विषतंत्र : वेवेष्टी म्हणजे सर्व शरीरभर त्वरेने व्याप्त होते, ते विष होय. विषतंत्राला आयुर्वेदीय परिभाषेत ‘अगदतंत्र’ असे म्हटले आहे. अगद म्हणजे ‘विषनाशन’ होय व त्याविषयीचा विचार असलेले तंत्र म्हणजेच शास्त्र म्हणून ‘अगदतंत्र’ होय.
राजापासून रंकापर्यंत अनेक कारणास्तव शत्रू व दुष्ट बुद्धीच्या लोकांकडून विविध प्रकारांनी विषप्रयोग करून मारण्याचे प्रयत्न होतात आत्महत्येसाठीही काही लोक विष घेतात तसेच विषारी प्राण्यांच्या दंशालाही काही लोक बळी पडतात.अशा ह्या सर्वांचा विचार या तंत्रात होतो.
स्थावर आणि जंगम विषे : पोटात जाऊन प्राणनाश करणारी विषे प्रायः खनिज आणि उदिभज्ज असतात. ती ‘स्थावर’ विषे आणि सजीव प्राण्यांच्या द्वारे होणारा विषसंसर्ग ‘जंगम’ विषे होत. स्थावर विषाचे एकूण ५५ विष प्रकार आहेत. वनस्पतिसृष्टीतील ५३ विष प्रकार खालीलप्रमाणे आहेत. काही खनिज धातूही विषरूप आहेत.
(१) मूल (मूळ) विष (कण्हेर, गुंज, कळलावी इ. आठ वनस्पती)
(२) पत्र (पान) विष (विषपत्रिका, करंभ, महाकरंज इ.पाच वनस्पती)
(३) फलविष (कुचला, धोतरा,जेपाळ इ. बारा वनस्पती)
(४) पुष्पविष (वेत वगैरे पाच वनस्पती)
(५) त्वचा, गाभा, डिंक विष (आंत्रपाचक सौरीयक, कर्तरी इ. सात वनस्पती)
(६) क्षीरविष (बिधारी निवडुंग, रुई इ. तीन वनस्पती) व
(७) कंदविष (कालकूट, बचनाग, हालाहल इ. तेरा वनस्पती)
ही वनस्पतिसृष्टीतील विषे होत. सोमल आणि हरताळ ही दोन खनिज विषे आहेत.
जंगम विषाचे दृष्टिविष, निःश्वासविष, दंष्ट्रा (दात) विष, नखविष, मूत्रविष, पुरीष (मल) विष, शुक्रविष, लालाविष, आर्तव (रज) विष, मुखविष, अपानवायुजन्य (सरलेला वायू) विष, अस्थिविष, चंचुविष, पित्तविष, नांगीविष (किंवा घुल्यासारख्या प्राण्याच्या अंगावरचे केस) आणि मृतदेहविष हे सोळा प्रकार आहेत.
स्थावर विष : स्थावर विषाचे गुण व प्राणनाशक्रम असे आहेत : विषाचे तीक्ष्ण, उष्ण, रूक्ष, विशद, व्यवाय (सर्व शरीर व्यापणारे) आशुकर (शीघ्र कार्यकारी), लघू, विकाशी (शिथिल करणारे), सूक्ष्म अव्यक्तरस व अपाकी (न पचणारे) हे सर्वही गुण शरीरस्थ ओजाच्या मृदू, शीत, स्निग्ध, पिच्छिल (चिकट), स्थिर, प्रसाद, गुरू, श्लक्ष्ण (गुळगुळीत), बहल, मधुर ह्या गुणांशी संपूर्णतया विरुद्ध असल्याने ते शरीरात शिरताच प्रथम रक्ताला दूषित करून देहभर पसरते. नंतर कफ, पित्त, वात (वायू) ह्या दोषांना आणि त्यांच्या आमाशय, नाभी आणि पक्वाशय ह्या स्थानांना दूषित व क्षुब्ध करते आणि हृदयात पोहोचून प्राणनाश घडवते.
स्थावर विषांत कंदविषे अत्यंत वीर्यशाली व स्थिर गुणांची असतात. मूल, पत्र, इ. विषांचे शरीरावर पुढीलप्रमाणे परिणाम होतात (१) मूलविष : अंग मोडून आल्यासारखे वाटणे, बडबड करणे व बेशुद्धी येणे (२) पत्रविष : जांभया, आंगमोडे, श्वास (धाप लागणे) (३) फलविष : वृषणशोथ (अंडकोशाची दाहयुक्त सूज), दाह, अन्नद्वेष (४) पुष्पविष : वांती, पोटफुगी, बेशुद्धी (५) साल, गाभा व डिंक विष : मुख दुर्गंध, (त्वचेच्या) खरखरितपणा, शिरःशूल, कफस्त्राव (६) क्षीरविष : तोंडातून फेस येणे, द्रवमल प्रवृत्ती, जीभ जड पडणे आणि (७) खनिज धातुविष : हृदयपीडा, मूर्च्छा, तालुदाह.
स्थावर विषांचे आक्रमक आठ वेग : विष शरीरात गेल्यानंतर क्रमाने एका धातूतून दुसऱ्या धातूत जाते, त्याला वेग म्हणतात. हे सात धातूंचे सात वेग असतात. पोटात घेतलेल्या विषाचा वेग रसधातूपासून तर दंशाच्या विषाचा वेग रक्तधातूपासून सुरू होतो. आठ वेगांची चिन्हे पुढीलप्रमाणे होतात. प्रथम वेग : रसधातुदुष्टी, तहान, दात शिवशिवणे, लाळ गळते, ओकारी, जीभ काळी व ताठ होणे, मूर्च्छा, श्वास व थकवा येणे द्वितीय वेग : रक्तधातुदुष्टी, विवर्णता, भ्रम, कप, मूर्च्छा, जांभया, चिमचिम (चुणचुण) वेदना, तमक (दम्याचा एक प्रकार) श्वास, ग्लानी, दाह, कंठपीडा व विष आमाशयात पोहोचून हृदयात वेदना निर्माण करते तृतीय वेग: मांसधातुदुष्टी, अंगावर मंडले (चट्टे), पित्तासारख्या गांधी, खाज, सूज, टाळू सुकणे, डोळे वर्णहीन किंवा पिवळे व त्यांवर सूज येणे आणि आमाशयात तीव्र शूल उत्पन्न करते चतुर्थ वेग: मेदोधातुदुष्टी होऊन, वायू प्रकोप, वांती, दाह, सर्व आंग, आमाशय व पक्वाशयामध्ये शूल, मूर्च्छा, खोकला, आतड्यात गुरगुर, डोके जड होणे, उचकी लागणे पंचम वेग: अस्थिधातुदुष्टी, डोळ्यांपुढे निळा व इतर रंग दिसणे, अंधेरी, कफयुक्त लाळास्त्राव, शरीराला विवर्णता व सांधे फुटल्यासारखे वाटणे षष्ठ वेग: मज्जाधातुदुष्टी, सर्वदोषप्रकोप, उचकी, पक्वाशय वेदना, संज्ञानाश व तीव्र अतिसार होणे सप्तम वेग : खांदे, पाठ, कंबर मोडते व श्वासावरोध होणे आणि अष्टम वेग : शुक्र व ओजोनाश होऊन मृत्यू .
