वेदन : (सेन्सेशन). ज्या प्रक्रियेमुळे व्यक्तीला एखाद्या उद्दीपकाचे ज्ञान मिळते त्या प्रक्रियेलाच ‘वेदन’ असे म्हणतात. या प्रक्रियेत ‘वेदनेंद्रिये’ किंवा ‘ज्ञानेंद्रिये’ (सेन्स ऑर्गन्स) आणि ⇨तंत्रिका तंत्र वा मज्जासंस्था यांचा कार्यभाग महत्त्वाचा असतो. डोळे, नाक, कान, त्वचा आणि जीभ या ज्ञानेंद्रियांमुळे व्यक्तीला बाह्य जगतातील उद्दीपकांचे ज्ञान होत असते. या ज्ञानेंद्रियांमध्ये विशिष्ट अशा ‘ग्राही पेशी’ असतात. प्रत्येक ज्ञानेंद्रियातील ग्राही पेशी विशिष्ट प्रकारच्या उद्दीपकामुळे उत्तेजित होत असतात. ग्राही पेशी उत्तेजित झाल्यावर ही उत्तेजना विद्दुत्‌ रासायनिक प्रक्रियेद्वारा मज्जास्फुरणांत (नर्व्ह इम्पल्सेस) रुपांतरित होते. ही मज्जास्फुरणे ज्ञानेंद्रियांना केंद्रीय तंत्रिका तंत्राशी जोडणाऱ्या मज्जातंतूच्या द्वारा मेंदूकडे पाठविली जातात व यामुळॆ उद्दीपकासंबंधीचे जे ज्ञान मेंदूला मिळते त्यालाच ‘वेदन’ असे म्हणतात. अशा प्रकारे ज्ञानवाही मज्जातंतूंच्या द्वारे वेदनेंद्रिये मेंदूकडे उद्दीपकांची माहिती संप्रेषित करतात. आपल्या भोवतालच्या बाह्य जगाचे ज्ञान करुन देणारे माध्यम असे वेदन या प्रक्रियेचे वर्णन केले जाते. वेदन हे बोधात्मक अनुभवाचे अत्यंत मूलभूत आणि प्रारंभिक स्वरुप होय. वेदनांशिवाय आपल्याला बाह्य जगाचे ज्ञान होऊ शकत नाही.

तथापि आपल्या सभोवतालच्या जगाची जी जाणीव वेदनांद्वारा आपल्याला होत असते, त्यात निव्वळ वेदनांशिवाय अधिक काहितरी असते. बोधात्मक अनुभवांच्या बारकाईने केलेल्या परिक्षणातून ही बाब स्पष्टपणे दिसून येते. जेव्हा एखाद्या वस्तूकडे आपण पाहतो तेव्हा त्या वस्तूचा आकार, रंग इत्यादींचा प्रत्यय येतो. पण त्या वस्तूचा आकार आणि रंग या ज्ञानाबरोबरच ती वस्तू कोणती आहे, तिचे नाव काय आहे, तिचा उपयोग काय आहे इत्यादींचीही जाणीव त्या वस्तूकडे पाहताना आपल्याला होते. म्हणजेच त्या वस्तूपासून ‘वेदनेंद्रियातर्फे प्राप्त झालेले वेदन’ आणि ‘पूर्वानुभव, स्मृती, कल्पना इत्यादींच्या साहाय्याने त्या वेदनाचा लावला गेलेला अर्थ’ या दोहोंचाही वस्तुविषयक अनुभवात अंतर्भाव झालेला असतो. अशा प्रकारे आपल्याला होणारे वेदन हे निव्वळ वेदन नसून ते अर्थयुक्त असते. अशा अर्थपूर्ण वेदनालाच ‘संवेदन’ (परसेप्शन) असे म्हणतात. यावरुन वेदनाला बोधात्मक अनुभवातील प्रारंभिक किंवा मूलभूत अवस्था असे म्हटले जाते. वेदनाशिवाय वस्तूंची किंवा उद्दीपकांची जाणीव आपल्याला होऊ शकत नाही. पण वस्तुंविषयक प्रत्यक्ष अनुभवांमधील ही जाणीव अर्थपूर्ण असल्यामुळे आपला बोधात्मक अनुभव हा केवळ ‘वेदनात्मक’ नसून तो ‘संवेदनात्मक’ असतो ही याबाबतची वस्तुस्थिती होय. [→ संवेदन].

