विक्रम विद्यापीठ : मध्य प्रदेश राज्यातील एक विद्यापीठ. उज्जैन येथे स्थापना (१९५७). प्रस्तुत विद्यापिठास ‘उज्जैन विद्यापीठ’ असे नाव देण्यात आले (१९९३). विद्यापीठाचे स्वरूप अध्यापनात्मक व संलग्नक असून उज्जैन, देवास, धार, झाबुआ, मंदसोर, राजगढ, रतलाम, शाजापूर, निमाड जिल्ह्याचा पश्चिम भाग हे ह्या विद्यापीठाच्या कक्षेत येतात. दोन विद्यापीठीय महाविद्यालये, २५ घटक महाविद्यालये, ८३ संलग्न महाविद्यालये तसेच १६ विद्यापीठीय अध्ययन शाळा विद्यापीठकक्षेत मोडतात. यांपैकी ‘सिंदिया ओरिएंटल स्कूल’ मध्ये प्राचीन संस्कृती व पाली भाषेतील हस्तलिखिते जतन करण्यात आली असून तेथे प्राचीन संस्कृती व भाषा आणि प्राच्यविज्ञा या विषयांचे संशोधन करण्याची सोय आहे. १ जुलै ते ३० जून असे विद्यापीठाचे शैक्षणिक वर्ष असून ते जुलै−नोव्हेंबर, डिसेंबर−एप्रिल अशा दोन सत्रांत विभागले आहे. कला, वाणिज्य, सामाजिक विज्ञाने, शिक्षणशास्त्र, विधि, विज्ञान, आयुर्वेद, अभियांत्रिकी, जीवविज्ञान इ. विद्याशाखा विद्यापीठात असून अध्यापनाचे माध्यम इंग्रजी वा हिंदी आहे. मध्य प्रदेश विश्वविद्यालय अधिनियम १९७३ अन्वये ह्या विद्यापीठाचे नियमन केले जाते.

विद्यापीठाच्या कक्षेतील प्रदेशात वास्तव्य करणाऱ्या विद्यार्थ्यांना नियमित विद्यार्थ्यांप्रमाणेच, काही अटींचे पालन करून खाजगी रीत्या परीक्षा (बी.ए., बी. एस्‌सी., बी. कॉम्., एम्. ए., एम्. एस्‌सी (गणित) स्त्रियांसाठी एल्एल्.बी.) देण्याची विद्यापीठात सोय उपलब्ध आहे. मात्र बी.एस्सी. परीक्षेच्या बाबतीत संलग्न महावद्यालयांत नियत प्रात्याक्षिके पूर्ण केल्याचे प्रमाणपत्र सादर करावे लागते. याशिवाय विद्यार्थ्यांसाठी अनेक शिष्यवृत्त्या व विद्यावेतने, वसतिगृहे, आरेग्यसेवा केंद्रे, प्रौढशिक्षण केंद्र, बी. एड्. अभ्यासक्रमासाठी अंतर्गत गुणांकन पद्धती इ. सुविधा विद्यापीठात उपलब्ध असून जर्मन व रशियन भाषांचे एक वर्षांचे पदविका व पदव्युत्तर अभ्यासक्रम तसेच छात्रसेना अभ्यासक्रम विद्यापीठात राबविले जातात.

विधिसभा, कार्यकारी मंडळ, विद्याशाखा, विविध विषयांची अभ्यासमंडळे तसेच विद्वत् व नियोजन मंडळ ही विद्यापीठाची प्रमुख अधिकार मंडळे आहेत. कुलपती, कुलगुरू, कुलसचिव, विद्याशाखाप्रमुख आणि ग्रंथपाल हा प्रमुख अधिकारी आहेत.

विद्यापीठाच्या ग्रंथालयात १,२५,००० ग्रंथ व सु. ६०० नियतकालिके होती (१९९४-९५). सूक्ष्मपट व छायामुद्रण इत्यादींची त्यात सोय आहे. त्याच वर्षी विद्यापीठात ३५,५४९ विद्यार्थी अध्ययन करीत होते. विद्यापीठाचे उत्पन्न २.९१ कोटी रू. खर्च २.४१ कोटी रु. होता. (१९८३-८४).

मिसार, म. व्य.