वृत्ति : (ॲटिट्यूड). सामाजिक मानसशास्त्रातील एक महत्त्वपूर्ण संकल्पना. वृत्तीची व्याख्या नेहमीच काहीशी लवचिक राहिली असली, तरी स्थूलमानाने असे म्हणता येईल, की एखादी व्यक्ती, वस्तू, परिस्थिती, घटना, कल्पना इत्यादींना विशिष्ट प्रकारे प्रतिक्रिया देण्याची व्यक्तीची प्रणवता वा कल म्हणजे वृत्ती होय. वृत्ती ही बरीचशी स्थायी असते. ती सतत बदलणारी भावावस्था वा क्षणिक लहर नव्हे.

वृत्ती ह्या कमीजास्त अंशानी सकारात्मक वा नकारात्मक असू शकतात. व्यक्तींच्या व्यक्तिगत अनुभवांतून आणि ग्रहणप्रक्रियेतून त्या विकसित झालेल्या असतात आणि ह्याच प्रक्रियेतून त्यांच्यात कधीकधी परिवर्तन होऊ शकते, असे सामान्यतः मानले जात असले तरी त्या आपल्याला जनुकांमधून प्राप्त होतात, असे मतही मांडले गेले आहे.

व्यक्ती आपल्या जीवनारंभापासून अनेक समूहांमधून वावरत असते. उदा., कुटुंब, शेजारी, समवयस्क मित्रमैत्रिणी, विविध धार्मिक, वांशिक, सांस्कृतिक गट इत्यादी. ह्या सर्वांचा कमीअधिक प्रभाव व्यक्तिजीवनावर पडून व्यक्ती त्यांच्या वृत्ती आत्मसात करण्याची शक्यता असते तथापि अशा अनुभवस्रोतांपासून व्यक्तीसमोर येणारी मूल्ये आणि विश्वास ह्यांचा स्वीकार करताना व्यक्ती आपल्या मानसिक वा अन्य प्रकारच्या वैयक्तिक गरजांचा किंवा तिच्या दृष्टीने कोणती मूल्ये केंद्रवर्ती महत्त्वाची ठरतात, ह्यांचा विचारही करु शकते. त्यातून काही मूल्यांचा ती अव्हेरही करील. अशा स्वीकारातून वा अव्हेरातूनच अखेरीस व्यक्तीच्या वृत्ती व तिचे अनन्यसाधारण असे व्यक्तिमत्व घडत गेलेले असते.

काही निकषांवर माणसांचे वर्ग पाडून त्यांतील एकेका वर्गाच्या संदर्भात देण्याची विशिष्ट सकारात्मक वा नकारात्मक प्रतिक्रिया निश्चित झाली की तिला वृत्तीचे स्वरुप येते, असेही दिसते. उदा., माणसांच्या त्वचेच्या विशिष्ट रंगावरुन त्या रंगाच्या लोकांचा एक वर्ग मानसिक पातळीवर तयार करणे आणि त्या वर्गात मोडणाऱ्या प्रत्येक माणसाबद्दल एक प्रतिक्रिया सुसंगतपणे देत राहते. अशी सुसंगत प्रतिक्रिया देण्यासाठी श्रीमंतांचा, धर्मपरायणांचा असे लोकांचे विविध वर्ग तयार केले जातात.

दूरदर्शन, वर्तमानपत्रे ह्यांसारख्या प्रभावी प्रसारमाध्यमांतून विशिष्ट दृष्टिकोणांचे समर्थन वा त्यांना विरोध केला जात असतो. ही प्रसारमाध्यमे ज्या सांस्कृतिक गटांशी निगडीत असतात, त्यांचा त्यांवर मोठा प्रभाव असतो. अशा विविध अनुभवस्रोतांतून विकसित झालेल्या वृत्तीही सांस्कृतिक-वैचारिक परिसरात महत्त्वाचा बदल घडून आल्यास पालटू शकतात. मेंदूप्रक्षाळणाच्या (ब्रेनवॉशिंग) तंत्रांची परिणामकारकता ह्या संदर्भात पाहता येते. [→ मेंदूप्रक्षाळण]. प्रौढ वयातही एखाद्या वादळी घटनेमुळे व्यक्तीच्या वृत्ती बदलून जाण्याची शक्यता असते.

