वृषण : मानवी जनन तंत्रामध्ये पुरुषाच्या शरीरात युग्मक कोशिका (विभाजनाद्वारे पक्व जनन कोशिका निर्माण करणाऱ्या कोशिका) निर्माण करणाऱ्या ग्रंथीला वृषण म्हणतात. जनन तंत्राच्या कार्यास चालना देणारे⇨पौरुषजन (ॲंड्रोजेन) हे हॉर्मोन (उत्तेजक स्राव) स्रवणाऱ्या कोशिकाही (पेशीही) याच ग्रंथीत असतात. वृषणांची जोडी ⇨अंड (स्त्री बीज) निर्माण करणाऱ्या ⇨अंडकोशाप्रमाणे उदराच्या गुहेत न राहता त्याच्याबाहेर असलेल्या मुष्क या पिशवीसारख्या कोशात असते. हत्ती व सागरी सस्तन प्राण्यांमध्ये मात्र ती उदरगुहेतच आढळते.
भ्रूणविज्ञान : कटिभागात असलेल्या जनन कोशिकांच्या स्तंभापासून पुरुषात वृषण किंवा स्त्रीमध्ये अंडकोश यांची निर्मिती होते. वाय गुणसूत्रांच्या [→गुणसूत्र] नियंत्रक क्रियेमुळे जनन कोशिकांचे रुपांतर वृषणात होते. वारेतून [→वार-२] निर्माण झालेले ⇨जरायू जनन ग्रंथिपोषी हे हॉर्मोन लगेच या वृषणावर कार्य करु लागते. गर्भावस्थेच्या चौथ्या महिन्यात या हॉर्मोनाची निर्मिती जेव्हा विशेष वाढते तेव्हा वृषणातून पौरूषजन हॉर्मोनाची निर्मितीही वाढते. त्यामुळे गर्भाच्या लैंगिक इंद्रियांचा विकास होण्यास मदत होते. वृषणाची निर्मिती श्रोणि (कटि) – प्रदेशात झाल्याने त्याच्या रक्तवाहिन्या व तंत्रिका (मज्जा) तेथूनच प्राप्त झालेल्या असतात. त्यांच्यासह दोन्ही वृषणे हळूहळू खाली सरकू लागलात आणि उदर व मांडी यांच्या सीमेवरील यांच्या स्नायूंच्या स्तरांमधील वंक्षण नालीत प्रवेशतात. या नालीच्या खालच्या टोकातून बाहेर पडून श्रोणी मेखलेची कड ओलांडून प्रत्येक वृषण आपापल्या बाजूच्या मुष्क कक्षात येऊन पोहोचते. बहुतेक नवजात अर्भकात ही क्रिया जन्मापूर्वी पूर्ण होते. इतरांमध्ये जन्मानंतर, परंतु पौगंडावस्थेपूर्वी ती पूर्ण होते. ती जर अपूर्ण राहिली तर अनावरोहित किंवा गुप्त वृषण स्थिती निर्माण होऊन त्यामुळे शुक्राणू (पुं-जनन कोशिका) निर्माण करण्याच्या कार्यात बाधा येते व वंध्यत्व येऊ शकते. वृषणाच्या या अवरोहणाबरोबरच वंक्षण नालीमध्ये झालेली पोकळी नंतर हळूहळू बुजते. त्यात उणीव राहिल्यास या मार्गातून लहान आतड्याचे एखादे वेटोळे ढकलले जाऊन वंक्षण अंतर्गळ (हार्निया) निर्माण होण्याची शक्यता असते. [→अंतर्गळ भ्रूणविज्ञान].
