विसंगति, भूवैज्ञानिक : भूकवचातील खडकांच्या स्तरवैज्ञानिक अभिलेखमालेत (थरांच्या कालानुक्रमे  आसणाऱ्या नोंदींच्या मालिकेत) पडलेला खंड किंवा निर्माण झालेला व्यत्यय याचा भौतिकीय पुरावा म्हणजे विसंगती होय. विसंगतीमुळे लगतच्या खंडकात आढळणाऱ्या थरांपैकी काही थर गहाळ झालेले आढळतात, तसेच तिने लाखो वर्षापर्यंतचा भूवैज्ञानिक कालावधी दर्शविला जातो. याला ‘स्तरक्रमखंड’ म्हणतात. या काळात आधींच्या अधिक जुन्या खडकाचा काही भाग अपक्षरणाने म्हणजे झीज होऊन निघून गेलेला असतो व निक्षेपणाची (साचण्याची) क्रिया घडलेली नसते. नंतर या झिजलेल्या पृष्ठभागावर अधिक नविन खडक साचतात. अशा रितीने विसंगतीच्या ठिकणी स्तररचना मध्येच खंडित झालेली असते.

प्रकार : विसंगतीचे पुढील चार प्रकार केले जातात. यांपैकी पहिले तीन प्रकार आकृतीत दाखविले आहेत.

विसंगतीचे प्रकार (अ) असंगती, (आ) कोनीय विसंगती, (इ ) स्तरीय विसंगती. असंगती : यामध्ये विसंगतीच्या पातळीखालचे खडक स्तरित (थरयुक्त) नसतात. हे खालचे खडक खूप खोल जागी निर्माण झालेले संपुंजित स्फटिकी खडक असतात. या जुन्या खडकांचे रूपांतरण झालेले असते अथवा त्यांच्यात अग्निज खडकांचे अंतर्वेशन(घुसण्याची क्रिया) झालेले असते. या खडकांची झिज झालेली असते व या झिजलेल्या पृष्ठभागावर गाळाचे खडक नव्याने साचलेले असतात. कर्नाटकातील गोकाक गावानजिकच्या टेकडीच्या माथ्याशी असंगतीचे उत्तम उदाहरण दिसते.तेथे कलादगी खडक तिरप्या आर्कीयन खडकांवर विसंगतपणे वसलेले आहेत.

कोनीय विसंगती : या बाबतीत विसंगतीच्या पातळी खालील म्हणजे अधिक जुने खडक स्तरित असून त्यांचे विरूपण झालेले असते, म्हणजे ते तिरपे झालेले असतात वा त्यांना घड्या पडलेल्या असतात. अशा विरूपित खडकांची झीज होऊन झिजलेल्या पृष्ठभागावर गाळाचे नवीन स्तरित खडक साचतात. यामुळे विसंगतीच्या पातळीच्या ठिकाणी जुन्या व नव्या खडकांच्या स्तरांच्या नती (क्षितिजपातळीशी होणारा थराचा कोन) भिन्न असतात. या वैशिष्ट्यांमुळेच विसंगतीचा हा प्रकार सर्वप्रथम लक्षात आला. परिणामी विसंगतीच्या पातळीच्या खालील व वरील खडकांच्या थरांच्या पातळ्यांमधील हा भूमितीय संबंध वर्णन करण्यासाठीच मुळात विसंगती ही संज्ञा वापरीत असत. कोनीय विसंगती गाळाच्या एकाच द्दश्यांशात (उघड्या पडलेल्या भागात) चटकन लक्षात येते. अथवा विस्तृत क्षेत्राचे काळजीपूर्वक निरीक्षण केल्यावर लक्षात येते.  या विस्तृत विसंगतीला प्रादेशीक कोनीय विसंगती म्हणतात. हेल्बर्थ ब्रिज ( यॉर्कशर, इंग्लंड) येथील कोनीय विसंगती स्पष्ठपणे दिसते.

स्तरिय विसंगती : या विसंगतीची पातळी अनियमित असून तिच्याखालचे व वरचे खडकांचे थर समांतर असतात. याचा अर्थ दोन्हींची नती सारखीच असते. मात्र त्यांच्या मधील आधारपृष्ठाची झीज झाल्याचा पुरावा असतो. म्हणजे हे दोन खडक झीज झालेल्या सुस्पष्ठ पृष्ठभागाने अलग झालेले आसतात. भूपृष्ठीय किंवा शक्तिशाली प्रवाहांमुळे अंतःसागरी झीज होऊन हा पृष्ठभाग तयार झालेला असतो. या काळात येथे निक्षेपण झालेले नसते अथवा खालील खडकांचे विरूपण वा हालचाल झालेली नसते. हिलाच निक्षेपणरहित विसंगती किंवा विनक्रमी विसंगती इ. संज्ञाही आहेत.

समांतर विसंगती  : (परासंगती).  या बाबतीत विसंगतीच्या पातळीच्या दोन्ही बाजूंचे थर समांतर व सुसंगत असतात, म्हणजे जुन्या व नव्या थरांना अलग करणारा द्दश्य असा झिजलेला पृष्ठभाग नसतो. किंवा तो अतिसूक्ष्म असल्याने चटकन लक्षात येत नाही. यांमुळे विसंगतीच्या खालील व वरील थरांमधील दर्शक जीवाश्मांचे (निश्चित काळ सूचित करणाऱ्या शिळारूप झालेल्या जीवांच्याअवशेषांचे ⟶ जीवाश्म) अध्ययन केल्यावरच लक्षणीय स्तरक्रमखंड उघड होऊनही विसंगती लक्षात येते.

