विधीकल्पित: (लीगल फिक्शन). कायद्याच्या कार्यवाहीत वास्तवात झालेले बदल समाविष्ट करण्याकरिता जे कल्पित गृहीत धरले जाते, त्यास ‘विधीकल्पित’ म्हणतात. कायदा, विशेषतः लिखित स्वरूपात असणारा कायदा हा सुलभतेने बदलता येत नाही, तो नेहमीच कालसापेक्ष असतो. म्हणूनच तो स्थितीशील राहू शकत नाही. कालमानानुरूप तो बदलणे आवश्यक असते. कायद्यात बदल घडवून आणणाऱ्या. माध्यमांपैकी एक माध्यम म्हणजे ‘विधीकल्पित’ होय.

सुप्रसिद्ध ब्रिटीश विधीवेत्ता ⇨सर हेन्री जेम्स समनर मेन (१८२२-८८) याने आपल्या ॲन एन्शन्ट लॉ इट्स कनेक्शन विथ द अर्ली हिस्टरी ऑफ सोसायटी अँड इट्स रिलेशन टू मॉडर्न आयडियाज (१८६१) या ग्रंथात विधीकल्पिते, समन्याय (इक्किटी) आणि सक्षम विधीमंडळ या माध्यमांतून कायद्याची निर्मिती होऊन तो समाजाभिमुख बनविता येतो, असे म्हटले आहे. न्यायशास्त्र व राजकीय तत्त्वज्ञान यांमधील अनेक संकल्पनांची चर्चा त्यात करताना त्याने रोमन, यूरोपीय, भारतीय आणि इतर प्राचीन विधी-पद्धतीचा आधार घेतला आहे. याच ग्रंथात त्याने ‘फिक्शन’या शब्दाची व्युत्पत्ती दिली असून हा शब्द लॅटिन भाषेतील ‘फिक्टीओ’ह्या शब्दापासून बनला आहे, असे स्पष्टीकरण दिले आहे. रोमन विधीत विधीकल्पिताला एक मर्यादित अर्थ होता. त्यानुसार विधीकल्पित किंवा फिक्शन म्हणजे प्रतिवादीस ज्या विधानांचा खोटेपणा सिद्ध करण्यास मनाई असे, असे वादीने केलेले कल्पित विधान होय. रोमन न्यायालयास एखादा खटला अथवा दावा चालविण्यासाठी अधिकारकक्षा मिळावी, म्हणून केलेल्या विधानापुरतेच असे विधीकल्पित मर्यादित असे. उदा., ‘मी रोमचा नागरिक आहे म्हणून दावा चालविण्याचा न्यायालयास अधिकार आहे’, असे विधान वादीने केल्यास, तो वादी प्रत्यक्षात परकीय नागरिक असला, तरीही प्रतिवादीस त्या विधानाचा खोटेपणा सिद्ध करण्यास परवानगी नसे. मेनने या मर्यादित अर्थापेक्षा जास्त व्यापक अर्थाने विधीकल्पित या संज्ञेचा वापर केला आहे. त्याच्या मते कायद्याचे शब्द तेच राहिले असेल, तरी कायद्याच्या तत्त्वात बदल घडून आला आहे, किंवा त्याची प्रक्रिया बदलली आहे. ही वस्थुस्थिती हे सत्य लपविण्यासाठी मान्य केलेले गृहीत म्हणजेच विधीकल्पित होय.

विधीकल्पित ही संज्ञा पुढील उदाहरणाने अधिक स्पष्ट करता येईल: दत्तक घेतलेली संतती ही नैसर्गिक संततीच आहे असे कायद्याने मानले, म्हणजेच प्रत्यक्षात नैसर्गिक संतती नसूनही ती नैसर्गिक आहे असे मानणे हे विधीकल्पित होय. म्हणजे दत्तक या विधीकल्पिताने पिता-पुत्राचे नैसर्गिक नाते नसतानाही तसे नाते निर्माण करण्यात येऊन त्यांना कायदेशीर संबंध वा हक्क प्रस्थापित करता येतात. एखाद्या वादात दत्तकाचा प्रश्न उभा राहिल्यास एखाद्या पक्षास ‘अ’या व्यक्तीस दत्तक घेतलेच नव्हते, असे प्रतिपादन करता येईल. कारण तो वस्तुस्थितीचा प्रश्न आहे. परंतु ‘अ’ही व्यक्ती दत्तक असल्याने ती नैसर्गिक संतती नाही व म्हणून तीस अधिकार मिळणार नाहीत, हे विधान करता येणार नाही. म्हणजेच विधीकल्पित खोटे आहे, असे म्हणून त्यामागचा आशय किंवा योजना नाकारणारा तर्क वापरता येत नाही. [⟶दत्तक].

मेनच्या मते न्यायालयाच्या न्यायनिर्णय प्रक्रियेमधून तयार होणारा कायदा हादेखील विधीकल्पिताचा एक प्रकार होय. कारण न्यायनिर्णय (जजमेंट) देत असताना कायद्याचे मूळ शब्द तसेच राहिलेले असतात परंतु त्यांचा आशय बदललेला असतो. मात्र तसे न म्हणता उलट न्यायालयाने मूळ कायद्याच मांडला आहे, असे गृहीत धरले जाते. कायद्याचा अन्वयार्थ करताना काळाच्या गरजेप्रमाणेत्याची कक्षा कमी-अधिक करणे, ही क्रिया विधीकल्पिताद्वारेच करतात. विख्यात अमेरिकन विधीश ⇨रॉस्को पाउंड (१८७०-१९६४) याने आपल्या ज्युरिस्प्रूडन्स (१९५९) या ग्रंथात विधीकल्पिताबद्दल चर्चा केलेली आहे त्याने खालील तीन प्रकारे विधीकल्पिताचे वर्गीकरण मांडून त्याचे विवेचन दिले आहे: (१) अध्याहृत उत्तरदायित्त्व (कन्स्ट्रक्टिव्ह लायबिलिटी), (२) गृहित वचन (इम्प्लाइड प्रॉमिस) आणि (३) अध्याह्त न्यास (कन्स्ट्रक्टिव्ह ट्रस्ट).