पशू व पक्ष्यांना विषवेग : पशूंना विषाच्या चार वेगांत आणि पक्ष्यांना तर तीनच वेगांत मृत्यू येतो. थकवा, संज्ञानाश, गरगर फिरणे, कंप, खाणे बंद व श्वासावरोध अशी चिन्हे होतात.
स्थावर विषांचे स्वरूप : कर्कट, कालकूट, वत्सनाभ इ. १३ नावांची स्थावर विषांचे वर्ण व स्वरूप शास्त्रात वर्णिले आहे. तथापि त्याचा व्यवहारात प्रत्यक्ष परिचय फारसा नाही. काही नावे ही संदिग्ध आहेत. वत्सनाभ म्हणजे बचनाग हे विष भुरकट रंगाचे व गोस्तनाकार असते.
खनिज विषात ताम्राचे महत्त्व : ताम्र म्हणजे तांबे. ही धातू खनिज विषात अतितीव्र विष आहे. विषाच्या गुणांपेक्षा वांती, भ्रांती इ. आठ दोष ताम्रविषात अधिक आहेत. तथापि ते शुद्ध करून वापरल्यास विषाचा नाश करते. त्यातही स्थावर विषाचा नाश व हृदयाची शुद्धी करते, हे याचे वैशिष्ट्य आहे.
तांब्याप्रमाणेच मनशीळ व हरताळ हीसुद्धा खनिज विषे आहेत. ती अशुद्ध वापरल्यास अपाय करतात, पण शुद्ध करून प्रमाणबद्ध वापरल्याने अमृतासारखे गुणावह होतात. ह्यांचीही गणना उपविषात केली आहे.
मद्याचेही सेवन नियम आणि प्रमाणाबाहेर घडल्यास विषाप्रमाणे दुष्परिणाम घडतात, कारण विषाचेच सर्वही गुण काही कमी प्रमाणात मद्यामध्ये आहेत.
विष, मद्य व ओज यांचे तुलनात्मक कोष्टक |
||
विषगुण |
मद्यगुण |
ओजगुण |
अतिलघू |
लघू |
गुरू |
अतिरुक्ष |
रुक्ष |
स्निग्ध |
अतिउष्ण |
उष्ण |
शीत |
अतितीक्ष्ण |
तीक्ष्ण |
मृदू |
अतिसूक्ष्म |
सूक्ष्म |
बहल |
अति-आशुकारी |
आशुगामी |
प्रसाद |
अति- व्यवायी |
व्यवायी |
स्थिर |
अनिर्देश्य रस |
अम्लरस |
मधुररस |
अतिविकाशी |
विकाशी |
श्लक्ष्ण |
अतिविशद |
विशद |
पिच्छिल |
विषाचे गुणतः परिणाम : विष हे लघू गुणाने मनावर आक्रमण करून त्याला अस्थिर करते व त्यामुळे त्याची चिकित्सा दुष्कर होते. रुक्ष गुणाने वायूचा व उष्ण गुणाने रक्तासह पित्ताचा प्रकोप करते. तीक्ष्ण गुण विचारशक्तीचा नाश व मर्मस्थानाची बंधने तोडतो सूक्ष्म गुणामुळे विष शरीरावयवांत प्रविष्ट होऊन त्यांच्या कार्याचा नाश होतो. आशू गुण शीघ्रप्राणनाशक, व्यवायी गुण सर्वदेहव्यापी, विकाशी दोषधातुमलांचा नाश करणारा, विशद गुणामुळे विष शरीरात कुठेही एका ठिकाणी राहत नाही. पचन होण्याचा विषाचा स्वभाव नसल्याने त्याला शरीराबाहेर घालवणे दुष्कर असते व त्यामुळेच रोगी कदाचित जगला, तरी दीर्घकालपर्यंत त्याचे दुःख जाणवत असतेच.
दूषीविष : विष जुनाट झाले, अन्य विषनाशक द्रव्यांनी मिश्र वा संसर्गी होऊन निर्वीर्य झाले, वणवा, झंझावात किंवा उन्हाचा प्रखर ताप यांनी शोषले वा शुष्क झाले किंवा मुळातच गुणहीन असले, तर त्याला ‘दूषीविष’ म्हणतात. हे विष हीनवीर्य असल्याने प्राणनाश न करता वर्षोगणती शरीरात पीडा करीत राहते.
उपद्रव : मल प्रवृत्ती फुटीर, शरीर विवर्ण, तोंडाला विशिष्ट वास, चव नसणे, अधिक तहान, मूर्च्छा, वांती ,वाणी अडखळत व अस्पष्ट, उदास वृत्ती, त्रिदोष लक्षणे, पांडुत्व, दाह, कृशत्व इ. उपद्रव विषाने होतात. आमाशयगत झाल्यास कफ आणि वायू विकार, पक्वाशयगत झाल्यास वात आणि पित्तविकार होऊन केस गळल्यामुळे रूग्ण पंखहीन पक्ष्यासारखा विद्रुप, विकल होतो आणि अवयवांची कार्यक्षमता नष्ट होते.
धातुगत झाल्यास त्या त्या धातुदुष्टीचे विकार होतात. थंड वारे आणि आकाशात अभ्र आल्यास ह्या दूषीविषाचे उपद्रव वाढतात.
सार्वदेहिक परिणाम : निद्राधिक्य, जडत्व, जांभया, हातपाय जखडणे, रोमांच, अंगमर्द (अंगात पेटके आल्याप्रमाणे वेदना), जेवल्यावर अधिक सुस्ती अपचन, अरूची, त्वचेवर गांधी, मतिभ्रंश, रसादी धातुक्षय, हातपाय तोंडावर सूज, वांती, जलोदर, अतिसार, विवर्णता, मूर्च्छा, विषमज्वर व अतितहान हे परिणाम होतात. धातुदुष्टी असेल तसे विविध उपद्रव होतात.
