विशेषीकरण, औद्योगिक : उद्योगांच्या प्रगत अवस्थेत विशेषीकरणाची घटना अनिवार्य असते. विशेषीकरणाचा एक अर्थ उत्पादनाच्या एकूण प्रक्रियेतील कोणताही एक विशिष्ट क्रिया वा उपक्रिया अपवर्जितपणे (सर्व क्रिया वा उपक्रिया एकाच व्यक्तीकडून पार पाडण्याऐवजी त्यांपैकी सुटी क्रिया किंवा उपक्रिया एकेका व्यक्तीकडून वारंवार व सातत्याने केली जाणे) पूर्ण करणे असा होतो. अपवर्जिततेमुळे व्यक्तीची संख्यात्मक व गुणात्मक उत्पादकता वाढीस लागते. वस्तूच्या उत्पादनात अनेक क्रिया व उपक्रिया अभिप्रत असतात. एकाच व्यक्तीने अथवा उत्पादनसंस्थेने त्या उत्पादनाच्या सर्व क्रिया पूर्ण करणे हा उत्पादनाचा एक प्रकार होय. जसे कापड उत्पादनात सूत कातणे, विणणे, कापडास रंग देणे, नक्षी उमटवणे, आवेष्टन क्रिया (पॅकिंग) अशा सर्व गोष्टी एकाच घटकामार्फत होऊ शकतील. दुसरा प्रकार म्हणजे, एक माणूस वरीलपैकी कोणतीही एकच प्रक्रिया मोठ्या प्रमाणावर करेल. तो फक्त सूत काढण्याचे किंवा कापड विणण्याचे काम करेल. ही घटना म्हणजे कामाचे विशेषीकरण होय. इतर प्रक्रियांसाठीदेखील याचप्रमाणे विशेषीकरणाचा अवलंब केला जातो.

विशेषीकरणाचे प्रामुख्याने दोन प्रकार आहेत. विशेषीकरणाचे काम व्यक्तीनुसारी असू शकते. एखाद्या यंत्राचा विशिष्ट सुटा भाग तयार करण्याचे काम निरनिराळ्या व्यक्तींवर सोपवले जाईल. उदा., कातारी (टर्नर), जोडारी (फिटर), रधित्रचालक (शेपर), पॉलिश करणारा कामगार, लेथ चालवणारा कामगार अशा निरनिराळ्या व्यक्तींकडून कामे करून घेतली जातील व ती विशेषीकृत कौशल्याची कामे असतील. ही सर्व कामे एकाच व्यक्तीने करण्याऐवजी, विविध व्यक्ती ही वेगवेगळी कौशल्याची कामे पार पाडतील व त्यानंतर सुटा यंत्रभाग तयार करण्याचे एकूण काम पूर्ण होईल.

मध्ययुगीन समाजात बलुते पद्धतीत एक प्रकार सामाजिक विशेषीकरण आढळून येत असे. खेडेगावात एका कुटुंबाने सगळी कामे करण्याऐवजी सुतारकाम, लोहारकाम, चांभारकाम, सोनारकाम अशी विविध कामे करणारी निरनिराळी कुटुंबे असत. तो तो व्यवसाय पिढ्यान्पिढ्या वंशपरंपने त्या त्या कुटुंबात चालत आलेला दिसून येतो. एखादा सुतार इतरांकरिता सुतारकाम करून त्या मोबदल्यात आपल्या गरजेनुसार लोहारकाम, सोनारकाम, शिंपीकाम करवून घेत असे. असा व्यवहार हा खेड्यातील ⇨वस्तुविनिमय पद्धतीचा पायाच होता. [⟶ अलुते-बलुते]. आधुनिक काळात वस्तुविनिमय पद्धत मागे पडून चलनाधिष्ठित अर्थव्यवस्था आली. तथापि त्यामागील विनिमयाचे मूळ तत्त्व कायम राहिले.

