विमान उद्योग : विमानांचा अभिकल्प (आराखडा) तयार करणे, त्यांची बांधणी (विकास) व उत्पादन करणे, तसेच त्यांचा उपयोग करणे म्हणजे ती चालविणे, त्यांची देखभाल करणे आणि त्यांची उड्डाणे भरवशाची व सुरक्षित होतील हे पाहणे इ. कामांशी निगडित असलेल्या उद्योगाला विमान उद्योग म्हणतात. विमानांबरोबरच अवकाशयाने, क्षेपणास्त्रे आणि त्यांच्याशी निगडित असलेली विद्युतीय व इलेक्ट्रॉनिकीय सामग्री (म्हणजे एव्हिऑनिक्स हा शब् एव्हिएश-वैमानिकीय –इलेक्ट्रॉनिक्सवरून आला आहे). यांचाही अंतर्भाव या उद्योगात करतात. म्हणून या उद्योगाला वैमानिकीय (किंवा हवाई) अवकाश उद्योग (एअरोस्पेस इंडस्ट्री) हे नाव देतात. (अमेरिकेच्या हवाई दलाने पृथ्वीच्या वातावरणात व त्यापलीकडील अवकाशात उडू शकणाऱ्या वाहनांवरील संशोधन सुरू केले तेव्हा वातावरण व त्यापलीकडील अवकाश यांना मिळून एअरोस्पेस हा शब्द वापरला. प्रथम या वाहनांना एअरोस्पेस प्लेन म्हणत. १९५९ साली अशा वाहनांचा अभिकल्प, बांधणी, उत्पादन वगैरेंशी निगडित असलेल्या उद्योगाला एअरोस्पेस इंडस्ट्री हे नाव स्वीकारण्यात आले आणि १९६०-७० दरम्यान हा शब्द सर्वत्र वापरात येऊ लागाल). विमाने बनविणाऱ्या काही कंपन्या ग्लायडर, हेलिकॉप्टर इ. वाहनेही तयार करतात.

प्रस्तुत नोंदीत मुख्यत्वे विमानांविषयीची माहिती दिली आहे. ग्लायडर व ग्लायडिंग, रॉकेट, हेलिकॉप्टर, क्षेपणास्त्रे या हवेपेक्षा जड हवाई वाहनांवर मराठी विश्वकोशात स्वतंत्र नोंदी आहेत तसेच अवकाशविज्ञान या नोंदीत अवकाशयानांची माहिती आलेली आहे. यांशिवाय अंतराळवीर, ‘उपग्रह, कृत्रिम’, ‘झोत प्रचालन, मार्गनिर्देशन, वातयान, वातविवर, वायुयामिकी, विमान, विमानतळ, विमान परीक्षण, विमानांचा अभिकल्प व रचना विमानांचे एंजिन, विमानातील उपकरणे, वैमानिकीय अभियांत्रिकी, सागरी विमाने, स्वयंघूर्णी, हवाई छत्री, हवाई वाहतूक, हेलिकॉप्टर इ. या उद्योगाशी निगडित असलेल्या स्वतंत्र नोंदीही मराठी विश्वकोशात आहेत.

अवकाशातील मोहिमांमुळे माणसाला एकूण पृथ्वीविषयी अधिक वास्तव दृष्टी प्राप्त झाली आहे. या आधीच्या काळात माणसाला विश्वाविषयी जेवढी माहिती होती, तीपेक्षा खूपच जास्त प्रमाणात ती अवकाशयुगात प्राप्त होत आहे. विविध उद्योगांत वापरात असलेल्या असंख्य तंत्रविद्या ह्या उद्योगातून उपलब्ध झाल्या आहेत. परिणामी लेसर घूर्णी या साधनापासून ते पृथ्वीभोवती फिरणाऱ्या प्रयोगशाळा किंवा अवकाशस्थानकापर्यंतच्या सुविधा उपलब्ध झाल्या. हवाई वाहनांची गती शून्यापासून (एकाच जागी स्थिर असलेले हेलिकॉप्टर) ते ताशी ३९,००० किमी.पर्यंत (चंद्राकडे पाठविण्यात आलेल्या अपोलो अवकाशयानाची मूळ गती) साधली आहे आणि हवाई वाहनांचे आकारमान टाचणीच्या माथ्याएवढे (वैमानिकीय इलेक्ट्रॉनिकीतील सूक्ष्म मंडले) ते ३६ मजली इमारतीएवढे (चंद्राकडे अवकाशात धाडणारे शक्तिशाली सॅटर्न-५ रॉकेट) झाले, तसेच एका माणसापासून शेकडो माणसे (जंबो जेट विमान), तसेच अवजड माल, सामग्री नेणारी विविध प्रकारची विमानेही या उद्योगातून पुढे आली.

या उद्योगाचा एकूण मानवी जीवनावर मोठा परिणाम झाला आहे व होत आहे. १९५०-६० दरम्यान झोत (जेट) प्रचलित वाहने पुढे आली व त्यामुळे जग हे काळ व अंतर या दृष्टींनी खूपच जवळ आले. मोठ्या झोत विमानांमुळे जगातील दूरवरच्या प्रमुख शहरांदरम्यान प्रवासी व माल यांची वाहतूक काही तासांतच होऊ शकते. अशा हवाई वाहतुकीमुळे माणसाच्या कामाच्या व वागण्याच्या सवयींत बदल होत नाही. दूरवरची बेटे, विरळ वस्तीचे मोठे, भूप्रदेश, निबीड अरप्ये यांसारख्या दुर्गम भागांत जाणे आपदग्रस्तांना अन्न, औषधे, कपडे इ. मदत तातडीने पुरविणे तसेच पेरणी, पशुधनाची मोजणी, पिकांवरील रसायनांची फवारणी व धुरळणी करणे इ. कामांसाठी विमाने व हलिकॉप्टर वापरता येतात.

या उद्योगामुळे युद्धाचे स्वरूप पालटले. लढाऊ व बाँबफेकी विमानांची तत्काळ मारा करण्याची क्षमता आणि लष्कराला रसद व कुकक पुरविण्याची वाहतूक विमानांची क्षमता यांवर आधुनिक युद्ध अवलंबून राहू लागले. १९५० नंतर हेलिकॉप्टर, खास प्रकारची विमाने, क्षेपणास्त्रे, रॉकेटे इ. लष्कराच्या दृष्टीने महत्त्वाची ठरली आहेत. यातूनच अवकाशयुद्ध ही संकल्पना पुढे येत आहे. अशा रीतीने लष्कराचे सामर्थ्य व राष्ट्राची प्रतिष्ठा या बाबतींत राजकीय दृष्टीने, तर निर्यातीचे व रोजगारनिर्मितीचे साधन या बाबतीत आर्थिक दृष्टीने हा उद्योग महत्त्वाचा झाला आहे.

कच्चा माल : पोलाद, हलक्या मिश्रधातू, विशिष्ट प्रकारच्या मिश्रधातू (उदा., तापरोधी मिश्रधातू), तयार रूपातील प्रमाणभूत सुटे भाग, विद्युतीय व इलेक्ट्रॉनीय सामग्री, विविध प्रकारची उपकरणे व साधने, संमिश्र सामग्री, अन्य गौण सामग्री इ. पुष्कळ प्रकारचा कच्चा माल या उद्योगात वापरतात. या मालाच्या भौतिकीय व रासायनिक गुणधर्मांत, तसेच आकार व आकारमानांत विविधता असते. तथापि या उद्योगाने ठरवून दिलेल्या विनिर्देशांनुसारच कच्चा माल असावा लागतो. असा माल बनविण्यासाठी अत्याधुनिक सामग्री व तिच्यासाठी मोठी गुंतवणूक करावी लागते. शिवाय याची मागणी मर्यादित असते. यामुळे याच्याकडे खाजगी उद्योजक आकर्षित होत नाहीत. उदा., ॲल्युमिनियम, टिटॅनियम, मॅग्नेशियम यांच्या मिश्रधातू बनविण्यासाठी अगदी नवीन तंत्रे वापरावी लागतात तर नट, बोल्ट, रिव्हेट, नळ्या, रबरी वस्तू इत्यादीही प्रमाणभेत दर्जाच्या आणि तंतोतंत आकार व आकारमानाच्या असाव्या लागतात.

धातु-मिश्रधातूच्या ढेपा, घडिवे, ओतिवे व कांबी यांच्या प्रत्येक गटाचे भौतिक व यांत्रिक गुणधर्म काळजीपूर्वक तपासून पाहतात. सुट्या भागांचे उत्पादन करताना व त्यांवर इतर प्रक्रिया करतानाही सतत लक्ष ठेवतात. उदा., भेगांची वा तडयांची तपासणी क्ष-किरणांनी करतात. तसेच यंत्रण करताना नगांचे निरीक्षण करता व त्यांपासून बनविलेल्या भागांचीही तपासणी करतात. विविध भागांची मापे अगदी बिनचूक असावी लागतात. म्हणून त्यांची परिमाणे मोजण्यासाठी विविध प्रकारची मापके, साधने व इलेक्ट्रॉनीय प्रयुक्ती वापरतात. यांशिवाय रंगलेप, आसंजके (चिकटविणारे पदार्थ), गंजरोधी व झीजरोधी मिश्रणे, रेझिने, व्हार्निशे, वंगणे इ. कच्चा मालही या उद्योगात लागतो. तोही दर्जेदार असावा लागतो.


 महोत्पादन : थोड्याच देशांत व थोड्याच कंपन्या विमानांचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन करतात. अर्थात, विमानांची जुळणी करण्यासाठी लागणारे विविध प्रकारचे असंख्य सुटे भाग या कंपन्या इतर हजारो कारखान्यामधून आपल्या गरजेनुसार बनवून घेतात. यांपैकी काही कारखान्यांचे विशेषीकरण झालेले आहे. म्हणजे काही कारखाने अवतरण यंत्रणा किंवा विमानातील उपकरणेच बनवितात तर इतर काही कारखान्यांत काया, पंख, पुच्छ यंत्रणा इ. विमानांचे मोठे भागच तयार होतात.

विमानांची जुळणी करणाऱ्या संयंत्राचे (कारखान्याचे) कार्य हे पुष्कळ प्रमाणात मोटारगाडीची जुळणी करणाऱ्या संयंत्रासारखेच चालते [⟶मोटारगाडी उद्योग]. त्यासाठी उत्पादनाच्या जुळणी मार्गावर कामगारांची जागा ठरवून दिलेली असते. मोठ्या कंपन्यांत जुळणीचे उपमार्ग किंवा शाखाही असतात. अशा उपमार्गांवर विमानाची काया, पंख यांसारख्या मोठ्या भागांची जोडणी होते आणि मग ते भाग अंतिम जुळणीसाठी मुख्य जुळणी मार्गाकडे पाठविले जातात. यूरोपातील एअरबस या मोठ्या बहुराष्ट्रीय प्रकल्पामध्ये पंख एका देशात, काया दुसऱ्या देशात तर एंजिन तिसऱ्या देशात तयार होते व नंतर सर्व भाग जुळणीसाठी एका संयंत्रात एकत्र आणले जातात.

विमानाचे सर्व भाग व्यवस्थितपणे जोडल्यावर विमान अंतिम रूपात जुळणी मार्गावरून बाहेर पडते. मग त्यांची पूर्ण तपासणी करतात, नंतर चाचणी घेणारा वैमानिक त्याचे चाचणी उड्डाण करतो. विमानाच्या एंजिनाचे व नियंत्रक प्रणालींचे कार्य अगदी बिनचूकपणे व समाधानकारक रीतीने होत आहे, याची हा वैमानिक खात्री करून घेतो. अंतिम चाचणीत यशस्वी ठरलेले विमान विक्री योग्य होते.

विमानांचे उत्पादन : विमाने निर्माण करणाऱ्या कंपन्या मुख्यत्वे विमाने बनवितात. काही ठिकाणी विमानांबरोबर ग्लायडर, हेलिकॉप्टर, क्षेपणास्त्रे, अवकाशवैज्ञानिक सामग्री वगैरेंचेही उत्पादन होते.

अमेरिका हा या उद्योगातील सर्वांत आघाडीवर असलेला देश आहे. १९७०-८० या दशकात रशिया वगळता जगातील एकूण विमानांपैकी २५ टक्के विमानांचे उत्पादन अमेरिकेत झाले होते. १९९२ च्या सुमारास विमानांचे भाग बनविणारे सु. ३,३०० कारखाने आणि १०० विमान जुळणी करणारी संयंत्रे अमेरिकेत होती. परकीय चलनाच्या दृष्टीने हा येथील महत्त्वाचा उद्योग आहे. शिवाय इतर उद्योगांच्या विकासाला याची मदत होते.

रशियात हा उद्योग सरकारी मालकीचा आहे. पूर्वी येथील या उद्योगातील उत्पादने मुख्यतः या देशाला राजकीय दृष्टीने जवळच्या असलेल्या पूर्व यूरोपीय देशांत निर्यात होत असत. रशियाच्या विघटनानंतर विशेषतः येथील लष्करी विमाने इतर देशांतही विकली जाऊ लागली.

विमान उद्योगात पुढील तीन प्रमुख प्रकारची विमाने तयार होतात : (१) बाँबफेकी, लढाऊ, झुंजी, वाहतूक, प्रशिक्षण इ. प्रकारची लष्करी विमाने ही मोठ्या प्रमाणात तयार होतात. ही विमाने शासनामार्फत खरेदी केली जातात व सैन्य दले त्यांचा वापर करतात. (२) प्रवासी व माल यांच्या व्यापारी वाहतुकीसाठी शेकडो प्रवासी बसू शकणारी मोठी व २० ते १०० प्रवाशांची मध्यम व लहान विमाने तयार करतात. मोठी विमाने बहुधा झोत विमाने असून त्यांत २,३ किंवा ४ एंजिने असतात. (३) यांशिवाय इतर वापराची म्हजणे सर्वसाधारण वैमानिकीय विमाने लहान असतात. ती व्यावसायिक उद्योजक, हौशी लोक, शेतकरी इ. लोक विविध कामांसाठी वापरतात. अशा बहुतेक विमानांत २ वा ३ एंजिने असून ती प्रचालकयुक्त असतात. काहीत मात्र झोत एंजिने बसविलेली असतात.

विविध देशांत हा उद्योग पूर्णपणे खाजगी (उदा., अमेरिका), पूर्णपणे सरकारी (उदा., भारत व रशिया) किंवा समिश्र उदा., ग्रेट ब्रिटन व कॅनडा) स्वरूपाचा आहे.