गरविष : निर्विष द्रव्यांचा संयोग होणे हे सर्वसाधारण गरविष आणि सविष द्रव्य संयोगाला ‘कृत्रिम’ विष अशी वेगळी नावे असली, तरी दोघांनाही ‘गरविष’च हे नाव आहे. दुष्ट बुद्धीच्या स्त्रिया स्वतःच्या इच्छेने किंवा शत्रूला वश होऊन पतीवर किंवा राजावर अशा गरविषाचा कपटाने प्रयोग करताता. त्यासाठी अन्नातून नख, केस, मल, मूत्र, आर्तव असे अमंगल पदार्थ विषारी कीटक, कच्ची भस्मे, रसायने इ. अन्नातून खाऊ घातले जाते.
परिणाम : पांडू, आग्निमांद्य, कासश्वासादी दीर्घकालिन आजाराने कृश होत जाऊन यकृतप्लीहा वृद्धी, सूज व क्षय होतो. स्वप्नात कोल्हा, मांजर, मुंगूस, साप, वानर इ. जनावरे, शुष्क वृक्ष व जलाशय, स्वतःचा वर्ण काळ्याचा गोरा किंवा या विपरीत दिसतो. आपल्याला डोळे, कान, नाक इ. नाहीत असे दिसते. सर्व अवयवांची कार्यक्षमता नष्ट होते.
उपचार : उपाचार त्वरित करावेत. वमन द्यावे म्हणजे वांतीतून विष निघून जाऊन हृदय शुद्ध होते. नंतर साखर आणि मधातून सुवर्णभस्म व सुवर्णमाक्षिक चाटणे हा सर्व कृत्रिम विषावर उत्तम योग आहे. शास्त्रोक्त पद्धतीने सुवर्ण सेवन करवावे. तूप पाजणे हा वातपित्तात्मक लक्षणे असता सोपा व खात्रीचा उपाय होय.
विषसंकट : पित्तप्रकृती, वर्षाऋतू, तीक्ष्ण पदार्थसेवन, पित्तदोष वृद्धी आणि रक्तधातुदुष्टी हा सर्व योग एकत्र होणे हे विषसंकट म्हटले जाते. यातून जगण्याची शक्यता फारच कमी असते.
परिणामवर्धक गोष्टी : भूख, तहान लागणे, उन्हाचा त्रास, अशक्तता, क्रोध, शोक, भीती यांमुळे मन संत्रस्त, अतिश्रम, अजीर्ण अतिसार, वायू व पित्तवृद्धी, तीळाची फुले, तिळाचा वास, तापलेल्या जमिनीवर पाऊस पडून निघणारे वाफारे, घनगर्जना, हत्ती किंवा उंदराचा आवाज, वाद्यध्वनी ही विषसंकटात सांगितलेली कारणे असून पूर्वेचा वारा, कमल पुष्पाचा वास ह्यांतून कोणत्याही गोष्टीमुळे विषोपद्रव तीव्र होतात. पावसाळी हवेतील क्लेद (शरीरातील पाणी) विष पसरण्यास साह्यक होतो. शरदातील अगस्ती उदयाने मात्र विष मंद होते.
व्यक्तिनाशार्थ विषप्रयोग : अन्नपान, दातवण, अभ्यंग व उटण्याचे साहित्य, शृंगारसाहित्यातील मुखलेप, वस्त्रे, अलंकार, पुष्पहार तसेच पादत्राण, बसावयाचे आसन, पाय ठेवण्याचे पादपीठ, वाहनोपयोगी हत्ती, घोड्यांचे पृष्ठभाग व त्यावर घालावयाचे सामान इत्यादींद्वारे राजपुरूष अथवा विशिष्ट व्यक्तीवर न कळत विषप्रयोग केला जाणे शक्य असते, म्हणून प्रत्यक्ष उपयोगापूर्वी त्या त्या गोष्टीची परीक्षा केली पाहिजे. याबद्दल काही उदाहरणे अशी : (१) विषटुष्ट अभ्यंग स्नेह : तेल इ. स्नेहात विष असेल तर त्याचा रंग बदलतो. बुळबुळीत व घट्टपणा येतो. त्याच्या उपयोगाने अंगावर फोड येतात ते पिकतात, पीडा व स्त्राव होतो. ताप, घामही येतो व मांस फाटते. यावर थंड पाणी शिंपणे, थंड लेप लावणे, चंदन,कमळ, वाळा, कोष्ठ इत्यादींचा रस, कवठाचा रस व गोमूत्र प्यावे. (२) हत्ती, घोडे इ. वाहनांचे पृष्ठभाग व त्यांवरील सामान विषदूषित असता त्या वाहनावरून प्रवास करणारांचे कुल्ले, गुद्द्वार, वृषण, जननेंद्रियांवर फोड उठतात वाहन प्राण्यांची लाळ जाते डोळे लाल होतात. त्यावर अभ्यंगाची योजना करावी. (३) विषदुष्ट अलंकार इत्यादी : त्याचे मूळचे तेज जाते, अलंकार घातलेल्या अवयवांचा दाह होतो. ते पिकतात, चिघळतात. त्यांवरही विषघ्न अभ्यंग करावा. (४) विषयुक्त पेय पदार्थ : पेय द्रव्यानुसार त्यावर निरनिराळ्या रंगांच्या रेषा उमटतात, फेस आणि बुडबुडे येतात त्यात प्रतिबिंब दिसत नाही किंवा ते दुहेरी, सच्छिद्र लहान अथवा वेडेवाकडे दिसते. (५) विषयुक्त भाज्या, वरण इ. : यांना पाणी सुटते, रसहीन होतात, ताज्या असूनही शिळ्या दिसतात. मूळचा वासही बिघडतो. (६) विषयुक्त फळे : यांचा मूळचा रंग, वास जातो कच्ची फळे त्वरित पिकतात व पिकलेली नासतात. असेच इतर वस्तूंचेही स्वरूप रंग, चव इत्यादींमध्ये विषामुळे अकस्मात बिघाड होतो. उपद्रवावर उपचार : पिंपळी, वाळा, जटामांसी, लोध्र, नागरमोथे, ब्राह्मी, सूक्ष्म वेलची आणि सोनगुरू यांचे मिश्रण मधात घ्यावे. याला ‘दुषी विषारी अगद’ असे नाव आहे. इतर विषांवरही याचा उपयोग होतो. (७) काही पुष्प, पत्र वनस्पतींचा वासही विष परिणामकारी असतो. त्यामुळे मूर्च्छा, शिरःशूल, ओकारी, शिंका, ज्वर, हृदयवेदना व अवयव शुष्क होणे असे उपद्रव होतात.