भूवैज्ञानिक अभिलेखमालेच्या दृष्टीने विसंगतीचे महत्व : विशेषतः गाळाच्या खडकांमधील परस्परसंबंधांचा अर्थ लावण्याच्या दृष्टीने विसंगती महत्वाच्या असतात. तसेच विविध भूवैज्ञानिक घडामोडींविषयी अनुमान करण्यासाठी विसंगती उपयुक्त ठरतात याची काही उदाहरणे पुढे दिली आहेतः खोलपर्यंत अथवा दीर्घकाळ अखंडपणे झालेली झीज असा अंदाज असंगतीवरून करता येतो. कोनीय विसंगती पर्वतनिर्मितीच्या घडामोडींविषयी अनुमान करण्यास उपयुक्त असतात. कारण यामध्ये प्रथम अधिक जुने थर विरुपित होतात, मग ते अपक्षरणाच्या पातळीपर्यंत वर उचलले जातात व नंतर त्यांची झीज होऊ लागते. विरूपण न होता होणाऱ्या मोठ्या उत्थानांमध्ये (वर उचलले जाण्याच्या क्रियांमध्ये) किंवा समुद्रपातळी खाली गेल्याने स् स्तरीय विसंगती निर्माण होते व या मधल्या काळातील इतरत्रच्या थरांचे अनुक्रम ठरविण्यासाठी तिचा उपयोग होतो. अनेकदा मोठ्या प्रमाणात समुद्रपातळी खाली गेल्याने झीज झालेले खंडाच्या आकारमानाचे पृष्ठभाग निर्माण होतात, तर अधिक वारंवार समुद्रपातळी थोडीच खाली गेल्याने खंडाच्या सीमावर्ती व किनारी भागांतच परिणाम होतात. या बाबतीत सीमावर्ती भागातील पृष्ठभागाखालील खडकांचे अनुक्रम ठरविण्यासाठी भूभौतिकीय पद्धती वापरता  (⟶ खनिज पूर्वेक्षण भूभौतिकी) समांतर विसंगती ही स्तरीय विसंगतीप्रमाणे निर्माण होते.समांतर विसंगती ओळखण्यासाठी जीवस्तर गतीप्रमाणे निर्माण होते. समांतर विसंगती ओळखण्यासाठी जीवस्तर वैज्ञानिक अभिलेखामालेत घडलेल्या खंडांचा उपयोग करावा लागतो, म्हणजे थरांमधून गहाळ झालेले जीवाश्मांचे पट्टे (वा क्षेत्रे) निक्षेपांतील खंड दर्शवितात. खोल सागरी तळावर होणारी भौतिक झीज व रासायनिक क्रियेने अवसाद (गाळ) विरघळून होणारी झीज या दोन्हींमुळे समांतर विसंगती निर्माण होतात. समांतर विसंगतींनी सूचित होणारे खंड हे जलवायुवैज्ञानिक (दीर्घकालीन सरासरी हवामानामुळे  उद् भवणाऱ्या) व भूसंराचनिक (  भूपट्ट सांरचनिकी) बदलांशी जुळतात या बदलाद्वारे महासागरावरील पाण्याची निर्मिती व अभिसरण यांचे नियमन होत असते.

अमेरिकेत ग्रॅंडकॅन्यच्या तळालगत, स्कॉटलंडच्या पृर्व किनाऱ्यावरील सिक्कार पॉंइंट येथील तसेच भारतातील आर्कीयन कालोत्तर  महान विसंगती  ही जगातील काही मोठ्या विसंगतीची उदाहरणे होत. ⇨ अर्कीयन व ⇨पुराण महाकल्प व गण यांच्यामधील आर्कीयन कालोत्तर महान विसंगती सुस्पष्ट असून ती पुराण गणाच्या तळाशी आहे. येथे पुराण गणाचे खडक आर्कीयन खडकांवर विसंगतपणे वसलेले आहेत. हिचा कालखंड मोठा असून भारतीय स्तरविज्ञानाच्या दृष्टीने ती अतिशय महत्वाची ठरली आहे. या शिवाय ⇨ अरवली संघ व ⇨ रायलो  माला यांच्यातील विसंगती सुस्पष्ट व मोठी आहे, ⇨ पमोंकार् बॉनिफेरसच्या तळाशी असणारी विसंगती भारतात सर्वत्र आढळते, तर ⇨ आर्य महाकल्प व गण आणि ⇨ द्रविड महाकल्प व गण यांच्यातील उत्तर कार् बॉनिफेरस कालीन (सु, ३५ ते ३१ कोटी वर्षापूर्वीच्या काळातील) विसंगती तेवढीशी स्पष्ट नाही. भारतीय भूवैज्ञानिक इतिहासाचे विभाग करताना टी.एच् हॉलंड यांनी या विसंगतीचा उपयोग केला आहे.

ठाकुर, अ.ना.