विक्रियाकारक : ज्यांच्या इतर रसायनांबरोबरच्या विक्रिया वैश्लेषिक रसायनशास्त्रात उपयुक्त असतात, अशा अतिशय शुद्ध रसायनांना विक्रियाकारक म्हणतात. विक्रियाकारकांच्या या अशा विक्रियांमुळे प्रयोगशाळेत अन्य द्रव्ये, रसायने किंवा विद्राव ओळखता येतात तसेच त्यांचे मापन व परीक्षण करता येते. विक्रियाकारक घनरूप, द्रवरूप वा वायुरूप असतात. तसेच ते विद्रावाच्या रूपांतही वापरले जातात. विक्रियाकारक उद्योगधंद्यांत तसेच वैद्यकीय क्षेत्रात महत्त्वाचे ठरले आहेत. उदा., सोडियम थायोसल्फेट हा औद्योगिक विक्रियाकारक छायाचित्रांच्या विकाशनासाठी ‘हांयपो’ या नावाने वापरतात तर फेलिंग विद्राव या वैद्यकातील महत्त्वाच्या विक्रियाकारकाच्या मदतीने ग्लुकोज ओळखता येते. काही विक्रियाकारकांमुळे विद्रावात अवक्षेपणाची (घन कण साखा खाली बसण्याची) क्रिया करता येते, तर काहींमुळे रसायने विरघळण्यास मदत होते. वर्णमापनीय विक्रियाकारकांमुळे रंगीत संयुगे बनतात व अभिवाह या विक्रियाकारकांमुळे सहजपणे वितळणारी संयुगे तयार होतात. ⇨ऑक्सिडीभवन व ⇨क्षपण या विक्रियांतही विक्रिया करक सहभागी होतात.
विक्रियाकारक अतिशय शुद्ध असावालागतो व पदार्थाच्या अत्यल्प अंशाचे अस्तित्व निश्चित करण्यासाठी तो अतिशय संवेदनशील असावा लागतो. विक्रियाकारकांच्या शुद्धतेची प्रत ठरविण्यासठी १९०३ व १९१७ साली समित्या नेमल्या होत्या. १९५० पर्यंत सु. १७७ विक्रियाकारकांतील रसायनांच्या शुद्धतेचा तपशील व प्रमाण निश्चित केले होते. विक्रियाकारकातील रसायनांची शुद्धता प्रत्येक देशातील मानताप्रमाणे ठरवितात. सीपी किंवा रासायनिक दृष्ट्या शुद्ध (तांत्रिक प्रतिपेक्षा शुद्ध), एआर किंवा विश्लेषणासाठी योग्य (खास रीतीने शुद्ध केलेले द्रव्य), बीपी (ब्रिटिश औषधिकोशानुसार-फार्माकोपीयानुसार), यूएसपी (यू. एस. औषधिकोशानुसार), एसीएस (अमेरिकन केमिकल सोसायटीच्या मानकांनुसार), आयएसआय (भारतीय मानक संस्थेच्या गरजेनुसार) या विक्रियाकारकांतील रसायनांच्या शुद्धतेच्या काही प्रती आहेत. तांत्रिक किंवा व्यापारी प्रतीची रसायने तेवढी शुद्ध नसतात. त्यामुळे विक्रियाकारक म्हणून ती निरुपयोगी असतात.
अतिशय शुद्ध विक्रियाकारक बनविण्यासाठी स्फटिकीभवन, संप्लवन (घनरूप पादार्थाचे द्रवरूपात रूपांतर न होता एकदम वायुरूपात रूपांतर होण्याची क्रियाउदा., आयोडिन), ऊर्ध्वपातन, संश्लेषण (उदा., शुद्ध कॅल्शियम क्लोराइडच्या विद्रावात शुद्ध अमोनियम कार्बोनेटाचा विद्राव टाकून शुद्ध कॅल्शियम कार्बोनेट मिळविणे) इ. पद्धती पुनःपुन्हा वापरतात.
सहजपणे मिळणाऱ्या, सहजपणे शुद्ध करता येणाऱ्या, तसेच हवेतील पाणी किंवा कार्बन डाय-ऑक्साइड यासारख्या घटकांशी विक्रिया न करणाऱ्या शुद्ध रसायनांचा एक गट असून त्याला ‘मूल मानक विक्रियाकारक’ म्हणतात. या विक्रियाकारकांतील एकूण अशुद्धी ०.०२ टक्क्यांहून कमी असते. मापी विश्लेषणात वापरण्यात येणाऱ्या विद्रावांची संहती (विरघळलेल्या द्रव्याचे प्रमाण) ठरविण्यासाठी अथवा ज्या विक्रियेत अशुद्धीचे प्रमाण अगदी कमी असावे लागते अशा बाबतीत वापरावयाच्या विद्रावांची संहती निश्चित करण्यासाठी हे विक्रियाकारक वापरतात.
