विश्वनाथशास्त्री, राचकोंडा : (३० जुलै १९२२). तेलुगू साहित्यिक. ‘राविशास्त्री’ या नावानेही प्रसिध्द. श्रीफाकुलम् येथे जन्म. ते आंध्र विद्यापीठातून तत्वज्ञान विषय घेऊन बी. ए. झाले आणि नंतर मद्रास विद्यापीठाची कायद्याची पदवी घेतली. विशाखापटनम् येथे त्यांनी वकिली केली. ते प्रामुख्याने कथाकार म्हणून प्रसिध्द असले, तरी प्रथम प्रकाशात आले, ते अल्पजीवी (१९५४) या कांदबरीमुळे. ही त्यांची कादंबरी खूप गाजली. ती भारती या वाड्मयीन नियतकालिकातून आधी क्रमश: प्रसिध्द झाली. या कादंबरीचा नायक सुव्वया हा सरकारी कारकून जबर न्यूनगंडाने पछाडलेला आहे. त्याच्यापुढे परिस्थितीच्या दडपणातून काही अस्तित्वविषयक समस्या उभ्या राहतात. पण स्वत:च्या इच्छाशक्तीच्या बळावर आत्मस्वातंज्ञत्र्याचा वापर करून तो काही एक निर्णय घेतो व या समस्येतून मार्ग काढून स्वत:च्या दौर्बल्यावर मात करतो. या कादंबरीतून अस्तित्ववादी विचारसरणीचे वैशिष्ट्यपूर्ण दर्शन घडते. विश्वनाथशास्त्रींवर जेष्ठ तेलुगू कवी ⇨ श्रीरंगम् श्रीनिवासराव ऊर्फ ‘ श्री श्री’ यांचा प्रभाव पडला व त्यातून ते समाजपरिवर्तनवादी, शोषणविरोधी आणि मानवतावादी अशा ‘अभ्युदयकवी’ गटाकडे ओढले गेले. या प्रभावातूनच त्यांनी अन्यायग्रस्त, दारिद्यपीडित, शोषित व्यक्तींची हृदयस्पर्शी चित्रे आपल्या कथांतून रेखाटली. भारती व आंध्र पत्रिका या नियतकालिकांतून प्रसिध्द झालेल्या त्यांच्या कथांनी तरूणांची मने आकृष्ट केली. त्यांची कथासृष्टी  विविध प्रकारच्या पात्रांनी नटलेली आहे. ‘मंचि चेडुलो ए कथा’, ‘द स्मोकिंग टायगर अनु धुलिपूजा’ यांसारख्या त्यांच्या कथांचे तंत्रही अगदी वेगळे व अभिनव आहे. ‘जरी अंचु तेल्लचीरे’, ‘मूडस्थलालो’, ‘कॉर्नर सीटु’, ‘वर्षम्’ या त्यांच्या गाजलेल्या काही कथा होत. श्री श्रींच्या प्रभावाखाली त्यांनी दैनंदिन जीवनातील अगदी साध्या सामान्य विषयांवर-उदा., कुत्र्यांचे पिलू, आगकाडी, साबणवडी, केळ्याची साल, लाकडी ढलपा, कुलूप इ. विषयांवर-एकूण नऊ कथा यूवा मासिकात लिहिल्या आणि नंतर त्यांचा संग्रह रूक्कुलु या शीर्षकाने प्रकाशित केला (१९७३). श्री श्री यांच्यासमवेत त्यांनी ‘रेव्होल्यूशनरी रायटर्स असोसिएशन’ या संघटनेची १९७० मध्ये स्थापना केली. त्यांच्या नंतरच्या कथा-कांदबऱ्या वर मार्क्सवादी राजकीय विचारांचा स्पष्ट प्रभाव दिसून येतो. बाकी-कथालू (१९७२) या कथासंग्रहात, तसेच गोवुलोस्त्सुत्राई जाग्रत (१९७५) व सोम्मुलु पोनयंदी (१९८१) या कांदबऱ्यात ही राजकीय विचारधारा आढळून येते. त्यांच्या अन्य उल्लेखनीय साहित्यकृतीत कथा-सागरम् (१९५५), आरू सारा कभलु, मरि आरू चित्रालू (१९६३) हे कथासंग्रह, तसेच निजाम (१९६२), विपादम् (१९६९), तिरस्कृती (१९७४) इ. नाटके प्रसिध्द आहेत. त्यांच्या लिखाणात कामवैफल्य, द्वेष, असहिष्णुता, उन्माद, अवमान इ. अनेक भावांचे मनोवेधक चित्रण आढळून येते.

इनामदार, श्री. दे.