विशेषीकरणचा दुसरा प्रकार म्हणजे, भौगोलिक किंवा प्रादेशिक विशेषीकरण होय. काही विशिष्ट कलाकौशल्याची परंपरा, नैसर्गिक घटकांची अनुकूलता अशा कारणांमुळे काही भौगांलिक विभाग काही विशिष्ट वस्तूंच्या उत्पादनाचे विशेषीकरण साधतात. लोहखनिज-कोळसा यांच्या अनुकूलतेमुळे भारताच्या मध्यभागात धातु-उद्योगाचा मोठा विस्तार झाला. कापूस, तेलबिया, तंबाखू, तान ही पिके विशिष्ट भौगोलिक परिस्थितीतच होत असल्याने तो प्रदेश त्या पिकाच्या मुबलक उत्पादनानेच ओळखला जातो.

विशेषीकरणाची घटना व तिचे फायदे-तोटे याचे शास्त्रशुद्ध विवेचन ⇨ॲडम स्मिथ (१७२३-१७९०) यांच्या द वेल्थ ऑफ नेशन्स (१७७६) या ग्रंथात प्रथम केलेले आढळते. टाचणी तयार करण्याच्या करखान्यात धातूची तार काढणे, तुकडे करणे, पॉलिश करणे, टोक काढणे अशा ज्या अनेक क्रिया होतात त्या वेगवेगळ्या व्यक्तींनी केल्यास कामाचे विशेषीकरण साधले जाईल, असे त्यांनी दाखवून दिले. उत्पादनाच्या संयुक्त क्रियेचे विविध भाग पाडणे, श्रमविभागणी करणे व त्यातून कामात विशेषीकरण साधणे ही बाब स्मिथ यांनी आपल्या लिखाणात विशद केली आहे. यातूनच पुढे विदेशी व्यापार, विनिमय व तुलनात्मक लाभ दाखविणारे सिद्धांत निर्माण झाले.

विशेषीकरणाच्या घटनेत गुण व दोष असे दोन्ही आढळून येतात. एकाच प्रकारचे काम सातत्याने करीत राहिल्याने कामाचा वेग वाढतो. कामात कार्यक्षमता वाढवता येते. कामात यंत्रसामग्रीचा वापर वाढवता येतो. उत्पादन मोठ्या प्रमाणावर करता येते. त्यामुळे सरासरी उत्पादनखर्चात बचत होते. कार्यकौशल्य वाढल्यामुळे कामगारांची उत्पादकता वाढणे, त्यांच्याकडून त्या प्रक्रियेत काही नवी तंत्रे, शोध लागण्यच्या शक्यता निर्माण होणे, अशाही गोष्टी घडून येतात. जो कामगार पॉलिश करणे, धातुजोड करणे अशी विशेषीकृत कामे वर्षानुवर्षे करीत राहतो, तोच त्या अनुभवातून काही व्यावहारिक उपयुक्त सूचना करू शकतो. विशेषीकरण जितके सूक्ष्म, तितकी औद्योगिक मक्तेदारी अधिक दृढमूल व सामर्थ्यवान झाल्याचे आढळते. वाहने तयार करण्याचे अनेक कारखाने वा उत्पादक असू शकतील पण त्यांतील तारदोर (केबल) किंवा प्लग यांसारख्या सुटया भागांचा जर खूप मोठ्या प्रमाणावर वापर होत असेल, तर पर्यायाने वाहन-उद्योगावर या केबल उत्पादकांचे नियंत्रण राहील. केबलचे उत्पादन, केबलची किंमत यांचा वाहन-उद्योगाच्या भवितव्यावर प्रभाव पडत राहील. औद्योगिक विशेषीकरणाने मक्तेदारी-शक्ती प्रस्थापित होण्यास काही प्रमाणात मदत होते.