विमाननिर्मितीचा खर्च खूप वाढला आहे. राइट बंधूंच्या विमानासाठी १ हजार अमेरिकन डॉलरपेक्षा कमी खर्च आला होता तर हवाई वाहतुकीचा आधुनिक मोठ्या झोत विमानासाठी कोट्यावधी डॉलर खर्च होता. यामुळे लहान कंपन्या (उद्योग) विमाने बनवू शकत नाहीत. मोठ्या कंपन्यांनाही यासाठी भांडवल उभारणे अवघड जाते. म्हणून खर्चात बचत करण्यासाठी कंपन्यांचे विलीनीकरण करतात. यातून बोईंग व मॅकडॉनेल डग्लस, रॉकवेल इंटरनॅशनल कॉर्पोरेशन, ब्रिटिश एअरोस्पेस या जागातील सर्वांत मोठ्या कंपन्या तयार झाल्या आहेत. शिवाय खास प्रकारची विमाने बनविण्यासाठी अनेक यूरोपीय देशांनी सहकार्यही केले आहे. उदा., कंकॉर्ड हे हवाई वाहतुकीचे स्वनातील (ध्वनीच्या गतीपेक्षा जास्त वेग असणारी) विमान ब्रिटन व फ्रान्स यांनी मिळून बनविले होते. मात्र तांत्रिक अडचणींमुळे ती मागे पडली.

विमान उद्योगाची वैशिष्ट्ये : अमेरिकेत १९६०-७० दरम्यान या उद्योगाची उत्पादनाची क्षमता जादा झाली होती. यामुळे नवीन कंपन्या या क्षेत्रात आल्या नाहीत, उलट काही कंपन्यांची पिछेहाट झाली. जादा उत्पादनक्षमतेमुळे विमाननिर्मितीचा खर्चही जादा होतो. मात्र देशाच्या संरक्षणाच्या दृष्टीने ही राखीव गुंतवणूक मानतात. अर्थात देश झटपट युद्धसज्ज अथवा दीर्घकालीन युद्ध यांसाठी ही गुंतवणूक पुरेशी ठरत नाही.

या उद्योगातील कोणत्याही शाखेतील उत्पादन तंत्रे ही उत्पादित करावयाच्या वस्तूच्या तांत्रिक जटिलतेशी निगडित असतात. इतर उद्योगांशी तुलना करता या उद्योगात यंत्रणा व हस्तकौशल्य अधिक प्रमाणात लागते. शिवाय क्षेपणास्त्रे व अवकाशवैज्ञानिक सामग्री बनविण्यासाठी अधिक कुशलता, विश्वासार्हता व अचूकता यांची गरज असते. यामुळे या उद्योगाचे परंपरागत उद्योगांऐवजी प्रयोगशाळेशी अधिक साम्य आहे.

संशोधन व विकास यांचे महत्त्वही या उद्योगात अधिक असते. यामुळे या उद्योगामध्ये हजारो वैज्ञानिक व अभियंते यांची निकड भासते. त्यांचे हे महत्त्व लक्षात घेता त्यांचा भांडवली साधनसामग्री (किंवा गुंतवणूक) असा विचार करावा लागतो. अर्थात या उद्योगासाठीचे संशोधन व विकास याविषयीचे काम खाजगी व सरकारी क्षेत्रांत आणि विद्यापीठांतही होत असते.

इतर उद्योगाच्या तुलनेत यात नफा कमी मिळतो. शिवाय आर्थिक व व्यावसायिक जोखीमही जास्त असते. कारण वाहतुकीचे नवीन विमान विकसित करण्यासाठी खूप पैसा व अनेक वर्षे लागतात. मोठ्या कर्जामुळे नवीन संयंत्रे व सामग्री खरेदी करणे अवघड जाते. यामुळे विमानाची किंमत वाढत जाते व हा या उद्योगाच्या प्रगतीतील अडसर ठरतो. मात्र या उद्योगातून चांगले व्यवस्थापक तयार होतात व शासनापाशी चांगले विक्रीकौशल्य उपलब्ध होते. रोजगार व कर्मचारी या दृष्टींनी हा उद्योग महत्त्वाचा ठरला आहे.

या उद्योगातील विविध शाखांत विशेषीकरण झाल्याने उद्योगातील स्पर्धा कमी होण्यास मदत होते. विमानाचे एंजिन, सर्वसाधारण वापराची विमाने व सामग्री आणि हेलिकॉप्टर या शाखांत असे विशेषीकरण सर्वाधिक झाले आहे. काही उत्पादन कंपन्यांनी आपल्या उत्पादनात विशेषीकरण केले आहे. (उदा., बोईंगने वाहतुकीच्या विमानांत, लॉकहीडने वाहतुकीच्या लष्करी विमानांत, ग्रुमानने नाविक दलाच्या विमानांत, फेअरचाइल्डने हल्ला करणाऱ्या विमानांत).


 विभाग : बाजारपेठांनुसार या उद्योगाचे पुढील प्रमुख विभाग पाडता येतील.

लष्करी विमाने व क्षेपणास्त्रे : ही सर्वांत मोठी बाजारपेठ असून हिचे मुख्य गिऱ्हाईक शासनसंस्था हे असते. यामुळे शासनाच्या मागणीचा व धोरणांचा या उद्योगावर प्रभाव पडतो.

शत्रूच्या विमानांशी झुंज देणे, भूपृष्ठावरील व भूपृष्ठालगतच्या लक्ष्यावर हल्ला चढविणे व टेहळणी ही कामे लढाऊ विमाने करतात. दूरवर असलेल्या भूपृष्ठावरील लक्ष्यावर हल्ला करण्यासाठी बाँबफेकी विमाने वापरतात. हल्ला करणाऱ्या  विमानांना निरीक्षक विमाने मदत करतात. शिवाय वाहतूक व प्रशिक्षण यांसाठीची लष्करी विमानेही असतात. हवेतल्या हवेत इंधन भरण्याच्या कामासाठी काही लढाऊ हल्ला करणारी किंवा वाहतूक विमानेही वापरतात अथवा इलेक्ट्रॉनीय युद्धातील वापराच्या दृष्टीने त्यांचा अभिकल्प तयार केलेला असतो. बचाव कार्य, वाहतूक व हल्ला करणे यांसाठी हेलिकॉप्टरचा उपयोग होतो. यांशिवाय खास प्रकारची लष्करी विमानेही असतात पण त्यांची माहिती गुप्त ठेवलेली असते.

क्षेपणास्त्राचे काम त्यांच्या आकारमानानुसार असते. अधिक मोठी क्षेपणास्त्रे ही प्रक्षेपणास्त्रे (उड्डाणाच्या मोठ्या भागात ज्यांवर नियंत्रण ठेवलेले नसते अशी) असतात. सर्वांत मोठी क्षेपणास्त्रे आंतरखंडीय पल्ल्याची व लक्ष्यापर्यंत अवकाशातून जाणारी असतात. लहान क्षेपणास्त्रेही मार्गनिर्देशित (सर्व उड्डाणभर ज्याचे नियंत्रण हवाई अवकाश वाहन न म्हणता दारुगोळा मुक्त शस्त्र असे संबोधिले जाते. [⟶क्षेपणास्त्रे].

लष्करी विमाने व क्षेपणास्त्रे यांची मागणी कमाल पातळीपर्यंत पोहोचली आहे. तंत्रविद्येतील खास प्रकारची प्रगती, युद्ध अथवा शस्त्रसंभारातील बदल या गोष्टी घडल्या तरच यांची मागणी वाढेल. नाही तर केवळ एकाची दुसऱ्याने भरपाई करण्याइतकीच मागणी असते. मात्र याचा अर्थ प्रत्येक उत्पादकाच्या मालाची मागणी स्थिर राहते असा होत नाही. कारण राजकीय कारणापोटी मागणी रद्द होण्याची भीती/शक्यता नेहमीच असते. अशा प्रकारे मागणी रद्द झाल्याने उत्पादनाला अचानक खंड पडतो. मात्र वरकड खर्च तेवढाच राहतो.

या उद्योगातील तंत्रांमध्ये अचानकपणे मोठे बदल होत नाहीत. हे बदल सावकाशपणे होत असतात. त्यामुळे विमाने व क्षेपणास्त्रे वाढत्या प्रमाणात गुंतागुंतीची, संहारक व महाग होत आहेत. यामुळे या उद्योगात अधिक गुंतवणूक होत नाही परिणामी प्रत्येक नग महाग होऊन हे दृष्टचक्र चालू राहते.

अवकाशवैज्ञानिक सामग्री : या बाबतीतील मागणीही मुख्यत्वे शासनाकडून येते. अवकाशयाने मानवासहित वा मानवरहित अशी अवकाशात पाठवितात. त्यासाठी रॉकेट वापरतात. अवकाशविमानही (स्पेस शटलही) रॉकेटने अवकाशात पाठवितात व ते परत परत वापरता येते. त्यामुळे अवकाश कार्यक्रमाचा खर्च कमी होतो. केवळ वैज्ञानिक संशोधनासाठी छोटी रॉकेटे बनविण्यात आली आहेत.

व्यापारी, वैज्ञानिक व लष्करी हेतूंनी अवकाश कार्यक्रमाचा उपयोग होतो. यांपैकी लष्करी वापरांविषयीच्या शक्यतांच्या बाबतीत झपाट्याने प्रगती झाली आहे. १९८२ साली अमेरिकेने आपल्या हवाई दलात स्वतंत्र अवकाश समादेश (कमांड) सुरू केला आहे. [⟶अवकाशविज्ञान उपग्रह, कृत्रिम, रॉकेट].

हवाई वाहतूक : व्यक्तिगत प्रवासामुळे हवाई वाहतुकीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली. लष्करी विमानांचा प्रगतीतून या वाहतुकीची सुरुवात झाली. तर या व्यवसायामुळे लष्करी विमानांच्या बाजारपेठेच्या अस्थिरतेतून येणारी उद्योगातील असुरक्षितेता काही प्रमाणात कमी झाली. अशा विमानांचा टिकाऊपणा व आयुर्मर्यादा (सु.२० वर्षे) वाढल्यास त्यांच्या मागणीत घट होते.

बहुतेक देशांत हवाई वाहतुकीची एखादी तरी कंपनी असते. पुष्कळ देशांत एक वा अनेक सरकारी हवाई वाहतूक कंपन्याही आहेत. यांच्यामार्फत विशिष्ट मार्गांवर वेळापत्रकानुसार नियमित सेवा पुरविल्या जातात. विशिष्ट वेळी व विशिष्ट ठिकाणी जाण्यासाठी विमाने भाड्यानेही मिळतात. दरवर्षी लाखो यूरोपीयन लोक अशा भाड्याच्या विमानांतून आपल्या आवडीच्या पर्यटन स्थळी जात असतात.

नियमित वाहतुकीत प्रवासी व माल या दोन्हींची वाहतूक होते. १९७०-८० च्या दरम्यान अमेरिकेत या व्यवसायाने पर्याप्त पातळी गाठली होती व इतरत्र त्याची वाढ होत होती. प्रवाशांची घटती संख्या व वाहतुकीचा वाढता खर्च यांमुळे पुष्कळ कंपन्यापुढे आर्थिक अडचणी येतात. यावर उपाय म्हणून अमेरिकेत भाड्यातील कपात यासारख्या प्रवाशी आकर्षित करणाऱ्या योजना आखण्यात आल्या होत्या. यामुळे प्रवासी यातायात वाढलेली होती. मात्र वाढत्या खर्चामु १९८० नंतर परत भाडेवाढ करण्यास सुरुवात झाली.

बहुतेक यूरोपीय देशांत दोन वा अधिक कंपन्यांची मिळून मोठी राष्ट्रीय कंपनी स्थापन करण्यात आली आहे. शिवाय दोन देशांतील कंपन्या आंतरराष्ट्रीय वाहतुकीत संलग्न भागीदारी करतात. यांमुळे खर्चात बचत होते. कारण विमानांची खरेदी, वैमानिकांचे प्रशिक्षण इ. बाबतींत परस्पर सहकाय्र करता येते.

नागरी हवाई वाहतुकीच्या विमानांचे आकारमान खूप भिन्न असते. सर्वसाधारणपणे अधिक दूरवरच्या प्रवासासाठी अधिक मोठी विमाने पसंत करतात. छोट्या विमानांचे वजन १० टनांपर्यंत असून त्यांत सु. १० प्रवासी बसू शकतात तर ३०० ते ४०० टन वजनांच्या बोईंग-७४७ या मोठ्या विमानांत ३३१ ते ५५० प्रवासी बसू शकतात. कंकॉर्ड व टीयू-४४ सारखी स्वनातील विमानेही प्रवासी वाहतुकीसाठी वापरली आहेत. [⟶हवाई वाहतूक].

सर्वसाधारण वापराची विमाने : लष्करी व दूरवरची नागरी हवाई वाहतूक यांशिवाय इतर कामांसाठी वापरण्यात येणारी विमाने यात येतात. उद्योग व्यवसाय, व्यक्तिरात वापरख् खेळ व मनोरंजन, भूमिसर्वेक्षण, मृदसंधारण, हवाई छायाचित्रण, मानचित्रण, हवाई कायद्यांची अंमलबजावणी, वैमानिकांचे प्रशिक्षण व हवाई उड्डाणविषयक सूचना देणे दूरध्वनी, तारा, हमरस्ता, तसेच पाण्याचे व तेलाचे नळ यांची तपासणी व देखभाल बिया विखरून टाकणे, भाताची लागण खते, रसायने व कीटकनाशके इत्यादींची फवारणी व धुरळणी बचावकार्य, अग्निशमन, पशुधनाची गणती वगैरे कामांसाठी ही विमाने वापरतात. अशा झोत व टर्बोप्रॉप विमानांमध्ये कर्मचाऱ्यांसह चाळीसजण बसू शकतात. याहून लहान व्यक्तिगत वापराची विमाने दट्ट्याच्या एंजिनांची असतात. ती भाड्यानेही मिळतात. २० प्रवाशांपर्यंतही वाहतूक करणारी हलकी विमाने यांत येतात. त्यांचा दीर्घअंतराच्या हवाई वाहतुकीमधील दुव्यासारखा उपयोग होतो (उदा., विमानतळ ते शहर किंवा उपनगर अशी वाहतूक). रेल्वे वा रस्ते यांची सोय नसलेल्या दुर्गम भागांतील वाहतुकीसाठीही ती वापरता येतात. ऑस्ट्रेलियातील रॉयल फ्लाईंग डॉक्टर सर्व्हिस या सेवेद्वारे दूरवरच्या लोकांना वैद्यकीय सेवा पुरविली जाते. शिवाय खास सुसज्ज विमानातू रुग्णाला रुग्णालयात हलविण्याची सोयही करतात. अशा हवाई रुग्णवाहिका अन्य देशांतही आहेत. पोलीसही अशी विमाने वापरतात. यांपैकी व्यावसायिक कामांसाठीच्या विमानांची मागणी वाढत आहे तर व्यक्तिगत विमानांची मागणी कमी होऊ लागली आहे. कारण खेळ व मनोरंजनाचा हा छंद खर्चिक व वेळखाऊ आहे. शिवाय अशी विमाने लांब अंतरासाठी वापरता येत नाहीत आणि कमी अंतरासाठी मोटारगाडी स्वस्त पडते.


