विश्वहिंदु परिषद : भारतातील एक हिंदु संघटना. प्राचीन गौरवशाली परंपरा व इतिहास असलेल्या भारतावर जवळजवळ बाराशे वर्षे परकीय आक्रमणे होत राहिली व काही शतके परकीयांचे साम्राज्य राहिले आणि त्याचा परिणाम म्हणून येथील समाजामध्ये अनेक प्रकारची कमजोरी उत्पन्न झाली. अर्थात परकीय, विशेषतः इंग्रजी राज्य, हे आपल्या कमजोरीचे ‘कारण’ होते अशी समजूत व मांडणी प्रचलित होती परंतु आपल्या समाजात अशी कमजोरी आधीपासूनच हळूहळू बळावत गेल्यामुळेच परकीय राज्य शतकानुशतके टिकून राहिले म्हणजेच परक्यांचे शासन हे आपल्या कमजोरीचे ‘कारण’ नसून तो आपल्या कमजोरीचा ‘परिणाम’ होता, असे ⇨ राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक डॉक्टर⇨ केशव बळीराम हेडगेवार (१८८९-१९४०) यांचे विश्लेषण होते आणि म्हणूनच ती सर्व प्रकारची कमजोरी व सामाजिक असंघटित अवस्था दूर करणे हाच शाश्वत व भरीव उपाय आहे, असे त्यांचे सांगणे होते. त्यांचे हे मूलभूत चिंतन हीच ‘विश्वहिंदु परिषद’ या संस्थेच्या स्थापनेमागील भूमिकेची पार्श्वभूमी होती.

सुमारे हजार वर्षाच्या प्रदीर्घ कालखंडात आपसांतील प्रतिस्पर्धा आणि जाती, पंथ, क्षेत्र, प्रदेश, सांपत्तिक स्तर इ. निरनिराळ्या आधारांनी जे भेदभाव समाजात रुजले आणि त्यामुळे जी दुर्बलता उत्पन्न झाली, ती नाहीशी करून हिंदु समाजामध्ये एकात्मता, समरसता आणि एकजूट पुनर्स्थापित करणे हा सकरात्मक विचार या स्थापनेमागे आहे. ही सामाजिक, धार्मिक व सेवाव्रती संघटना असून राजकारणापासून अलिप्त आहे. हिंदू धर्म व हिंदू संस्कृती यांबद्दल अभिमान, निष्ठा व भक्ती जागृत करणे, प्राचीन व समृद्ध जीवनप्रणालीसंबंधी श्रद्धा जोपासणे, हिंदूंच्या आध्यात्मिक मूल्यांवर अधिष्ठित नैतिक गुणांचा विकास करणे, अस्पृश्यता नाहीशी करून स्‍नेहपूर्ण वातावरणात, वंचित आणि मागासलेल्या लक्षावधी बांधवांना प्रगतीची संधी, आदर व समानतेचे स्थान मिळवून देणे, वनवासी-गिरिजन बंधूंनादेखील सामाजिक सुरक्षा व प्रतिष्ठा प्राप्त करून देणे, उपासना-पद्धती कोणतीही असली, तरी सर्व हिंदु समाजाचेच घटक असल्याची जाणीव उत्पन्न करणे आणि त्याबरोबरच हिंदू विचार, जीवनपद्धती व मानवतेच्या कल्याणाची मूल्ये संपूर्ण विश्वामध्ये प्रसारित करणे, ही विश्वहिंदू परिषदेची उद्दिष्टे आहेत. ‘हिंदुत्व’ हे स्‍नेह व समन्वयाने संपूर्ण विश्वाचा विचार-आचार करणारे व्यापक जीवनतत्व असल्याने (सर्वोच्च न्यायालयाचा निकाल: सिव्हिल अपील नं. २८३६ ऑफ १९८९: न्यायमूर्ती वर्मा व अन्य ११ डिसेंबर १९९५) तेच विश्व-समन्वयाचे लक्ष्य साध्य करू शकते, अशी परिषदेची धारणा आहे.