विष हे विषाचे औषध : स्थावर विष शरीराच्या अधोभागी व जंगम विष ऊर्ध्व भागावर परिणाम करीत असल्याने ती परस्परांना मारक होऊ शकतात. म्हणून स्थावर विषावर सर्पादीचा दंश करवणे व जंगम विषावर वचनागादी विष वापरणे हितावह होते.
सविष अन्नपरीक्षा व परिणाम : अग्निपरीक्षा : सविष अन्न अग्नीवर टाकले की चट चट आवाज होतो, अग्नीच्या ज्वाला मोराच्या कंठासारख्या हिरव्या, निळ्या, तांबूस असून फाटणाऱ्या, डोळ्यांना असह्य, त्यांचा धूर तीक्ष्ण असतो व अग्नी लौकरच आपोआप विझतो.
इतर प्राण्यांद्वारे परीक्षा : अन्नावर बहुधा माश्या बसत नाहीत, बसल्या तर मरतात, विषाने कावळ्यांचा आवाज बसतो किंवा ते मरतात, चकोर पक्ष्याच्या डोळ्यातील लाली जाते, कोकिळाचा आवाज बिघडतो, करकोचा उन्मत्त होतो, मोर आनंदित होतो, पोपट-मैना ओरडतात, पांढऱ्या ठिपक्यांचा चितळ नावाचा हरीण अश्रू ढाळतो व माकडाला मलविसर्जन होते.
अन्नाच्या वाफा : या वाफांच्या संसर्गाने हृदयात पीडा, डोळे भ्रमिष्ट, डोकेदुखी ही चिन्हे होतात. तेव्हा हृदयावर चंदन लेप व कोष्ठ, वाळा, जटामांसी व मध यांच्या द्रव्याचे नस्य व अंजन करावे. शिरीष, हळद आणि चंदन यांचा मस्तकावर आणि डोळ्याभोवती लेप द्यावा.
विषयुक्त अन्नाला हस्तस्पर्श : हातांचा दाह, नखे गळणे ही लक्षणे दिसतात. उपळसरी, गुळवेल, पावसाळ्याच्या प्रारंभी पडणारे लाल मखमली किडे (इंद्रगोप, बीरबरोटी), निळे कमळ ह्यांचा लेप हातांना लावून उपचार करतात.
विषान्नाचा जिभेवर परिणाम : जीभ आठळीसारखी जाड व स्थिर, रसज्ञानविहीन, टोचणी आणि आगयुक्त होऊन पुष्कळ कफस्त्राव होतो. त्यावर वाफेच्या परिणामाप्रमाणे उपचार व सूजहरमिश्रण चोळतात.
विषारी दातवण : याची हीच लक्षणे असून धायटी, हिरडा, जांभळाची बी मधात लावून उपाय करावेत.
सविष अन्न आमाशयात पोहोचल्यावर दाह, मूर्च्छा, तृष्णा, अतिसार, पोटफुगी, कंप इ. उपद्रव होतात. तेव्हा वांतीने विष काढण्यासाठी दही, ताक किंवा तांदुळाच्या धुवणातून गेळफळ, कडू भोपळा आणि कडू दोडकी चूर्ण पाजावे.
पक्वाशयात सविष अन्न पोहोचल्यावर वरील लक्षणे व शरीर फिकट आणि कृश होते. त्यासाठी निळीचे फळ दह्याबरोबर किंवा पिंपळी, वाळा, लोध्र, नागरमोथे, ब्राह्मी, वेलची व सोनगेरू यांचे चूर्ण दही व मधातून चाटवितात.
विषकन्या : लहानपणापासून थोड्या प्रमाणात व पुढे थोडे थोडे प्रमाण वाढवीत सुस्वरूप मुलीला विष खाऊ घालावे. यामुळे मोठी होईतो तिच्या सर्व अवयवांत विष भिनून ती संपूर्ण विषारी होते. म्हणून तिला विषकन्या म्हणतात. लुब्ध होणाऱ्या व्यक्तीला तिच्या आलिंगन, चुंबन, संभोगादीद्वारा घातक परिणाम होतात. शत्रुपक्ष अशी युक्ती योजून राजपुरुषाचा नाश करीत असतो. म्हणून सावधानतेने अशा विषकन्येची परीक्षा करावी. तिच्या अंगावरील पुष्पहार त्वरित म्लान होतात. तिच्या स्पर्शाने वस्त्रांतील उवा, शय्येवरील ढेकूण इ. मरतात.
हृदयावरण : विषाचा हृदयावर परिणाम न व्हावा म्हणून तूप, दही, दूध, मध, थंड पाणी यांतून मिळतील त्या व तितक्या द्रव्यांचा उपयोग करावा मोर, मुंगूस, घोरपड, हरिण इत्यादींचे मांस, रस आणि हृदयरक्षक अमृता घृत, अजेयघृतपान करावे. सुवर्ण योग घ्यावे. अजरुहा वनस्पतींचा लेप केलेले कपडे छातीवर धारण करावेत.
विष देणाराची ओळख : (१) विषप्रयोग करणारी व्यक्ती विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे देत नाही. (२) काय बोलावे हे त्याला सूचत नाही. (३) बोलणे बहुतेक निरर्थक, पुष्कळ विसंगत व मूर्खासारखे असते. (४) बोटे मोडतो, कारणावाचून भूमीवर रेघा ओढतो. (५) हसतो. (६) थरथर कापतो. (७) त्रस्त होतो. (८) दृष्टीला दृष्टी लावून न पाहता दुसरीकडेच पाहतो. (९) गलितगात्र होतो. (१०) चेहऱ्याचा वर्ण बदलतो. (११) नखांनी उगीच काड्या वगैरे मोडतो. (१२) मुद्रा दीनवाणी होते. (१३) वारंवार डोक्यावरून हात फिरवतो. (१४) भलत्याच मार्गाने पळून जाण्याच्या विचारात असलेला दिसतो. (१५) सर्व वागणे विपरीत भासते व चैतन्यहीनसा दिसतो.
