वुल्फेनाइट : (यलो लेड ओअर). शिशाचे खनिज. स्फटिक चतुष्कोणीय, प्रसूच्याकार, वडीसारखे, काही अगदी पातळ [→ स्फटिकविज्ञान]. भरड ते सूक्ष्म कणांच्या पुंजांच्या रूपातही हे आढळते. रंग पिवळा, विविध नारिंगी छटांचा, हिरवट, पांढरा वा करडा. कस पांढरा. चमक मेणासारखी ते हिऱ्यासारखी. पारदर्शक ते दुधी काचेप्रमाणे काहीसे पारभासी. भंजन खडबडीत. अतिशय ठिसूळ. कठिनता २.७-३. वि. गु. ६.५-७. [→ खनिजविज्ञान]. रा. सं. PbMoO4 (येथे PbO ६०.८%, MoO3 ३९.२%). कधीकधी शिशाच्या जागी कॅल्शियम येते. शिशाच्या ऑक्सिडीभूत [→ ऑक्सिडीभवन] शिरांमध्ये हे पायरोमॉर्फाइट, सेऱ्यूसाइट, व्हॅनेडिनाइट, कॅल्साइट, गोएथाइट इ. खनिजांबरोबर आढळते. ॲरिझोनामध्ये (अमेरिका) व चेकोस्लोव्हाकियात याचे सुंदर स्फटिक आढळतात. शिवाय अमेरिका (पेनसिल्व्हेनिया, उटा, नेव्हाडा, न्यू मेक्सिको), ऑस्ट्रिया, जर्मनी, सार्डिनिया, ऑस्ट्रेलिया इ. प्रदेशांतही हे आढळते. मॉलिब्डेनमाचे गौण धातुक (कच्च्या रूपातील धातू) म्हणून याचा उपयोग होतो. एफ्.एक्स्. फोन वुल्फेन (१७२८-१८०५) या ऑस्ट्रियन खनिजवैज्ञानिकांवरून याचे वुल्फेनाइट हे नाव पडले आहे.
ठाकूर, अ. ना.