व्यक्तींच्या वृत्ती कशा बदलू शकतात, ह्याबद्दल मानसशास्त्रज्ञांनी वेगवेगळ्या प्रणाली मांडलेल्या आहेत. त्यांतील काही अशा : (१) आपले मानसिक जग सुसंगत, एकात्म असावे असे अनेकांना वाटते. ही सुसंगती आणि एकात्मता ढळल्याची जाणीव झाल्यास अशा व्यक्ती अस्वस्थ होऊन आपल्या मनोविश्वाची सुसंगत आणि एकात्म अशी पुनर्मांडणी करण्याचा प्रयत्न करीत राहतात आणि वृत्तींमधल्या परिवर्तनाच्या रुपाने ती घडून येते. (२) आपल्या जगाकडे एक सुसूत्र, नियमबद्ध वस्तू म्हणून पाहावे, त्या नियमबद्धतेच्या आधारे घटनांचे पूर्वकथन करणे शक्य व्हावे असे माणसांना वाटते. त्यामुळे आपल्या अवतीभवती घडणाऱ्या घटनांची कारणमीमांसा करण्याचा, स्वतःच्या व इतरांच्या वर्तनाची कारणे शोधण्याचा ती प्रयत्न करतात. व्यक्ती, वस्तू, परिस्थिती, घटना ह्यांना विशिष्ट प्रकारे प्रतिसाद देण्याच्या प्रवणतेत ही कारणे दिसतात. ह्याच वृत्ती होत. महत्त्वाच्या घटनांच्या-व्यक्तींच्या वर्तनांच्या आपण करीत असलेल्या कारणमीमांसेतील बदल हा वृत्तींमध्ये झालेल्या परिवर्तनाचा निदर्शक असतो. ‘कारणमूलक उपपत्ती’ (ॲट्रिब्यूशन थिअरी) ह्या नावाने ही प्रणाली ओळखली जाते.

व्यक्तीच्या मानसिक जगात वृत्ती अनेक प्रकारची कार्ये करीत असतात. त्यांतील काही अशी: (१) आपण राहत असलेल्या व्यामिश्र परिसरातील व्यक्ती, वस्तू इत्यादींचे अधिक सोपे, व्यवस्थासुलभ असे एक प्रकारीकरण आपल्याला विविध वृत्तींच्या आधारे प्राप्त होऊ शकते. त्यातून त्या परिसराशी येणाऱ्या आपल्या संबंधांसाठी एखाद्या स्वयंचलित यंत्राप्रमाणे काम करणाऱ्या प्रतिक्रियांचे संच आपल्या मानसिक पातळीवर आपण निर्माण करु शकतो. (२) आपल्या वृत्ती समजून घेऊन आपण स्वतःची ओळख अधिक स्पष्टपणे करुन घेऊ शकतो स्वतःला अधिक सुसंगतपणे व्यक्त करु शकतो. त्या दृष्टीने आपल्या भावना आपल्या वर्तनात उतरवू शकतो. ह्या भावनाविष्काराला एक प्रकारचे विरेचनात्मक मूल्यही असते. (३) आपल्या मनातील कोंडलेल्या उर्जांचा तसेच आपणातील द्विधाभावांचा मार्ग, आपल्याला आपल्या जाणिवेच्या पातळीवर मान्य होईल आणि समाजालाही स्वीकारार्ह वाटेल, अशा प्रकारे मोकळा करुन देतो. आपल्या अनेक अबोध प्रेरणांना तोंड देण्यास ही प्रक्रिया मदत करते. उदा., सर्वसाधारण समाजापासून काही कारणाने अलग पडलेल्या लोकांविषयी-स्वैराचारी कलावंत, मूठभर श्रीमंत लोक इ. – व्यक्त केली जाणारी विद्वेषवृत्ती म्हणजे ती धारण करणाऱ्या व्यक्तींच्या मनांतील काही अनिष्ट अबोध प्रेरणांना जाणिवेच्या स्तरावर मिळवून दिलेली एक वाट होय, असे काही अभ्यासकांना वाटते.