सामूहिक विनाशार्थ विषप्रयोग : आक्रमण करणाऱ्या राजाचा ससैन्य विनाश करण्यासाठी त्याच्या गुरांचा चारादाणा, माणसांसाठी असलेले अन्नधान्य आणि ह्या दोहोंसाठी उपयुक्त असे जलाशय, रस्ते आणि वातावरण ही सर्व विषदुष्ट करण्याची शक्यता असते. म्हणून उपयोगापूर्वी त्यांची परीक्षा व इष्ट तर शुद्धी केली पाहिजे.
(१) विषदुष्ट चारादाणा व अन्नाचे पुढील परिणाम होतात : ग्लानी, मूर्च्छा, वांती, अतिसार. (२) विषदुष्ट जलाशय परीक्षा : पाणी बुळबुळीत, फेसाळ, उग्रवास व विविध रंगांच्या रेषायुक्त होते. त्यातील बेडूक, मासे इ. मरतात त्यात डुंबणारे व ते पाणी पिणारे पशुपक्षी मृत होतात. हत्ती, घोडे अशा आनुप प्रदेशात संचार करताना मोह, ज्वर, दाह, सूज अशा विकारांनी ग्रस्त होतात. (३) विषदुष्ट रस्ते : जमीन, खडक, नदी किनारे, वाळवंट व रस्ते विष शिंपून दूषित केली जातात. तेथे वावरणाऱ्या माणसांच्या व पशूंच्या शरीराचा जो भाग संसर्गात येईल तेथे सूज येऊन दाह होईल. तेथले केस, नखे गळून पडतील. (४) विषारी धूर अथवा वायू : यात संचार करणारे पक्षी थकून खाली पडतात, माणसांना खोकला, पडसे, शिरःशूल व तीव्र नेत्ररोग होतात.
यांची शुद्धी खालीलप्रमाणे करतात : (१) चारादाणा व अन्नामुळे होणाऱ्या उपद्रवासाठी प्रथम वमनादी शोधन आणि नंतर शामक चिकित्सा करावी. विषनाशक अशा चांदी, सोने, पारा, उपळसरी व या सर्वांच्या समान नागरमोथे, गोरोचन आणि कपिला अशा द्रव्यांचा लहानमोठ्या वाद्यांना लेप करून ती वाजवावीत. (२) जलाशय शुद्धी : धावडा, राळेचा वृक्ष, असाणा, पांगारा, पाडळ, मोरवाडा, बाहवा, आपटा, कायफळ यांची साल जाळून ती राख जलाशयात मिसळावी. (३) विषदुष्ट रस्ते : उपळसरी व सुगंधी गणातील द्रव्ये दारूबरोबर, पाण्यात माती कालवून त्याबरोबर किंवा वावडिंग, पहाडमूळ व किन्हई यांच्या काढ्याबरोबर वाटून रस्ते शिंपावेत. (४) विषारी धूर आणि वायुशुद्धी : लाख, हळद, अतिविष, नागरमोथा, रेणुकबीज, वेलची, तमालपत्र, तगर, कोष्ट आणि गहुला यांची पूड विस्तवावर टाकून तो धूर सर्वत्र पसरवावा. (५) क्षारागद : धावडा, लघुराळेचा वृक्ष, शिरीष, तिवस इ. वृक्षांची साल जाळून क्षार विधीने क्षार काढावा व त्याचा लेप वाद्यांना करून ती वाजवावी. (६) पताका व तोरणांनाही हाच लेप करून ती देवळे, झाडे व उंच इमारतींची शिखरे यांवर बांधावीत.
विषलिप्त शस्त्रप्रयोग : शस्त्रांना विषाचे पाणी देऊन शत्रूकडून मारा होतो. हे विष जर सौम्य असेल, तर तत्काल प्राणहानी झाली नाही तरी शस्त्रामुळे झालेल्या व्रणातून रक्तस्त्राव होतो, व्रण लौकर पिकतो, त्यातून काळे, ओलसर, दुर्गंधयुक्त मांस वारंवार झरते. शिवाय तहान, मूर्च्छा, ज्वर, दाह ही लक्षणे होतात.
शस्त्राच्या आघातावाचूनही व्रण झाला व जर ही लक्षणे आढळली, तर त्या व्रणात विषाचा अन्य प्रकारे प्रवेश झाला आहे असे समजावे.
स्थावर व जंगम विषांवर अपथ्य : व्यायाम, दिवसा झोप, क्रोध, उन्हात फिरणे, अंगावर उन्ह घेणे, मैथून हे विहार आणि काकवी, नवे धान्य, तीळ, धान्यापासून केलेली दारू, कुळीथ इ. उष्ण व पित्तवर्धक द्रव्ये वर्ज्य करावीत. ताम्र आणि सुवर्ण यांचे शास्त्रोक्त सेवन सर्व प्रकारच्या विषांवर हितावह आहे.
उपविषे : रुई व निवडुंगाचा चीक, कळलावी, गुंजा, कण्हेर,कुचला, अफू, धोतरा, जेपाळ ही मूळ, पान, फळ इ. स्वरूपाची नऊ उपविषे गणली आहेत. यांतील रुई व निवडुंगाच्या चिकाची शुद्धी करावी लागत नाही. कळलावी कंदाची गोमूत्रात, गुंजांची कांजीमध्ये, तुपात भाजून कुचल्याची, आल्याच्या रसात अफूची, धोतरा बी चार प्रहर गोमूत्रात ठेवून सुकल्यावर कांडून तुसे काढली म्हणजे आणि जेपाळ बीची टरफले व मोरव काढून म्हशीच्या शेणात तीन दिवस ठेवल्यानंतर स्वच्छ धुवावे आणि अडुळशाच्या रसात घोटून कोऱ्या खापरावर लिंपून शुष्क झाल्यावर लिंबू रसाच्या बऱ्याच भावना दिल्याने शुद्ध होते.
सर्वही विषे, उपविषे शुद्ध करून सूक्ष्म प्रमाणात योग्य उपयोग केल्याने प्राणदायी व रसायनासारखी फलप्रद होतात, तसे न केल्यास प्राणघातक होतात. दुरुपयोग झाल्यास रुई आणि निवडुंग यांचा चीक तीव्र विरेचक, गुंजांमुळे विसूचिका लक्षणे (वेदनायुक्त वांती, जुलाब), कण्हेरामुळे झटके येणे, श्वासावरोध, कुचल्यामुळे धनुर्वाताची लक्षणे, अफूमुळे संज्ञानाश, धोतऱ्यामुळे गलशोथ, दृष्टीमांद्य व जेपाळने तीव्र विरेचन व ओजोनाश इ. प्रमुख लक्षणे होऊन मृत्यू येतो.