आपल्याला प्राप्त होणारी वेदने ही ज्याप्रमाणे बाह्य वस्तूंशी संबंधित असतात, त्याचप्रमाणे ती शरीरांतर्गत अवस्थांशीही संबंधित असू शकतात. शरीरांतर्गत अवस्थांमध्ये बदल झाल्याने जी वेदने निर्माण होतात, त्यांना ‘आंतरिंद्रिय वेदने’ असे म्हणतात. मळमळणे, गुदमरणे, भूक किंवा तहान लागणे, थकवा येणे इ. अनुभव आंतरिंद्रिय वेदनांमुळे येतात. अशा वेदनांचा आणखी एक प्रकार म्हणजे ‘स्नायुवेदन’ हा होय. स्नायुवेदनांमुळे आपल्याला शरीराची स्थिती, अवयवांचे परस्परसंबंध व त्यांच्या गतीसंबंधी ज्ञान मिळते. अवयवांच्या निरनिराळ्या हालचालींमध्ये सुसूत्रता निर्माण होण्यासाठी स्नायुवेदने अत्यंत महत्त्वाची असतात. स्नायूंमधील ग्राही पेशींचा ज्या मज्जातंतूंद्वारा मेंदूशी संबंध येतो ते मज्जातंतू दुखावले गेले, तर शरीराच्या स्थितीची व गतीची नीट ओळख आपल्याला होऊच शकणार नाही.

ज्ञानेंद्रियांमुळे प्राप्त होणाऱ्या वेदनांमध्ये खालील वैशिष्ट्ये दिसून येतात : (१) गुण : वेदनांचे जे निरनिराळे प्रकार आहेत, त्यांच्या गुणांमध्ये फरक आढळून येतो. उदा., आवाज आणि रंग या वेदनांमुळे प्राप्त होणाऱ्या अनुभवांमध्ये अगदी स्पष्टपणे फरक जाणवतो. पण एकाच प्रकारच्या वेदनक्षेत्रातही गुणात्मक फरक अनुभवता येतो. उदा., निळा आणि हिरवा हे दोन प्राथमिक आणि विशुध्द असे रंग बघत असताना त्यांच्यातील वेगळेपण अगदी स्पष्टपणे जाणवते. (२) तीव्रता : वेदनांच्या तीव्रतेत फरक असतात. एका विशिष्ट स्वरमानाचा आवाज ऐकत असताना जे वेदन जाणवते, ते त्याच्या विशिष्ट गुणाचे निदर्शक असते. पण याच आवाजाची तीव्रता वाढविली किंवा कमी केली असताना जो बदल घडून येतो, तोदेखील आपल्या लक्षात येतो. एकाच स्वरमानाच्या आवाजातील या चढउताराला ‘ध्वनिमहत्तेतील’ (लाउडनेस) बदल असे म्हणतात. अशा प्रकारे सर्वच वेदनक्षेत्रांत तीव्रतेनुसार बदल घडतात. (३) व्याप्ती : वेदनांचे हे वैशिष्ट्य व्यापकतेशी किंवा आकारमानाशी संबंधित आहे. विशेषतः दृष्टीच्या बाबतीत हे वैशिष्ट्य अगदी ठळकपणे लक्षात येते. उदा., खूप दूर अंतरावर असलेली वस्तू अतिशय लहान म्हणजे एखाद्या ठिपक्यासारखी दिसत असली, तरी ती आपल्या जवळ आली की बरीच मोठी दिसू लागते. हा बदल दृष्टिवेदनाची व्याप्ती वाढली आहे असे सूचित करतो. (४) कालावकाशता : कोणताही वेदनाचा अनुभव घेता येण्यासाठी काही काळपर्यंत ते टिकून राहणे जरुरीचे असते. अर्थात ते किती काळपर्यंत चालू असते, यावर त्याची परिणामकारता अवलंबून राहील. म्हणूनच एकाच तीव्रतेचा ध्वनी एक सेकंद एवढया कालावधीसाठीच ऐकला आणि तोच ध्वनी बऱ्याच काळपर्यंत ऐकला, तर त्याचा जो परिणाम घडून येईल त्यात फरक राहील. एवढे मात्र खरे की, कोणतेही वेदन काही काळपर्यंत टिकून राहणे आवश्यक आहे. (५) स्थानिक चिन्ह : दृष्टी आणि स्पर्श वेदनांच्या बाबतीत हे वैशिष्टय विशेषत्वाने लागू पडते. उदा., एकाच वस्तूचा त्वचेवर दोन ठिकाणी सारख्याच दाबाने स्पर्श झाला, तर स्थानिक चिन्हानुसार त्यांच्या वेदनगुणात फरक जाणवतो.

