विजयन् , ओ. व्ही.: (२ जुलै १९३१− ). आधुनिक मलयाळम् लेखक. पूर्ण नाव ओट्टुपुळक्कळ वेलुकुट्टी. जन्म केरळमधील ओट्टपालमनजीक मणकारा येथे. मद्रास विद्यापीठाची इंग्रजी साहित्यविषयक एम्. ए. ची पदवी (१९५४) घेऊन त्यांनी प्रारंभी अधिव्याख्याता म्हणून अध्यापन केले (१९५१−५७). नंतर शंकर्स वीक्ली साप्ताहिकात व्यंग्यचित्रकार व स्तंभलेखक म्हणून त्यांनी काम केले (१९५८−६३). त्यानंतर त्याच सुमारास नव्याने सुरू झालेल्या द पॅट्रियट या इंग्लिश दैनिकात व्यंग्यचित्रकार म्हणून त्यांनी नोकरी केली. १९६७ पासून त्यांनी मुक्त पत्रकारितेचा व्यवसाय करून अनेक इंग्रजी व मलयाळम् नियतकालिकांना लेख व व्यंग्यचित्रे पुरवली. खसककिन्से इतिहासम् (१९६९, इं. शी. ‘द एपिक ऑफ खसक’) या त्यांच्या कादंबरीने त्यांना दिगंत कीर्ती मिळवून दिली. आशय, तंत्र, मांडणी या सर्वच दृष्टींनी ही कादंबरी आधुनिक होती. या कादंबरीचा नायक, किंबहूना ननायक रवी हा चिंतनशील वृत्तीचा सुशिक्षित तरूण मानवी नात्यांतील गृढ व खोल संबंधांचा, तसेच मानवी अस्तित्वाच्या मुळांचा शोध घेऊ पाहतो. अगम्य आप्तसंभोगाच्या पापभावनेने पछाडलेल्या हा तरूण खसक नावाच्या एका काल्पनिक खेड्यात जाऊन राहतो व तिथल्या एकशिक्षकी शाळेत शिक्षकाची नोकरी धरतो. खसक खेड्याच्या चित्रणात लेखकाने मिथ्य व वास्तव यांचा एक अपूर्व समन्वय साधला आहे. या खेड्यात नानाविध जाति-धर्माचे व भिन्नभिन्न वृत्तिप्रवृत्तींचे अनेक लोक एकत्र राहतात, तसेच सुरस व चमत्कारिक आख्यायिकांविषयी हे खेडे प्रसिद्ध आहे. एका रोगाच्या साथीत या खेड्यातील हजारो माणसे दगावतात. तोवर विलासी व भोगवादी जीवन जगत असलेला रवी या घटनेने कमालीचा वैफल्यग्रस्त होतो व ते खेडे सोडून जाण्याचा निर्णय घेतो. अखेर बसस्टॉपवर बसची प्रतीक्षा करीत असतानाच सर्पदंशाने त्याचा मृत्यू होतो. त्याने स्वेच्छा पतकरलेले हे मग्ण म्हणजे एका परीने त्याची आत्महत्याच आहे, असे लेखकाने सूचित केले आहे. जीवनप्रमाणेच मृत्यूचाही तो एका तटस्थ, अलिप्त भावनेने स्वीकार करतो. ही तटस्थता भोवतालच्या दैनंदिन धकाधकीच्या जीवनात तशी दुर्मीळच म्हणावी लागेल. या कादंबरीचे वैशिष्ट्य म्हणजे त्यातील पार्थिव जग व भेसूर विक्षिप्त कल्पनाविश्व, वास्तव व अतिवास्तव, गंभीर व हास्यस्पद या घटकांचे चमत्कृतिपूर्ण मिश्रण होय. रूपकाश्रयी शैलीवैशिष्ट्यांमुळेही ही कादंबरी लक्षणीय ठरली. अल्पावधीतच तिच्या चार आवृत्या निघाल्या आणि तिला ओडक्कुझळ व एसपीसीएस्. ही पारितोषिक लाभली. विजयन् यांची धर्मपुराणम् (१९८५) ही कादंबरीही वैशिष्ट्यपूर्ण