विमानतळ चालविणे : धावपट्टी, मार्गनिर्देशनाची मदत व भूपृष्ठावर लागणाऱ्या इतर सोयीसुविधा वगैरे विमानतळामुळे उपलब्ध होतात. त्यांना या उद्योगाच्या दृष्टीने विशेष महत्त्व आहे. महणून विमानतळ चालविणे हा याचा एक भाग होतो. थोड्याच देशांत अतिशय मोठे विमानतळ आहेत. इतर देशांत लहान विमानतळ असून तेथे हलक्या, लहान विमानांच्या अवतरणाची व आरोहणाची सोय होते. विमानतळ सरकारी वा खाजगी मालकीचे असतात. [⟶विमानतळ].

साहाय्यक उद्योग : व्यापारी हवाई वाहतूक कंपन्या, वैमानिक, विमानतळ, प्रवासी यांना अगदी भिन्न प्रकारच्या वस्तू व सेवा या उद्योगामार्फत पुरविल्या जातात. उदा., सुरक्षा, इंधन, विशिष्ट खाद्य पदार्थ, जेवण, विमा, हवाई कायद्यांची व हवामानविषयक माहिती वगैरे.

इतिहास : विमान उद्योगाचा विकास कसा होत गेला हे समजण्यासाठी या उद्योगाचा इतिहास थोड्या विस्ताराने पुढे दिला आहे. या उद्योगाच्या विकासाचे चार प्रमुख टप्पे सांगता येतील. हा विकास प्रमुख तंत्रवैज्ञानिक परिवर्तनांद्वारे होत आला आहे. १९३०-४० दरम्यान विमानाच्या बांधणीत लाकूड, कापड व तारा यांची जागा धातू व मिश्रधातू (मुख्यतः पोलाद व ॲल्युमिनियम) यांनी घेतली. १९४०-५० दरम्यान वायू टरबाइन एंजिनांची निर्मिती व स्वनातील वेग गाठण्यात मिळालेले यश ही तंत्रवैज्ञानिक प्रगती झाली, १९५०-६० दरम्यान क्षेपणास्त्रांचा विकास झाला व त्यांतील तंत्रविद्येचा अवकाशविज्ञानाप्रमाणे विमान उद्योगातही वापर करण्यात आला. त्यानंतरच्या टप्प्यात या उद्योगात इलेक्ट्रॉनिकीचा व पर्यायाने संगणकांचा मोठ्या प्रमाणावर वापर होत आहे.

प्रारंभीचा काळ : या उद्योगाची सुरुवात अमेरिकेतील ओहायओ राज्याच्या डेटन येथील सायकलीच्या एका दुकानात झाली, असे म्हणता येईल. कारण येथे विल्बर व ऑर्व्हिल या राइट बंधूंनी आपले पहिले ‘फ्लायर-I’ विमान तयार केले होते. किटी हॉक (नार्थ कॅरोलायना) येथे १७ डिसेंबर १९०३ रोजी ऑर्व्हिल राइट यांनी या विमानाचे यशस्वी उड्डाण केले (म्हणून या विमानाला ‘किटी हॉक’ असेही म्हणतात). अशा तऱ्हेने हा विसाव्या शतकातील उद्योग आहे. राइट बंधूंनी इतरांचे लेखन व प्रयोग यांचे अध्ययन करून व स्वतः पतंग, ग्लायडर वगैरेंचे प्रयोग करून आपल्या विमानाचे पंख, प्रचालक वगैरेंचे आकार व आकारमान ठरविले. याकरिता त्यांनी सायकल व स्वतः बनविलेले वातविवर यांचा वापर केला. अशा तऱ्हेने संशोधन व विकास कार्यक्रम टप्प्याटप्प्याने पार पाडून त्यांनी आपले विमान बनविले होते. यातील एंजिनही त्यांनीच तयार केले होते. उड्डाणासाठी ठिकाण निवडताना त्यांनी तेथील वारा व अन्य परिस्थिती विचारात घेतली होती. नंतर त्यांनी अधिक सुधारित विमाने तयार केली. १९०७ साली पहिला विमान अपघात होऊन त्यात ऑर्व्हिल गंभीरपणे जखमी झाले व लेफ्टनंट टॉमस ई. सेलफ्रिज मृत्यू पावले. अमेरिकेच्या सैन्य दलाने १९०९ साली पहिले लष्करी विमान राइट बंधूंकडून खरेदी केले. १९०३ सालीच त्यांनी विमानाच्या एकस्वासाठी (पेटंटसाठी) अर्ज केला होता. १९०९ साली त्यांना मिळालेल्या एकस्वाविषयी त्यांचा ग्लेन कर्टिस यांच्याबरोबर वाद निर्माण झाला. अखेरीस १९१४ साली राइट बंधूंच्या बाजूने याचा निकाला लागला. [⟶राइट, विल्बर राइट, ऑर्व्हिल].

अलेक्झांडर ग्रॅहॅम बेल यांच्या पुढाकाराने हवेपेक्षा जड विमानांच्या उड्डाणाचे वैज्ञानिक संशोधन करण्यासाठी एरिअल एक्सपेरिमेंट ॲसोसिएशन (AEA) ही संस्था स्थापन झाली. सेलफ्रिज, ए.डब्ल्यू, बाल्डवीन, जे.ए.डी. मॅककर्डी व कर्टिस या हिच्या सदस्यांनी आपापल्या अभिकल्पाची विमाने बनवून उडविण्याचे प्रयत्न केले. पैकी कर्टिस यांनी वजनाला हलके एंजिन, आरोहण व अवतरण यंत्रणांमधील सुधारणा वगैरे सुधारणा केल्याने विमान सपाट जमिनीवरून उडविणे शक्य झाले. यामुळे राइट बंधूंचे उड्डाणासाठीचे गुंतागुंतीचे रूळ व अवतरणाची घसर यंत्रणा यांची गरज उरली नाही. कर्टिस यांनी चाकांऐवजी प्लावकांवर उभारलेली जलविमाने (प्लावक विमाने) व उडती नौका विकसित केली. तसेच विमानाचे जहाजावरून आरोहण व जहाजावर अवतरण करता येते, असेही दाखविले. त्यांची उड्डाण नौका व सर्व भावी उड्डाण नोकांचा आद्य नमुना ठरला.

इ.स. १९१४ पर्यंत विमान बांधणी मोठ्या छपरीत, साध्या हत्यारांनी व हातांनीच होत असे. त्यासाठी स्प्रूसच्या लाकडाच्या चौकटीवर कॅनव्हास कापडाचे (क्वचित प्लायवुडचे) आच्छादन घालीत व ते बांधण्यासाठी तारा वापरीत तेव्हा लाकूडकाम (सुतारकाम) हे या उद्योगातील महत्त्वाचे काम होते. १९०५ साली शार्ल व गाब्रिएल या व्हॉझां बंधूंनी जगातील पहिली विमान बनविणारी कंपनी पॅरिसजवळ स्थापन केली. तेथे त्यांनी मागणीनुसार थोडी विमाने तयार केली. १९०६ साली आल्बेर्तो सांतोस द्यूमां यांनी विमानाचा अभिकल्प तयार केला. लेआँ लेव्हाव्हास्यूर यांनी १९०७ साली बनविलेले ८ सिलिंडरांचे व ५० अश्वशक्तींचे एंजिन यूरोपात अनेक विमानांत वापरण्यात आले. ल्वी ब्लर्यो यांनी स्वतः अभिकल्पित केलेल्या एकपंखी विमानातून इंग्लिश खाडी प्रथम पार केली (१९०९). आंरी व मॉरीस फार्मा फ्रान्समध्ये, तर फ्रेडेरिक हँडली पेज, ए.व्ही. रो आणि टी.ओ. एम्. सॉपविथ यांनी ग्रेट ब्रिटनमध्ये विमाने बनविण्याचा उद्योग सुरू केला. १९०९ साली रीम्झ (फ्रान्स) येथे भरलेल्या पहिल्या मोठ्या जागतिक प्रदर्शनांत आंरी फार्मा यांचे विमान विक्रीस ठेवले होते. १९११-१२ मधील यूरोपातील उड्डाण स्पर्धांमुळे विमानांची व एंजिनांची कार्यक्षमता सुधारली आणि विमानाच्या गतीत व पल्ल्यात वाढ झाली.

अमेरिकेत आर्मी सिग्नल कोअरने राइट बंधूंकडे लष्करी विमानाची मागणी १९०८ साली नोंदविली. यातून राइट बंधूंनी श्रीमंत लोकांच्या मदतीने आपली कंपनी १९०९ साली स्थापन केली (हिचा कारखाना डेटनला व मुख्य कार्यालय न्यूयार्क शहरात होते). याच वर्षी ग्लेन एल्.मार्टिन यांनी कॅलिफोर्नियात एका जुन्या चर्चमध्ये विमाननिर्मिती कंपनी सुरू केली व थोड्याच वर्षांत ही अमेरिकेतील प्रमुख विमान कंपनी बनली. मात्र पहिल्या महायुद्धापर्यंत या उद्योगाची अमेरिकेत विशेष प्रगती झाली नव्हती व या महायुद्धात त्यांचा विशेष प्रभाव जाणवला नाही.


 पहिले महायुद्ध (१९१४-१८) : याआधी एका वेळी थोडीच विमाने हाताने बनवीत व मुख्यतः खेळ व मनोरंजनासाठी वापरीत. मात्र या युद्धाने विमानांची मागणी वाढली विमाननिर्मितीचे मोठे उद्योग पुढे आहे व विमानांचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर होऊ लागले. या काळात जर्मनीत ४० हजारांहून जास्त, तर ब्रिटनमध्ये ५५ हजारांहून जास्त विमाने तयार झाली. फ्रान्स, इटली, रशिया व अमेरिका येथेही विमाननिर्मितीचे मोठे कारखाने उभारण्यात आले. फार्मा, हँडली पेज, व्हॉझां या उद्योगांनी नवीन अभिकल्पाची एंजिने वापरून लढाऊ व बाँबफेकी विमाने, तर इतर उद्योगांनीही युद्धोपयोगी विमाने तयार केली. या युद्धात प्रथमतः टेहळणी विमाने वापरली. त्यांद्वारे रोज हजारो छायाचित्रे मिळू लागल्याने युद्ध क्षेत्राची अधिक स्पष्ट कल्पना येऊ लागली. मोठ्या बाँबफेकी विमानांमुळे शत्रूच्या प्रदेशांत खोलवर जाऊन दिवसा व रात्रीही हल्ला करणे शक्य झाले. तसेच गरजांनुसार विविध प्रकारची खास विमानेही बनविण्यात आली. या काळात विमानांची एकूण कार्यक्षमता खूप सुधारली. विमाने, एंजिने व इतर सामग्रीचे उत्पादन वाढल्याने उत्पादन साखळीची व मोठ्या प्रमाणावरील प्रशिक्षणाची गरज निर्माण झाली.

युद्ध सुरू झाल्यावर एका आठवड्याच्या आतच जर्मनांनी पॅरिसवरील विमानांचे हल्ले सुरू केले. जर्मन विमानांत बेंट्स व मर्सिडीज ही उत्कृष्ट एंजिने वापरीत. ती प्रमाण अभिकल्पाची होती. यामुळे त्यांच्या देखभालीचे व सुटे भाग बदलण्याचे काम सुलभ झाले. मात्र तंत्रविद्येत झपाट्याने बदल होताना असे प्रमाणीकरण जोखमीचेही ठरू शकते, कारण शत्रूच्या प्रगत विमानांपुढे अशी विमाने जुनी ठरतात. एच्.जी. फॉकर यांनी विमानात प्रथमच मशीनगन बसविल्याने जर्मन हवाई दलाचे सामर्थ्य वाढले. जर्मनीत एक आसनाची, दोन आसनांची, सागरी अशी अनेक प्रकारची युद्धोपयोगी विमाने बनविण्यात आली. युद्धाच्या अखेरीस मोठी बाँबफेकी विमाने बनविण्यावर तेथे भर देण्यात आला होता. वातनौकांचा वापर नंतर मर्यादित प्रमाणावरच करण्यात आला.

फ्रान्सने या युद्धात सर्वाधिक विमाने वापरली. तेथे खास व सुधारित प्रकारची लष्करी विमाने बनविली आणि येथील विमान उद्योग चांगलाच विकसित झाला. विमानांत अनेक सुधारणाही करण्यात आल्या. उदा., कार्यक्षम एंजिने, प्रगत सोयीसुविधा, प्लावक विमाने वगैरे.

ब्रिटनमध्येही या उद्योगाची अशीच भरभराट झाली. १९१२ साली स्थापन झालेल्या रॉयल फ्लाईंग कोअरजवळ १९१४ साली १५० विमाने व १,८०० कर्मचारी होते, तर १९१८ सालाअखेर त्याच्यापाशी २२,००० विमाने व ३ लाख कर्मचारी होते. १९१२ साली स्थापन झालेल्या रॉयल एअरक्राफ्ट फॅक्टरीत जेफ्री डी हॅव्हिलँड यांनी बनविलेल्या अभिकल्पानुसार १९१४ पर्यंत अनेक प्रायोगिक लष्करी विमाने तयार झाली. दिवसा व रात्री बाँबफेक करू शकणाऱ्या दीर्घ पल्ल्याच्या विमानांत ब्रिटनमध्ये बनविलेली उत्कृष्ट एंजिने (उदा., रोल्स-रॉइस) वापरीत. १९१८ साली ब्रिटनमप्रमाणे अमेरिकेतही हँडली पेज विमानांचे उत्पादन होऊ लागले. नाविक तळांचे रक्षण व पाणबुडी विरोधी गस्त यांकरिता सागरी विमाने आणि उडत्या नौका यांचाही वापर ब्रिटनमध्ये होत होता. युद्धाच्या अखेरीस तेथे विमानवाहू जहाज बांधण्याविषयी विचार चालू होता.

