विद्यार्थी, ललित प्रसाद : (१५ फेब्रुवारी १९३१-१ डिसेंबर १९८५). प्रसिद्ध भारतीय मानवशास्त्रज्ञ तसेच मानवजातिवर्णन-शाखेचे विशेष अभ्यासक. त्यांचा जन्म बिहार राज्यातीलबरीयारपूर (जि. पाटणा) या गावी सधन मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. त्यांच्या आईचे नाव सीता व वडिलांचे नाव अयोध्या प्रसाद असे होते. त्यांच्या पत्नीचे नाव लक्ष्मी असे असून त्यांना दोन मुलगे व दोन मुली, अशी चार अपत्ये होती. शालेय व महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केल्यावर १९५३ मध्ये अधिव्याख्याता म्हणून विद्यार्थी यांच्या अध्यापनविषयक कारकीर्दीस प्रारंभ झाला. १९५६-५८ च्या दरम्यान शिकागो विद्यापीठात पूर्णवेळ संशोधक व अधिव्याख्याता म्हणून त्यांनी काम केले व तेथूनच पीएच्. डी. ही पदवी मिळवली (१९५८). त्याच वर्षी बिहार राज्याच्या रांची विद्यापीठातील मानवशास्त्र विभागात प्राध्यापक व विभागप्रमुख म्हणून त्यांची नियुक्ती झाली आयुष्याच्या अखेरपर्यंत त्यांनी तेथेच काम केले.
आपल्या अध्यापन-संशोधन कारकीर्दीच्या सु. तीन दशकांच्या कालावधीत त्यांच्या सु. ३० च्या वर विद्यार्थ्यांनी पीएच्. डी. व डॉक्टर ऑफ लेटर्स (डी. लिट्.) यांसाठी यशस्वीपणे संशोधन पूर्ण केले. त्यांनी शिकवलेल्या पदव्युत्तर पातळीच्या विद्यार्थ्यांची संख्याही याच्या कितीतरी पट अधिक आहे. त्यांनी चोविसांवर ग्रंथांचे लेखन, छत्तिसांवर ग्रंथांचे संपादन तसेच सु. १५० शोधनिबंध लिहिले. त्यांचे प्रमुख ग्रंथ पुढीलप्रमाणे : सेक्रिड कॉम्प्लेक्स इन हिंदू गया (१९६१), द मालेर : नेचर-मॅन-स्पिरिट कॉम्लेप्स इन अ हिल ट्राइब ऑफ बिहार (१९६३), कल्चरल काँटुअर्स ऑफ ट्राइबल बिहार (१९६४), ट्राइबल कल्चर ऑफ इंडिया (१९७७), राइझ ऑफ अँथ्रोपॉलॉजी इन इंडिया (दोन खंड, १९७८), राइझ ऑफ वर्ल्ड अँथ्रोपॉलॉजी (१९७९). टेन्डस इन वर्ल्ड अँथ्रोपॉलॉजी (१९७९), द खारीया देन अँड नाऊ (१९८०), ॲप्लाइड अँथ्रोपॉलॉजी अँड डिव्हेलपमेंट इन इंडिया (१९८०), रिसर्च मेथड्स इन सोशल सायन्स इन इंडिया (१९८५). यांशिवाय सोशल सायन्स रिसर्च व द इंडियन अँथ्रोपॉलॉजिस्ट या शास्त्रीय नियतकालिकांचे ते प्रवर्तक व संपादक होते.
विद्यार्थी यांचा सांस्कृतिक-सामाजिक मानवशास्त्र या शाखेमध्ये सखोल व्यासंग व तज्ज्ञ या नात्याने विशेष अधिकार होता तर आदिवासी-जातिवर्णन, ग्रामीण अभ्यास व नागरीकरण या विषयांमध्ये त्यांना खास रुची होती. शिवाय भारताच्या मुख्य भूमीवरील, तसेच अंदमान-निकोबार द्वीपसमूहामधील, आदिवासी संस्कृतीवरही त्यांनी खूप संशोधन व लिखाण केले आहे. कार्यात्मक (फंक्शनल) मानवशास्त्र, भारतीय संस्कृतीचा इतिहास, लोकसाहित्य, लोकविद्या इ. विषयांवरही त्यांनी चौफेर लिखाण केले आहे. ‘ब्रिटिश स्कूल ऑफ अँथ्रोपॉलॉजी’च्या ⇨ ब्रॉनीस्लॉ कास्पेर मॅलिनोस्की (१८८४-१९४२) व ⇨रॉबर्ट रेडफीवल्ड (१८९७-१९५८) या मानवशास्त्रज्ञांच्या विचारसरणीतील ते एक समजले जातात. रॉबर्ट रेडफील्ड यांच्या कार्याचाही पगडा त्यांच्यावर होता व त्याचे प्रतिबिंब त्यांच्या लिखाणात प्रकर्षाने दिसून येते. द मालेर : नेचर-मॅन-स्पिरिट कॉम्प्लेक्स इन अ हिल ट्राइब ऑफ बिहार या संशोधनपर ग्रंथाद्वारा आदिवासींच्या अभ्यासपद्धतीचे नवीन पैलू विद्यार्थी यांनी उजेडात आणले. त्यात मालेर या आदिवासी जमातीचा, मानवाच्या निसर्गाशी असलेल्या अतूट नात्याच्या संदर्भात, विशेष अभ्यास करून त्यांनी एक नवीनच विचारप्रवर्तक संकल्पना मांडली.
