विल्सन, एडवर्ड ऑस्बर्न : (१० जून १९२९ –   ). अमेरिकन जीववैज्ञानिक. मुंग्यांवरील अध्ययनाच्या क्षेत्रातील जगातील अग्रेसर अधिकारी व्यक्ती. सामाजिक जीवविज्ञानाचे ते अग्रणी आहेत. सामाजिक जीवविज्ञानात मानवासहित सर्व प्राण्यांच्या सामाजिक वर्तनाच्या आनुवंशिक पायाचे अध्ययन केले जाते.

विल्सन यांचा जन्म बर्मिंगहॅम (ॲलाबॅमा, अमेरिका) येथे झाला. त्यांनी आपल्या कारकीर्दीच्या सुरुवातीच्या काळात स्वतः ॲलाबॅमा विद्यापीठामध्ये मुंग्यांच्या अध्ययनाला वाहून घेतले आणि १९४९ मध्ये बी. एस्. व १९५० मध्ये एम्. एस्. या पदव्या संपादन केल्या.१९५५ मध्ये हार्व्हर्ड विद्यापीठाची पीएच् डी. पदवी संपादन केली त्या वेळेला त्यांनी मुंग्यांच्या लॅसियस प्रजातीचे (वंशाचे) सविस्तर वर्गीकरणवैज्ञानिक विश्लेषण पुरे केले. डब्ल्यू. एल्. ब्राऊन यांच्या सहकार्याने त्यांनी चारित्र्य (वर्तन) विस्थापन ही संकल्पना विकसित केली. या प्रक्रियेत दोन अगदी निरटच्या नात्यांतील समष्टीमध्ये (प्राण्याच्या एकूण संख्येमध्ये) एकमेकांशी प्रथम संपर्कात आल्यानंतर जातीमध्ये क्रमविकासीय (उत्क्रांतीचे) विभेदन अती जलद होते आणि त्यामुळे दोहोंमधील स्पर्धा व संकराच्या संधी कमीत कमी होतात.

हॉर्व्हर्ड विद्यापीठाच्या विद्याशाखेत १९५६ मध्ये त्यांची नेमणूक झाल्यावर त्यांनी अनेक शोध लावले. त्यामध्ये मुंग्या मुख्यतः फेरोमोन या रासायनिक द्रव्याच्या संक्रमणाद्वारे एकमेकींना संदेश देण्याचे कार्य करतात याचाही समावेश आहे. दक्षिण पॅसिफिकमधील मुंग्यांच्या वर्गीकरणात सुधारणा करीत असताना प्रकार चक्र संकल्पनेचे त्यांनी सुसूत्रीकरण केले. यामध्ये नव्या जाती निर्माण होण्याची प्रक्रिया व जातीचा प्रसार यांचा बदलत्या अधिवासाशी (राहण्याच्या ठिकाणी) संबंध असतो. अशा अधिवासाच्या जीवाच्या समष्टीचा प्रसार होताना समोरासमोर सामना (संघर्ष) होतो. १९७१ मध्ये त्यांनी दि इन्सेक्ट सोसायटीज हा मुंग्या व अन्य समाजप्रिय कीटकांवरील निष्कर्षात्मक ग्रंथ प्रसिद्ध केला. या ग्रंथात कीटकांच्या सामाजिक गटांच्या वर्तन पद्धतींबरोबरच असंख्य जातींचे परिस्थितीविज्ञान व समष्टी गतिकी (लोकसंख्येची गतिशीलता) हे विषय हाताळले आहेत. सोशिऑलॉजी : दि न्यूसिंथिसिस (१९७५) या आपल्या दुसऱ्या महत्त्वाच्या ग्रंथात त्यांनी सामाजिक वर्तनाच्या जीववैज्ञानिक पायाविषयीचे सिद्धांत मांडले आहेत. त्यामध्ये त्यांनी एका प्रकरणात असेही सूचित केले आहे की, ज्या अत्यावश्यक जीववैज्ञानिक तत्वांवर प्राणिसमाज आधारलेले आहेत ती तत्वे मानवाच्या सामाजिक वर्तनाला लागू आहेत. या प्रतिपादनामुळे विशिष्ट शास्त्रज्ञ व गट प्रक्षोभित झाले कारण अशा कल्पना राजकीय दृष्ट्या प्रक्षोभक आहेत असे त्यांचे मत पडले. वस्तुतः विल्सन यांचे असे प्रतिपादन आहे की, दहा टक्के एवढ्या कमी प्रमाणात मानवाचे वर्तन आनुवंशिकतेने प्रभावित झालेले असते व उरलेले बाकी पर्यावरणाशी निगडित असते, असे त्यांच्या पाहण्यात आलेले आहे. ऑन ह्यूमन नेचर (१९७८) ह्या त्यांच्या ग्रंथाला १९७९ मध्ये पुलिट्‌झर पारितोषिक मिळाले. त्यामध्ये त्यांनी मानवी आक्रमण (आक्रमकता), लैंगिकता व नीतिशास्त्र यांच्या संदर्भातील सामाजिक जीवविज्ञानाचा अभिप्रेत अर्थ याचा शोध घेतला आहे.