आहे. सर्वं कष सत्तेच्या भयावह अमानुष प्रदर्शनावर या कादंबरीत प्रखर टीका आहे. त्यातील ओंगळ, बीभत्स वर्णनांबद्दल कादंबरीवर टीकाही झाली. पण लेखकाच्या मते, स्वातंत्र्योत्तरकालीन राजकीय परिस्थितीचे वर्णन केवळ याच भाषेत होऊ शकते, म्हणून भाषेचे शिष्ठमान्य संकेत या कादंबरीत लेखकाने जाणीवपूर्वक धुडकावून लावले आहेत. या कादंबरीचे इंग्रजी भाषांतर खुद्द लेखकानेच द सागा ऑफ धर्मपुरी (१९८८) या शीर्षकाने केले. १९९० मध्ये विजयन यांना गुरुसागरम् या त्यांच्या कादंबरीसाठी केरळ साहित्य अकादेमीचे व साहित्य अकादेमीचे अशी पारितेषिके लाभली. मानवी मनोविश्वाची आध्यात्मिक शोधयात्रा लेखकाने या कादंबरीत घडवली आहे. विजयन् यांनी आपल्या कथांतूनही सूक्ष्म व विविध अशा मानवी मनोव्यापारांचा वेध घेतला आहे. या कथांचे रचनासौष्ठवही लक्षणीय आहे. लेखकाने स्वतःच्या काही कथा इंग्रजीत अनुवादिल्या असून, त्यांचा संग्रह आफ्टर हाँगिंग अँड अदर स्टोरीज या शीर्षकाने प्रकाशित झाला आहे(पेंग्विन, इंडिया, १९८९). त्याला साहित्य अकादेमीचे इंगजी अनुवादाचे पारीतोषिकही मिळाले (१९९१). विजयन् यांची ‘पारकळ’ (१९७०, इं. शी. ‘रॉक्स’) ही कथा विशेष उल्लेखनीय आहे. या कथेत मानवजातीचा शेवट सूचित केला आहे. युद्वखोर राष्ट्रे अण्वस्त्रांचा वापर करून पृथ्वीवरचे मानवी जीवन नष्ट करू पाहतात. खडक हे भूमातेचे प्रतीक कल्पिले आहे. अखेर मृगांकमोहन हा पुरूष व तानवान ही स्त्री हे युघ्यमान राष्ट्रांमधले दोनच नागरिक जिवंत उरतात. ते सृष्टीच्या आद्यारंभीच्या आदम आणि ईव्ह यांची आठवण करून देतात. त्याने युद्धात आपली तीन वर्षाची मुलगी, तर तिने आपला चेन नावाचा मुलगा गमावला आहे. त्यामुळे अत्यंत शोकाकूल मनःस्थितीत ते एकत्र येतात पण मूल न होऊ देण्याचा निर्णय घेतात. कारण पृथ्वीवर नवा जीव जन्माला घालणेहे पाप असल्याची त्यांची भावना होते. जीवन हे जिथे सतत विनाशाच्या खाईत लोटले जाते, तिथे निर्मिती निरर्थकच ठरते. अखेर ते दोघे मृत्यूला सामोरे जातात. प्रतीकात्मकता, समृद्ध आवाहक प्रतिमा व सूचक काव्यात्म शैली यांच्या परिणामकारक उपयोजनातून लेखकाने या कथेद्वारे आधुनिक जगाची नवी मिथ्य निर्माण केली आहे. विजयन् यांनी इरिंगलकुडा (१९६७) हे प्रवासवर्णनही लिहिले. केरळमधील या छोट्या खेड्याचे वर्णन त्यांनी उत्तर ध्रुवावरच्या एखाद्या अज्ञात प्रदेशाला भेट द्यावी तशा थाटात विनोदी, व्यंग्यात्म व उपरोधप्रचुर शैलीत केले आहे. नवसाहित्याचा प्रणेता म्हणून त्यांचे स्थान मलयाळम् साहित्यात महत्त्वाचे आहे.
इनामदार, श्री. दे.