अध्यापनक्षेत्रात काम करीत असताना विद्यार्थी यांना विविध प्रकारचे मानसन्मान, तसेच अनेकविध संस्था-परिषदा यांची अध्यक्ष-उपाध्यक्ष पदे लाभली. ‘भारतीय विज्ञान परिषद संस्थे’च्या मानवशास्त्र शाखेचे अध्यक्ष (१९६७-६८) ‘आंतरराष्ट्रीय मानवशास्त्र व मानवजातिविज्ञान’ आणि ‘भारतीय मानवशास्त्र संस्था’ या दोन मान्यवर संस्थांचे अध्यक्ष (१९७३-७८) म्हणून त्यांचे कार्य उल्लेखनीय आहे. ‘भारतीय सामाजिक विज्ञान संशोधन संस्थे’ चे संस्थापक व सदस्यत्व, ‘इंडो-कॅनडियन शास्त्री इन्स्टिट्यूट’चे त्याचप्रमाणे केंद्रीय गृहखात्याच्या अखत्याराखालील ‘केंद्रीय जमात संशोधन संस्थाविषयक परिषदे’चे सदस्यत्व त्यांना मिळाले होते. यूनेस्कोच्या ‘आंतरराष्ट्रीय समाजविज्ञान परिषदे’चे ते उपाध्यक्ष होते (१९८०-८२) तर यूनेस्कोच्याच इंटरनॅशल जर्मल ऑफ एशियन स्टडीज या नियतकालिकाचे संपादकपदही त्यांनी भूषविले होते. १९८३ मध्ये ‘असोसिएशन फॉर अँथ्रोपॉलॉजिकल डिप्लोमसी, पॉलिटिक्स अँड सोसायटी’ या जागतिक परिषदेने प्राध्यापक, लेखक, संपादक, संशोधक, प्रशासक अशा विविध क्षेत्रांत विद्यार्थी यानी बजावलेल्या कार्याबद्दल विशेष पारितोषिक देऊन त्यांना गौरविले होते. भारतात व भारताबाहेरही मानवशास्त्राच्या अनेक प्रवर्तकांमध्ये विद्यार्थी यांचे स्थान महत्त्वपूर्ण आहे. मानवशास्त्र विषयातील एकमेव प्रगत अध्ययन व अध्यापन केंद्र केवळ रांची विद्यापीठातच असून, त्याला गुरुकुलाचा दर्जा प्राप्त करून देण्याचे महत्त्वाचे कार्य विद्यार्थी यांनी पार पाडले.
आयुष्याच्या अखेरची काही वर्षे विद्यार्थी ह्यांना आजारपणाने मोठ्या प्रमाणात ग्रासले होते. जून १९८५ मधील त्यांची शिलाँगची भेट ही अखेरचीच ठरली. स्वतः आजारी असूनही, विशेषतः आदिवासी लोकांच्या गाठीभेटी घेणे, अभ्यासगटांशी चर्चा करणे, क्षेत्राभ्यास-प्रकल्प पार पाडणे इत्यादींमध्ये त्यांचा विशेष सहभाग होता. त्यामुळे प्रसंगी स्वतःच्या कुटुंबाकडेही त्यांचे दुर्लक्ष झाले. अतिश्रम, सततचे दौरे आणि संशोधन यांमुळे त्यांचे व्याधी अधिकच बळावली. ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यांत ते अंथरूणाला खिळले आणि त्यातच त्यांचे रांची येथे देहावसान झाले.
कुलकर्णी, वि. श्री.