विश्वभारती : पश्चिम बंगाल राज्यातील एक विद्यापीठ शांतिनिकेतन (जि. बीरभूम) येथे स्थापना (१९५१). हे विद्यापीठ महर्षी ⇨ देवेंद्रनाथ टागोर यांनी १८६३ मध्ये स्थापन केलेल्या शांतिनिकेतन आश्रमातून विकसित झाले. १९०१ मध्ये ⇨ रवींद्रनाथ टागोर यांनी शांतिनिकेतन येथे आश्रम विद्यालय सुरू केले. १९३१ पासून या सर्वांतून विश्वभारती विद्यापीठ उभे राहिले. १९५१ मध्ये भारतीय संसदेच्या कायद्यान्वये या विद्यापीठाला कायदेशीर मान्यता देण्यात आली. या कायद्यात १९६१, १९७१ व १९८४ मध्ये काही सुधारणा करण्यात आल्या.
हे विद्यापीठ अखिल भारतीय स्वरूपाचे असून त्यात भारतातून तसेच परदेशांतून विद्यार्थी व प्राध्यापक येतात. शांतिनिकेतन व श्रीनिकेतन ह्या भागांत विद्यापीठाचे क्षेत्र (३० चौ. किमी.) विखुरले आहे. विद्यापीठाची आठ घटक महाविद्यालये आहेत. जुलै ते एप्रिल हे विद्यापीठाचे शैक्षणिक वर्ष असून त्यात तीन सत्रे आहेत. इंग्रजी व बंगाली भाषा हे अध्यापनाचे माध्यम आहे. विद्यापीठात संसद (विधिसभा), कर्मसमिती (व्यवस्थापकीय मंडळ) व शिक्षा समिती (विद्वत् सभा) ही मंडळे आहेत. येथील सर्व शिक्षण निवासी स्वरूपाचे आहे. विद्यापीठाचे (१) उत्तर शिक्षा सदन, (२) विद्या भवन, (३) शिक्षा भवन, (४) विनय भवन, (५) रवींद्र भवन, (६) कला भवन, (७) संगीत भवन, (८) पल्ली शिक्षा भवन आणि (९) पल्ली संघटन विभाग हे प्रमुख शैक्षणिक विभाग आहेत. विद्यापीठात बंगाली, ओडिया, हिंदी, तमिळ, मराठी, संथाळी, चिनी, जपानी, इंग्रजी व आधुनिक यूरोपीय भाषा तसेच अर्थशास्त्र, कला, शिक्षणशास्त्र, भूगोल, इतिहास, इंडो-तिबेट अभ्यास, इस्लाम धर्माचा अभ्यास, धर्मशास्त्र, समाजशास्त्र, संगीत, चित्र-शिल्पादी ललित कला हस्तकला व कारागिरी, तत्वज्ञान, कृषी, रसायनशास्त्र, गणित, पदार्थविज्ञान, जीवनविज्ञान इ. विषय शिकविले जातात. पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमांतर्गत अंतगुणांकन पद्धती तसेच अध्ययनात पाठनिर्देशन पद्धती विद्यापीठातर्फे राबविली जाते. वसतिगृहे, शारीरिक शिक्षण, वैद्यकीय उपचार इ. सोयी विद्यापीठात उपलब्ध आहेत.
ग्रामीण पुनर्रचनेचे कार्य पल्ली संघटन विभागाच्या वतीने केले जाते. समाजकार्याचे पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रम, हस्तकला-व्यवसायाचा पदविका अभ्यासक्रम तसेच ग्रामीण विकास अभ्यासक्रम, प्रौढशिक्षण, निरंतर शिक्षण इ. अभ्यासक्रम या विभागाद्वारे राबविले जातात.
उत्तर शिक्षा सदन विभागात वेगवेगळ्या ज्ञानशाखांचे पदवीपूर्व अभ्यासक्रम विद्या भवनात मुख्यत: मानव्यविद्या विषयांचे पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रम शिक्षा भवनात विज्ञान शाखेच्या वेगवेगळ्या विषयांतील पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रम विनय भवनात पदवी व पदव्युत्तर अध्यापक प्रशिक्षण रवींद्र भवनात रवीद्रनाथ टागोरांचे जीवन व कार्य, त्यांचे वाङ्मय तसेच विविध क्षेत्रांतील कर्तृत्व यांविषयी अध्ययन व संशोधन केले जाते. रवींद्रनाथ टागोरांची हस्तलिखिते, चित्रे, छायाचित्रे, संगीताच्या ध्वनिमुद्रिका इत्यादींचा विपुल संग्रह या भवनात आहे. कला भवनात ललित कलांचे पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रम असून त्यांत चित्रकला, शिल्पकला, आरेख्यक कला, अभिकल्प इ. विषयांचा दोन वर्षांचा प्रमाणपत्र अभ्यासक्रम शिकवला जातो. संगीत भवनात संगीताचे-विशेषत्वाने हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत, रवींद्र संगीत, वाद्य संगीत इत्यादींचे-पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रम, दोन वर्षाचा प्रमाणपत्र अभ्यासक्रम व पदविका अभ्यासक्रम, यांचे शिक्षण दिले जाते. पल्ली संघटन विभागात समाजकार्य विषयाचे पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रम, त्याचप्रमाणे हातमाग-विणकामाचा तसेच काष्ठशिल्पकामाचा पदविका अभ्यासक्रम पल्ली शिक्षा भवनात कृषी व विज्ञान शिक्षणाचे वेगवेगळे अभ्यासक्रम शिकविले जातात. केंद्रीय समाजकल्याण मंडळातर्फे अंगणवाडी प्रशिक्षण केंद्र चालवले जाते. त्यात स्त्री-कामागारांसाठी उपयुक्त असे प्रात्यक्षिक व सैद्धांतिक प्रशिक्षणवर्ग राबविले जातात. विद्यापीठाच्या लोक-शिक्षा संसदेतर्फे खाजगी घरगुती शिक्षणाचे आयोजन केले जाते. त्या परीक्षा घण्यासाठी विद्यापीठातर्फे कोठेही परीक्षाकेंद्र उभारण्याची खास तरतूद केलेली आहे.
विद्यापीठाच्या केंद्रीय ग्रंथालयात प्रत्येकी ३०७ चौ. मी. चे वाचनकक्ष आणि नियतकालिक-कक्ष आहेत. केंद्रीय ग्रंथालय व विभागीय ग्रंथालये यांतील ग्रंथ, नियतकालिके व हस्तलिखिते अशा एकूण वाचन-साहित्याची संख्या सु. ५,५७,०९९ होती (१९९५). ग्रंथालयाचे वैशिष्ट्य म्हणजे चिनी साहित्यातील महत्वाचे अभिजात ग्रंथ तसेच चिनी व बौद्ध त्रिपिटकांच्या अनेक दुर्मीळ आवृत्या यांचे संच उपलब्ध आहेत. विद्यापीठ क्षेत्राच्या सु. २० खेड्यांतील महाविद्यानयांना ग्रंथालयीन सेवा पुरविली जाते. विद्यापीठात एकूण ४,९८५ विद्यार्थी व ४९३ शिक्षक होते (१९९५-९६).
पहा : शांतिनिकेतन.
मिसार, म. व्यं गोगटे, श्री. व.
आपल्या मित्रपरिवारात शेअर करा..