प्रत्येक ज्ञानेंद्रियाचा एका विशिष्ट प्रकारच्या उद्दीपकाशी संबंध येत असतो. उदा., प्रकाशमान ऊर्जा ही नेत्रेंद्रियाचा उद्दीपक होय. [→ डोळा]. अंधकारात किंवा मंद प्रकाशात ‘शलाका’ क्रियाशील होतात, तर तेजस्वी प्रकाशात ‘शंकू’ क्रियाशील होत असतात. म्हणूनच मंद प्रकाशातील वस्तूंचे वेदन शलाकांमुळे होते, तर तेजस्वी प्रकाशातील वस्तूंचे वेदन शंकूंमुळे होते. तसेच वर्णवेदन शंकूंमुळेच होते. अर्थात कोणत्या रंगाचे वेदन होईल हे शंकूंना उद्दीपित करणाऱ्या प्रकाशलहरींच्या लांबीवर अवलंबून असते. प्रकाशलहरींची लांबी ४०० नॅनोमीटर असेल, तर जांभळ्या रंगाचे वेदन होईल आणि ७०० नॅनोमीटरच्या आसपास असेल, तर लाल रंगाचे वेदन होईल. द्विनेत्रीय दृष्टीमुळे वस्तूंच्या घनतेचा व अंतराचा बोध होतो.

श्रवणाच्या ग्राही पेशी कर्णेंद्रियाच्या आतील भागात असलेल्या शंखकवचातील तलपत्रात आढळतात. ध्वनिलहरींनी उद्दीपित झाल्याने या ग्राही पेशींद्वारे श्रवणवेदन अनुभवले जाते. श्रवण उद्दीपकाचे ‘स्वर’ आणि ‘कोलाहल’ असे दोन प्रकार आहेत. ध्वनिलहरी अनुकालिक व नियमित असल्या तर स्वरनिर्मिती होते. अनियमित लहरींनी कोलाहल निर्माण होतो. गुरुत्व (ध्वनिमहत्ता), स्वरमान आणि नाद हे श्रवणवेदनाचे विशेष गुण होत. ‘उंच स्वर’ किंवा ‘खालचा स्वर’ असे जे आपण म्हणतो ते स्वरमानाचेच निदर्शक होय. ध्वनिलहरींच्या वारंवारतेवर स्वरमान अवलंबून असते. ध्वनिमहत्ता तरंगांच्या उच्चत्वावर अवलंबून असते. निरनिराळ्या स्पंदनांच्या मिश्रणाने निर्माण होणाऱ्या संकीर्ण स्पंदनावर नादगुण अवलंबून असतो. [→ कान].

शीत, उष्ण, दुःख व स्पर्श ही प्रमुख त्वचावेदने असून त्यांच्या ग्राही पेशींचे त्वचेवर बिंदूमय वितरण झालेले आढळते. या वेदनांच्या संदर्भात त्वचेचे वेगवेगळे भाग कमीअधिक प्रमाणात वेदनक्षम असल्याचे आढळून येते. त्वचा किंचित दबली किंवा ताणली गेली, की स्पर्शाची जाणीव होते. त्वचा कापली जाणे, अत्यंत उष्ण वस्तूचा स्पर्श होणे, विद्युत्‌ प्रवाहामुळे झटका बसणे, काही रासायनिक द्रव्यांचा (उदा., ॲसिड) त्वचेशी संबंध येणे इत्यादींचा दुःखवेदनांचे उद्दीपक या नात्याने उल्लेख करता येईल. ‘रुतणे’ आणि ‘जळणे’ या अनुभवांमुळे निर्माण होणाऱ्या दुःखवेदनात गुणात्मक फरक असतो असे काही तज्ज्ञांनी (उदा., वेडेल) मत व्यक्त केले आहे. रुतल्यावर किंवा टोचल्यावर इजा झालेला शरीराचा भाग एकदम मागे घेणे ही अनुक्रिया घडून येते. त्वचेच्या उष्णतामानापेक्षा अल्पांशाने कमी किंवा अधिक उष्णतेच्या उद्दीपकामुळे शीत किंवा उष्ण वेदन निर्माण होते. त्वचेत विविध प्रकारच्या ग्राही पेशी असल्यामुळे विविध वेदनांचा अनुभव येतो. [→ त्वचा].