धुळीने किंवा अन्य रसायनांमुळे विक्रियाकारक संदूषित होणार नाही अशी काळजी घेतात. वापरताना संदूषित होऊ नये म्हणून तो सरळ ओतून घेतात. कलथ्यासारख्या साधनाने काढून घेत नाहीत. तसेच एकदा मूळ पात्रातून काढून घेतलेला विक्रियाकारक त्यात परत टाकीत नाहीत. उघडून ठेवलेल्या पात्रातील विक्रियाकारकाची शुद्धता राखून ठेवणे हा प्रश्नच असतो.
बऱ्याचदा उपयोगांनुसार विक्रियाकारकांचे वर्गीकरण करतात. ज्या विक्रियाकारकांची इतर अनेक रसायनांशी विक्रिया होऊ शकते, त्यांना सामान्य किंवा गट विक्रियाकारक म्हणतात. (उदा., क्षारकाने एखाद्या अम्लाचे काही प्रमाणात उदासिनीकरण होते, तसेच हायड्रोजन सल्फाइडे अनेक रसायनांबरोबर विक्रियाकारक म्हणून वापरता येतात). काही विक्रियाकारकांची इतर थोड्याच रसायनांबरोबर विक्रिया होऊ शकते, त्यांना विवेचक विक्रियाकारक म्हणतात [उदा., सल्फ्यूरिफ अम्लाने फक्त शिसे, बेरियम व स्ट्राँशियम यांच्या लवणांबरोबर अवक्षेप मिळतो. क्लोराइड, ब्रोमाइड, आयोडाइड, थायोसायनेट व इतर थोड्याच आयनांची (म्हणजे विद्युत् भारित अणू, रेणू वा अणुगटांची) चांदीची लवणे पाण्यात अविद्राव्य (न विरघळणारी) आहेत. यामुळे या आयनांच्या बाबतीत सिल्व्हर नायट्रेट हा विवेचक अवक्षेपक विक्रियाकारक आहे]. काही विक्रियाकारक विशिष्ट परिस्थितीत एकाच आयनाबरोबर विक्रिया करतात, त्यांना विशिष्ट विक्रियाकारक म्हणतात (उदा., अम्ल विद्रावात डायमिथिल ग्लायऑक्झाइम या विक्रियाकारकामुळे फक्त पॅलॅडियम आयनाचा अवक्षेप बनतो). बहुसंख्य अकार्बनी विक्रियाकारक विवेचक असतात, तर बहुतेक विशिष्ट विक्रियाकारक हे कार्बनी स्वरूपांचे असतात.
अशा कार्बनी विक्रियाकारकांत दोन प्रकारचे विक्रियाशील गट असतात. एक गट आपला इलेक्ट्रॉन दुसऱ्याला देऊन विद्युत् भाररहित होतो व यातून विद्युत् संयुजी बंध निर्माण होतो तर दुसऱ्या गटांमुळे इलेक्ट्रॉन वाटून घेतले जातात व सहसंयुजी बंध निर्माण होतो. एकाच आयनापाशी हे दोन्ही बंध असल्याने निर्माण होणारी संयुगे वलयी असतात. त्यांना कीलेट (ग्राम) संयुगे म्हणतात. ही संयुगे बहुतकरून पाण्यात न विरघळणारी व भडक रंगाची असतात. त्यामुळे ती विश्लेषणात फार उपयुक्त ठरतात.
विसाव्या शतकाच्या उत्तरार्धात अकार्बनी संयुगांच्या अभिज्ञानासाठी (ओळखण्यासाठी) कार्बनी संयुगे वापरण्यावर भर देण्यात आला. यातून बरेच चांगले कार्बनी विक्रियाकारक उपलब्ध झाले. ते अत्यंत संवेदनशील असून विवेचकही आहेत. तसेच कार्बनी रेणू व अकार्बनी आयन यांची जटिल (गुंतागुंतीची) संयुगे बनविण्यावर भर देऊन नवे विक्रियाकारक तयार केले आहेत.
पहा : वैश्लेषिक रसायनशास्त्र.
संदर्भ : 1. Fieser, L. Fieser. M. Eds., Fieser and Fieser’s Reagents for Organic Synthesis, Vols. 9 and 10, New York, 1981-82.
2. Fieser, M. Reagents for Organic Synthesis, 8 Vols., New York, 1980.
मिठारी, भू. चिं.