विठ्ठल बीडकर: (सु. १६२८-१६९०). मराठी कवी. संपूर्ण नाव विठ्ठल अनंत क्षीरसागर, विठ्ठलकवी, विठ्ठल चित्रकवी, विठ्ठलदास अशा वेगवेगळ्या नावांनी हा ओळखला जातो. बीड जवळच्या गौरीपूर गावात राहणारा म्हणून विठ्ठल बीडकर कमला-शारदा-संवाद (८१ श्वोक) ह्या काव्यामध्ये गोदावरीच्या तीरावरील श्रीपूर (शट्टागा) येथे त्याचे वास्तव्य असल्याचा निर्देश आढळतो. विठ्ठल व्यापारी होता. पंढरपूरचा विठोबा हे त्याचे उपास्य दैवत असल्याने दर वर्षी तो पंढरीच्या वारीला जात असे. त्याच्या काव्यामध्ये काही ठिकाणी त्याने स्वतःचा उल्लेख ‘विठ्ठलदास’ असा केला आहे.

रुक्मिणीस्वयंवर (१६७४), पांचालीस्तवन (१६७४), सीतास्वयंवर (१६७७), रसमंजरी (१६७९), द्रोपदीवस्त्रहरण (१६८०), विद्वज्जीवन, बिल्हणचरित्र आणि उपर्युक्त कमला-शारदा-संवाद हे विठ्ठलाचे आठ उल्लेखनीय काव्यग्रंथ. त्याने काही स्फुट पदेही रचली आहेत. बिल्हणचरित्राखेरीज आपल्या सर्व ग्रंथांवर तो आपली माहिती-उदा., नाव राहण्याचे ठिकाण, तसेच संबंधित ग्रंथाची पद्य संख्या इ.-देतो. संस्कृतातील महाकाव्यरचनेचा आदर्श समोर ठेवून विठ्ठलाने रुक्मिणीस्वयंवर आणि सीतास्वयंवर ही काव्ये रचलि. रुक्मिणीस्वयंवरावर (एकूण सर्ग ७, श्लोकसंख्या ३५३) एकनाथांच्या भावार्थ रामायणाचा व रुक्मिणीस्वयंवराचा प्रभाव दिसून येतो. विठ्ठलाच्या ह्या काव्यात कलात्मकतेपेक्षा रचनाचातुर्य व शब्दांची कसरतच अधिक दिसून येते. वेगवेगळी वृत्ते (पद्याच्या शेवटी गोवण्यात येणारे वृत्तनाम आणि मत्तमयूर ह्या क्वचित वापरल्या जाणाऱ्या वृत्ताचा वापर ही त्याची आणखी काही वैशिष्ट्ये), चित्रबंध, चमत्कृतिपूर्ण यमके, अनुप्रास इत्यादींची रेलचेल ह्या काव्यात आढळते. प्रतिलोम यमकही त्याने साधले आहे. सीतास्वयंवरामध्ये (एकूण सर्ग ७, श्लोकसंख्या ३६३) रुक्मिणीस्वयंवरातील अनेक शब्द व चरण पुन्हा तसेच आले आहेत. हनुमन्नाटक, रघुवंश, वाल्मिकि रामायण ह्यांचा, तसेच काही प्राकृत कवींच्या काव्यकृतींचा आधार विठ्ठलाने ह्या काव्याच्या रचनेसाठी घेतला आहे. रसमंजरी हे भानुदत्त ह्या मैथिली ग्रंथकाराच्या एका संस्कृत साहित्यशास्त्रीय ग्रंथाचे मराठी भाषांतर होय. पांचालीस्तवन (द्रौपदीचा धावा) हे विठ्ठलाचे २३ श्लोकांचे, शिखरिणी वृत्तात लिहिलेले काव्य होय. त्यानंतर त्याने लिहिलेल्या द्रौपदीवस्त्रहरणात पांचालीस्तवनातील चरण आढाळतात. भागवताच्या दहाव्या स्कंधातील कृष्णकथेच्या आधारे लिहिलेले विद्वज्जीवन (उल्लास ७, श्लोकसंख्या २६५) हे त्याचे काव्य केवळ विद्वानांसाठी रचलेले आहे. बिल्हणचरित्र हे काश्मीरी कवी बिल्हणाच्या चौरपंचासिका ह्या संस्कृत काव्याचे भाषांतर होय. वसंततिलका ह्या वृत्तात केलेल्या ह्या पद्यमय भाषांतरात कवी बिल्हण व एक राजकन्या शशिकला ह्यांच्या प्रेमाची व विवाहाची कथा आहे. ह्या काव्यात ‘विठ्ठल’ ह्या नावाखेरीज त्याने स्वतःची अन्य माहिती दिलेली नाही. त्यामुळे हाच विठ्ठल त्याचा कर्ता असावा किंवा कसे ह्याबद्दल काही अभ्यासक शंका व्यक्त करतात. कमला-शारदा-संवाद ह्या विठ्ठलाच्या ग्रंथात लक्ष्मी व शारदा यांचा वाद दाखविला आहे.

विविध वृत्ते, निरनिराळे चित्रबंध, चमत्कृतिपूर्ण यमके, तसेच अनुप्रास, श्लेष इ. अलंकारांची योजकता ही विठ्ठलाच्या काव्यरचनेचीप्रमुख वैशिष्ट्ये असली, तरी भावोत्कटता, कल्पकता, स्वतंत्र विचार इत्यादींचे दर्शन त्याच्या काव्यात होत नाही. रसनिर्मितीपेक्षा रचनाचमत्कृतीसाठीच त्याचे काव्य लक्षणीय ठरते. मराठीत चित्रबंधात्मक रचना करण्याचा पहिला मान त्याचाच असावा. संस्कृतातील विविध वृत्ते त्याने मराठीत आणली.

पोळ, मनीषा