ही मूलतत्त्वे व उद्देश ठेवून दि. २९ ऑगस्ट १९६४ रोजी ‘विश्वहिंदु परिषद’ या संस्थेची स्थापना मुंबईतील पवईच्या सांदीपनी साधनालय आश्रमात झालेल्या चाळीसहून अधिक विशेष निमंत्रितांच्या बैठकीत करण्यात आली. संस्थापक-सदस्यांमध्ये स्वामी चिन्मयानंद, डॉ. कनैयालाल मुनशी, मास्टर तारासिंग, संत तुकडोजी महाराज, भाई हनुमानप्रसाद पोद्दार, सी. पी. रामस्वामी अय्यर, जैन मुनी सुशीलकुमार, दलाई लामा, स्वामी सत्यमित्रानंद गिरी, तसेच शृंगेरी, द्वारका, कांची कामकोटी, ज्योतिष, गोवर्धन या पीठांचे शंकराचार्य आदी श्रेष्ठींचा समावेश होता. शि. शं. (दादासाहेब) आपटे संस्थापक-महामंत्री म्हणून नियुक्त झाले. या उपक्रमाच्या प्रेरणाप्रयत्‍नांमध्ये राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचे तत्कालीन सरसंघचालक गोळवलकर गुरूजींची प्रमुख भूमिका होती. त्यानंतर क्रमाक्रमाने धर्मसंसद, विद्वत्‌परिषद, भारत कल्याण परिषद, बजरंग दल, दुर्गावाहिनी अशा विविध क्रियाशील कार्यरचना उभारण्यात आल्या असून त्यांच्या माध्यमातून निरनिराळी कार्ये चालतात. विश्वहिंदु परिषदेच्या गेल्या तीन दशकांतील राष्ट्रीय स्तरावरील प्रमुख कार्यकर्त्यांमध्ये व पदाधिकाऱ्यांमध्ये प्रथमाध्यक्ष म्हैसूरनरेश जयचामराज वाडियार, लाला हंसराजगुप्त (दिल्ली), महाराणा भगवंतसिंह (मेवाड), पं. रामनारायण शास्त्री (इंदूर), हरमोहनलाल, केकाशास्त्री, मंदाकिनी दाणी आदींचा समावेश होतो. धर्माचार्यांचा समन्वय, सेवाव्रत, वनवासी क्षेत्र, गोरक्षण व गोसंवर्धन, महिला जीवन, परधर्मप्रवेशाला आळा घालून धर्मांतरितांचे परावर्तन व पुनर्वास, प्रचार-प्रसार इ. विविध विभागांचे कार्य योजनाबद्ध रीतीने चालते. विदेशविभागाच्या माध्यमातून विदेशातील हिंदूंशी संपर्क, संघटन, युवक-प्रशिक्षण, सेवाभाव-प्रेरणा इ. कार्ये संचालित केली जातात. चाळीसहून अधिक देशांमध्ये परिषदेचे नियमित कार्य चालत असून नव्वद देशांत सतत संपर्क असतो. अमेरिका, आफ्रिका, डेन्मार्क नेदर्लंड्‌स, इंग्‍लंड, नेपाळ, सिंगापूर आदी ठिकाणी १९८४ पासून विश्व-संमेलनेही आयोजित केली गेली आहेत.

धर्मसंसदेच्या १९८४ मधील दिल्लीच्या व १९८५ मधील उडिपीच्या अधिवेशनांत हिंदू समाजातील बहुसंख्य पंथोपपंथांचे अध्वर्यू कार्यकर्ते एका व्यासपीठावर हिंदू समाजरचनेच्या विचारासाठी एकत्र आले, ही मोठी उपलब्धी आहे. तेथे ‘न हिंदु पतितो भवेत् ।’ ही सर्वसमावेशक घोषणा करून, प्रचलित अनिष्ट व फुटीर प्रवृत्तींचा त्याग करण्याचा संदेश देण्यात आला. या दोन व नंतरच्या सहा धर्मसंसदांतून या दृष्टीने पुढील आचारसंहितेचे पालन करण्याचे आवाहन संपूर्ण हिंदू समाजाला करण्यात आले आहे : (१) सामाजिक एकात्मतेचे पोषण (२) अस्पृश्यतानिवारण, जातिभेदाला विरोध, हुंडाप्रतिबंध (३) आदर्श पारंपरिक महापुरूषांचा गौरव (४) धार्मिक व नैतिक शिक्षण, संस्कृत भाषेचे प्रशिक्षण (५) श्रमप्रतिष्ठा व त्याद्वारे समता (६) दुर्बल, अभावग्रस्त, आपद्‌ग्रस्त घटकांना साहाय्य व संधी (७) मंदिरसंस्थेचा जीर्णोद्वार व सामाजिक चैतन्यकेंद्रे म्हणून विकास (८) सण व उत्सव यांमागील सामाजिक आशयाची जाणीव (९) अन्य देशांतील हिंदू समाजाशी संपर्क व समन्वय (१०) धर्मांतराला आळा व धर्मांतरितांचे परावर्तन (११) हिंदूंच्या मानबिंदूंची व श्रद्धास्थानांची प्रतिष्ठा राखणे (१२) हिंदुहितरक्षणासाठी हिंदुविरोधी कारस्थानांवर नजर ठेवणे व आवश्यकतेनुसार संघर्षाचीही सिद्धता करणे.