शारीर व कार्य : प्रौढावस्थेतील वृषण अंडाकृती असून त्याच्या मागील पृष्ठभागावर अधिवृषणाचा पृष्ठभाग टेकलेला असतो. अधिवृषण हे वृषणाला समांतर असून त्याचे शीर्ष वरच्या टोकाला असते. तेथेच ते वृषणाला जोडलेले असते. खालच्या टोकाला असलेल्या त्याच्या पुच्छापासून दोरीसारखी जाड रेतोवाहिनी निघते. ही रेतोवाहिनी वरच्या दिशेने वळून वंक्षण नालीत प्रवेश करते व त्या मार्गाने उदरात जाऊन श्रोणि-प्रदेशातील रेताशयाला मिळते. वृषणाच्या रक्तवाहिन्या, तंत्रिका आणि रेतोवाहिनी या सर्वांच्या एकत्रित असलेल्या रचनेला रेतरज्जू असे म्हणतात. वंक्षण नालीत तो घट्ट बसलेला असतो.
वृषणाभोवती एक श्वेत प्रावरण आणि त्याच्यावर परिवृषण अशी दोन पटले असतात. श्वेत प्रावरणापासून आत जाणाऱ्या अनेक पडद्यांमुळे वृषणातील ऊतकाचे (समान रचना व कार्य असलेल्या कोशिकासमूहाचे) कप्प्यांमध्ये विभाजन झालेले असते. प्रत्यक्ष वृषणाभोवती स्नायूंचे आवरण नसते परंतु संपूर्ण वृषणकोशाला आधार देणारा वृषणकोशनिलंबी स्नायू उदराच्या खालच्या टोकापासून वृषणकोशाच्या त्वचेखालील भागात पसरलेला असतो. त्वचेला थंड स्पर्श झाल्यास ⇨प्रतिक्षेपी क्रियेने हा स्नायू आकुंचन पावून वृषणे वर उचलली जातात आणि मुष्काचा आकार लहान होतो. नवजात अर्भकात या क्रियेने वृषण अंशतः वंक्षण नालीमध्ये जाऊन गुप्तवृषणतेचा आभास निर्माण होऊ शकतो.
वृषणाची सूक्ष्म संरचनाही (१) रेतोत्पादक नलिकांचे जाळे व (२) अंतराली (त्यात असलेले पण त्याच्यापुरते मर्यादित नसलेले) ऊतक व त्यातील अंतःस्रावी कोशिका या दोन प्रकारच्या ऊतकांची बनलेली असते.
रेतोत्पादक नलिकांची संख्या प्रत्येक वृषणात सु. ४०० ते ६०० असते. एकंदर लांबी २५० मी. असलेल्या या नलिका रोज सु. तीन कोटी शुक्राणू निर्माण करतात. पौगंडावस्थेपासून वयाच्या सत्तरीपर्यंत ही क्रिया चालू राहते. नलिकेत जनन कोशिका आणि स्तंभाकार सर्टोली कोशिका (एन्रिको सर्टोली या इटालियन शरीरक्रियावैज्ञानिकांवरुन पडलेले नाव) अशा दोन प्रकारच्या मुख्य कोशिका असतात. परिघीय भागात जनन कोशिकांचे एकमेकींना जोडून तयार झालेले जाळे असते व त्यांपासून निर्माण झालेले आद्यशुक्राणू जोडलेल्या स्थितीतच असतात. या कोशिकांच्या आतल्या बाजूला सर्टोली कोशिकांचे जाळे असते. त्यांच्यामागून मार्ग काढत शुक्राणूंच्या विविध अवस्था नलिकेच्या पोकळ भागाकडे जात असतात. आद्यशुक्राणूंचे पाच-सहा वेळा सूत्रीविभाजन [→ कोशिका] झाल्यावर प्राथमिक शुक्रकोशिका तयार होतात. त्यांचे अर्धसूत्री विभाजन दोन अवस्थांमधून झाल्यावर प्रशुक्राणू या शुक्राणूच्या उपांत्य