वेडरबर्न, विल्यम : (२५ मार्च १८३८–२५ जानेवारी १९१८). जन्माने स्कॉटिश असलेले वेडरबर्न भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष (१८८९-मुंबई व १९१०- अलाहाबाद) होते. जन्म एडिंबरो येथे. एडिंबरो विद्यापीठातून ते पदवीधर झाल्यानंतर आय्. सी. एस्. ची परीक्षा उत्तीर्ण होऊन (१८६०) ते नोकरीनिमित्त हिंदुस्थानात आले. उपजिल्हाधिकारी व जिल्हाधिकारी (धारवाड) व पुढे न्यायाधीश म्हणून त्यांनी पुणे, अहमदनगर इ. ठिकाणी काम केले. अखेर मुंबई इलाख्याचे मुख्य सचिव म्हणून ते निवृत्त झाले (१८८७). निवृत्तीनंतर काँग्रेस अधिवेशनाच्या निमित्ताने ते हिंदुस्थानात येत असत.
शासकीय सेवेत असताना त्यांनी शेतकरीवर्गाच्या प्रश्नांमध्ये विशेष लक्ष घातले तथापि भारतातील शेतकऱ्यांवची मुख्य समस्या भांडवलाचा अभाव असून कर्जबाजारीपणामुळे जमिनीच्या खटल्यांसाठी खेडोपाडी लवाद न्यायालये असावीत, असे त्यांनी सुचविले. १८७६ च्या दुष्काळाच्या वेळी शेतकऱ्यांचे दंगे झाले, त्यासाठी जी चौकशी-समिती नेमली तीत भारतीय शेतकऱ्यांची बाजू त्यांनी मांडली. त्यांनी शेतीला मर्यादित व्याजदरात कर्ज उपलब्ध व्हावे, यासाठी सहकारी शेतकी बँकेची योजना मांडली. तसेच जंगलतोडीबद्दल त्यांनी धोक्याचा इशारा दिला. ‘भारतीय दुष्काळ संघटने’त (१९०१) दादाभाई नवरोजी, रमेशचंद्र दत्त इत्यादींबरोबर वेडरबर्न यांचाही समावेश होता.
शासकीय सेवेत असतानाच त्यांनी इंडियन नॅशनल काँग्रेसच्या स्थापनेत (१८८५) भाग घेतला आणि काँग्रेसच्या माध्यमातून भारतीयांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न केले. निवृत्तीनंतर ते इंग्लंडला परत गेले व पुढे ते ब्रिटिश संसदेवर निवडून आले (१८९३). वेल्बी आयोगासमोर त्यांनी भारतीयांतर्फे साक्ष दिली (१८९५). इंग्लंडमध्ये स्थापिलेल्या भारतीय संसदीय समितीचे ते अध्यक्ष (१८९३-१९००) होते. मुंबई येथील काँग्रेसच्या पाचव्या अधिवेशनांचे ते अध्यक्ष होते (१८८९). यावेळी हिंदुस्थानच्या राजकीय हक्कांची पहिली योजना तयार करण्यात आली. तसेच सारावाढ व सारावसुली यांच्या जुलूमाविरुध्द निषेधपर ठराव संमत करण्यात आले. पुढे त्यांच्याच अध्यक्षतेखामी २६ डिसेंबर १९१० रोजी अलाहाबाद येथे पंचविसावे अधिवेशन झाले.
काकडे, सुप्रिया सु.