यांपैकी अफूच्या उपद्रवासाठी तुरटी किंवा हिंगाचे पाणी उपयुक्त होते. इतर सर्व विषांवर गाईचे तूप पाजणे, दूध, साखर, लोणी यांचा उपयोग करावा म्हणजे ते शमतात.
जंगम विष : सर्प, विंचू, लूता इ. प्राणी आणि सिंह, वाघ, कोल्हा, पिसाळलेली कुत्री . इ. पशू यांचे दंश आणि चावण्यामुळे मारक विषाचेच परिणाम होतात. सजीव प्राण्यांच्या ह्या दंश विषालाच जंगम विष म्हणातात.
सर्प : दिव्य आणि भौम असे मुख्य दोन भेद सर्पामध्ये आहेत. यांतील वासुकी इ. दिव्यसर्प केवळ दृष्टी व निःश्वासाच्याच विषाने प्राणी मारतात, पण हे सहसा भूलोकी येत नाहीत.
भौम सर्पाचे ऐंशी भेद असून त्यांपैकी दर्वीकर २६, मंडली २२, राजीमंत १०, वैकरंज १० हे ६८ प्रकार सविष व बाकीचे १२ निर्विष होत. (१) दर्वीकर हे फणायुक्त, शीघ्रगामी व स्वस्तिकादी चिन्हयुक्त आणि वातप्रकोपक, (२) मंडली हे मंडलयुक्त, गोल लहान फणा व अंगावर वर्तुळे असलेले पित्तप्रकोपक व (३) राजीमंत हे फणाहीन, चित्रविचित्र रेषांचे व कफप्रकोपक असून (४) वैकरंज ही वरील सर्पाची मिश्रजात रंग चित्रविचित्र, त्रिदोष प्रकोपक होय.
सर्पदशांची कारणे : भूक, भीती, स्पर्शाने डिवचले जाणे, विष अधिक साठणे, डूक (डाव धरणे) इ. दंशाची कारणे संभवतात. दंश स्थानी खाज, सूज, पीडा व आग आणि गाठ आल्यासारखी दिसणे ही विषारी दंश लक्षणे होत.
दंशाचे वेग : दंशाचे सात वेग येतात व ते उत्तरोत्तर भयंकर होऊन प्राणनाश करतात. प्रथम वेगात रक्तदुष्टी होते म्हणजे रक्त काळे, शरीर काळे व अंगावर मुंग्या चालतात असा भास होतो. द्वितीय वेगात मांसधातुदुष्टी म्हणजे शरीर काळे ठिक्कर, सूज व अंगावर गाठी येतात. तृतीय वेगात मेदोधातुदुष्टी म्हणजे दंशातून चिकट स्त्राव, डोके जड, स्वेदावरोध होऊन दिसेनासे होते. चतुर्थ वेगात विष कोठ्यात शिरून कफादी दुष्टी, डोळ्यांवर झापड, तोंडाला पाणी सुटणे, संधिशैथिल्य निर्माण होते. पंचम वेग अस्थिधातूत पोहोचतो, प्राणवायू व अग्निदुष्टी, सांधे फुटणे, उचकी व दाह होतो. षष्ठ वेगात मज्जाधातुदुष्टी ग्रहणी दुष्ट होते, अवयव जड, अतिसार, हृदयपीडा व मूर्च्छा येते. सप्तम वेगात शुक्रधातूत विषप्रवेश, व्यानवायुप्रकोप, सर्व स्त्रोतसातून कफस्त्राव वातीसारखा होतो. कमर व पाठ मोडते, लाळ व घाम फार, हालचाल बंद व श्वासाचा अवरोध होतो. इतर जातीच्या सर्पविषांचेही थोड्याफार फरकाने असेच सात वेग होतात.
पाण्यात बुडलेले असणे, भूक, तहान, श्रम, भीती, थंडी, वारा, ऊन यांची अतिपीडी झालेली असणे, कात टाकणे, मैथुन, एखादा रोग आणि नुकतेच विष ओकलेले असेल, तर सर्पाला विष अल्प असते. सर्पविषाची असाध्य चिन्हे ही पुढीलप्रमाणे असतात : (१) उचकी, श्वास, वांती, खोकला असून हृदयशूलही असेल, तर असाध्य ठरते. (२) तोंडातून फेस, संज्ञानाश, हातपाय, तोंड काळे, दात ढिले, नाक वसणे, अंग फुटल्यासारखी पीडा, दंशातून चिकट स्त्राव होता. (३) तीव्र नस्याने चेतना न येणे, दंशव्रणातून रक्त न येणे, काठी इत्यादींचा आघात करून अंगावर वळ न उमटणे, थंड श्वास, डोक्याचे केस गळणे इ. लक्षणे दिसतात.
सर्पदंशावर उपाय : (१) दंशस्थान छेदून रक्त वाहू द्यावे, तेथेच डाग द्यावा. (२) सापाला पकडून आपण चावावे. (३) वारुळाची माती किंवा ढेकूळ चावून ती थुंकी लावावी, कानातला मळ लावावा. (४) तोंडात कापड धरून दंशस्थान सरसर चोखावे व थुंकावे. (५) दंशस्थानावर चार अंगुळे जागा सोडून दोरी, चामड्याचा मऊ पट्टा किंवा झाडाची अंतरसाल घट्ट बांधावी. याला अरिष्टाबंधन म्हणतात. (६) दंशस्थानाच्या आसपासची, हातापायाच्या शेवटी किंवा कपाळामधील शीर छेदून रक्तस्त्राव करवावा. नंतर विषहर लेप व थंडगार जल शिंपावे. (७) मस्तकावर काकपदाच्या आकाराचा छेद करून त्यावर रक्तथुक्तमांस अथवा चामडे ठेवावे. हा प्रयोग दवींकराच्या दंशावर उपयुक्त ठरतो. (८) सत्यव्रती, तपस्वी, ब्राहाण, ऋषी, देवांनी सुचविलेले मंत्र हे तेजस्वी प्रभावाने भयंकर विषापासूनही रक्षण करतात मांत्रिक सदाचारी असावा.(९) स्थावर विषाप्रमाणे सुवर्णसेवन, अग सेवनाने हृदयरक्षण करावे.