विविध वृत्तींचे वेळोवेळी मापन करुन त्यांच्या प्रभावाचा अंदाज घेण्यासाठी वृत्तिमापनाची विविध तंत्रे विकसित करण्यात आली आहेत. त्यांत थर्स्टन, लायकर्ट, बोगार्ड्‌स, ऑसगुड अशा काहींची तंत्रे प्रसिद्ध आहेत. त्यांतही लायकर्टची वृत्तिमापनपद्धती अधिक प्रचारात आहे.

व्यक्तीची वृत्ती व तिचे वर्तन ह्यांत सुसंगती असते असे गृहीत धरुन आणि तिच्या आपल्याला निश्चित ठाऊक असलेल्या वृत्तींचा आधार घेऊन विशिष्ट संदर्भात तिचे वर्तन कसे राहील ह्याबद्दल निश्चित स्वरुपाचे पूर्वकथन करता येईल का, असा प्रश्न उपस्थित केला जातो. मानसशास्त्रीय संशोधनातून मिळणाऱ्या निष्कर्षानुसार असे पूर्वकथन करण्याला बऱ्याच मर्यादा आहेत. अनेक कारणांमुळे व्यक्तीची वृत्ती आणि तिचे प्रत्यक्ष वर्तन ह्यांत फार मोठी सुसंगती आढळत नाही कारण वृत्ती आणि वर्तन ह्यांच्यातील सुसंगतीचे प्रमाण अनेक घटकांवर अवलंबून असते. त्या व्यक्तीची ती विशिष्ट वृत्ती कशी घडली, त्या व्यक्तीचे एकंदर व्यक्तिमत्व कशा प्रकारचे आहे, त्या व्यक्तीच्या वृत्तीशी सुसंगत वाटेल अशा कोणत्या वर्तनाचे पूर्वकथन करायचे आहे, अशा अनेक प्रश्नांचा विचार करावा लागतो.

काही मानसशास्त्रज्ञांच्या मते वृत्ती ह मानवी वर्तनावर परिणाम घडवून आणणारा एकमेव नव्हे, तर केवळ एक घटक आहे. आपली वृत्ती काहीही असली, तरी आपण काय करणे महत्त्वाचे ह्याबद्दल व्यक्ती इतरांचा विचार घेऊ शकतात कधीकधीमागणी ध्यानी घेऊन वर्तन करीत असतात तशी क्षमताही त्यांच्या ठायी असते. वृत्तिविषयात व्यक्तीचे हितसंबंध किती गुंतले आहेत, ह्यावरही वृत्ती व वर्तन ह्यांच्यातील सुसंगती अवलंबून असते. गुंतलेले हितसंबंध जेवढे मोठे, तेवढी वृत्ती व वर्तन ह्यांच्यातील सुसंगती मोठी. आपल्या वृत्तीची तीव्रतेने जाणीव होणे आणि तिची वर्तनप्रेरकता तीव्रतेने उत्तेजित होणे ह्यांसाठी हितसंबंधांबरोबरच वृत्तीची प्रबलता, तिची विशिष्टता ह्यांसारखे घटकही महत्त्वाचे ठरतात. ज्या वृत्ती अप्रत्यक्ष अनुभवापेक्षा प्रत्यक्ष अनुभवातून घडलेल्या असतात, त्या अधिक तीव्र आणि अधिक वर्तनप्रेरक असतात, असेही आढळून येते.

पहा : रस व्यक्तिमत्व, सर्जनशीलता.       

                    संदर्भ : १. Edwards, A. L. Techniques of Attitude Scale Construction, New York, १९५७.

          २. Kiesler,        C. A. B. E. Miller, N. Attitude Change : A Critical Analysis of Theoretical Approaches. New     York, १९६९.

          ३. Zimbardo, P. Ebbesen, E. B. Influencing Attitudes and Changing Behaviour,     Reading (Mass), १९६९.                                                       

कुलकर्णी, अ. र.