गोड, कडू, आंबट व खारट ही प्रमुख रुचिवेदने होत. जिभेवर रुचिवेदनाची काही अंशी वेगवेगळी स्थाने आढळतात. उदा., अग्रभागी गोडाचे, तर घशाकडील बाजूला कडू स्वादाचे वेदन होते. तसेच जिभेच्या अग्रभागी पण दोन्ही बाजूंना खारट, तर दोन्ही बाजूंकडे पण थोडया मागील भागात आंबट ही चव अनुभवता येते. [→ जीभ रुचि].

गंधवेदन निर्माण करणाऱ्या, ग्राही पेशी नाकातील एका अस्तरात आढळतात. श्वासाबरोबर येणाऱ्या गंधकणांनी त्या रासायनिक रीत्या उद्दीपित होतात. गंधवेदनांचे उद्दीपक वायुरुप असतात. मसालेदार गंध, राळगंध, दूषित गंध, जळकट गंध इ. गंधवेदने आपण अनुभवत असतो. [→ गंध नाक].

प्रत्येक ज्ञानेंद्रियाला त्याच्याशी संबंधित मेंदूतील वेदनकेंद्राशी जोडणारी एक वेदनवाहक चेता वा नस असते. ज्ञानेंद्रिय व मेंदू यांच्यातील या संबंधामुळेच आपल्यावर विविध उद्दीपकांचा परिणाम होत असतो. प्रत्येक ज्ञानेंद्रियाचा मेंदूमधील त्याच्याशी संबंधित वेदनकेंद्राशी स्वतंत्रपणे संबंध प्रस्थापित झालेला असतो व म्हणून विशिष्ट वेदनकेंद्राशी संबंधित मज्जातंतू उद्दीपित झाल्याने येणारा वेदनात्मक अनुभव त्या केंद्राद्वारा नियंत्रित केल्या जाणाऱ्या वेदनाशी संबंधित असतो. दृष्टिवेदन, श्रवणवेदन, गंधवेदन इ. भेद आपल्याला त्यामुळेच स्पष्टपणे जाणवतात.

एकाच वेदनक्षेत्रातील भेद ओळखता येण्यामागील कारणांचा शोध घेण्याचे अनेक प्रयत्न झाले आहेत. एकाच वेदनप्रकारातील गुणात्मक फरक काही अंशी स्थानविषयक संघटनावर, तर काही अंशी ग्राही पेशींच्या वैशिष्ट्यांवर अवलंबून असतो असे म्हणता येईल.

पंडित, र. वि. कुळकर्णी, अरुण

वेदन, तत्त्वज्ञानातील : पाश्चात्त्य तत्त्वज्ञानाच्या इतिहासात सोळाव्या शतकात प्रत्यक्षाचे स्वरुप आणि त्याची वैधता यांसंबंधीचा विचार मुख्यतः ज्ञानमीमांसेच्या संदर्भात होऊ लागला. ⇨रने देकार्त, ⇨जॉन लॉक यांसारख्या आधुनिक तत्त्ववेत्त्यांनी या प्रश्नांचा विचार करताना प्रतिबिंबात्मक वास्तववाद (रिप्रेझेंटेटिव्ह रीॲलिझम) स्वीकारला. लॉकच्या मते भौतिक वस्तूंच्या रंग, गंध, नाद, स्पर्श इत्यादींसंबंधी आपल्यामध्ये निर्माण होणाऱ्या संवेदना या आपल्याला वस्तूंच्या गुणधर्मांचे पूर्णतः वस्तुनिष्ठ ज्ञान देऊ शकत नाहीत. या संवेदना भौतिक वस्तू आणि ज्ञानेंद्रिये यांच्या आंतरक्रियांमधून निर्माण होतात. त्यामुळे अंशतः तरी त्या ज्ञातृसापेक्ष असतात. त्यांचे वस्तूंच्या विद्यमान गुणधर्मांशी साम्य नसते आणि त्यांचे स्वरुप हे प्रातिनिधिक असते. याचाच अर्थ असा, की बाह्य वस्तूंचे आपल्याला होणारे ज्ञान हे परोक्ष, अप्रत्यक्ष आणि प्रतिबिंबात्मक असते. या सिद्धांताची तार्किक परिणती ही संशयवाद किंवा चिद्वाद यामध्ये होते.