अवस्थेची निर्मिती होते. नलिकेच्या मधल्या पोकळ भागापर्यंत येऊन पोहोचलेले हे प्रशुक्राणू नंतर आपल्या शरीराचा बराच मोठा भाग टाकून देतात. या अवशिष्ट पिंडापासून मुक्त झालेली, लांबट आकाराची वळवळणारी कोशिका म्हणजेच शुक्राणू (शुक्रकोशिका) होय. या शुक्राणूंच्या पोषणासाठी व नलिकेतून परिवहनासाठी आवश्यक असा नलिकाद्रव सर्टोली कोशिकांपासून निर्माण होतो. हा द्रव व बीजे रेतोत्पादक नलिकांच्या संवलित (गुंडाळीसारख्या) जाळ्यातून पुढे सरकत सरलवाहिन्यांच्या वृषणजालिका या नावाने ओळखल्या जाणाऱ्या क्षेत्रात पोहोचतात व तेथून अपवाही (बाहेर वाहून नेणाऱ्या) वाहिन्यांमधून अधिवृषणात गोळा होतात[→वीर्य ], मेंदूतील पोष ग्रंथींपासून स्रवणारे पुटक उद्दीपक (फॉलिकल स्टिम्युलेटिंग हॉर्मोन FSH) हे हॉर्मोन सर्टोली कोशिकेच्या कार्यासाठी आवश्यक असे उद्दिपन करते. उलट सर्टोली कोशिकांमधून निघणारा इन्हीबीन हा पदार्थ ऋणपुनः प्रदानाने (जेव्हा एखाद्या प्रक्रियेचे परिणाम फारच मोठे असतात, तेव्हा तिची त्वरा वा आदान कमी करुन ती प्रक्रिया स्थिर करणाऱ्या पुनःप्रदानाने) पोष ग्रंथीवर नियंत्रण ठेवतो. याशिवाय वृषणातील अंतराली कोशिका टेस्टोस्टेरोन हॉर्मोनाद्वारे सर्टोली कोशिकांना उत्तेजित करतात.
अंतराली ऊतकात नलिकांना आधार देणारे संयोजी (जोडणारे) ऊतक, लसीकाद्रवासारखा[ →लसीका तंत्र ] ऊतकद्रव, सूक्ष्म रक्तवाहिन्यांचे जाळे इ. साधारणपणे सर्व इंद्रियांत आढळणारे घटक आढळतात. त्यांच्यामध्ये अंतःस्रावी कोशिका विपुलपणे पसरलेल्या असतात. वृषणाच्या एकंदर वजनाच्या सु. १०% असलेल्या या कोशिकांना लायडिख कोशिका (फ्रांट्स फोन लायडिख या जर्मन शारीरशास्त्रज्ञांच्या नावावरुन पडलेले नाव) म्हणतात. टेस्टोस्टेरोन या पौरुषजन हॉर्मोनाची निर्मिती त्या करतात. ही क्रिया पौगंडावस्थेपासून सुरु होते. गर्भावस्थेत अशाच स्वरुपाचे कार्य सुरु असते परंतु जन्मानंतर तीन ते चार महिन्यांनी ते पूर्णपणे थांबलेले असते. पौगंडावस्थेपासून मेंदूतील ⇨पोष ग्रंथीतून पीतपिंडकारी हॉर्मोनाची (ल्युटिनायझिंग हॉर्मोनाची LH) निर्मिती मोठ्या प्रमाणात सुरु होते त्याच्या प्रभावामुळे लायडिख कोशिका पुन्हा सक्रिय होतात. स्त्रीशरीरात हेच हॉर्मोन अंडकोशावर प्रभाव घडवून ग्राफियन अंडपुटकाचे रुपांतर पीतपिंडात करत असते. सर्टोली कोशिका आणि पोष ग्रंथी यांमधील ऋणपुनःप्रदानी संबंधाप्रमाणेच लायडिख कोशिका व पोष ग्रंथी यांमध्येही ऋणपुनःप्रदानी नाते असते. एवढेच नव्हे, तर हे पुनःप्रदान पोष ग्रंथीच्या वरच्या पातळीवर अधोथॅलॅमसावरदेखील क्रियाशील असते.