युद्धातील विमानांचे महत्त्व इटलीने प्रथम ओळखले होते. १९१४-१८ च्या दरम्यान तेथे निरीक्षणाची, प्रशिक्षणाची व एक आसनाची बाँबफेकी विमाने बनविण्यात आली. यांपैकी दिवसा व रात्री बाँबफेक करू शकणाऱ्या विमानांत प्रथम दोन एंजिनांची द्विपंखी आणि नंतर तीन वा चार एंजिनांची चार पंखी विमाने होती.

रशियात इगॉर सिकॉर्स्की यांनी हेलिकॉप्टरचे काम थांबवून स्वतः अभिकल्प तयार करून विमान बांधले. या मोठ्या द्विपंखी विमानाच्या बंदिस्त कक्षात १२ जण बसू शकत. त्यात १०० अश्वशक्तीची चार मर्सिडीज एंजिने बसविली होती. १९१५ साली १२० अश्वशक्तीची चार एंजिने असलेले असेच मोठे बाँबफेकी विमान बनविण्यात आले.

इ.स. १९१७ साली अमेरिका ११७ विमानांसह युद्धात उतरली तेव्हा त्यांत लढाऊ वा दारुगोळा वाहून नेण्याची सोय असलेले एकही विमान नव्हते. एअरक्राफ्ट प्रॉडक्शन बोर्ड स्थापन झाल्यानंतर त्याच्यामार्फत ब्रिटिश, फ्रेंच व इटालियन विमाने व एंजिने यांचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन करण्याचा निर्णय घेण्यात आला. मोटारगाडीच्या कारखान्यातील जुळणी यंत्रणेसारखी यंत्रणा विमाननिर्मितीत वापरण्यात आल्याने तेथील उत्पादन झपाट्याने वाढले. प्रसिद्ध लिबर्टी एंजिनाचा अभिकल्प तयार करणे व मग त्यांचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन करणे ही येथील विमान उद्योगाची महत्त्वाची कामगिरी होय. १९१७ पर्यंत १२ सिलिंडरांचे लिबर्टी एंजिन बनविण्यात आले. युद्धविरामापर्यंत अशी १,३०० एंजिने बनविण्यात आली व तेव्हा दिवसात १५० एंजिने तयार होत असत. विल्यम बोईंग यांची बोईंग कंपनी आणि ऑन व माल्कन या लॉकहीड बंधूंची लॉकहीड कॉर्पोरेशन या कंपन्या १९१६ साली स्थापन झाल्या. नंतर त्या विमाननिर्मिती करणाऱ्या जगातील दोन अग्रगण्य कंपन्या बनल्या.

दोन महायुद्धांदरम्यानचा काळ (१९१८-३९) : पहिल्या महायुद्धानंतर या ऊद्योगात मंदी आली.  १९२०-३० च्या दरम्यान लष्कराकडून या उद्योगाला किमान मागणी येत असे. त्यामुळे पुरेसे आर्थिक पाठबळ उरले नव्हते. इटली, जर्मनी व जपान पुन्हा युद्ध सज्ज होईपर्यंत (१९३०-३३) मंदी कमी-अधिक प्रमाणात टिकून होती. नंतर या उद्योगाला पुन्हा चालना मिळाली. विविध देश स्वतंत्र हवाई दल उभारू लागले. तसेच युद्ध हवेत जिंकायचे ही संकल्पना पुढे आली. यांमुळे विशेषकरून लष्करी विमानांची मागणी वाढली व त्यांचा विकासही झाला, याचा या उद्योगावर दूरगामी चांगला परिणाम झाला. विमानांतून बाँब हल्ले करून शत्रूचे औद्योगिक उत्पादन खंडित करणे व नागरी वस्तीवर हल्ले करून शत्रूचे नीतिधैर्य खच्ची करणे, तसेच सैन्याची रसद, कुमक व छत्रीधारी सैन्य विमानातून उतरविणे आणि नाविक दलाला साहाय्य करणे यांसाठी विमानांचा वापर वाढला. अशा रीतीने युद्धाचे स्वरूप पालटल्याने या उद्योगावरही त्याचा मोठा परिणाम झाला.

विमानांच्या शर्यती, धाडसी खेळ, विक्रम इत्यादींमुळे हवाई प्रवास व वाहतूक लोकप्रिय झाल. यामुळे १९३५ पर्यंत विमान हे वाहतुकीचे महत्त्वाचे साधन बनले होते. प्रथम पहिल्या महायुद्धातील जादा लष्करी विमाने परिवर्तित करून नागरी हवाई वाहतुकीसाठी वापरली. त्यातून देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय हवाई वाहतुकीचे जाळे निर्माण होत गेले. नंतर हवाई वाहतुकीच्या दृष्टीने सोयीस्कर अशी विमाने बनविण्यात येऊ लागली. शिवाय हवाई वाहतुकीशी निगडित असलेल्या सोयी, साधने, समाग्री व सेवा यांच्यातही सुधारणा होत गेल्या. प्रवाशांची सुरक्षितता व हित जपण्यात येऊ लागले. यामुळे या वाहतुकीत वाढ होऊन त्याचा विमान उद्योगाला लाभ झाला. व्यावसायिक व खाजगी कामांसाठी विमानांची व्यक्तिगत खरेदी होऊ लागली व तिचाही या उद्योगाच्या वाढीला हातभार लागला. तसेच हवाई टपाल सेवेमुळे विशेषकरून अमेरिकेत या उद्योगाला चांगलीच मदत झाली.


 विमान उद्योगात समन्वय साधण्यासाठी व त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी कायदे करण्यात आले. यामुळे १९३२-३३ च्या सुमारास जागतिक अर्थव्यवस्थेत या उद्योगाला स्थिर पाया लाभला. ब्रिटन, फ्रान्स, अमेरिका, इटली इ. देशांत स्वतंत्र हवाई खाते निर्माण झाले व त्यामार्फत नागरी व लष्करी वैमानिकीय गरजांमध्ये समन्वय साधण्यात आला. आंतरराष्ट्रीय व्यापारी हवाई वाहतूक सुरू झाल्यावर या कामांसाठी आंतरराष्ट्रीय आयोग स्थापण्यात आले आणि त्यांनी हवाई वाहतूक नियंत्रण, विमानाच्या उड्डाणांची, विमानाच्या प्रकारांची व प्रवाशांची सुरक्षितता इत्यादींसाठी नियम व कायदे केले. या कायद्यांचे पालन होते की नाही हे पाहणाऱ्या संस्थाही स्थापन झाल्या. या सर्व घटनांचा लाभ विमान उद्योगाची वाढ होण्यास झाला, कारण लष्करी सज्जीतेऐवजी व्यावसायिक फायद्यावर अधिक भर देण्यात येऊ लागला. यामुळे विमानांमध्येच नव्हे तर या उद्योगातच अंतर्बाह्य बदल होऊ लागला.

विमान उत्पादन करणाऱ्या कंपन्यांमध्ये नवीन ग्राहक आकर्षित करण्यासाठी स्पर्धा सुरू झाली. यातून विमान व विमानांचे एंजिन यांचे कार्यमान सुधारले आणि अधिक विश्वासार्ह, आरामदायी व चालवायला सोपी विमाने तयार होऊ लागली. प्रवासी व मालवाहतूक फायदेशीर होण्यासाठी मोठी व दीर्घ पल्ल्याची विमाने बनविण्यात येऊ लागली. अशा रीतीने या उद्योगात विमानाच्या बनावटीत कोणकोणत्या सुधारणा होत गेल्या हे थोडक्यात पुढे दिले आहे.

युद्धातील जादा विमानांमुळे त्यांच्या तंत्रविद्याविषयक प्रगतीला मर्यादा पडली होती. यामुळे अधिक चांगल्या अभिकल्पाची व चाचणी घेण्याला सज्ज असलेली एंजिने उपलब्ध असूनही त्यांच्या १९२५ पर्यंत वापर करता आला नाही. १९२५-३० दरम्यान विमानाच्या अभिकल्पात व बांधणीत बरीच प्रगती झाली. कारण वैज्ञानिक दृष्टी असलेले अभिकल्पक व अभियंते या उद्योगात आले होते. त्यांच्या व्यावसायिक गरजा भागविण्यासाठी सरकारी व खाजगी संशोधन प्रयोगशाळा स्थापन झाल्या. शिवाय वैज्ञानिक अहवाल व तंत्रविद्येविषयीची प्रकाशने यांद्वारे जुन्या व नव्या संशोधनांच्या माहितीचा प्रसारही होऊ लागला. अशा रीतीने या प्रयोगशाळा व विद्यापीठे येथील संशोधने व विकासाच्या कामांमुळे विमानविषयक तंत्रविद्येत झपाट्याने प्रगती झाली. यातून अधिक वेगवान, तसेच अधिक उंची व पल्ला  गाठणारी विमाने पुढे आली. यांपैकी पुष्कळ सुधारणा ह्या चांगल्या एंजिनांमुळे झाल्या. हवेने थंड होणारे अरीय (सिलिंडरांची त्रिज्यीय मांडणी असलेले) दट्ट्याचे एंजिन पुढे आल्याने आणि सिलिंडरांची मागणी एकारेषेत असलेल्या पंक्ती एंजिनातील सुधारणा यांमुळे विमानाची विश्वासार्हता वाढली. शिवाय विमानाचे कार्यमान व उड्डाणातील वर्तन यांविषयी अचूक गणितीय भाकिते करणे नवीन माहितीमुळे शक्य झाले, तसेच वातविवरात ही गणितीय भाकिते तपासून पाहता येऊ लागली. यांमुळे मुक्त चाचणीतील धोके टाळता येऊ लागले.

यांशिवाय विमानांत पुढील प्रकारच्या सुधारणा व प्रगती झाली. विमानाची शक्ती व वजन  यांतील गुणोत्तरात सुधारणा होत गेली. आत ओढून घेता येणारी निवर्तनी अवतरण यंत्रणा, दृश्यमानता कमी असताना उड्डाणाकरिता वैमानिकाला उपयुक्त ठरणारी उपकरणे, हवा अथवा दट्‌ट्याला पुरविण्यात येणारे इंधनमिश्रण दाबून त्याची घनता वाढविणारा सपींडक म्हणजे सुधारित अभिभारक, हिमनिर्मितीला प्रतिबंध करणारी यंत्रणा वगैरे सामग्री पुढे आली. विमानाचे सर्व भाग धातूंचे (मुख्यतः ॲल्युमिनियमाच्या मिश्रधातूंचे) बनविण्यात येऊ लागले. यामुळे धातुपत्राकाम ही या उद्योगातील प्रमुख उत्पादन प्रक्रिया झाली. अशा तऱ्हेने विमानाचे बल वाढल्याने द्विपंखी विमानाचे अधिक साध्या व वेगवान एकपंखी विमानात परिवर्तन करता आले, तसेच काही कंपन्या वजनाला हलकी विमाने बनवू लागल्या.

व्हर्सायच्या तहामुळे जर्मनीला हवाई दल बाळगण्यास मनाई होती. त्यामुळे तेथील विमान उत्पादन बंद होते, यामुळे तेथे १९१९ च्या सुमारास ग्लारयडरकडे अधिक लक्ष देण्यात येऊ लागले. खेळांप्रमाणेच लष्करी आणि बाँबफेकी विमानांच्या वैमानिकांच्या प्रशिक्षणासाठी ग्लायडरचा उपयोग झाला. १९२०-३० च्या दरम्यान विमान उत्पादन करणाऱ्या अनेक कंपन्या तेथे स्थापन झाल्या व विमानांचे उत्पादन परत सुरू झाले, सरकारी सवलती व हिटलर यांचे नेतृत्व यांमुळे या उद्योगाला चांगलेच प्रोत्साहन मिळाले. वजनाला हलक्या व कार्यक्षम अशा शिडांच्या विमानांचा अभिकल्प बनवून ती तयार करण्यात आली, तसेच जुन्या व नव्या कंपन्यांनी लढाऊ व बाँबफेकी विमाने तयार केली. याकरिता वायुयामिकीमधील संशोधन करण्यात आले. यामुळे १९३०-३३ मध्ये जर्मनी परत युद्धसज्जा होण्याच्या स्थितीत आला आणि १९३४ साली तेथील हवाईदल शस्त्रसंभाराने सज्ज  होण्यास परत सुरुवात झाली.

या काळाच्या प्रारंभी ब्रिटनमध्ये विमान उद्योगाच्या दृष्टीने आर्थिक परिस्थिती प्रतिकूल होती. १९३५ साली देश शस्त्रसज्ज होण्यास सुरूवात झाली व मग या उद्योगाची  स्थिती सुधारली. पुष्कळ वर्षे येथे चार एंजिनांची द्विपंखी विमाने तयार होत होती. नंतर येथील बहुतेक विमाने तीन एंजिनांची एकपंखी होती. फ्रान्समध्ये लष्करी विमाने व विमान एंजिने बनविणाऱ्या उद्योगाचे राष्ट्रीयीकरण करण्यात आल्याने कुशल मनुष्यबळ उपलब्ध असूनही उत्पादनात देश मागे पडला. परिणामी फ्रान्स व ब्रिटनलाही अमेरिकेकडून विमाने मिळविणे भाग पडले. यामुळे अमेरिकेतील विमान उद्योगाला उर्जितावस्था आली.

या काळात रशियात हा उद्योग सरकारमार्फत पुरेशा प्रमाणात चालू राहिला होता, दुसऱ्या महायुद्धापर्यंत तेथील विमानांच्या अभिकल्पांचा दर्जा जर्मनीच्या दर्जाएवढा उंचावला होता. तथापि तेथे परवान्यांद्वारे अन्य देशांतील विमाने तयार होत होती. या कामात जर्मनीसहित इतर प्रगत देशांनी रशियाला मदत केली होती.

या काळात जपानमध्येही विमान बनविणाऱ्या अनेक कंपन्या स्थापन झाल्या आणि दुसऱ्या महायुद्धापर्यंत जपान हा विमाननिर्मिती करणारा एक प्रमुख देश बनला होता. १९४० सालचे जपानचे झीरो हे लढाऊ विमान जगातील बहुधा सर्वात चांगले लढाऊ विमान होते.