सर्पविषमुक्तीचे चिन्ह : तीनही दोष व सप्तधातू समावस्थेत येऊन अन्नाची इच्छा होणे, मूत्र व जिव्हा निर्दोष आणि इंद्रिये व मन प्रसन्न होऊन कार्यक्षम होणे, वर्णही प्रसन्न होणे ही सर्पविषमुक्तीची लक्षणे होत.
वर्ज्य : तेल, कुळथाचे पाणी, मद्य, कांजी व झोप वगैरे वर्ज्य असून मंडली सर्पदंशाची जागा डागू नये. वमन, विरेचन, नस्य, अंजन, घृतपान. तूपमधातून अगदपान इ. याचे पथ्यविधी आहेत. [⟶ पथ्यापथ्य].
विषारी कीटदंश : उत्पत्ती व लक्षणे : मेलेला सर्प किंवा त्याचे मल, मूत्र, शुक्र, अंडी कुजून विषारी कीट उत्पन्न होतात. यांच्याही दंशाने सात वेग येतात. त्या लक्षणांवरून वात, पित्त, कफ आणि सांनिपातिक असे पुढील चार प्रकार संभवतात : (१) वात लक्षणे : दंशस्थानी टोचणी व तीव्र पीडा (२) पित्त लक्षणे : अल्पस्त्राव, दाह, लाली, धावरे, खजूर किंवा पक्क पोलूच्या फळासारखा रंग (३) कफ लक्षणे : पीडा मंद, पक्क उंबरासारखा दंश आणि (४) सांनिपातिक लक्षणे : स्त्राव फार, तीनही दोषांची लक्षणे असून असाध्य ठरतात. सूज पसरणे, रक्तदुर्गंध, डोळे व डोके जड होणे, मूर्च्छा, भ्रम, श्वास ही सर्वसामान्य लक्षणे होत.
दंशस्थानी गांधी व सूज : लूताविष : हे भयंकर विषारी किडे सूक्ष्म असून दंशाची लक्षणे दोषानुसार चार प्रकारची आढळतात. सांनिपातिक स्वरूपात लक्षणे असाध्य व पृथक् दोषांची कष्टसाध्य असतात.
दंशस्वरूप : गजकर्णासारखे चट्टे पांढरे, तांबडे, काळे, मृदूमध्ये जाळीसारखे, तीव्र वेदना पिकतात, लस वाहते, ती लागेल तेथेही व्रण होतात. विशेषतः शरीराच्या ऊर्ध्वमागी होणे हा ह्या चट्ट्यांचा विशेष आहे. ७ ते १५ दिवसांत ह्या विषाने मृत्यू येतो. यांचे नख मलमूत्रही विषारी असते.
उपाय : तुंबडी, शिंग किंवा सिरावेध करून रक्तस्त्राव करणे, शीत द्रव सिंचन, शीत लेप, नस्य, अभ्यंग, अंजन, धूम, कवल, गंडूष, ऊर्ध्व अधःशोधन करावं. पिंपळ, भोकर, बेहडा यांची साल, फळे, बी इत्यादींचा उपयोग द्रव सिंचन, लेप वगैरेंसाठी करावा.
पिसाळलेल्या पशूंचे दंश-विष : कुत्रा, कोल्हा, तरस, अस्वल, वाघ इ. पशू कफवृद्धी व वातप्रकोप होऊन पिसाळतात. संज्ञानाश, शेपटी खाली पडणे, जबडा व खांदे लूळे होणे, तोंडातून लाळ जाणे, ऐकू न येणे, अंधत्व आणि वाटेल त्याला चावण्यासाठी सैरावैरा धावणे ही पिसाळलेल्या पशूची चिन्हे होत.
दंश झालेल्या व्यक्तीची चिन्हे : दंशाच्या जागी बधिरता, त्यातून काळेशार चिकट रक्त वाहणे, विषारी शस्त्राच्या व्रणाची सर्व चिन्हे, हृदय व डोक्यात पीडा, ज्वर, अंग ताठणे, खाज, टोचणी. विवर्णता, सुन बहिरीसारखा विकार, भ्रम, व्रण पिकणे, गाठी उठणे, त्वचा आखडणे, व्रणाच्या कडा टणक व उचलून आल्यासारख्या होणे इ. दंश झालेल्या व्यक्तीची चिन्हे होत. जो पशू चावला त्याचेच रूप आरशात किंवा पाण्यात दिसणे, हे याचे मरणसूचक चिन्ह होय.
जलत्रास : पाण्याचा स्पर्श, खळखळाट दृश्य किंवा पाण्याचे चित्र पाहूनही, फार काय नुसत्या कल्पनेनेही ह्या विकाराचा झटका येतो, म्हणून ह्याला जलत्रास म्हणतात. पिसाळलेल्या कुत्र्याच्या दंशानंतर ही स्थिती बहुधा होते. दंश न होताही हा उपद्रव होऊ शकतो. हेही मृत्यूसूचक होय.
उपचार : दंशब्रण दाबून रक्त काढून कढत तुपाचा चटका किंवा डाग द्यावा. त्रिदोषहर योग, विषनाशक विविध अगदयोग, विषध्नलेप द्यावेत, जुने तूप पाजावे. अंकोलाच्या झाडाची उत्तर दिशेची ताजी मुळी तुपातून प्यावी व लेपही द्यावा. श्वेतपुनर्नवामूळ व धोतऱ्याचे फळ वाटून पाजावे. विषहर औषधाच्या पाण्याने स्नान घालावे. पुन्हा विषप्रकोप न व्हावा म्हणून वमन-विरेचनाने कोष्ठशुद्धी अवश्य करवावी. प्रभावी मंत्राचाही उपचार करावा.
विंचू : नांगीला पेरे कमी असणे किंवा मुळीच नसणे ही विषारी विंचवाची ओळख असून अधिक पेरी मंदविष लक्षण होय.
उत्पत्ती : (१) मंदविष विंचू : सापाने दंश केलेले लाकूड, विटा, ढेकूळ यांत किंवा दंशानंतर सडलेल्या फळात अथवा जनावरांचे शेण, मूत्र सडून त्यात उत्पन्न होतात. यांचे कृष्ण, श्याच, कर्बूर इ. १२ प्रकार आहेत. (२) मध्यम विष विंचू : सर्प किंवा विषारी प्राण्यांच्या कुजलेल्या मल, मूत्र, अंड्यापासून होतात. पोट धुरकट, नांगी दोन पेरांची असून रक्त, पीत व कपिल हे यांचे तीन प्रकार आहेत. (३) तीव्रविष विंचू : हे सर्पादींचे देह कुजून होतात. यांचे श्वेत, चित्र, श्यामल इ. १५ प्रकार असून यांच्या विषाचे सर्पविषासारखेच वेग येतात.
