विहार : बौद्ध भिक्षूंचे निवासस्थान व पाठशाळा असणारी शैल वास्तुरचना. ⇨ चैत्यगृहांच्या निर्मितीबरोबरच या वास्तु प्रकाराचे बांधकाम भारतात प्रामुख्याने कार्ले, भाजे, नासिक, वेरूळ, पितळखोरे, भारहूत, सांची, सारनाथ, उदयगिरी, कोंडाणे, मथुरा, जुनागढ, अमरावती, कान्हेरी इ. ठिकाणी झालेले आढळते. इ. स. चौथ्या शतकापर्यंतच्या कालखंडात प्रामुख्याने हा बौद्ध वास्तुप्रकार विकसित झाला. मध्यभागी मोकळे प्रशस्त सभागृह वा दालन व त्याभोवती छोट्या खोल्या (शयनदालन) या अवकाशयोजनेपुढे प्रशस्त ओवरी अशी विहारांची सर्वसाधारण रचना केली जात असे. शयनदालनात दगडात कोरूनच झोपण्यासाठी ओटे केले जात. वायुवीजनासाठी पुढील ओवरीत जाळीदार दगडी भिंती काढल्या जात. सुरवातीच्या काळात बिहारमध्ये अलंकरणाचा पूर्णपणे अभाव असे, परंतु नंतर शिल्पकला, उत्थित शिल्पे, चित्रकला, स्तंभरचना, स्तंभशीर्षे इ. घटकांद्वारे विहारनिर्मितीमध्ये अलंकराचा वापर केला जाऊ लागला. बौद्ध धर्म सर्वत्र प्रसृत झाल्यावर शैल-वस्तुनिर्मितीची प्रक्रिया सर्वत्र झपाट्याने विकसित झाली तेव्हा अधिकाधिक विहारांची व शयनदालनांची आवश्यकता भासू लागली. त्यानुसार उदयगिरी, वेरूळ येथे अनेकमजली विहारांची रचना दगडात खोदून करण्यात आली .
मध्य प्रदेशातील ⇨ वाघ तसेच महाराष्ट्रातील अंजिठा व नासिक येथील विहाररचना अनेक दृष्टींनी अभ्यासनीय आहेत. नासिक येथील विहारामध्ये आतील सभागृहात स्तंभांचा अभाव आढळतो. अवकाशरचना साधारणपणे सर्वत्र चौरसकृती आढळते. अंजिंठा, बाघ आणि इतरत्र मात्र मध्यभागीच्या सभागृहात चौरस किंवा वर्तुळाकार स्तंभरचना आढळतात. त्यामुळे आतील अवकाशात काहीसा अडथळा निर्माण होतो. स्तंभरचना आणि स्तंभशीर्ष या दोन घटकांसाठी मात्र विहारनिर्मिती बौद्ध वास्तुतज्ञांना उपकारक ठरली. रचनेतील प्रमाणबद्धता, सौष्ठव, शिल्पविषय यांविषयी अनेक प्रयोग करणे त्यांना त्यामुळे शक्य झाले आणि उत्तरोत्तर त्यांत प्रगती होत गेलेली आढळते. विहारांचा दर्शनी भाग अशा अलंकृत स्तंभरचनेद्वारे सुशोभित केला जात असे. वैदिक काळातील काष्ठशिल्पांवर आधारित वेदिका, हर्मिका यांच्या प्रतिकृती, चौरस पायऱ्यांचे निमुळते होत जाणारे स्तंभतळ आणि स्तंभशीर्ष, स्तंभतळाचे कुंभाकार, षट् कोनी वा अष्टकोनी स्तंभ व त्यांवरील प्राण्यांची शिल्पे अशा प्रमाणबद्ध अलंकरणांनी विहारांमधील स्तंभ सजविले जात असत. नासिक आणि अजिंठा येथील विहारात यातील कौशल्य विशेषत्वे नजरेत भरते.
विहारांमध्ये सभागृहासमोर छोटेसे चैत्यगृह वैयक्तिक कर्मकांडांसाठी खोदले जात असे. भिंती, स्तंभ यांचे पृष्ठभाग उत्थित शिल्पांद्वारे व चित्रकलेद्वारे बुद्धाचे चरित्रप्रसंग दर्शवून सजविले जात असत. कमानीयुक्त दारे-खिडक्या, वैदिक आकारांवर आधारित शैल्यशिल्पे, स्तंभरचना हे घटक विहारनिर्मितीची कलात्मक अंगे मानली जातात. त्याचप्रमाणे कार्यानुरूप अवकाशनिर्मिती, शैलशिल्पातील तंत्रसफाई यांमुळेही विहार हा बौद्ध वस्तुप्रकार अभ्यसनीय ठरतो. चीन, जपान, अग्नेय आशिया येथेही अनेक ठिकाणी इतर बौद्ध वास्तुप्रकारांसमवेत विहारनिर्मिती झालेली आढळते.
दीक्षित, विजय
“