अमेरिका १९१९-२० च्या सुमारास या उद्योगात बराच मागे असलेला देश होता. नॅशनल ॲडव्हायझरी कमिटी फॉर एरॉनॉटिक्स (NACA स्थापना १९१५) या संशोधन केंद्राची पहिली संशोधन प्रयोगशाळा थोड्याच काळाने स्थापन झाली. येथील संशोधनामुळे १९३० साली हे जगातील एक मोठे संशोधन केंद्र बनले. तेथे बहुतेक प्रकारच्या विमानांचे नियंत्रित स्थितीत परीक्षण करण्याची सोय आहे. येथील संशोधन आणि सुविधा यांचा अमेरिकेतील विमान उद्योगाला चांगलाच लाभ झाला. १९२६ साली स्थापन झालेल्या डॅनिअल गुगेनहाइम फंडाच्या उद्दिष्टांमुळे वैमानिकीच्या सर्व क्षेत्रांवर त्याचा पुढील काळात प्रभाव पडला आहे. यातून वैमानिकीविषयीच्या संस्था व प्रयोगशाळा स्थापन होऊन त्यांच्याकडे तज्ञ आकृष्ट झाले. यातूनच वैमानिकीचे आणि १९४० नंतर अवकाशविज्ञानविषयक पुढचे संशोधन व प्रगती शक्य झाली.

आर्थिक महामंदीच्या काळातही डोनाल्ड डब्ल्यू. डग्लस, विल्यम बोईंग,रॉबर्ट व कोर्टलँड ग्रॉस, जॉन के. नॉर्थ्रप इ. उद्योजकांच्या परिश्रमामुळे व चिकाटीमुळे अमेरिकेतील विमान उद्योगाची प्रगती होत गेली. प्रथम टपालाच्या आणि नंतर प्रवासी व माल यांच्या वाहतुकीसाठी विमाने करण्यात आली. यातून मोठी विमाने व भौगोलिक स्थलदर्शक संकेतदीप, काही प्रमाणात विश्वासार्ह असे रेडिओ मार्गनिर्देशक व संदेशवहन इ. नवीन सुविधा व साधने तसेच नवीन सामग्री पुढे आली आणि त्यांची हवाई वाहतूक व्यापक होण्यास मदत झाली. पर्यायाने एकूण विमान उद्योगाची प्रगती झाली.


 दुसऱ्या महायुद्धापर्यंत सागरपार उड्डाणासाठी उडत्या नौका वापरीत. त्या आणि वातनौका १९३६ नंतर मागे पडल्या आणि परिभ्रमी (फिरत्या) पंखाचे स्वयंघूर्णी, हेलिकॉप्टर ही हवाई वाहने पुढे आली. पहिले स्वयंघूर्णी युआन द ला सिएर्व्हा यांनी बनवून १९२३ साली उडविले होते. हेलिकॉप्टरचे पहिले यशस्वी उड्डाण १९३७ मध्ये करण्यात आले. हे हेलिकॉप्टर हेन्रिख फोक यांनी संशोधन करून बनविले होते.

जमिनीवर व पाण्यावर सारख्याच कार्यक्षमतेने आरोहण व अवतरण करू शकणाऱ्या विमानाचे पहिले उड्डाण १९२४ साली ग्रोव्हर लोएनिंग यांनी केले होते. लष्कर व सागरी तटरक्षक दल यांच्यासाठी अशी अनेक विमाने बनविली होती. हवाई वाहतूक कंपन्यांनी व खाजगी वापरासाठीही ही विमाने विकत घेतली होती. अमेरिकेत १९२७-३० दरम्यान अशी छोटी विमाने बनविण्यात आली होती. रॉबर्ट एच्. गॉडर्ड यांनी द्रवरूप इंधनावर चालणाऱ्या रॉकेट एंजिनावर प्रयोग केल (यातून जर्मनीचे व्ही-२ क्षेपणास्त्र पुढे आले). गॉडर्ड यांनी असे पहिले प्रायोगिक रॉकेट १९२६ साली उडविले तर रॉकेट शक्तिचालित विमानाचे पहिले उड्डाण १९२९ मध्ये फ्रिट्‌झ फोन ओपेल यांनी केले. यासाठी त्यांनी ग्लायडरच्या मागील भागाला बंदुकीच्या दारूने चालणारे रॉकेट जोडले होते. ब्रिटनचे फ्रँक व्हिटल व हींकेल ही जर्मन विमान-उत्पादक कंपनी यांनी मिळून झोत एंजिने बनविली. पहिले झोत विमान १९३९ साली उडविण्यात आले. त्याचे झोत एंजिन हान्स फोन चेन यांनी बनविले होते. विमानवाहू जहाजाचा विकासही दोन महायुद्धांदरम्यानच्या काळात झाला.

दुसरे महायुद्ध (१९३९-४५) : १ सप्टेंबर १९३९ रोजी जर्मन विमानांनी पोलंडवर हल्ला केला व दुसरे महायुद्ध सुरू झाले. युद्धसज्ज  होण्याचे जर्मनीचे प्रयत्न १९३८ सालीच उघड होऊनही ब्रिटन, फ्रान्स व अमेरिका या देशांनी याची तातडीने दखल घेतली नाही. यामुळे जर्मनीने एकापाठोपाठ एक अशा रीतीने यूरोपीय देश पादाक्रांत केले. या काळात केवळ ब्रिटनच्या हवाई दलाने जर्मन हवाई दलाशी चांगला लढा दिला. ब्रिटनमधील कंपन्यांनी युद्धोपयोगी विमानांचे उत्पादन झपाट्याने वाढविले. यामुळे युद्ध सुरू झाल्यावर वर्षभरातच ब्रिटनमधील विमानांचे उत्पादन जर्मनीमधील उत्पादनाएवढे होऊ लागले. मात्र फ्रान्समधील विमान उद्योगाची स्थिती वाईट होती व १९४० साली पराभूत झाल्यावर या स्थितीत सुधारणा होण्याचेच थांबले.

जर्मनीप्रमाणे जपानचे हवाई दल मोठे होते. जपानमधील पुष्कळ युद्धोपयोगी विमाने मित्सुबिशी कॉर्पोरेशन ही कंपनी तयार करीत असे. जर्मनीच्या आक्रमणामुळे रशियातील विमान उद्योगातही झपाट्याने वाढ झाली व हा उद्योग उरल पर्वताच्या पूर्वेस हलविण्यात आला. १९४४ साली तेथील विमानांचे उत्पादन जर्मनीतील उत्पादनाएवढे (मात्र ब्रिटन व अमेरिका येथील उत्पादनापेक्षा कमी) झाले. या कामी रशियाला दोस्त राष्ट्रांची मदत झाली. इटलीमधील विमान उद्योग तुलनेने लहान होता. युद्धाचे पारडे फिरल्यावर जर्मनीत हवाई कर्मचाऱ्यांची संख्या, तसेच इंधन व शस्त्रास्त्रे यांचे उत्पादन यांच्या तुलनेत विमाने जादा प्रमाणात निर्माण होत होती.

अमेरिकेत १९३९ साली २,१०० विमाने तयार झाली होती. मात्र १९४१ साली अमेरिका युद्धात उतरल्यावर तेथील विमाननिर्मिती करणाऱ्या कारखान्यांचा मोठा विस्तार करण्यात आला व त्यासाठी कर्मचारी वर्ग बाहेरूनही आणण्यात आला. इंग्लंड व फ्रान्स या दोस्त राष्ट्रांकडून विमानांची मागणीही वाढत होती. त्यामुळे अमेरिकेतील विमानांचे उत्पादन मोठ्या प्रमाणात वाढले. तेथे वर्षाला ५० हजार विमाने बनविण्याचा निर्णय १९४० साली घेण्यात आला आणि पुढील पाच वर्षे यापेक्षाही अधिक विमाने तयार झाली. युद्ध समाप्तीपर्यंत तेथे वाहतुकीची व बाँबफेकी, लढाऊ इ. युद्धोपयोगी ३ लाखांहून जास्त विमाने बनविण्यात आली. अशा रीतीने विमान उद्योगात अमेरिका हा सर्वाधिक उत्पादन करणारा देश झाला.

जर्मनी, ब्रिटन व अमेरिका येथे या उद्योगातील जुन्या तंत्रविद्यांच्या आधारे नवीन तंत्रविद्या विकसित झाल्या. पेनेम्यूंडे (जर्मनी) येथील रॉकेट चाचणी केंद्रात ए-४ म्हणजे नंतरचे व्ही-२ या पहिल्या मोठ्या क्षेपणास्त्राची चाचणी जर्मनीने १९४२ साली घेतली आणि अवकाश युगाची सुरूवात झाली. तसेच व्ही-१ हे प्रयोगशील मार्गदर्शित क्षेपणास्त्रही तेथे विकसित करण्यात आले. याकरिता जर्मनांनी गॉडर्ड यांच्या संशोधनकार्याचे काळजीपूर्वक अध्ययन केले होते. १९४४ पासून युद्धात क्षेपणास्त्रे मोठ्या प्रमाणात वापरली गेली. या तिन्ही देशांनी झोत विमाने बनवून तीही युद्धात वापरली. विमानांसाठी रॉकेटची शक्ती वापरण्याचेही प्रयत्न झाले तथापि बहुतेक रॉकेटे लहान होती आणि त्यांचा पूरक शक्तीसाठी मर्यादित प्रमाणातच उपयोग करण्यात आला.

जागतिक पातळीवरील युद्ध व हवाई बाँब हल्ल्यांचा मुक्तपणे वापर यांमुळे मोठ्या विमानांचे महत्त्व व मागणी वाढली. विमानांची संरचना अधिक गुंतागुंतीची झाली. रात्री तसेच सर्व प्रकारच्या हवामानांत करावयाच्या उड्डाणांसाठी रडार व इतर इलेक्ट्रॉनीय प्रयुक्तींचा वापर होऊ लागला.

आंतरराष्ट्रीय तणावाच्या व युद्धाच्या काळात संशोधनाचा भर शस्त्रसंभारातील सुधारणांवर असल्याने संशोधनाचे स्वरूप शुद्ध राहू शकत नाही. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात विमान उद्योगातील संशोधन शुद्ध न राहता विकासात्मक स्वरूपाचे झाले. उदा., जर्मनीने सैद्धांतिक ज्ञानाचा उपयोग शस्त्रसंभारात सुधारणा करण्यासाठी केला, यातून व्ही-२ क्षेपणास्त्र पुढे आले. १९३७ नंतर अमेरिकेतील संशोधन मुख्यतः लष्करी विमानांत सुधारणा करण्याच्या दृष्टीने करण्यात आले. अशा प्रकारे या काळातील संशोधनामुळे पुढील प्रकारच्या सुधारणा झाल्या. १९४१ साली व्हिटल (डब्ल्यू-९) या झोत एंजिनाची उड्डाण चाचणी इंग्लंडमध्ये घेतली. मग अमेरिकेत यांच्या आद्य नमुन्याच्या प्रती बनवून त्यांच्यावर चालणाऱ्या विमानांचे उड्डाण करण्यात आले (१९४२). झोत एंजिनाचा प्रसार झपाट्याने झाला व युद्धाच्या अखेरीस लढाऊ विमानांमध्ये जुंकर जंबो-००४ ही झोत विमाने वापरण्यात येत होती. अमेरिकेत इगॉर सिकॉस्की यांनी १९४०-४१ मध्ये हेलिकॉप्टर विषयक संशोधन केले होते. मात्र १९४५ पर्यंत त्यात विशेष प्रगती झाली नव्हती.

१९४५ नंतरचा काळ : दुसरे महायुद्ध संपल्यावर लष्करी विमानांची मागणी एकदम कमी झाली व या उद्योगात मंदी आली. १९४८ साली शीतयुद्ध सुरू झाले. यामुळे पाश्चात्य राष्ट्रांना शस्त्रसज्ज करण्याचाभार मुख्यत्वे अमेरिकेवर पडला. यातून अमेरिकेतील विमान उद्योगातील मंदीवर मात करण्याचे प्रयत्न सुरू झाले. तसेच एच्. एच्. आर्नल्ड, जॉर्ज ल्यूइस व थीओडोर फोन कार्मन यांच्या कार्यामुळे वायू टरबाइन एंजिन व स्वनातीत वेगाने उड्डाण या तंत्रविद्या विकसित झाल्या आणि स्वनातीत झोत विमाने पुढे आली. या विमानांमुळे जगातील सर्व ठिकाणी जलदपणे, आरामात व सुरक्षितपणे जाण्याची सोय झाली व नागरी हवाई झपाट्याने वाढली व एकूण या उद्योगाला प्रोत्साहन मिळाले. १९५० साली कोरियाचे युद्ध सुरू झाले व अमेरिकन सरकारची विमानांची मागणी वाढून या उद्योगाला उत्तेजन मिळाले. या युद्धामुळे लढाऊ झोत विमानांचे युद्धातील वर्चस्व व हेलिकॉप्टरचे महत्त्व सिद्ध झाले. १९५४ साली रशियाने बाँबफेकी झोत विमानांची निर्मिती सुरू केली. यामुळे अमेरिकेतही या उद्योगातील गुंतवणूक वाढविण्यात आली.


 लष्करी व हवाई वाहतुकीच्या विमानांतील परंपरागत एंजिने व प्रचालक यांचा वापर १९७० नंतर बंद झाला. झोत विमाने १९६२ नंतर मोठ्या प्रमाणात वापरात आली. वाढत्या शक्तीची झोत एंजिने पुढे येत गेली व विमानांचे नवीन अभिकल्प बनविण्यात आले. परिणामी ध्वनीपेक्षा जास्त वेगाने विमाने धावू लागली. शिवाय हवेतल्या हवेत इंधन भरण्याची सोय उपलब्ध झाल्याने विमानांचा पल्लाही वाढला.विमानांची वरच्या दिशेत चढण्याची क्षमता व कमाल उंची गाठण्याची क्षमता यांमध्येही सुधारणा झाली. विमानांचे पंख व काया यांच्या अभिकल्पात मूलभूत सुधारणा झाल्या. विमानांचे नियंत्रण अधिक सुविकसित झाले. अपघाताच्या वेळी वैमानिकाची सुटका होण्यासाठी क्षेपक/निःसारक आसनाची गरज निर्माण झाली. पूरक ज्वालकाच्या मदतीने एंजिनांची शक्ती वर्धित करणे शक्य झाले.