वरील संहितेनुसार विश्वहिंदू परिषदेने जे विशेष उपक्रम हाती घेतले, त्यांपैकी काही पुढे दिले आहेत :

समाजसेवा व प्रबोधन : निरनिराळ्या क्षेत्रांत शुश्रूषा व आरोग्य केंद्रे, वनवासी-विकास केंद्रे, स्वयंरोजगार प्रकल्प, वंचित बालकांसाठी बालवाडी-संस्कारकेंद्रे-वसतिगृहे-विद्यालये, महिलाविकास केंद्रे, चल-रुग्णसेवा आता अशा प्रकारचे २,१०० हून अधिक सेवाप्रकल्प भारताच्या सर्व प्रांतांमध्ये परिषदेचे कार्यकर्ते चिकाटीने चालवीत आहेत. सेवा, संस्कार, समन्वय व सामाजिक सुरक्षा या चार पैलूंवर सर्व प्रकल्पांची रचना आधिष्ठित आहे. शांताराम हरी केतकरकृत सेवासरितांचा अमृतकुंभ (१९९७) या पुस्तकात यांतील काही प्रकल्पांची माहिती दिलेली आहे. यांपैकी मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील तलासरी (जि. ठाणे) येथील ‘वनवासी कल्याण केंद्र’ हा प्रकल्प उल्लेखनीय आहे.

महत्त्वाच्या व प्रासंगिक अशा राष्ट्रीय समस्यांकडे हिंदू समाजाचे व शासनाचे लक्ष वेधण्यासाठी उपक्रम राबवले जातात. उदा., गोवंशरक्षण व संवर्धन ईशान्य भारतातील घुसखोरी, हिसांचार व दहशत सव्वा लाखांचे परावर्तन अन्य धर्मीयांची हिंदुविरोधी कारस्थाने व फुटीर प्रवृती यांना विरोध रामजन्मभूमी मुक्ती आंदोलनाचे संचालन व त्यासाठी रथयात्रांचे प्रभावी आयोजन अशा विविध विषयांकडे शासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी, शांततामय मार्गाने विश्वहिंदू परिषदेने कार्य केले आहे.

विश्वहिंदू परिषदेतर्फे हिंदु चेतना हे पाक्षिक चालवले जाते. विश्वहिंदू परिषदेच्या विद्यमान पदाधिकाऱ्यांमध्ये विष्णू हरि दालमिया हे अध्यक्ष, अशोक सिंहल हे कार्याध्यक्ष, आचार्य गिरिराजकिशोर हे महामंत्री, जयभानसिंह पबैया (बजरंग दल), साध्वी ऋतंबरादेवी (दुर्गावाहीनी) इत्यादींचा समावेश होतो. प्रसिद्ध इंग्रज इतिहासज्ञ आर्नल्ड जोसेफ टॉयन्बी यांनी इशारा दिला आहे, की ‘पश्चिमेकडील जगात ज्या अध्यायाची सुरुवात झाली त्याची अखेर जर मानवजातीच्या विनाशामध्ये व्हावयास नको असेल, तर भारताच्या जीवनप्रणालीतच त्याचे निराकरण असून ते अखिल मानवसमाजाने एका कुटुंबासारखे राहावे (वसुधैव कुटुम्बकम्‌) या त्याच्या प्रेरणेतच आहे’. त्याच मार्गावर विश्वहिंदू परिषदेची वाटचाल व्हावी, असा परिषदेचा प्रयत्‍न आहे.

कानिटकर, उत्तम