सूक्ष्म विशेषीकरणाचे काही दोषही नजरेस येतात. जर एकूण उत्पादनक्रिया निरनिराळ्या विशेषीकृत उपप्रक्रियांवर अवलंबून असेल आणि जर काही कारणाने एका उपप्रक्रियेत खंड पडला, तर एकूण उत्पादन खंडित होऊ शकते. वाहन-उद्योग तेजीत असेल पण केबल उत्पादनात खंड पडल्यास तो वाहनांच्या एकूण उत्पादनावरच प्रतिकूल परिणाम घडवून आणेल. देशातील एखाद्या भागात विवक्षित वस्तूच्या उत्पादनाचे विशेषीकरण झाले असेल आणि पूर, दुष्काळ, नैसर्गिक आपत्ती, स्थानिक आर्थिक धोरण, संप यामुळे त्या भागातील उत्पादनावर प्रतिकूल परिणाम झाला, तर एकूण उत्पादनावरच त्याचा विपरीत परिणाम होईल. उत्पादनाची सर्व क्रिया यामुळे परावलंबी राहते. विशेषीकरणाचा दुसरा तोटा वैयक्तिक पातळीवर संभवतो. एकच काम कित्येक वर्षे करीत राहिल्याने कौशल्यातील वाढीच्या बरोबरीनेच, त्या व्यक्तीस थकवा व कंटाळा यांचाही अनुभव येऊ शकतो. तसेच एकूण कामाचा एकच भाग सातत्याने केल्याने, संपूर्ण काम केल्यास किंवा निर्मितीचा आनंद वा समाधान व्यक्तीस मिळत नाही. वस्तू तयार करण्याच्या विविध क्रिया स्वतः केल्याने सुतार, लोहार, चर्मकार यांना जे संपूर्ण वस्तू तयार केल्याचे समाधान मिळेल, ते फक्त लाकूड तासणे वा पॉलिश करीत राहणे यांसारख्या कामातच संपूर्ण आयुष्य घालविणाऱ्यास व्यक्तीस मिळणार नाही. आर्थिक विकासाच्या कार्यक्रमात औद्योगिकीकरण अनिवार्य आहे व औद्योगिकीकरणामध्ये औद्योगिक विशेषीकरण घडून येणेही अटळ व स्वाभाविकच आहे. त्यामुळे अशा औद्योगिक विकासात व्यक्तीस यांत्रिकपणा, कंटाळवाणेपणा व परात्मता अथवा अलगता यांचा अनुभव हटकून येत राहणार असेही म्हणता येईल.

विशेषीकरणाचे भवितव्य काय, असाही प्रश्न उपस्थित केला जातो. विज्ञान व तंत्रविद्येचे उपयोजन करून विशेषीकरण सतत साधले जाणार, त्यामुळे उत्पादनखर्चाची बचत होऊन नफ्याची शक्यता वाढणार व या सर्वांमुळे विनिमय व व्यापार यांस अधिक चालना मिळणार असे चित्र भविष्यकाळात असेल, असे मानण्यास जागा आहे. परंतु त्यामुळे समाजात जो दुरावलेपणा वा तुटकपणा येतो, तो कमी करण्याचे जे प्रयत्न करावे लागतील, त्यात समाजशास्त्रज्ञांना महत्त्वाची भूमिका पार पाडावी लागेल. औद्योगिकीकरणाच्या यांत्रिक घडामोडींना मानवी चेहरा असावा, असा निष्कर्ष यातून निघतो. औद्योगिक विशेषकरणाच्या रेट्यामुळे मानवी सर्जनशीलता व त्यातून मिळणारा आनंद नामशेष होणार नाहीत, अशी धडपड आता समाजास करावी लागणार आहे.

आधुनिक उद्योगांचा विस्तार व त्यांतील गुंतागूत वाढल्याने ॲडम स्मिथ यांच्या काळातील एकाच छताखाली असणाऱ्या कारखान्यातील वेगवेगळ्या क्रिया, उपक्रिया यांपुरतेच औद्योगिक विशेषीकरण आता मर्यादित राहिलेले नाही. आधुनिक उद्योगांना आवश्यक असे प्रकल्प अहवाल तयार करणे, औद्योगिक वित्तबाबींविषयी सल्ला देणे इ. कामे करणारे विशेषज्ञ आता तयार झालेले असून, त्यांच्या तज्ज्ञतेचा लाभ अनेक उद्योगांना होत असतो. हा तज्ञांचा वर्ग आधुनिक औद्योगिक व्यवस्थेचा अविभाज्य भाग झालेला असल्याने, औद्योगिक विशेषीकरणाचे हे वेगळे रूप आज वेगाने पुढे येत आहे.

पहा : औद्योगिकीकरण.

संदर्भ : Galbraith, J.K. The New Industrial State, London, 1967.

दास्ताने, संतोष