टेस्टोस्टेरोनाची अल्प प्रमाणात निर्मिती अधिवृक्कामध्ये होते व निष्क्रियीकरण यकृतात होते. लायडिख कोशिकांमधून बाहेर पडलेल्या टेस्टोस्टेरोनाचा काही अंश विसरणाने (विखुरला जाऊन) जवळच्या सर्टोली कोशिकांपर्यंत पोहोचून रेतोत्पादनास चेतना देत असतो आणि बाकीचा भाग रक्तात शोषला जाऊन शरीरभर पसरतो. त्याच्या प्रभावामुळे रेताशय, पुरःस्थ ग्रंथी, शिश्न यांसारख्या जनन तंत्रीय इंद्रियांची वाढ आणि क्रियाशीलता टिकविली जाते. पौगंडावस्थेत निर्माण होणारी दुय्यम लैंगिक लक्षणे दिसू लागतात उदा., चेहेऱ्यावरील (दाढीमिशांचे) केस, शरीरावरील केस, स्वरयंत्र मोठे होऊन आवाजात बदल होणे, त्वचेवरील (त्वक्-स्नेह ग्रंथींतून स्रवलेला वंगणासारखा) तेलकट वसास्राव निर्मिती इत्यादी. मेंदूवरील क्रियेमुळे कामप्रेरणा उत्तेजित होते. यांशिवाय टेस्टोस्टेरोनाचे प्रथिन चयापचयावर [शरीरात सतत चालणाऱ्या भौतिक व रासायनिक घडामोडींवर→चयापचय] उपचयी (चयापचयाचे विधायक) परिणाम घडून येत असतात. त्यामुळे स्नायू व हाडांची वाढ होण्यास मदत होते.
वृषणाचे विकार : वर दिल्याप्रमाणे अनावरोहित वृषणाची स्थिती दीर्घकाळ टिकल्यास शुक्राणुनिर्मितीवर अनिष्ट परिणाम होऊ शकतो. लहान मुलांच्या ⇨गालगुंड या विषाणुजन्य रोगात कधीकधी वृषणशोथ (वृषणाची दाहयुक्त सूज) होऊन वेदना निर्माण होतात परंतु त्याचा जनन कोशिकांवर विशेष परिणाम होत नाही.⇨अंडवृद्धीत (जलवृषणात) मुष्काच्या पोकळीत द्रव साठल्यामुळे वृषणाचा आकार वाढतो. हत्ती रोगात लसीकावहनाच्या अवरोधामुळे कधीकधी मोठ्या प्रमाणात मुष्काची वाढ होते. वृषणातील जनन कोशिकांवर प्रारणाचा (तरंगरुपी उर्जेचा) अनिष्ट आणि कायमस्वरुपी परिणाम होण्याचा धोका असतो. म्हणून निदान, उपचार आणि व्यावसायिक उपयोग यांमध्ये प्रारणाचा उपयोग करताना संरक्षणासाठी योग्य ती काळजी घ्यावी लागते.⇨उपदंश ⇨परमा,⇨ क्षयरोग या संक्रमणांमुळे अधिवृषणशोथ होऊ शकतो. वृषणातील विविध प्रकारच्या कोशिकांपासून मातक अर्बुदांची निर्मिती होऊ शकते.
पहा : अंडवृध्दि जनन ग्रंथि जनन तंत्र पुंस्त्वविद्या प्रजोत्पादन लिंग लैंगिक वैगुण्ये शुक्राणु.
संदर्भ : 1. Findlay, A. L. R. Reproduction and the Foetus, London, 1984.
2. Wilson, J. D. Foster, D. W., Eds., William’s Textbook of Endocrinology, Philadelphia, 1985.
3. Wingard, L. B. Human Pharmacology : Molecular to Clinical, London, 1991.
श्रोत्री, दि. शं.