परोपकार बुद्धीसारखी लक्षणे ही आनुवंशिकतेवर आधारित असू शकतील व ती ⇨नैसर्गिक निवडीच्या प्रक्रियेत क्रमविकसित (उत्क्रांत) झाली असावीत हा सिद्धांत त्यांच्या अनेक उल्लेखनीय सिद्धांतांपैकी एक आहे. व्यक्तीच्या प्रजोत्पादनाच्या संधी वाढविणारी फक्त शारीरिक व वर्तनविषयक विशेष लक्षणे नैसर्गिक निवडीकडून जोपासली जातात, असे परंपरेने मानले जाते. जसा एखादा जीव जेव्हा आपल्या कुटुंबातील अन्य सदस्यांच्या रक्षणासाठी आपला जीव धोक्यात घालतो तेव्हा परहितवादी वर्तन हे नैसर्गिक निवडीशी न जुळणारे असते. तथापि विल्सन असे प्रतिपादन करतात की, बहुतेक परहितवादी वर्तन हे नैसर्गिक निवडीशी सुसंगत असते, कारण स्वार्थत्याग हा अगदी निकटच्या नात्यातील व्यक्तीच्या रक्षणासाठी केलेला असतो. म्हणजे ती व्यक्ती ही त्याग केलेल्या जीवाच्या जीनांची अधिकतर वाटेकरी असते. अशा तऱ्हेने विल्सन यांच्या सिद्धांताप्रमाणे व्यक्तीचे परिरक्षण (सातत्य टिकविण) करण्यापेक्षा जीनाचे परिरक्षण करणे हे क्रमविकासीय तंत्राचे केंद्रबिंदू होते.

हॉर्व्हर्ड विद्यापीठात प्राणिविज्ञानाचे प्राध्यापक (१९६४–७६) व त्यानंतर एफ्. बी. बेअर्ड, ज्युनिअर (कनिष्ट) या अध्यासनाचे विज्ञान प्राध्यापक म्हणून विल्सन यांनी काम केले. तसेच ते १९७२ पासून म्युझियम ऑफ कंपेरेटिव्ह झूलॉजीमध्ये कीटकविज्ञानाचे अभिरक्षक आणि १९७३ मध्ये सोसायटी फॉर द स्टडी ऑफ एव्ह्यूलेशनचे अध्यक्ष होते. अमेरिकन जीववैज्ञानिक पॉल अर्लिक यांच्याबरोबर त्यांना १९९० सालचे स्वीडनचे क्रॉफर्ड पारितोषिक विभागून मिळाले.

जमदाडे, ज. वि.