विकासवाद : एकोणिसाव्या शतकात यूरोपमध्ये ⇨क्रमविकासाचा (उत्क्रांती, विकास) शास्त्रीय दृष्टिकोणातून सांगोपांग अभ्यास सुरू झाला. त्याचा तत्त्वज्ञानाच्या क्षेत्रावर परिणाम होऊन तेथे जे वैचारिक मंथन झाले आणि ज्या तात्त्विक भुमिका घेतल्या गेल्या, त्यांना ‘विकासवाद’ (उत्क्रांतिवाद, एव्हलूशनिझम) अशी संज्ञा देता येईल. आज आपल्या भोवती पसरलेली सजीव सृष्टी २०० ते ३०० कोटी वर्षंपूर्वी निर्माण झालेल्या, अगदी आरंभीच्या जीवांपासून क्रमाने फरक पडून वनलेली आहे हे जीव आरंभीच्या जीवांपासून क्रमाक्रमाने फरक पडून बनलेली आहे हे जीव आरंभी अगदी सूक्ष्म व साधेसुधे होतो परंतु हळूहळू ते अधिक मोठे झाले त्यांची मुळची साधी शरीररचनाही बदलत गेली आणि असे होत होत त्यांना आजचे स्वरूप प्राप्त झाले, असा विचार जीवविज्ञानाच्या क्षेत्रात मांडला जाऊ लागला. फ्रेंच जीववैज्ञानिक ⇨लामार्क (१७४४−१८२९) ह्यांनी ‘संपादित गुणलक्षणांचे अनुहरण’ ही जीवांच्या क्रमविकासाबाबतची आपली उपपत्ती मांडली. जीव आपल्या परिसराशी जुळवून घेण्याचा प्रयत्न करीत असतात ह्या प्रयत्नांतूनच त्यांच्या शरीररचनेत फरक घडून येतात ते त्यांच्या वंशजांत उतरतात पुढेही काही फरकांची भर त्यांच्यात पडत जाते आणि ह्या रीतीने वेगळी जात उत्क्रांत होते, असे लामार्क ह्यांचे म्हणणे होते. पुढे ब्रिटिश जीववैज्ञानिक ⇨चार्ल्स डार्विन (१८०९−८२) ह्यांनी एका जातीतून दुसरी जात कशी उत्क्रांत होते, ह्यासंबंधीची त्यांची उपपत्ती ऑरिजिन ऑफ स्पीशीज…. (१८५९) ह्या त्यांच्या ग्रंथातून मांडली. ती थोडक्यात अशी : जीवांची प्रजा ज्या प्रमाणात वाढत असते, त्या प्रमाणात जीवनावश्यक वस्तूंची वाढ होत नसते. त्यामुळे जागण्यासाठी संघर्ष करावा लागतो आणि त्यात टिकून राहण्यासाठी आपल्या परिसराशी जुळवून घेण्याची क्षमता जीवांपाशी असावी लागते. एखाद्या जातीच्या काही जीवांच्या अवयवांमध्ये वा रचनेमध्ये काही फरक घडून येतात. ते केवळ यदृच्छेनेच घडून येतात परंतु जगण्यासाठी करावयाच्या संघर्षात हे फरक त्या जीवांना उपयुक्त ठरू शकतात. तसे ते ठरल्यास हे जीव टिकून राहतात आणि त्यांच्याच जातीचे अन्य जीव नष्ट होतात. अशा टिकून राहिलेल्या जीवांना जीवनकालहात उपयोगी ठरलेले फरक त्यांच्या वंशजात उतरतात. ह्या प्रक्रियेतून अनेक फरकांची भर त्या जीवांच्या रचनेत पडन जाते. त्यामुळे ही रचना इतकी बदलते, की मूळच्या जातीची जागा एका वेगळ्याच जातीने घेतली आहे, असे म्हणावे लागते. ह्या प्रकारे एका जातीपासून दुसरी जात उत्क्रांत होते. मात्र ही सर्व प्रक्रिया टप्प्याटप्प्याने आणि सावकाश होत असते. [⟶ नैसर्गिक निवड].
डार्विन ह्यांची ही उपपत्ती नीतिनिरपेक्ष आहे. जीवांच्या मनांच्या वा जाणिवेच्या विकासाचाही तीत विचार नाही. उत्क्रांतीच्या वा विकासाच्या मागे कोणतेही उद्दिष्ट नसून एका यांत्रिक प्रक्रियेने ती घडून येते, ती असे ही उपपत्ती सांगते.
