वुडवर्थ, रॉबर्ट सेशन्झ : (१७ ऑक्टोबर १८६९ – ४ जुलै १९६२). अमेरिकन मानसशास्त्रज्ञ. जन्म मॅसॅचूसेट्स (अमेरिका) या राज्यातील बेल्चरटाउन येथे झाला. वडील विल्यम वॉल्टर वुडवर्थ हे धर्मोपदेशक होते, तर आई लिडिया एम्स ही प्राध्यापिका होती. न्यूटन (मॅसॅचूसेट्स) येथे माध्यमिक शिक्षण पूर्ण केल्यावर ॲम्हर्स्ट, वॉशबर्न, हार्व्हर्ड आणि कोलंबिया या विद्यापीठांमध्ये त्यांनी आपले उच्च शिक्षण पूर्ण केले.
ग्रॅन्व्हिल स्टॅन्ली हॉल यांच्या लेखांचा व व्याख्यानांचा त्यांच्यावर विलक्षण प्रभाव पडला. पुढे हार्व्हर्ड विद्यापीठातील प्रसिध्द अमेरिकन मानसशास्त्रज्ञ व तत्ववेते ⇨विल्यम जेम्स यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी सामान्य व अपसामान्य मानसशास्त्राचे अध्ययन केले. १८९७ मध्ये हार्व्हर्ड विद्यापीठातून मानसशास्त्रातील एम.ए. ही पदवी त्यांनी प्राप्त केली. १८९९ मध्ये जेम्स माकीन कॅटेल यांच्या मार्गदर्शनाखाली ‘द ॲक्युरसी ऑफ व्हॉलंटरी मूव्हमेंट’ हा प्रबंध कोलंबिया विद्यापीठाला सादर करून त्यांनी पीएच.डी प्राप्त केली. पुढे १९०३ मध्ये याच विद्यापीठात कॅटेल यांचे उत्तराधिकारी म्हणून त्यांनी कामाची जबाबदारी स्वीकारली. १९५८ पर्यंत, म्हणजेच अर्ध्या शतकाहून जास्त काळ त्यांनी या विद्यापीठात मानसशास्त्राचे अध्यापन केले. ‘अमेरिकन सायकॉलॉजिकल असोसिएशन’ या संस्थेतर्फे मानसशास्त्रातील प्रशंसनीय कामगिरीबद्दल त्यांना १९५६ मध्ये सुवर्णपदक देण्यात आले. १९२१ मध्ये ‘नॅशनल ॲकॅडेमी ऑफ सायन्सेस’वर त्यांची नेमणूक झाली.
ज्या विषयांचे अध्ययन व्यक्ती करत असेल त्यांच्यात काही प्रमाणात साम्य असल्यास एका विषयाच्या अध्ययनाचा दुसर्याय विषयाच्या अध्ययनावर परिणाम होऊन ‘अध्ययन संक्रमण’ घडून येते हे वुडवर्थ यांनी सिध्द केले. तसेच वर्तनाला चालना देणारी ऊर्जा या नात्याने ‘प्रचोदना’ या संकल्पनेचे महत्त्व विशद करण्यात त्यांनी विशेष पुढाकार घेतला. प्रचोदना आणि यंत्रणा या दोन बाबी भिन्न असून यंत्रणा कार्यरत होण्यासाठी प्रचोदना सहाय्यभूत ठरत असते. स्वयंचलित वाहनांमध्ये गतीसाठी चाके, नियंत्रण इ. यंत्रणा जरी आवश्यक असली, तरी ही यंत्रणा कार्यरत होण्यासाठी ‘पेट्रोल’ सारख्या ऊर्जेची नितांत गरज असते. त्याप्रमाणे विविध वर्तनात्मक क्रिया घडून येण्यासाठी जरी हात, पाय, स्नायू इत्यादींनी बनलेली यंत्रणा सहाय्यभूत ठरत असली, तरी ती कार्यान्वित होण्यासाठी ऊर्जेचीही आवश्यकता असते. या ऊर्जेलाच वुडवर्थ यांनी ‘प्रचोदना’ असे म्हटले असून ती जीवाला शरीरातून उपलब्ध होत असते.
विचारप्रक्रियेत केवळ शाब्दिक यंत्रणाच कार्यान्वित होत असते, असे नसून विचार चालू असताना इतर शरीरांतर्गत यंत्रणादेखील कार्यरत होत असतात असे वुडवर्थ यांचे मत होते. स्वप्नांद्वारे जरी अतृप्त इच्छांची अभिव्यक्ती होत असली, तरी स्वप्ने पूर्णतः कामप्रेरणेशीच संबंधित असतात असे म्हणता येणार नाही हेदेखील त्यांनी प्रतिपादिले. सैनिकांमधील अपसामान्य प्रवृत्तींचा शोध घेण्यासाठी त्यांनी १९१८ मध्ये एक प्रश्नावली तयार केली. तीत शारीरिक व्यथा, भीती, चिंता, भावना आणि विविध मनोवृत्ती ह्यांसंबंधीच्या प्रश्नांचा समावेश होता.
वुडवर्थ यांनी जे ग्रंथ लिहिले त्यांत डायनॅमिक सायकॉलॉजी (१९१८), कंटॆंपररी स्कूल्स ऑफ सायकॉलॉजी (१९३१), एक्स्पेरिमेंटल सायकॉलॉजी (१९३८) आणि डायनॅमिक्स ऑफ बिहेव्हिअर् (१९५८) हे विशेष उल्लेखनीय आहेत. जी. टी. लॅड यांच्या फिजिऑलॉजिकल सायकॉलॉजी या ग्रंथाची सुधारित आवृत्ती तयार करण्यातही त्यांचा सहभाग होता.
गोगटे, श्री. ब.
“