अण्वस्त्रांमधील प्रगतीमुळे १९५४ नंतर मध्यम पल्ल्यातची (IRBM-इंटरमिजिएट-रेंज बॅलिस्टिक मिसाइल) व आंतरखंडीय (ICBM-इंटरकाँटिनेंटल बॅलिस्टिक मिसाइल) प्रक्षेपणास्त्रे पुढे आली. यातूनच अवकाशयानांचा मार्ग खुला झाला. कारण या प्रक्षेपणास्त्रांमुळे प्रगत रॉकेट एंजिन, वातावरणात परत शिरताना लागणारे उष्णतारोधी संरक्षक कवच, सुविकसित वैमानिकीय इलेक्ट्रॉनिकीय प्रयुक्ती, छोटे संगणक इ. सुविधा पुढे आलेल्या होत्या. १९५७ साली स्पुटनिक हा पहिला कृत्रिम उपग्रह अवकाशात सोडला. यामुळे रशिया व अमेरिका यांच्या चंद्रावर प्रथम मानव पाठविण्यासाठी स्पर्धा सुरू झाली. २० जुलै १९६९ रोजी अमेरिकेने पहिला माणूस चंद्रावर पाठविण्यात यश मिळविले. अशा प्रकारे अवकाश उद्योगाची भरभराट होत गेली.

दुसऱ्या महायुद्धानंतर नागरी हवाई वाहतूक कंपन्या हे विमान उद्योगाचे मोठे गिऱ्हाईक बनल्या. १९४५ नंतर हवाई वाहतुकीची भूपृष्ठावरील वाहतुकीशी स्पर्धा सुरू झाली. यामुळे १९५०-६० दरम्यान नागरी हवाई वाहतूक व पर्यायाने विमान उद्योग यांचा चांगला विस्तार झाला. अमेरिकेत रेल्वे व जल वाहतूक मागे पडून हवाई वाहतुकीचे महत्त्व वाढले. यामुळे तेथील हवाई वाहतूक व विमान उद्योगांनी जागतिक बाजारपेठत आघाडी संपादन केली. १९७० मध्ये अमेरिकेत व नंतर इतरत्र  हवाई वाहतुकीसाठी मोठी विमाने वापरात आली.

लष्करी कामे व दूरवरची नागरी हवाई वाहतूक यांशिवाय इतर अनेक कामांसाठीही विमाने वापरतात. ही विमाने सापेक्षतः लहान असून त्यांचा पल्ला व आसनक्षमता कमी असतात. त्यांच्यामुळे वेळेची व इंधनाची बचत होते. कीटकनाशकाच्या फवारणीसारख्या कामात वेळ, इंधन व कीटकनाशक कमी लागते आणि फवारणी अचूक व एकसारखी करता येते. दुर्गम भागात कर्मचारी व सामग्री पोहोचविता येते. दुसऱ्या महायुद्धानंतर आलेल्या आर्थिक सुबत्तेमुळे विशेषतः अमेरिकेत अशा विमानांचा वापर जास्त वाढला. इतर देशांतही असा वापर वाढत आहे.

दुसऱ्या महायुद्धानंतर ब्रिटनमधील विमान उद्योग मागे पडला. तेथे स्वनातीत विमाने बनविण्याचे प्रयत्न करण्यात आले. १९७७-८७ या काळात तेथे या उद्योगाचे राष्ट्रीयीकरण झाले होते. ब्रिटिश एअरोस्पेस ही येथील प्रमुख विमान उत्पादक कंपनी आहे. विमाने, क्षेपणास्त्रे, विमानाची एंजिने, विविध द्रव्ये व सामग्री बनविणारे उद्योगही येथे आहेत. सोसायटी ऑफ ब्रिटिश एअरोस्पेस कंपनीज या संस्थेचे हे उद्योग सदस्य होतात. या संस्थेमार्फत दर दोन वर्षांनी प्रमुख आंतरराष्ट्रीय वैमानिकीय प्रदर्शन भरविण्यात येते. त्याचा या उद्योगाला लाभ होतो.

फ्रान्समध्ये या उद्योगाचे १९४५ नंतर पुनरूज्जीवन झाले. १९५० साली मार्सेल ब्लॉक यांनी स्थापलेल्या एव्हिऑन्स मार्सेल दासौ या कंपनीची लढाऊ मिराज व व्यापारी मिस्टरी ही विमाने अतिशय यशस्वी ठरली आहेत. ब्रिटनबरोबरच्या सहकार्यातून फ्रान्सने कंकॉर्ड हे स्वनातीत विमाने बनविले, तर फ्रान्स, ब्रिटन व जर्मनी यांच्या सहकार्यातून एअर बस इंडस्ट्रीज ऑर्गनायझेशन ही विमाननिर्मिती संघटना सुरू झाली. कमी अंतरे व छोटे विमानतळ यांमुळे यूरोपमध्ये हेलिकॉप्टर व शॉर्ट टेक-ऑफ अँड लँडिंग (STOL) ही विमाने लोकप्रिय होत आहेत.

कोरियाच्या युद्धानंतर रशियातील विमान उद्योगही वेगाने वाढला. विमानविषयक कल्पकता, गुणवत्ता व कार्यक्षमता याबाबतीत येथील उद्योग प्रभावशाली ठरला आहे. लढाऊ मिग-२५, बाँबफेकी टीयू-२२-एम व हेलिकॉप्टर एमआय-२६ ही रशियन हवाई वाहने लोकप्रिय झाली आहेत. येथील विमान उद्योग सरकारी मालकीचा असून येथून हवाई वाहनांची निर्यात होते.

दुसऱ्या महायुद्धात नष्ट झालेल्या जपानमधील विमान उद्योगाचे चांगल्या रीतीने पुनरूज्जीवन होत आहे. देशाच्या आर्थिक स्थितीमुळे येथील विमान उद्योगाचे भवितव्य उज्ज्वल आहे.

विविध प्रकारची विमाने व विमानाची एंजिने तयार करणारे कारखाने ऑस्ट्रेलियात आहेत. तेथे बहुतेक विमाने परवान्याच्या पद्धतीने तयार होतात. परदेशी अभिकल्प असलेली प्रगत लष्करी विमाने व विमानांची एंजिने तेथे तयार होतात. मेलबर्नला दोन व सिडनीला एक अशी एकूण तीन विमाननिर्मिती संयंत्रे ऑस्ट्रेलियात आहेत.

अमेरिकेत या उद्योगाच्या सु. ४,००० कंपन्या असून त्यांत ६० प्रमुख आहेत. या कंपन्यांचा व्याप व कामे यांत खूप विविधता आहे. येथे प्रचालन वैमानिकीय इलेक्ट्रॉनिकी यांसारखी तांत्रिक कामे करणाऱ्या तसेच नवीन शस्त्रास्त्रे, अवकाश प्रणाली बनविणाऱ्या खास कंपन्या आहेत. शिवाय अवतरण यंत्रणा, शक्तिसंयंत्रे, पूरक शक्तिप्रणाली, अवकाश पोषाख, खास संगणक इ. बनविणाऱ्या उपकंपन्या असून त्या मुख्य कंपन्यांच्या दृष्टीने महत्त्वाच्या आहेत. या सर्व कंपन्यांच्या कामांवर लक्ष ठेवून त्यात समन्वय साधण्याचे काम व्यवस्थापक करतात.

इ.स. १९५० नंतर खर्च कमी करण्यासाठी विविध देशांत कंपन्यांचे विलिनीकरण होऊन विमाननिर्मितीच्या व नागरी हवाई वाहतुकीच्या मोठया कंपन्या तयार झाल्या उदा., अमेरिकेत मॅक्‌डॉनेल डग्लस कॉर्पोरेशन व रॉकवेल इंटरनॅशनल कॉर्पोरेशन तर ब्रिटनमध्ये ब्रिटिश एअरवेज. १९९६ सालाच्या अखेरीस बोईंग व मॅक्‌डॉनेल डग्लस या कंपन्यांच्या विलिनीकरणातून जगातील सर्वांत मोठी कंपनी तयार झाली.

युद्धकाळातील संशोधन हे तातडीच्या उपाययोजनेसारखे होते. युद्धानंतर अशी तातडी उरली नव्हती व आर्थिक स्थिती सुधारली होती. त्यामुळे या उद्योगात दीर्घकालीन उपयोगाचे संशोधन होऊलागले. अमेरिकेशिवाय ब्रिटन, कॅनडा इ. देशांतही असे संशोधन झाले. मात्र अमेरिकेतील नॅशनल एरॉनॉटिक्स अँड स्पेस ॲडमिनिस्ट्रेशन म्हणजे नासा (आधीची नॅशनल ॲडव्हायझरी कमिटी फॉर एरॉनॉटिक्स) या संघटनेच्या प्रयोगशाळा व चाचणी उड्डाण केंद्रे येथे असे सर्वाधिक व व्यापक स्वरूपाचे संशोधन झाले. दुसऱ्या महायुद्धानंतर येथे हाती घेण्यात आलेल्या पुढील काही प्रकल्पांवरून या संशोधनाची व पर्यायाने या उद्योगाची प्रगती लक्षात येऊ शकेल: ध्वनीच्या वेगाच्या जवळपास वेग आसणारा हवेचा झोत ज्यात वापरतात अशा वातविवरातील संशोधन स्वनातीत विमानांच्या उड्डाण चाचण्या विमान व हेलिकॉप्टर यांचे स्थैर्य व नियंत्रण यांची गुणवैशिष्ट्ये निश्चित करणे विमानाचे उभ्या दिशेतील आरोहण व अवतरण यांचे संशोधन विमानवाहू जहाजावरील तसेच कमी लांबीच्या धावपट्टीवरील विमानाच्या अवतरणात येणाऱ्या अडचणींचा अभ्यास लवचिक पंखयुक्त विमानांचा विश्लेषणात्मक अभ्यास विमानासाठी वापरलेल्या द्रव्यांचे व सामग्रीचे उच्च तापमानाला होणारे वायुगतिकीय वर्तन व तापन यांचा अभ्यास वगैरे.


 अशा संशोधनामुळे विमानांत पुढील प्रकारच्या सुधारणा झाल्या आहेत : टेहळणी विमानांत इलेक्ट्रॉनीय सामग्रीप्रमाणेच छायाचित्रणाच्या सामग्रीचा वापर वाढला, विस्तृत क्षेत्राची माहिती मिळविण्यासाठी सुविकसित सामग्री असणारी खास प्रकारची विमाने बनविण्यात आली, उंचावरून टेहळणी (उदा., यू-२ विमान) व वातावरणवैज्ञानिक संशोधनासाठीची विमाने तयार करण्यात आली. सैन्य, रसद व छत्रीधारी सैन्य थोड्या अवधीत दूरवर वाहून नेणारे लष्करी वाहतूक विमानांचे विविध प्रकार तयार करण्यात आले (लॉकहीड सी-५ गॅलॅक्सी हे असे सर्वांत मोठे विमान ठरले). मात्र १९६०-७० दरम्यान अशा प्रकारची काही कामे कृत्रिम उपग्रहांमार्फत करण्यात येऊ लागली, तसेच आंतरखंडीय प्रक्षेपणास्त्रेही पुढे आली होती. यांमुळे लांब पल्ल्याच्या काही लष्करी विमानांचे महत्त्व कमी झाले. शिवाय विमानवाहू जहाजांचा वापरही कमी झाला. अशी जहाजे काही थोड्याच नाविक सत्तांकडे राहिली आहेत.

एक्स-१५, माख-६ या विमानांची कामगिरी सर्वांत उच्च दर्जाची ठरू शकेल. या विमानांमुळे वातावरण व अवकाश यांत होणाऱ्या उड्डाणांमधील तफावत दूर होऊ शकेल. अमेरिकेची हवाई व नाविक दल तसेच नासा ही संघटना यांनी संयुक्तपणे अशी तीन खास प्रकारची विमाने संशोधनासाठी तयार केली आहेत. त्यांची प्रायोगिक उड्डाणेही करण्यात आली आहेत. त्यांमध्ये या विमानांनी ताशी ७,२०० किमी. एवढा वेग व १,०६,७०० मी. एवढी उंची गाठली होती.

नागरी हवाई वाहतुकीतही नवीन विमाने पुढे येत आहेत. उदा.,बोईंग कॉर्पोरेशन बोईंग-७३७ मालिकेत बनविलेले बोईंग -७३७ -७०० हे पहिले विमान. हे आधीच्या विमानांपेक्षा अधिक वेगाने, अधिक उंचीवरून व अधिक लांबच्या पल्ल्यापर्यंत उडू शकेल शिवाय हे विमान अधिक स्वस्तही आहे. त्याचा वेग ताशी ८५० किमी. असून ते १२,५०० मी. एवढी उंची गाठू शकेल. यात १२८ ते १४९ प्रवासी बसू शकतील. याचा पल्ला ५,५५८ किमी. एवढा असून त्यामुळे कोठेही न थांबता ते अमेरिका हा देश पार करू शकेल. हे विमान १९९७ मध्ये, तर याच्या पुढील बोईंग -७३७-८०० हे १८९ प्रवासी बसू शकणारे विमान १९९८ साली विक्रीला उपलब्ध होईल.

वैमानिकीय इलेक्ट्रॉनिकी :  दुसऱ्या महायुद्धानंतरच्या काळात लष्करी वापराच्या दृष्टीने इलेक्ट्रॉनिकीच्या क्षेत्रात बरेच संशोधन झाले. या संशोधनातून प्रथम विमानात व नंतर अवकाशयानात वापरावयाच्या इलेक्ट्रॉनीय प्रयुक्तींचे पूर्णपणे नवीन असे क्षेत्र पुढे आले. ही एकूण परंपरागत वैमानिकीत पडलेली पहिली अतिशय मोलाची भर होय. या प्रयुक्तींचा विमान उडत असताना विमानात व जमिनीवरूनही उपयोग होतो. विमानांचा वाढता वेग, तसेच त्यांच्या संरचनेतील व बांधणीतील वाढती गुंतागुंत यांमुळे शत्रूचे विमान ओळखणे, त्याचा पाठलाग करणे व अखेरीस ते नष्ट करणे यांसाठी स्वयंचलित इलेक्ट्रॉनीय सामग्रीची वाढत्या प्रमाणात गरज भासू लागली. यातूनच इलेक्ट्रॉनिकीचा या उद्योगातील वापर वाढत आहे. अशा रीतीने विमाने, क्षेपणास्त्रे, अवकाशयाने, तसेच ती चालविणे अथवा वापरणे यांमधील इलेक्ट्रॉनिकीच्या वापराला वैमानिकीय इलेक्ट्रॉनिकी (एव्हिऑनिक्स) असे म्हणतात. अशा इलेक्ट्रॉनिकीय घटकांचा वापर एकसारखा वाढत असल्याने हा या उद्योगातील महत्त्वाचा विभाग झाला आहे. उदा., दुसऱ्या महायुद्धातील बी-२९ या बाँबफेकी विमानात असे काही हजार घटक होते, तर बी-४७ या बाँबफेकी झोत विमानात ४०,०००, बी-५२ या विमानात ५०,००० आणि बी-५८ या स्वनातीत झोत विमानात ९५,००० घटक होते.