लामार्क आणि डार्विन ह्यांच्या उपपत्तींमुळे विकासाच्या विचाराला तत्त्वज्ञानाच्या पातळीवर चालना मिळाली. इंग्रज तत्त्वज्ञ ⇨हर्बर्ट स्पेन्सर (१८२०−१९०३) ह्यांनी डार्विन ह्यांच्याही आधी सोशल स्टॅटिक्स (१८५०) ह्या त्यांच्या ग्रंथातून विकासाची एक उपपत्ती मांडली होती. तथापि तिच्यावर लामार्क ह्यांच्या उपपत्तीचा प्रभाव होता. डार्विन ह्यांचा उपर्युक्त ग्रंथ प्रसिद्ध झाल्यानंतर स्पेन्सर ह्यांनी विकासाचे तत्त्व ज्ञेय विश्वात सर्वत्र कसे लागू करता येते, हे दाखवून देण्याचा प्रयत्न केला. अगदी आरंभीच्या, साध्या रचनेच्या जीवांप्रमाणेच प्रत्येक वस्तूची सुरुवातीची रचना साधी असते तथापि हळूहळू तिचा विकास होऊन गुंतागुंतीची कार्ये पार पाडण्याची क्षमता तिच्यात येते मात्र ह्या प्रक्रियेमागे कोणताही हेतू नसतो, प्रत्येक वस्तूला आरंभ, मध्य (म्हणजेच समतोलावस्था) आणि अखेर असते. उदा., मनुष्य जन्मतो, परिपक्वावस्थेला पोहोचतो आणि नंतर मरण पावतो. मानवी समाजही ह्याच अवस्थांतून जातात आणि यथावकाश अंतर्गत वा बाह्य कारणांमुळे नष्ट होतात. ह्या सर्व अवस्था सान्त (फाइनाइट) अशा स्थळकाळाच्या चौकटीत घडून येतात, असे स्पेन्सर ह्यांचे म्हणणे होते. स्पेन्सर ह्यांनी विकासाची व्याख्या अशी केली आहे : विकास म्हणजे सापेक्षतः अनिश्चित, असंबंध अशा एकजिनसीपणापासून सापेक्षतः निश्चित, सुसंबद्ध अशा बहुजिनसीपणाकडे जाणे. ह्याचे उदाहरण असे देता येईल : एकच पेशी असलेल्या अमीबासारख्या प्राण्याचे संपूर्ण शरीराच सर्व प्रकारची कार्ये पार पाडीत असते. येथे एकजिनसीपणा असतो. परंतु विकास पावलेल्या मनुष्यप्राण्याची विविध कार्ये अनेक पेशींनी घडलेल्या त्याच्या शरीरातील विविध अवयव पार पाडीत असतात, त्यामुळे येथे बहुजिनसीपणा आलेला असतो. अमीबाचे संपूर्ण शरीरच सर्व प्रकारची कार्ये पार पाडीत असल्यामुळे शरीराच्या विविध अवयवांच्या सुसंबद्धता असण्याचा प्रश्न त्याच्या बाबतीत येत नाही. माणसाची विविध कार्ये त्याच्या शरीराचे विविध अवयव पार पाडीत असले, तरी ते सर्व एकाच शरीराचे भाग असतात आणि त्यांच्यात पूर्ण एकात्मता आणि सुसंबद्धता असते. आरंभी स्वतःच्या सर्व गरजा भागविण्यासाठी स्वतःच्या एकट्याने मेहनत करणारा माणूस पुढे सुतीरकी, लोहारकी इ. वेगवेगळ्या व्यवसायांच्या रूपांनी समाजात निर्माण झालेल्या श्रमविभागणीच्या आधारे आपल्या वेगवेगळ्या गरजा भागवून घेऊ लागला, हेही ह्या संदर्भात दाखवता येईल.
विकासाची व्याख्या मानवी समाजाला लावून दाखविताना जीवाचे शरीर आणि समाज ह्यांच्यातील भेद स्पेन्सर दाखवतात. उदा., जीवाच्या शरीरातील पेशी ह्या त्यांच्या संपूर्ण शरीराच्या व्यवस्थेसाठी एकत्र काम करणाऱ्या साहाय्यकांसारख्या असतात, परंतु समाज मात्र त्यात सदस्यांप्रमाणे राहत असलेल्या व्यक्तींच्या हितासाठी असतो. कोणत्याही प्रकारच्या समाजवादाला स्पेन्सर ह्यांचा विरोध होता, तो ह्याच भूमिकेतून. मुक्त अर्थव्यवस्थेचेही ते खंदे पुस्कर्ते होते. तथापि डार्विन ह्यांची उपपत्ती मानवी समाजाला लावून दाखविताना ‘जो जगण्याचा लायकीचा असेल तोच जगेल’ (सरव्हाइव्हल ऑफ फिटेस्ट) अशी धारणा त्यांना व्यक्त केल्यामुळे ‘सामाजिक डार्विनवाद’ (सोशल डार्विनिझम) ह्या नावाने पुढे आलेल्या भूमिकेला तात्त्विक पाया प्राप्त झाला. ज्यांना आर्थिक वा राजकीय शक्ती प्राप्त होते ते तिच्यासाठी लायक असतात म्हणूनच ज्यांना ती मिळत नाही ते अपात्रच असतात, अशी भूमिका घेऊन सामाजिक डार्विनवाद्यांनी सामाजिक विषमतेचे आणि दुर्बलांच्या शोषणाचे समर्थन केले.
