विग्‌मान, मेरी : (१३ नोव्हेंबर १८८६−१८ सप्टेंबर १९७३). जर्मन नर्तकी, नृत्यशिक्षिका व नृत्यालेखिक. हॅनोव्हर येथे जन्म. एमिल झाक् डॅलक्रॉझ व रूडाल्फ व्हॉन लेबन यांच्याकडे तिने नृत्याचे शिक्षण घेतले. १९१० मध्ये तिने आपला पहिला जाहीर नृत्यप्रयोग सादर केला. १९१४ मध्ये लेबनची साहाय्यक म्हणून काही काळ तिने त्याच्या झुरिकमधील नृत्यविद्यालयात अध्यापन केले. स्वित्झर्लंडमध्ये तिने आपल्या स्वतंत्र नृत्यरचना बांधण्यास सुरुवात केली. १९२० मध्ये तिने ड्रेझ्डेनमध्ये ‘विग्‌मान सेंट्रल इन्स्टिट्यूट’ या आपल्या नृत्यशिक्षणसंस्थेच स्थापना केली. या ठिकाणी तिने विपुल एकव्यक्तिनृत्ये व समूहनृत्ये यांची मालिकाच निर्माण केली. सुरुवातील ही नृत्ये धक्कादायक व वादग्रस्त ठरली, तरी कालांतराने रसिकमान्य झाली. विग्‌मानने युद्ध, विनाश, मानवी दुष्प्रवृत्ती अशा आशयाची अनेक नृत्ये रचली. जरी तिने आपल्या नृत्यरचनांतून प्रेम, सुख असे विषय हाताळले असले, तरी त्यांचे स्वरूप प्रायः गंभीरच आहे. ती तत्कालीन प्रेक्षकवर्गाला रूचणारी आनंदी, हलकीफुलकी, भपकेबाज व परीकथासदृश अशी बॅले नृत्ये नव्हती. या पार्श्वभूमीवर तिच्या ⇨नृत्यालेखनाचे (कॉरिओग्राफी) वेगळेपण नजरेत भरते. नृत्य हे केवळ सौंदर्यपूर्ण असण्यापेक्षा ते अभिव्यक्तिक्षम असले पाहिजे व त्यातून मानवी जीवनाचा काही आशय व्यक्त झाला पाहिजे, अशी तिची भूमिका होती. बॅले नृत्याच्या गिरकीवजा, फिरत्या व प्रवाही पदन्यासांच्या लयबंधांतून फक्त नाजुक, कोमल व हर्षोत्फुल्ल भावभावनाच प्रकट होऊ शकतात, अशी तिची धारणा होती. पण तिला नृत्यातून प्रक्षुब्ध व शोकात्म भाव प्रकट करावयाचे असल्याने तिने बसवलेल्या नृत्यात्म हालचाली हिंस्त्र, प्रक्षोभक, तुटकतुटक व कोनात्मक टोकदार (वळसेदार असण्याऐवजी) अशा प्रकारच्या होत्या. ह्या नृत्यांसाठी वापरण्यात आलेले संगीतही मधुर व सुश्राव्य असण्यापेक्षा उग्र  काहीसे कर्कशच होते आणि त्यात ढोल, झांजा व तास अशा आधातवाद्यांचा वापर केला जात असे. या वाद्यांच्या कर्कश तालावर विग्‌मान आपली नृत्ये बसवत असे. विग्‌मानच्या प्रमुख व गाजलेल्या नृत्यकृतींमध्ये द सेव्हन डान्सेस ऑफ लाइफ (१९१८), टोटेन्माल (१९३०), ऑर्फियस अँड यूरिडिसी हा ऑपेरा (१९४७), Lesacre du printemps ही बर्लिन महोत्सवासाठी तयार केलेली नृत्यरचना (१९५७) आदींचा अंतर्भाव होतो. विग्मानने न्यूयॉर्कमध्ये १९३० साली आपले नृत्यप्रयोग प्रथमतः सादर केले. १९३१ मध्ये न्यूयॉर्क शहरात ‘विग्‌मान स्कूल’ या नृत्यसंस्थेची स्थापना केली. विग्‌मानची शिष्य नर्तकी हन्या होल्मच्या दिग्दर्शनाखाली ही संस्था चालू झाली व पुढे १९३६ मध्ये या संस्थेचे रूपांतर ‘हन्य होल्म स्कूल’ मध्ये झाले. विग्‌मानने अनेक वर्षे आपल्या नृत्यसंचासमवेत देशोदेशी दौरे केले. प्रत्येक ठिकाणी तिची नृत्ये त्यांतील तांत्रिक नावीन्य व मानवतावादी सामाजिक आशय यांमुळे प्रशंसनीय ठरली. दुसऱ्या महायुद्धकाळात जर्मनानी विग्‌मानला तिच्या लाइपसिकमधील नृत्यविद्यालयातच राहून तिने बॅलेचे शिक्षण द्यावे, असे निर्बंध घातले. १९५० मध्ये तिने डायलेम या बर्लिनच्या उपनगरात नवे नृत्यविद्यालय स्थापन केले. तिने लिहिलेले Die sprache des Tanzes (इं. शी. द स्पीच ऑफ डान्स) हे नृत्यविषयक पुस्तक १९६३ मध्ये प्रकाशित झाले. प. बर्लिनमध्ये तिचे निधन झाले.

इनामदार, श्री. दे.