वेंकटराममूर्ति, गिडुगु : ( ? – १८६३-२४ जानेवारी १९४०). तेलुगू लेखक. जन्म गोदावरी जिल्ह्यातील (आंध्र प्रदेश) इंदुपल्ली या गावी. लहानपण पर्वतालपेटा या गावी गेले. त्यानंतर शालेय शिक्षणासाठी ते विजयानगरम्ला आले. पुढे १८९६ साली ते बी. ए. झाले. १९११ पर्यंत त्यांनी पर्लाकिमिडी येथे अध्यापनाचे काम केले. त्याच सुमारास त्यांना भाषावैज्ञानिक अध्यायनाची आवड निर्माण झाली. त्यांनी अनेक कोरीव लेखांचे अध्ययन करुन त्यांवर काही लेख लिहिले. दिरघशी व तिसरा वज्रहस्त यांच्या कोरीव लेखांवरील त्यांची अभ्यास-टिपणे एपिग्राफिका इंडिकामध्ये प्रकाशित झाली. मुखलिंगम् येथील देवळांच्या भिंतीवरील लेख राममूर्तींनी प्रथम प्रकाशात आणले. त्या स्थानाचा अभ्यास करुन गंग घराण्याची राजधानी कलिंगनगर नसून मुखलिंगम् हीच असली पाहिजे, असे त्यांनी अनेक प्रमाणे देऊन लिहिलेल्या अँटिक्विटिज ऑफ मुखलिंगम् या ग्रंथाद्वारे सिद्ध केले.
राममूर्तींचे सर्वांत महत्त्वाचे कार्य म्हणजे आंध्र प्रदेश-ओरिसा या राज्यांच्या सरहद्दींजवळ बोलल्या जाणाऱ्या ‘सवर’ या बोलीभाषेचा अभ्यास हे होय. सवर संस्कृती व सवर भाषा यासंबंधी विपुल साहित्य त्यांनी गोळा केले. बोलीच्या अभ्यासाविषयी तेलुगूमध्ये सर्वप्रथम लिहिणारे भाषाअभ्यासक राममूर्ती हेच होत. सवर भाषेवर काही संशोधनग्रंथ त्यांनी प्रसिद्ध केले. १८९० ते १९१० या दरम्यान सवर-तेलुगू निघंटू (शब्दकोश) आणि तेलुगू- सवर निघंटू, सवर-वाचकमु इ. ग्रंथांतून त्यांनी सवर-तेलुगू भाषांच्या संबंधांवर महत्त्वपूर्ण प्रकाश टाकला.
विसाव्या शतकाच्या प्रारंभकाळात तेलुगू साहित्यनिर्मितीची भाषा ग्रांथिक असावी की व्यावहारिक असावी, असा वाद निर्माण झाला होता. या वादात राममूर्तींनी ग्रांथिक भाषेच्या विरोधात व्यावहारिक भाषेचे (बोलीभाषेचे) जोरदार समर्थन केले. प्राचीन ग्रांथिक शैलीपेक्षा व्यावहारिक भाषा तेलुगू साहित्याच्या निर्मितीस जास्त पोषक असल्याचे आपले मत त्यांनी प्रभावीपणे मांडले. पुढे त्यांनी व्यावहारिक भाषेचे उपयोजन केवळ गद्य लेखनामध्ये करावे, पद्यासाठी करु नये, अशीही पुस्ती जोडली. त्यांनी १९१९ पासून व्यावहारिक भाषेची लोकप्रियता वाढविण्यासाठी तेलुगू नावाचे पत्र काही काळ चालविले. त्यांनी निर्माण केलेल्या काही साहित्यकृती पुढीलप्रमाणे होत : (१) बालकवि शरण्यमु (२) व्यासमज्जरी (३) पंडित भिषक्कुल भाषा भेषजमु व (४) गद्य चिंतामणि.
श्रीकाकुलम् येथे त्यांचे निधन झाले.
लाळे. प्र. ग.
आपल्या मित्रपरिवारात शेअर करा..