विमुखनति : कमानीसारखा आकार असलेल्या खडकांतील घडीला विमुखनती म्हणतात. हिच्या दोन बाहूंच्या (बाजूंच्या) ⇨नतीच्या दिशा एकमेकींच्या विरूद्ध असतात व हे बाजू एकमेकांपासून दूर जाणारे असतात. म्हणजे विमुखनतीतील थरांचा उतार तिच्या अक्षापासून दर व खालील दिशेत जाणारा असतो (घडीतील कोणत्याही एका थरातील कमाल वक्रतेच्या बिंदूमधून जाणाऱ्या काल्पनिक रेषेला घडीचा अक्ष व त्याच्या प्रतलाला अक्षीय प्रतल म्हणतात). सामान्यपणे स्तरवैज्ञानिक दृष्टीने सर्वांत जुने खडक विमुखनतीच्या वक्रतेच्या मध्याशी किंवा गाभ्याशी असतात व अधिक नवे खडक बाहेरच्या बाजूंना असतात. झीज होऊन विमुखनतीच्या माथ्याचा भाग नाहीसा झालेला असल्यास अधिक खोलवर असलेले अधिक जुने थर उघडे पडतात. म्हणून घडीच्या अक्षाकडे जाताना उत्तरोत्तर अधिक जुने थर आढळल्यास ता घडी विमुखनती असल्याचे लक्षात येते. विमुखनतीचा व्याप काही सेंमी. पासून अनेक किमी. पर्यत असू शकतो.
सर्वांत साध्या प्रकारात विमुखनतीच्या दोन्ही बाहूंची नती सारखी असून तिचे अक्षीय प्रतल उभे असते. हिला सममित विमुखनती म्हणतात [आ. (अ)]. अधिक विक्षुब्ध झालेल्या प्रदेशांत विमुखनतींचे असममित, उपरिवली [आ. (आ)], शायी [आ. (इ)] व जटिल [गुंतागुंतीची आ. (ई)] हे प्रकार आढळतात. असममित विमुखनतीचे दोन बाहू विरुद्ध दिशांना पण भिन्न प्रमाणांत नत असतात तिच्यातील थराची वरची बाजू वरच असते आणि तिचे अक्षीय प्रतल तिरपे असते [⟶ घड्या, खडकांतील]. उपरिवलीतही अक्षीय प्रतल खूपच तिरपे असते तिचे दोन्ही बाहू एकाच दिशेत पण भिन्न प्रमाणांत नत असतात आणि उलटून खाली गेलेल्या बाहूतील थराची वरची बाजू खाली गेलेली असते. शायी घडीत विमुखनतीचे अक्षीय प्रतल क्षितिजसमांतर (आडवे) असते व तिची एक बाजू पर्यस्त म्हणजे उलटी झालेली असते. काही विमुखनती याहीपेक्षा गुंतागुंतीच्या असंतात. अशा विमुखनतींचे स्तरवैज्ञानिक व संरचनात्मक असे दोन प्रकार होतात. ज्या घडीचे दृश्य स्वरूप विचारात न घेता ती मुळात विमुखनती होती असा निष्कर्ष जिच्या स्तरवैज्ञानिक माहितीच्या आधारे काढता येतो, तिला स्तरवैज्ञानिक विमुखनती म्हणतात. मूळ स्वरूप लक्षात न घेता ज्या घडीचा आकार विमुखनतीसारखा असतो तिला संरचनात्मक विमुखनती म्हणतात. ज्या विमुखनतीमधील थर बाहेरील सर्व दिशांत नत असतात, शा खास प्रकारच्या विमुखनतीला घुमट म्हणतात.
पन्हळासारखा आकार असणारी ⇨संमुखनती ही विमुखनतीच्या विरूद्ध अशी संरचना आहे. कधीकधी संमुखनतीच्या भागापेक्षा विमुखनतीच्या भागाची झीज फार झपाट्याने होते. यामुळे त्यांच्यामधील परस्परसंबंध पूर्णपणे बदलतात. म्हणजे संमुखनती ही पर्वताचे शिखर वा माथा बनते, तर विमुखनतीच्या जागी दरी निर्माण होते (उदा., ॲपालॅचिअन पर्वतरांगेतील काही शिखरे व दऱ्या). खडकांना घड्या पडून बनलेल्या समुद्रकिनाऱ्यांवर समुद्रकिनाऱ्याचे आक्रमण झाल्यास विमुखनतीचे बेटे बनतात. जगातील खनिज तेलाचे बहुसंख्य साठे विमुखनतीच्या भागांत आढळले आहेत. कारण खनिज तेल साठण्याच्या दृष्टीने चांगला उपयुक्त ठरू शकेल असा सापळा विमुखनतीमुळे निर्माण होऊ शकतो. [⟶ खनिज तेल].
थरयुक्त खडकांवर पुष्कळ वेळा आडव्या दिशेत संपाडन (दाब देणाऱ्या) प्रेरणा लावल्या जातात व यामुळे विमुखनती निर्माण होते. संपीडन प्रेरणा (दाब) दोन्ही बाजूंनी समप्रमाणात असल्यास सममित विमुखनती तयार होते. एका बाजूचा दाब दुसरीकडे जास्त असल्यास प्रथम असममित विमुखनती तयार होते एका बाजूचा दाब खूपच वाढल्यास विमुखनती कलंडून उपरिवली तयार होते आणि अत्यधिक दाबाने वली पूर्ण आडवी होऊन शायी वली निर्माण होते. कधीकधी उत्थानाद्वारेही (थर वरील दिशेत रेटले जाण्याच्या क्रियेनेही) विमुखनती तयार होते.
पहा : घड्या, खडकांतील संमुखनति.
ठाकूर, अ. ना.
“