वेंकटेश्वरराव, काटुरि : (१५ ऑक्टोबर १८९५- ? -१९६०). प्रसिद्ध तेलुगू कवी. जन्म काटुरु (जि. कृष्णा) येथे. त्यांचे शिक्षण व बरेचसे वास्तव्य मच्छलीपटनम्‌ला झाले. मच्छलीपटनम् येथील ‘हिंदू हायस्कूल’ मध्ये शिकत असतानाच, चेळ्‌ळपिळ्‌ळ वेंकटशास्त्री यांच्या प्रेरणेने त्यांनी पिंगली लक्ष्मीकांतम्‌ (१८९४-१९७२) यांच्या समवेत काव्यलेखनास प्रारंभ केला. तोलकरि (१९२३) हा त्यांचा एकत्रित रीत्या लिहिलेल्या कवितांचा पहिला काव्यसंग्रह होय. १९२१ मध्ये बी. ए. च्या शेवटच्या वर्षाला असताना त्यांनी महात्मा गांधींनी सुरु केलेल्या असहकारितेच्या चळवळीत भाग घेतला. १९३० च्या चळवळीत त्यांना चार महिने कारावासाची शिक्षाही झाली. मच्छलीपटनम्‌ येथील आंध्र जातीय कलाशाळेत १९३२ ते १९३९ पर्यंत ते तेलुगूचे अध्यापक होते. पुढे १९३९ ते १९४३ पर्यंत ‘नॅशनल कॉलेज’ चे प्राचार्य म्हणून त्यांनी काम पाहिले. त्यानंतर बरीच वर्षे ते कृष्णपत्रिका  या साप्ताहिकाचे संपादक होते. पिंगली लक्ष्मीकांतम् हे त्यांचे जोडीदार कवी होत. पिंगली लक्ष्मीकांतम् हे प्रख्यात कवी, समीक्षक व विद्वान असून आंध्र विद्यापीठात अनेक वर्षे तेलुगूचे प्राध्यापक होते. या दोघा कवींच्या संयुक्त काव्यरचना प्रसिद्ध आहेत. सौंदरनंदमु (१९३२) हे काव्य दोघांनी संयुक्त रीत्या रचले. ते जरी संस्कृतचा अनुवाद असले, तरी त्यातील मौलिकता लक्षणीय आहे. या काव्यात गांधीजींच्या तत्त्वज्ञानाचा परोक्ष रीत्या प्रचार केला आहे. दोघा कवींच्या तोलकरि  व पौलस्त्य हृदयमु (१९३८) या काव्यांत व्युत्पन्नता व तरल भावुकता यांचा सुंदर संगम अढळतो. हरिजनांचा मंदिरप्रवेश या विषयाचा अविष्कार करणारी गुडिघंटालु ही त्यांची कविताही त्या काळात लोकप्रिय ठरली. त्यांनी संस्कृत व इंग्रजी साहित्यकृतींचे उत्तम अनुवादही केले. प्रतिज्ञायौगन्धरायण (१९२६) व स्वप्नवासवदत्ता (१९३६) ही त्यांची भाषांतरित संस्कृत नाटके होत. नल्लगलुव (१९२५) हा आलेक्सांद्र द्यूमाच्या द ब्लॅक ट्यूलिप या कादंबरीचा अनुवाद आणि तपोवनम् हा रवींद्रनाथ टागोरांच्या अध्यात्मिक प्रवचनांचा अनुवाद हे विशेष उल्लेखनीय आहेत. वेंकटेश्वरराव काटुरी व पिंगली लक्ष्मीकांतम् या कविद्वयांनी ⇨तिरुपति-वेंकटकवुलु  या कविद्वयांची परंपरा यशस्वीपणे पुढे चालविली. संस्कृत व इंग्रजी साहित्यांतील विविध शैलींच्या अध्ययनामुळे त्यांच्या रचनेत अभिजातता व आधुनिकता यांचा उचित समन्वय साधला गेल्याचे दिसून येते.               

लाळे, प्र. ग.