एखादी व्यक्ती जाणूनबुजून किंवा अतिनिष्काळजीपणे दुसऱ्यानचे नुकसान करते, त्यावेळेस त्या नुसकानीची जबाबदारी त्या व्यक्तीवर असते, हे नुकसानभरपाईच्या कायद्याचे मूळ तत्त्व आहे. परंतु नोकराने मालकाचे काम करीत असताना दुसऱ्याचे नुकसान केले, तर मालकास जबाबदार धरता येते का असा प्रश्न जेव्हा उपस्थित होतो, तेव्हा नोकर मालकातर्फे काम करीत असताना मालकाची जबाबदारी अध्याहृत समजली जाते व अध्याहृत उत्तरदायित्वाचे विधीकल्पित उपयोगात आणून मालक नुकसानभरपाई देण्यास बांधील राहतो. [⟶सहसेवक नियम]. त्याचप्रमाणे अज्ञान मुलाने नुकसान केल्यास त्याच्या पालकास जबाबदार धरले जाते.

गृहीत धरलेले वचन याबद्दल इग्लंडमधील ‘द मूरकॉक’खटला प्रसिद्ध आहे (खंड १४-प्रोबेट डिव्हिझन पृ. ६४-१८८९). वादीने प्रतिवादीशी केलेल्या कराराप्रमाणे वादीला आपल्या बोटीवरील माल प्रतिवादीच्या धक्क्याशी उतरविण्याची परवानगी होती. बोटीचा आकार पाहता ओहोटीच्या वेळेस बोट जमिनीला खाली टेकेल, हे दोन्ही पक्षांना माहीत होते. ती जमीन सरकारी मालकीची होती. त्या खडबडीत तळामुळे बोटीच्या बुडाला भोके पडली. वादीने नुकसानभरपाईचा दावा करताना बोटीला नुकसान होणारा नाही हे त्यातील अध्याहृत वाचन आहे, अशी न्यायालयाने भूमिका घेतली. म्हणजेच प्रत्यक्ष वचन दिले नसले, तरी ते जणू काही दिलेच होते, असे विधीकल्पित वापरले जाते.

न्यासाच्या कायद्याप्रमाणे न्यासी स्वतःच्या फायद्यासाठी न्यासाचा वापर करू शकत नाही. तसा वापर करून त्याने काही संपत्ती जमा केल्यास ती संपत्तीसुद्धा मुळात न्यासाची नसली, तरी न्यासाचीच समाजली जाते. येथेही अध्याहृत न्यासाचे विधीकल्पित लागू केले जाते. [⟶न्यास].

व्यक्तीच्या बाबतीतही काही विधीकल्पिते मानलेली आहेत. कायद्याने ज्यांचे अस्तित्त्व मान्य केले आहे, अशा व्यक्तींनाच फक्त कायद्याने अधिकार मिळतात. त्यामुळे नैसर्गिक तसेच अनैसर्गिक व्यक्तींना उदा., कंपनी, संस्था इत्यादींना-अधिकार मिळतात. गर्भावस्थेमधील जीवाला काही दुखापत झाल्यास त्याची आई व गर्भ अशा दोघांनाही नुकसानभरपाई मागता येते. गर्भला संपत्तीत अधिकार असतो. म्हणजेच जन्म होण्यापूर्वीहीगर्भास विधीकल्पिताने ‘व्यक्ती’ म्हणून काही उद्देशांपुरती मान्यता दिलेली असते. तसेच देवालयातील मूर्तींनाही विधीकल्पित वापरून व्यक्तीची दर्जा दिला जातो.

सामन्यपणे कायदा प्रगतिशील बनविण्यासाठी विधीकल्पिताचा वापर करण्यात येतो. तसेच सोय व कल्याण पाहणे हाही त्याचा उद्देश असतो अनेकदा हे खोटे ठरते. उदा., गुलामगिरी अस्तित्त्वात असताना नैसर्गिक व्यक्ती असूनही विधीकल्पिताने गुलामास व्यक्तीचा दर्जा नाकारला. गुलामाला विकून टाकणे, जिवे मारणे, गुलाम स्त्रीवर बलात्कार करणे हे अधिकार मालकाला होते. न्याय मिळविण्यासाठी गुलाम कायद्याकडे जाऊ शकत नसे, कारण त्यास कायद्याने व्यक्तीचा दर्जा नाकारला होता. [⟶दास्य].

अनेक विधीपद्धतींमध्ये विवाहीत स्त्रीलाही काही बाबतींत स्वतंत्र व्यक्ती म्हणून दर्जा नसे. पतीच्या संमतिशिवाय ती संपत्ती विकूनसे. शकत म्हणजेच विधीप्रक्रियेसाठी एखादी गोष्ट प्रत्यक्षात नसतानाही ती तशी आहे असे मानणे, हे विधीकल्पिताने शक्य होते. तसेच एखादी गोष्ट प्रत्यक्षात असूनही ती तशी नाही, असे मानणे हेही विधीकल्पितानेच शक्य होते.

संदर्भ:1. Maine, Sir Henry James Sumner, Ancient Law, London, 1959.

    2. Pound, Roscose, Jurisprudence, Vol.lll, part V, London, 1959.

धागमवार, वसुधा जोशी, वैजयंती