दंशलक्षणे : (१) मंदविष : वेदना, कंप, दंश होताच निखाऱ्याचा चटका लागल्यासारखे तीक्ष्ण दाह, घाम, सूज, ताप तसेच हातापायांना दंश झाल्यास विष वर चढते. (२) मध्यम विष : जिभेला सूज, अन्न गिळवत नाही, मूर्च्छा इ. लक्षणे दिसतात. (३) तीव्र विष : मोठमोठे जीड, भोवळ, दाह, ज्वर, रोमरंध्रांतूनही काळे रक्त जोराने स्त्रवते, जीभ सुजते, मृत्यू येतो.
उपचार : उग्र व मध्यम विषासाठी सर्पविषाप्रमाणेच दंशाभोवती कोमट शेणाने शेकून घाम काढावा फासणी घालून रक्त जाण्यासाठी हळद, सैंधव, सुंठ, मिरे, पिंपळी यांचे चूर्ण चोळावे महाळुंग रस, तुळस, गोमूत्र यांचा लेप द्यावा तूप, मध किंवा दूध-साखर पुष्कळ घालून प्यावे. मंदविष दंशावर चक्र तैलाने किंवा विदारिगंधागणोक्त सिद्ध तेलयुक्त पोटिसाने शेकावे, चातुर्जात चूर्ण दूध-गुळातून किंवा गूळ घालून दूध पाजावे. मोर, कोंबडा यांची पिसे, सैंधव, तेल आणि तूप किंवा करडईची फुले, हळद, कोढू धान्याचे गवत व तूप यांचा धूप द्यावा.
उंदराचे विष : लालन, चपल, पुत्र, श्वेत, छछुंदर इ. १८ नावे संसर्ग व विषलक्षणे उंदराच्या जातीवरून आहेत.
संसर्ग : उंदराचे शुक्र हे विष आहे. शुक्रव्याप्त असा दात, नख इ. कोणताही भाग आपल्या त्वचेवर लागल्यास रक्त दूषित होते व त्वचेवर गाठी, सूज, काठ उंचावलेली मंडले, पुष्कळशा पुळ्या, धावरे, त्वचारोग, संधिपीडा, मूर्च्छा, अंगग्लानी, रोमांच इ. लक्षणे होतात.
उपचार : दंशावर डागणे, फासण्यांनी रक्तस्त्राव करणे शिरीष, हळद, कोष्ठ, केशर व गुळवेल यांचा लेप देणे तसेच कडू दोडक्यातील गराचा काढा वांतीसाठी तर निशोत्तर, दंतीमूळ, त्रिफळा यांचा विरेचनासाठी उपयोग अथवा दुसरी वमन, विरेचन करणारी औषधे द्यावीत. शिरोविरेचनासाठी शिरीष वृक्षाची अंतरसाल हुंगवणे. शेणाच्या रसाचे अंजन देणे. कवठाचा गर, गाईच्या शेणाचा रस व मध किंवा रसांजन, हळद, इंद्रजव, कुटकी व अतिविष कल्क व मध यांचे चाटण द्यावे.
सावधानता : हे विष शरीरातून संपूर्ण न गेले, तर अभ्रयुक्त हवेत पुन्हा कुपित होते. तसे झालेच तर रक्त काढणे इ. सर्व उपचार पुन्हा करावेत.
आणखी काही विषारी कीटक : परुषा, कृष्णा, चित्रा इ. आठ प्रकारच्या गोमी कृष्ण, सार, कुहक इ. आठ प्रकारचे बेडूक विश्वंभरा, अहिंडुका, स्थूलशीर्षा इ. सहा प्रकारच्या मुंग्या कांतारिका, कृष्णा, पिंगला इ. सहा प्रकारच्या माश्या आणि सामुद्र, परिमंडल, पार्वतीय इ. पाच प्रकारचे मासे यांत येतात. ह्यांच्या दंशाने दाह, सूज, कंडू, पुटकुळ्या, थंडीताप इ. उपद्रव होतात. त्यांवर विषारी शस्त्राच्या परिणामांवर सुचवलेले उपचार करावेत. तीव्र परिणामांवर सर्पविषावरील उपचार करावेत.
जळवा : ह्या पाण्यात राहतात. मासे, बेडूक, किडे यांतील विषारी प्राण्यांच्या सडलेल्या मूत्रपुरीषापासून उत्पन्न होणाऱ्या सविष जळवा होत. इतर जळवा निर्विष असतात. कृष्णा, अलगर्दा, इंद्रायुधा इ. सविष जलवा असून यांच्या दंशाने त्या जागी सूज, बरीचशी खाज, मूर्च्छा, ताप, दाह, वांती, गुंगी, ग्लानी असे उपद्रव होतात. यावरील उपचार म्हणून निशोत्तर, इंद्रावण इ. औषधे व लवण वर्गातील द्रव्यांचे सूक्ष्मचूर्ण मधातून प्यावे, अंजन, अभ्यंग, नस्य इ. प्रकारांनी द्यावे. याला प्रभावी महाअगद म्हणतात.
शंकाविष : काही तरी बोचले की, काही तरी चावले अशा शंकेने सुद्धा मानसिक परिणामामुळे उद्वेग, ताप, वांती मूर्छा, इ. विषोपद्रव होतात. अशा वेळी रक्तात पोहोचल्यावाचून विषाचे मारक परिणाम होत नाहीत ही गोष्ट पटवून देणे हाच मुख्य उपाय होय. शिवाय मंत्रोक्त पाणी अंगावर शिंपणे, धीर देणे व खडीसाखर, मनुका, भुई कोहळा, जेष्ठमध आणि मध यांचे पाणी पाजणे व तेच शिंपणे हे उपाय करतात.
संरक्षक उपाय : हिरा, माणिक, पाचू वगैरे रत्ने, विषमूषिका वनस्पती, पुनर्नवा, सर्पाचा मणी व उग्र विषे अंगठी, अलंकार, ताईत इत्यादींमध्ये घालून नित्य अंगावर धारण करावीत. दिवसा जंगल व अपरिचित ठिकाणी जाताना, रात्री घराबाहेर पडताना घुंगरू बसवलेली खुळखुळणारी काठी, छत्री जवळ बाळगावी. आवाजाने व छत्रीच्या सावलीने साप इ. भिऊन पळून जातात.
जळूकर, श्री. द.
“