विटी दांडू: मुलांचा एक देशी खेळ. शहरांपेक्षा खेडोपाडी तो जास्त प्रचारात आहे. त्यात व्यायाम व मनोरंजन यांचा योग्य समन्वय साधला जातो. हा खेळ काटेकोर नियमांनी बांधलेला नाही परंतु त्यात काही एक नियमबद्धता पाळल्यास वैयक्तिक व सांघिक गुण दाखविण्यास पुष्कळ वाव आहे. हा खेळ प्राचीन काळापासून प्रचलित असल्याचे उल्लेख आढळतात. महाभारताच्या आदिपूर्व त्याचा निर्देश आला आहे. यादव विटीदांडू : विटी कोलण्याची क्रिया.काळातील खेळाचे वर्णन लीळाचरित्रात आहे. ज्ञानेश्वर, एकनाथ, तुकाराम, मुक्तेश्वर आदींनी या खेळाचे उल्लेख केले आहेत.  

भारतात हा खेळ सर्वत्र खेळला जातो. आंध्र प्रदेश, गुजरात, महाराष्ट्र या राज्यांत तो विशेष लोकप्रिय आहे. उत्तर भारतात ‘गुल्ली (गिल्ली) डंडा’ या नावाने तो खेळला जातो. या खेळाचे अनेक प्रकार आहेत. ‘झवकूपाणी’ या प्रकारातील वकेट, लेंड, मुंड, नाल, आर, वैद हे शब्द तेलगू भाषेतील ओकटी, रेंडू, मुंड, नालगू, आरुं, ऐदू (एक, दोन, तीन, चार, सहा व पाच) या शब्दांचे अपभ्रंश आहेत. त्यामुळे हा खेळ अर्वाचीन काळात प्रथम तेलंगणातून आला असावा, असे वाटते. या खेळाला एक लाकडी विटी (इटी) आणि दांडू इतकेच साहित्य लागते. विटी साधारण २ ते ५ इंचाच्या (५ ते १३ सेंमी.) दरम्यान लांब आणि १ ते १ / इंच (सु.३ सेंमी.) व्यासाची आणि दोन्ही बाजूंना निमुळती टोकदार असते. दांडू मुठीत धरता येईल इतका-म्हणजे सु. १ / इंच (सु. ३ सेंमी.) व्यासाची आणि दोन्ही बाजूंना निमुळती टोकदार असते. दांडू मुठीत धरता येईल इतका-म्हणजे सु. १ / इंच (४ सेंमी.) व्यासाचा व सु. १ / फुट लांब (४५ सेंमी.)-असून, त्याचे एक टोक तासून चपटे वा टोकदार केलेले असते. खेळाआधी सु. ३ × १ / इंच (८ × ४ सेंमी.) आकाराची व टोकांना निमुळती अशी जमिनीत एक खोलगट खाच करतात, तिला ‘गली’ (किंवा गुजराती भाषेत ‘बदी’) असे म्हणतात. या गलीवर विटी आडवी किंवा उभी ठेवून आणि तिच्या मागे दांडू टेकवून खेळाडू ओणवा होऊन ती विटी कोलतो. हाताने जोर देऊन किंवा दांडूला पायाने धक्का मारून विटी दूर उडवितात, म्हणजे कोलतात. कोललेली विटी झेलण्यासाठी गलीसमोर उभ्या असलेल्या खेळाडूने ती झेलली, तर खेळणाराचा डाव जातो. त्यानंतर ज्याची पाळी असेल, तो खेळाडू खेळतो. त्याने विटी जवळ कोलली, तर विटी पडली तेथून गलीवर उडी मारून त्याला बाद करता येते. ‘लाल इटीदांडू’ या प्रकारात खेळणाऱ्या संघाने प्रारंभी विटी गलीच्या टोकावर ठेवून ती दांड्याने वर उडवून ती खाली पडण्यापूर्वी दांडूने पुन्हा उडवावी, ती जेथे पडेले तेथून परत उडवावी व टोला मारावा, असे तीन वेळा टोले मारतात. ती मारण्याला गैरसोयीच्या जागी पडलेली असेल, तर चार-पाच फुटांच्या अंतरात ती उचलून दुसऱ्या सोयीस्कर जागी टाकण्याचा खेळाडूला अधिकार असला, तरी त्यासाठी त्याला एक टोला गमवावा लागतो. गलीपासून विटीच्या तिसऱ्या टोल्याच्या अखेरच्या अंतरावर जेवढे दांडू भरतील, तेवढे गुण खेळणाराला अंदाजाने मागून मिळविता येतात. हा अंदाज चुकला, तर डाव जातो परंतु मोजणीत जास्त दांडू भरले, तर तितके गुण खेळाडूला मिळतात. ज्या संघाचे गुण जास्त तो संघ जिंकतो किंवा दोन्ही संघांची विशिष्ट संख्येची (उदा., १००/२००/५००) एक ‘कावड’ असते. ती संख्या जो संघ प्रथम पुरी करतो, तो विजयी ठरतो. विजयी संघातील प्रत्येकजण तीन टोले मारून विटी दूर उडवतो आणि पराभूत संघातील प्रत्येक खेळाडू विटीपासून गलीपर्यंत लंगडी घालून कावड पुरी करतो. दुसराही एक प्रकार-‘आबक-दुबक’-यातएकेका खेळाडूचे किती गुण होतात, ही चुरस असते. यात प्रत्यक्ष खेळणारा व इतर असे दोन भाग पडतात. खेळणाराने कोललेली विटी इतर खेळाडूंनी झेलावयाचा प्रयत्न करावयाचा जर झेलली, तर तो बाद होतो व इतरांत सामील होतो. कोललेली विटी झेलली नाही, तर खेळाडूने आपला दांडू गलीवर काटकोनात आडवा ठेवावयाचा किंवा गलीवर हाताने उभा धरावयाचा. प्रतिपक्षाच्या खेळाडूंपैकी एकाने विटीने नेम मारावयाचा, तो लागला, तर खेळणारा बाद होतो परंतु नेम चुकला तर विटी जेथे पडली असेल, तेथे जाऊन खेळणारा विटीच्या एका टोकावर दांडू मारून ती वर उडवितो आणि टोला मारतो. म्हणजे हा एकाच टोल्याचा खेळ असतो. खेळाडू आपला दांडू गलीपासून साधारण एक फुटावर आडवा ठेवतो. ज्या जागेवर विटी पडली असेल तेथून पुन्हा दांडूला नेम मारावयाचा तो लागला, तर खेळाडू बाद होतो. नेम चुकला, तर विटी ज्या अंतरावर पडली असेल, तेथून ती उडवून तो पुन्हा टोला मारतो. टोला चुकेपर्यंत किंवा दांडूला नेम लागेपर्यंत त्याचा खेळ चालू राहतो. जास्त खेळाडू असल्यास दोन गट पाडूनही हा डाव खेळतात.

संदर्भ : १. अखिल महाराष्ट्र शारीरिक शिक्षण मंडळ, लंगडी, लगोऱ्या, विटीदांडू या खेळांचे नियम, पुणे, १९५८.

          २. मुजुमदार, द. चिं. संपा, व्यायामज्ञानकोश, खंड पहिला, बडोदे, १९३६.

गोखले, श्री. पु.