आंतरखंडीय प्रक्षेपणास्त्रे : यांच्या विकासासाठी १९५०-६० दरम्यान अमेरिका व रशिया या देशांत मोठी स्पर्धा सुरू होती. त्यामुळे या उद्योगात क्रांतिकारक बदलाची सुरुवात झाली. यातून तंत्रविद्याविषयक गरजा मोठ्या प्रमाणात वाढल्या. उदा., प्रचालन, संरचना व वायुगतिकी या क्षेत्रांतील खास तंत्रविद्याविषयक गरजा अनेक पटींनी वाढल्या. या प्रक्षेपणास्त्रांच्या संशोधनाने विमान उद्योगात मोठ्या प्रमाणात बदल घडून येण्यास मदत झाली. या प्रक्षेपणास्त्रांच्या विकासाच्या प्रारंभीच्या काळात विमान उद्योगासाठी लागणाऱ्या संशोधन व विकासाच्या सुविधा, साधने विकसित झाली. तसेच कुशल कर्मचारी तयार झाले. यामुळे विमान उद्योगाची वाटचाल झपाट्याने होण्यास मदतच झाली.

विमान उद्योगाचे भवितव्य : १९७०-७३ च्या सुमारास अमेरिका व यूरोप येथील काही कंपन्यांनी मोठी प्रवासी विमाने बांधण्यावर भर दिला. अशा जंबो जेट वा एअरबस विमानांत नेहमीच्या विमानापेक्षा दुप्पट ते तिप्पट प्रवासी बसू शकतात. यामुळे काही प्रमाणात खर्च कमी झाला आणि गर्दीच्या विमानतळावरील वाहतूक मर्यादित होण्यास मदत झाली. अर्थात विमानतळावरील गर्दी हा या उद्योगापुढील एक महत्त्वाचा प्रश्न राहिला आहे. यामुळे विमानाचा अवतरणापूर्वी व आरोहणापूर्वी बराच खोळंबा होऊन वेळापत्रक विस्कळीत होते व खर्चही वाढतो. मोठे विमानतळ हा यावरील एक उपाय होता. मात्र असे विमानतळ जेथे जास्त जमीन उपलब्ध आहे अशा ठिकाणी म्हणजे शहरांपासून दूर बांधणे भाग होते. या विमानतळांमुळे नागरी वस्तीला होणारा त्रास काही प्रमाणात कमी झाला, तथापि शहरातून विमानतळावर जाण्यायेण्यासाठी रस्त्याने जास्त अंतर कापणे आवश्यक झाले. परिणामी त्या रस्स्तावरील वाहनांच्या गर्दीत भर पडून रस्ता वाहतुकीची कोंडी होण्याची शक्यता वाढली. मध्यम आकारमानाची विमाने हा यावरील एक उपाय आहे. अशा विमानांना लहान धावपट्टी चालू शकते. शॉर्ट टेक-ऑफ अँड लँडिंग (STOL) व व्हर्टिकल टेक-ऑफ अँड लँडिंग (VTOL) या नावांनी ओळखण्यात येणारी विमाने या दृष्टीने उपयुक्त ठरू शकतील. त्यांच्यासाठी लागणारे लहान विमानतळ शहरालगत बांधता येतील. मुख्य मार्गांवरील व गर्दींच्या विमानतळांवरील वाहतुकीच्या दृष्टीने हा उपाय उपयुक्त ठरेल.

छोट्या व वजनाला हलक्या विमानांपासून ते टेहळणीच्या माख-३ विमानांपर्यंतची विविध प्रकारची विमाने तसेच हेलिकॉप्टरही बनविण्यातयेतात. लष्करी विमानांच्या प्रकारांतही वाढ होत आहे. अशा तऱ्हेने संख्या व प्रकार या दृष्टींनी विमाननिर्मिती उद्योग व्यापक होत आहे. जमिनीवरून, हवेतून तसेच पाणबुडीतून सोडता येणारी अनेक प्रकारची प्रक्षेपणास्त्रेही तयार होतात. ती अधिक अचूक मार्गनिर्देशन प्रणाली असलेली, अधिक संहारक व अधिक दीर्घ पल्ल्याची बनविण्याचे प्रयत्न होत आहेत. अशा प्रकारे या उद्योगाची बाजारपेठ संख्या व प्रकार या दोन्ही दृष्टींनी व्यापक होत आहे. सरकार हे या उद्योगाचे प्रमुख गिऱ्हाईक असून त्याच्या मागणीत होणारा चढउतार, हा या उद्योगापुढील महत्त्वाचा प्रश्न आहे. शिवाय संरक्षण गरजा व भांडवलाची उपलब्धता यांचाही प्रभाव उद्योगावर पडतो. विविधीकरण करणे व आपल्या तंत्रविद्या इतर क्षेत्रांना (उदा., जहाज प्रचालन, रेल्वे, वातानुकूलन, बँका इ.) विकणे हे उपाय यावर योजतात.


 या उद्योगाच्या भवितव्याच्या दृष्टीने यातील सरकारचा प्रत्यक्ष सहभागही महत्त्वाचा ठरणार आहे. बहुतेक ठिकाणी सरकार या उद्योगात सहभागी असते. युद्धातील महत्त्वाची साधने म्हणून विमाने, प्रक्षेपणास्त्रे यांच्याकडे पाहिले जाते. त्यामुळे शस्त्रसज्ज होताना सरकार आपल्या गरजेनुसार उत्पादनांमध्ये सुधारणा करण्यास प्रोत्साहन देते व आर्थिक साहाय्यही करते. नागरी हवाई वाहतुकीसाठीही सरकारची मदत मिळते व बऱ्याच ठिकाणी स्वतः सरकारही या उद्योगात भागीदार असते. म्हणून हवाई वाहतुकीचे नियंत्रण व सुरक्षिततेची अंमलबजावणी करणे यांसाठी बहुतेक देशांत वेगळ्या संस्था असतात. बहुतेक देश इंटरनॅशनल सिव्हिल एव्हिएशन ऑर्गनायझेशन (ICAO) या आंतरराष्ट्रीय संघटनेचे सदस्य होतात. ही संघटना नागरी हवाई वाहतुकीला प्रोत्साहन देते व आंतरराष्ट्रीय हवाई वाहतुकीतील सुरक्षिततेत दक्षता घेण्यास मदत करते.

अवकाश तंत्रविद्या हे या उद्योगातील सर्वांत झपाट्याने वाढणारे क्षेत्र आहे. चंद्र व पृथ्वी यांच्या दरम्यान असलेल्या भागांचे मूलभूत समन्वेषण करणाऱ्या कृत्रिम उपग्रहांना या क्षेत्रात सर्वाधिक मागणी आहे. संदेशवहन, वातावरणवैज्ञानिक माहिती, मार्गनिर्देशन, टेहळणी इ. कामांसाठी असे कृत्रिम उपग्रह वापरतात. शिवाय उपग्रह अवकाशात पाठविणे, हवी असलेली अवकाशवैज्ञानिक माहिती पुरविणे इत्यादींसारख्या सेवासुद्धा या उद्योगात येतात.

  ठाकूर, अ.ना. 

भारत : भारतातील विमान उद्योगाची सुरूवात २३ डिसेंबर १९४० रोजी झाली. त्या दिवशी वालचंद हिराचंद यांनी हिंदुस्थान एअरक्राफ्ट लिमिटेड ही कंपनी बंगलोर येथे स्थापन केली. या कंपनीने दट्ट्याचे एंजिन असलेल्या व प्रशिक्षणासाठी वापरावयाच्या हॅर्लो विमानाचे परवान्यानुसार उत्पादन करण्याचे काम प्रथम हाती घेतले. बंगलोर येथे जुळणी करून बनविलेल्या पहिल्या हॅर्लो विमानाचे चाचणीउड्डाण जुलै १९४१ मध्ये करण्यात आले. त्यापुढील महिन्यात सैनिकांची ने-आण करणाऱ्या दहा आसनांच्या ग्लायडरचे चाचणीउड्डाण करण्यात आले. या ग्लायडरचा अभिकल्प (आराखडा) विष्णू महादेव घाटगे यांनी तयार केला होता. विमानाचा अभिकल्प तयार करणे व विमानांचे उत्पादन करणे ही कामे कंपनी करीत असे. १९४२ साली कंपनीने आपल्या या कामांत बदल केला. दुसऱ्या महायुद्धात दोस्त राष्ट्रांना मदत करण्यासाठी असा बदल करण्यात आला. आग्नेय आशियात दोस्त राष्ट्रे वापरीत असलेल्या लढाऊ, बाँबफेकी व वाहतुकीच्या विमानांची दुरुस्ती व संपूर्ण निरीक्षण (ओव्हरहॉल) करण्याचे काम कंपनी करू लागली. या महायुद्धानंतरच्या मंदीच्या काळात दुसऱ्या महायुद्धातील जादा विमानांचे पूर्वप्रायकरण (रिकंडिशनिंग) करण्याचे काम कंपनीने हाती घेतले. टायगर मॉथ, डकोटा व लिबरेटर यांसारखी रॉयल इंडियन एअरफोर्सने वापरलेली विमाने यांमध्ये होती.

भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर कंपनीने विमानाचा अभिकल्प तयार करण्याचे व विमान उत्पादनाचे काम परत हाती घेतले. दट्‌ट्याच्या  एंजिनाचे, प्रशिक्षणासाठीचे एचटी-२ या विमानाचा अभिकल्प तयार करण्याचे काम ऑक्टोबर १९४८ साली घाटगे यांच्या नेतृत्वाखाली सुरू करण्यात आले. याच्या पहिल्या आद्य नमुन्याचे उड्डाण ऑक्टोबर १९५३ मध्ये करण्यात आले. कंपनीने बनविलेली अशी अनेक विमाने भारतीय हवाई दलात तीस वर्षांहून अधिक काळ वापरात होती. नंतर कंपनीने मरूत (एचएफ-२४), किरण, पुष्पक व कृषक या विमानांचे अभिकल्प तयार करून उत्पादन करण्याचे काम हाती घेतले. कूर्ट टँक (टांक) हे जर्मन गृहस्थ मरूत विमानाचे प्रमुख अभिकल्पक होते. त्यांच्या हाताखाली अभियंते, आरेखक, कार्यशाळा तंत्रज्ञ व साहाय्यक अशा १,००० भारतीयांची तुकडी काम करीत होती. मरुतचा अभिकल्प तयार करण्यास ऑगस्ट १९५६ मध्ये सुरूवात झाली व त्याच्या पहिल्या आद्यनमुन्याचे उड्डाण जून १९६१ मध्ये करण्यात आले. किरण, पुष्पक व कृषक या विमानांचे प्रमुख अभिकल्पक घाटगे होते. किरणच्या अभिकल्पाची सुरूवात डिसेंबर १९५९ मध्ये झाली व त्याच्या पहिल्या आद्यनमुन्याचे उड्डाण सप्टेंबर १९६४ मध्ये करण्यात आले. याचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन करण्यात आले. झोत विमानाचे मूलभूत प्रशिक्षण देण्यासाठी भारतीय हवाई दलात वापरण्यात येणारे मरुत हे प्रमुख विमान आहे. स्वतः बनविलेल्या अभिकल्पांची विमाने तयार करतानाच हिंदुस्थान एअरक्राफ्ट लिमिटेड या कंपनीने डी हॅव्हिलँड, व्हँपायर, फॉलंड (ब्रिटन), नॅट व एअरो-स्पाशिएल (फ्रान्स) ही विमाने व ऑल्यूत (आताचे चेतक) हेलिकॉप्टर यांचेही परवान्याच्या आधारे उत्पादन सुरू झाले होते.

जानेवारी १९६० मध्ये भारत सरकारने हॉकर सिड्‌ली व ॲव्हरो-७४८ (ब्रिटन) या विमानांच्या उत्पादनासाठी हवाई दलाचा एक विभाग म्हणून एअरक्राफ्ट मॅन्युफॅक्चरिंग डेपो कानपूर येथे स्थापन केला. ऑगस्ट १९६३ मध्ये एरॉनॉटिक्स इंडिया लिमिटेड ही कंपनी स्थापली. सोव्हिएट मिग-२१ या विमानांच्या सांगाडा-चौकटी, एंजिने व वैमानिकीय इलेक्ट्रॉनिकीय घटक यांचे उत्पादन करण्यासाठी या कंपनीने ओझर (जि. नासिक), कोरापूट (ओरिसा) व हैदराबाद येथे कारखाने उभारले. एअरक्राफ्ट मॅन्युफॅक्चरिंग डेपोचे जून १९६४ मध्ये एरॉनॉटिक्स इंडिया लिमिटेड या कंपनीत विलीनीकरण करण्यात आले. नंतर या कंपनीचेही हिंदुस्थान एअरक्राफ्ट लिमिटेड या कंपनीत विलीनीकरण होऊन हिंदुस्थान एरॉनॉटिक्स लिमिटेड (एचएएल) ही कंपनी ऑक्टोबर १९६४ मध्ये स्थापन झाली.