विसाव्या शतकातील ⇨जॉर्ज एडवर्ड मुर, ⇨बर्ट्रंड रसेल यांसारख्या विश्लेषणवादी तत्त्वज्ञांनी चिद्वादाला विरोध करताना वेदन या शब्दाचे चिकित्सक विश्लेषण केले. वेदनाचे अस्तित्त्व हे ज्ञात्याला ते जेवढा काळ होत राहील, तेवढा काळ असते. म्हणजेच वेदनांचे अस्तित्व ज्ञात्यावर अवलंबून असते. मुरप्रणीत क्रिया- वस्तू विश्लेषणानुसार (ॲक्ट/ ऑब्जेक्ट ॲनॅलिसिस) प्रत्यक्षात, वेदनांची जाणीव किंवा वेदन (सेन्सिंग) आणि त्यांचे विषय असे दोन भाग असतात. जाणिवेचे अस्तित्व ज्ञात्यावर अवलंबून असले तरी जाणीव-विषयांचे अस्तित्व ज्ञात्यावर अवलंबून असेलच असे नाही. हा फरक स्पष्ट करण्यासाठी मुरने या जाणीव- विषयांचे ‘वेदनदत्त’ (सेन्स-डेटम) असे नामाभिधान केले. वेदन हे व्यक्तिगत असते, तशीच वेदनदत्तेही व्यक्तिगत असतात पण त्याचबरोबर वेदनाचे विषय असल्यामुळे वेदनदत्तेही व्यक्तीपेक्षा वेगळी, बाह्य असतात संवेदनांप्रमाणे पूर्णतः अंतर्गत नसतात. वेदनाचे विषय हे व्यक्तीने निर्माण केलेले नसतात, तर तिला ‘दिले गेलेले’ असतात म्हणून त्यांना वेदनदत्ते असे म्हटले जाते.

वेदनदत्ते ही वेदनाचे अपरोक्ष आणि प्रत्यक्ष विषय आहेत असे मानले गेले. याचाच दुसरा अर्थ असा, की वेदनदत्तांच्या बाबतीत संशयाला थारा राहत नाही. याचमुळे वेदनदत्तांचे ज्ञान प्रमादरहित आणि भविष्यातही कुठल्याही दुरुस्त्या करण्याची आवश्यकता नसलेले असे मानले गेले. या संशयातीत ज्ञानाच्या पायावर अनुभवाधिष्ठित ज्ञानाची इमारत रचता येईल, अशी आशाही बाळगली गेली. मात्र वेदनदत्तांचे बाह्य वस्तूंशी असलेले नाते वा संबंध नक्की कशा प्रकारचे आहे, तसेच असंवेदित (अन्‌सेन्स्‌ड) वेदनदत्तांना अस्तित्व असू शकते का, असल्यास त्यांचे स्वरुप काय असेल, या प्रश्नांची समानधानकारक उत्तरे न मिळाल्यामुळे हा सिद्धांत नंतर बराच वादग्रस्त ठरला. भाषिक तत्त्वज्ञान अंगीकारणाऱ्या जे. एल्‌. ऑस्टिन, गिल्बर्ट राइल या तत्त्ववेत्त्यांनीही त्यातील महत्त्वाच्या त्रुटी दाखवून त्यावर टीका केली आहे. मात्र हे मान्य करायला हवे, की वेदनदत्तांच्या सिद्धांताने ज्याप्रमाणे बर्क्लीप्रणीत आत्मनिष्ठ चिद्वादाला (सब्जेक्टिव्ह आयडीॲलिझम) छेद देणे शक्य झाले, त्याचप्रमाणे वास्तववादाच्या भिन्न सिद्धांतासंबंधी तत्त्वतः तटस्थ भूमिका घेणेही शक्य झाले.

गंगावणे, दीप्ती

पहा: मानसभौतिकी मेंदू शरीरक्रिया मानसशास्त्र संवेदन ज्ञानेंद्रिये.

संदर्भ : 1. Geldard, Frank A. The Human Senses, New York, 1972.            2. Gibson, J. J. The Senses Considered as Perceptual Systems, Boston, 1966.