हिंदुस्थान एरॉनॉटिक्स लिमिटडचे मुख्य कार्यालय बंगलोरला असून १९९६ साली हिचे १२ उत्पादन विभाग होते. त्यांपैकी बंगलोर येथे सहा आणि कानपूर, कोरापूट, नासिक हैदराबाद, लखनौ व कोर्वा येथे प्रत्येकी एक विभाग आहे. विमाने, विमानांची एंजिने, पूरक साधने, वैमानिकीय इलेक्ट्रॉनीय घटक, तसेच अवकाशविज्ञानाच्या प्रकल्पासाठीचे व क्षेपणास्त्रांचे घटक यांचा अभिकल्प, विकास, उत्पादन, दुरुस्ती व संपूर्ण निरीक्षण ही सर्व कामे करणारी हिंदुस्थान एरॉनॉटिक्स लिमिटेड ही एकमेवाद्वितीय अशी संस्था आहे. धातूचे ओतकाम व घडाई करणारा हिचा विभाग असून त्यामध्ये विमान व विमानाचे एंजिन यांच्यासाठी लागणारी बहुतेक ओतिवे व घडिवे तयार करतात. येथील उत्पादनांसाठी लागणारे ९० टक्के छिद्रपाट, धारकपकडी आणि परिशुद्ध (काटेकोर) हत्यारेही तेथील सुसज्ज हत्यारशाळांत (कार्यशाळांत) तयार करतात. भारतीय हवाई दल हे तिचे प्रमुख गिऱ्हाईक आहे. विमान व त्यांते सुटे भाग, तसेच विमानाच्यादुरुस्तीच्या सुविधा व संपूर्ण निरीक्षणाच्या सेवा कंपनी भारतीय हवाई दलास पुरविते. यांसाठी लागणाऱ्या पायाभूत सोयी येथे उपलब्ध असल्याने भारतीय हवाई दलास त्यांची भरीव मदत होते. या कंपनीमुळे देश स्वावलंबी होण्यास मदत होतेच, शिवाय परकीय चलनाची बचतही होते. शेजारच्या देशांबरोबर झालेल्या संघर्षात या कंपनीचे महत्त्व लक्षात आले आहे.


 विमानाच्या उत्पादनाशी निगडित असलेले पुढील प्रकल्प १९९६ साली चालू होते : अँग्लों-फ्रेंच जॅग्वार, रशियन मिग-२७, जर्मन डॉर्निअर-२२८, फ्रेंच ऑल्यूत व लामा (म्हणजेच चेतक व चीता हेलिकॉप्टर) यांचे परदेशी कंपन्यांच्या सहकार्याने उत्पादन होते आणि स्वतःच्या अभिकल्पानुसार किरण एमके-२ व एचपीटी-३२ ही विमाने तयार होतात. विमानांची पुढील एंजिनेही तयार होतात : रोल्स-रॉइस, टर्बो मेका आडौर (जॅग्वारसाठी) हे अँग्लो-फ्रेंच, रशियन आर-२९ (मिग-२७ साठी), अमेरिकी गॅरेट ३३१-५८ (डॉर्निअर-२२८ साठी), ब्रिटिश ब्रिस्टॉल सिड्‌ली ऑर्फियस (किरण एमके-२ साठी) आणि फ्रेंच टर्बो मेका आर्‌तूस्त III-B (चेतक व चीता हेलिकॉप्टरसाठी). अमेरिकेतील ॲलिसन उद्योगाच्या सहकार्याने औद्योगिक वायू टरबाइनांचेही उत्पादन होते. वैमानिकीय इलोक्ट्रॉनिकीमधील पुढील घटक व वस्तू तयार होतात : परा-उच्च  कंप्रता, अति-उच्च कंप्रता व उच्चि कंप्रता रेडिओ संदेशवहन संच, रेडिओ दिक्‌सूचक, रडार, उच्चतामापक, विमान (तसेच जहाज वा सैन्याची तुकडी) शत्रूचे आहे की मित्राचे ते ओळखणारी प्रयुक्ती, खास प्रकारचे नियामक (उदा., आगनियामक), रडार, निरूढिजन्य मार्गनिर्देशन प्रणाली (उड्डाणमार्गाचे नियंत्रण करू शकणारी प्रणाली), लेसर अंतरदर्शक, नकाशा व माहिती एकत्रितपणे दर्शविणारी इलेक्ट्रॉनीय प्रयुक्ती आणि विमानातील संगणक शिवाय जमिनीवरील रडार प्रणालीही येथे बनवितात. पुष्कळशा वैमानिकीय इलेक्ट्रॉनीय वस्तूंचा अभिकल्प देशी स्वरूपाचा आहे. विमानाचे पाचशेहून जास्त सुटे पूरक भाग तयार करण्यात येतात व बहुतेक बाबतीत परकीय साहाय्य घेतले आहे. पूरक सुट्या भागांत तळगाडे, चाके, गतिरोधक, जलप्रेरित यंत्रणा, शक्तिनियामक, हवेचे संपीडन, वातानुकूलन, विद्युतीय सामग्री, उपकरणे, आसन व सुरक्षिततेची सामग्री, विमानाची व एंजिनामधील इंधन प्रणाली हे भाग येतात.

हिंदुस्थान एरॉनॉटिक्स लिमिटेडने १९९६ सालापर्यंत तीन हजाराहून जास्त विमाने बनविली असून त्यांपैकी१/३विमाने देशी अभिकल्पाची व उरलेली परवान्यानुसार बनविलेली होती.

भारतीय विमान उद्योगाची १९७५-९५ दरम्यान पुष्कळ वाढ झाली असून यामुळे रोजगाराच्या सु. ४४,००० संधी उपलब्ध झाल्या आहेत. या उद्योगातील आधुनिक सुविधांत होणाऱ्या गुंतवणुकीतही वाढ झाली आहे. तथापि कंपनीचा दीर्घकालीन मूलभूत विकास व देशाच्या संरक्षणाच्या दृष्टीने या उद्योगापुढे असलेले उद्दिष्ट यांमध्ये प्रमुख अडचणी आहेत : काही विभागांतील मागणी घटली आहे, देशी अभिकल्प व विकास यांचे कार्यक्रम मंद गतीने चालू आहेत आणि मुख्य ग्राहक असणाऱ्या भारताच्या तिन्ही सैन्य दलांकडून या उद्योगासाठी मर्यादित प्रमाणातच आर्थिक तरतूद होत आहे.

कुशल कर्मचारी वर्ग, अर्हताप्राप्त अनुभवी चांगले व्यवस्थापन व एकूण सौहार्दाचे औद्योगिक संबंध या बाबतीत भारतीय विमान उद्योगाची स्थिती समाधानकारक आहे. उत्पादन व परीक्षणाची आधुनिक साधने, अभिकल्प व विकास यांना साहाय्यक असलेली संगणकांसारखी साधने, उपकरणे व सुविधा आणि त्यांचा चांगल्या प्रकारे उपयोग करणारे तंत्रज्ञही येथे उपलब्ध आहेत. शिवाय इलेक्ट्रॉन शलाकेद्वारे वितळजोडकाम, इलेक्ट्रॉन विसर्जन यंत्रण, विद्युत्‌रासायनिक रूपण, टिटॅनियमाचे जोडकाम, परिशुद्ध घडाई, फर्मा वितळ ओतकाम, चूर्ण धातुविज्ञान इ. आधुनिक उत्पादन तंत्रेही उपलब्ध आहेत. यांशिवाय या कंपनीची चांगली सुसंघटित अशी गुणवत्ता नियंत्रण व विमाविषयक संघटना असून तेथे तज्ञ व्यक्ती व सुविकसित सामग्रही आहे. एखादा अभिकल्प तयार करताना अथवा वस्तूचे (कार्यखंडाचे) उत्पादन करताना त्यांची हाताळणी व त्यांवरील प्रक्रिया कशा कराव्यात या विषयीच्या सूचना स्वयंचलित यंत्रांना देण्यासाठी संगणक वापरणे (काँप्युटर एडेड डिझाइन-CAD व काँप्युटर एडेड मॅम्युफॅक्चरिंग-CAM) आणि संमिश्र सामग्रीचा शोध घेणे यांसारख्या तंत्रविद्येच्या अगदी आधुनिक क्षेत्रांमधील संशोधन कार्यही येथे सुरू आहे.

एचटी-२, पुष्पक (प्रशिक्षण देण्यासाठी उड्डाण संस्थांमध्ये वापरण्यात येणारे दोन आसनांचे वजनाला अतिशय हलके विमान), कृषक (लष्करी निरीक्षण विमान), वसंत (शेतीविषयक विविध कामांसाठी उपयुक्त विमान), एचपीटी-३२ मरुत, प्रशिक्षणासाठीचे मरुत, किरण एमके-१, किरण एमके-२ आणि अजित (नॅटची सुधारित आवृत्ती) या निरनिराळ्या दहा प्रकारच्या विमानांचे अभिकल्प तयार करून त्यांचे येथे मोठ्या प्रमाणात उत्पादन करण्यात आले आहे. विकसनशील देशाच्या दृष्टीने ही कामगिरी गौरवास्पद असली, तरी यामुळे आत्मसंतुष्ट राहून चालण्यासारखे नाही. कारण मरुत व किरण या विमानांचे प्रकल्प हे त्या काळातील सर्वांत प्रगत प्रकल्प होते. तथापि त्यानंतरच्या दहा वर्षांत विमानाचा अभिकल्प व विकास यांसंबंधीचा मोठा प्रकल्प हाती घेतला नाही. अर्थात त्यानंतर हलके लढाऊ विमान (लाइट कंबॅट एअरक्राफ्ट LCA) व प्रगत हलके हेलिकॉप्टर (ॲडव्हान्स्ड लाइट हेलिकॉप्टर ALH) हे मोठे प्रकल्प सुरू झाले. यांपैकी पहिल्या LCA प्रकल्पाची जबाबदारी संरक्षण, संशोधन व विकास संघटनेच्या देखरेखीखाली असलेल्या एरॉनॉटिकल डेव्हलपमेंट एजन्सीकडे (ADA) सोपविली आहे. यामुळे देशातील उपलब्ध तज्ज्ञता व बुद्धीमत्ता या कामी वापरणे शक्य होईल. दुसऱ्या ALH प्रकल्पाची जबाबदारी हिंदुस्थान एरॉनॉटिकल लिमिटेडकडे आहे. या कंपनीचे अभिकल्प तयार करणारे २,००० अभियंते असून त्यांपैकी बहुतेकजण या दोन  प्रकल्पांचे काम करीत आहेत. एरॉनॉटिकल डेव्हलपमेंट एजन्सीकडे प्रतिनियुक्तीवर असलेले ५०० अभियंते LCA प्रकल्पाचे काम करीत आहेत. LCA ची केवल निदर्शक प्रतिकृती १९९५ साली तयार झाली होती. ALH चा अभिकल्प व विकास यांविषयी काम जर्मनीच्या एमबीबी कंपनीच्या सहकार्याने चालू आहे. मात्र दोन्ही प्रकल्पांची कामे सावकाशपणे होत आहेत.

सैन्य दलांची वाढती गरज पूर्ण करण्यासाठी सुधारित विमाने व संबंधित शस्त्रास्त्रे यांची नेहमीच गरज भासते. अशी मागणी देशातल्या देशात भागविणे शक्य न झाल्यास आयातीद्वारे ती भारवितात. उदा., जॅग्वार, मिराज-२०००, मिग-२३, मिग-२९ आणि सुखोई-३० एमके ही विमाने अशा प्रकारे आयात केली असून प्रशिक्षणासाठीही प्रगत झोत विमाने व लढाऊ हेलिकॉप्टर यांच्या बाबतीतही असे घडण्याची शक्यता वर्तविली जाते.

नागरी हवाई वाहतुकीच्या क्षेत्राच्या बाबतीत कमी अंतरासाठीची कॉम्प्युटर कंपन्यांच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांसाठीची खास सोयी असणारी एक्झिक्युटिव्ह व उड्डाण संस्थांसाठीची (फ्लाइंग क्लब) विमाने तसेच पिकांवरील फवारणीसाठी लागणारी आणि बचाव कार्यासाठी उपयुक्त हेलिकॉप्टर, साधे व यंत्रचलित ग्ला यडर इ. हवाई वाहने तयार होणे हे भारतीय विमान उद्योगाच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक आहे.

विमान उद्योगाच्या दृष्टीने निर्यातही महत्त्वाची आहे. भारतातून हेलिकॉप्टर, त्याचे सुटे भाग व घटक यांची निर्यात होते. रोल्स-रॉइस,गॅरेट, ॲलिसन इ. प्रसिद्ध विमाने एंजिननिर्मात्या कंपन्यांना एंजिनाच्या घटकांची निर्यात होते. यांपैकी बहुतेक निर्यात ही परवान्याच्या बदल्यात परत खरेदी करण्याविषयी झालेल्या करारांनुसार होते. म्हणून अशी निर्यात नियमितपणे व पुरेशा प्रमाणात होतेच असे नाही.


 विविध मर्यादांचा विचार केल्यास हिंदुस्थान एरॉनॉटिक्स लिमिटेडचे कार्य तंत्रविद्येच्या व आर्थिक दृष्टीनेही समाधानकारक ठरले आहे. विमाने व सुटे भाग, तसेच विक्रीनंतरच्या सेवा पुरवून या कंपनीने भारतीय हवाई दलाला चांगली मदत केली आहे. विमानांचा अभिकल्प व विकास या बाबतींत काही प्रगती निश्चित झाली आहे. मात्र या क्षेत्रात इतर देशांबरोबर राहण्यासाठी अधिक प्रगतीची गरज आहे. याकरिता लागणारे प्रशिक्षित तंत्रज्ञ व आधुनिक सुविधा येथे उपलब्ध आहेत. सरकारकडून आर्थिक पाठबळ मिळाल्यास देश या क्षेत्रात स्वावलंबी होण्यास मदत होईल. भारतातील विमान उद्योग विकसित देशांच्या तुलनेत चाळीस-पन्नास वर्षांनंतर सुरू झाला तसेच विकसित देशांत विमानविषयक तंत्रविद्यांचा विकास जलदपणे झाला आहे. यामुळे या बाबतीत विकसित देश व भारत यांच्यातील अंतर वाढत गेले आहे. भारतातील विमान उद्योगाच्या भवितव्याच्या दृष्टीने ही तफावत कमी होत जाणे गरजेचे आहे.

कारखान्यातील प्रवासी विमानबांधणीतील विविध टप्पे           लढाऊ झोत विमानांचे दीर्घ जुळणी मार्ग

एव्हरेट(सीॲटल) येथील बोईंग एअरक्राफ्ट कंपनीचा व्यापारी विमाने तयार करण्याचा कारखाना     विमानच्या प्रतिकृतीचे वातविवरातील परीक्षण

कीर्तिकर, किशोर क. 

पहा : ग्लाकयडर व ग्लायडिंग झोत प्रचालन दूरवर्ती नियंत्रण मार्गनिर्देशन वातयान वायुयामिकी विमान सागरी विमान स्वयंघूर्णी हवाई छत्री हवाई वाहतूक हेलिकॉप्टर. 

संदर्भ : 1. Dalton, S. The Miracle of Flight, New York, 1977.

           2. Mondey, D. Trippe, J., Eds., The International Encyclopedia of Aviation, New York, 1977.

           3. Reithmaier, L. Standard Aircraft Handbook, 1980.