नवोद्भवशील विकसवाद : (इमर्जंट एव्हलूशनिझम). नवोद्भव (इमर्जंट) ही संज्ञा इंग्रज तत्त्वज्ञ आणि मानसशास्त्रज्ञ जॉर्ज हेन्री ल्यूइस, (१८१७−७८) ह्यांनी प्रथम वापरली होती (१८७४). तथापि इंग्रज जीवशास्त्रज्ञ, मानसशास्त्रज्ञ आणि तत्त्वज्ञ ⇨कॉनवे लॉइड मॉर्गन (१८५२−१९३६) ह्यांनी नवोद्भवशील विकासवादाची उपपत्ती ठळकपणे पुढे आणली. नवोद्भवशील विकासवाद्यांची एकंदर भूमिका अशी सांगता येईल : जीवांच्या शरीररचनेत मोठे आणि आकस्मिक असे बदल घडून येत नसून त्यांच्या रचनेत होणाऱ्या बदलांची प्रक्रिया ही अखंड, सरळमार्गी, टप्प्याटप्प्यांनी आणि सावकाश घडून येणारी असते, असे डार्विनचे म्हणणे होते परंतु एखादा बदल वा बदलांचा समूह पहिल्यांदाच कसा अस्तित्वात येतो, हे डार्विनच्या ह्या भूमिकेतून समजून घेणे अवघड ठरते. नवोद्भवशील विकासवाद्यांच्या मते, जे पहिल्यांदा अस्तित्वात येते, ते आकस्मिकपणेच अस्तित्वात येणार. जीवांमध्ये जेव्हा आकस्मिकपणे बदल घडून येतात, तेव्हा विकासाची अखंड, सरळमार्गी, टप्प्याटप्प्याने घडून येणारी म्हणून म्हटली जाणारी प्रक्रिया खंडित होते किंवा तिला एक वेगळे वळण मिळते. विकासाच्या प्रक्रियेत अशी खंडिते (डिस्कंटिन्यूइटीज) वेळोवेळी दिसून येतात.
जीवांमध्ये दिसून येणारी विविधता आणि जटिलता ही कशी विकसित झाली, ह्याचे स्पष्टीकरण नवोद्भवशील विकासवाद्यांनी त्यांच्या भूमिकेतून दिले आहे. ते देताना, ह्याच संदर्भात प्राणतत्त्ववादी (व्हाय्टॅलिस्ट), यांत्रिकतावादी (मेकॅनिस्टिक), पूर्वरचनावादी (प्रीफॉर्मेशनिस्ट) आणि रूपांतरणवादी (रिडक्शनिस्ट) अशा चार भूमिकांतून दिली जाणारी अन्य चार स्पष्टीकरणे त्यांनी अमान्य केली आहेत. प्राणतत्त्ववाद्यांच्या मतानुसार अनन्य आणि अनाकलनीय अशा जीवनशक्तीमुळे जीवांमधील विविधता आणि जटिलता निर्माण होते, तर केवळ भौतिक-रासायनिक (फिजिकोकेमिकल) नियमांनुसार ती अस्तित्वात येते, असे यांत्रिकतावाद्यांचे म्हणणे आहे. पूर्वरचनावादी भूमिकेनुसार जीवांचे ठायी मुळातच असलेल्या अंतःशक्ती त्यांच्या विविधतेच्या आणि जटिलतेच्या रूपाने साकार होतात. रूपांतरणवादी भूमिका असे मानते, की ह्या विविधतेच्या आणि जटिलतेच्या मुळाशी काही मूलभूत घटक असतात. ते स्वतः बदलत नाहीत परंतु त्यांची फेरमांडणी होत असते व तीच ह्या विविधतेतून आणि जटिलतेतून प्रकट होत असते.
ही विविधता आणि जटिलता म्हणजे निसर्गाने नवनिर्मितीच्या दिशेने केलेली चाल होय, अशी नवोद्भवशील विकासविद्यांची भूमिका आहे. त्यांच्या मते ही नवनिर्मिती विकासाच्या प्रक्रियेत अनेकदा अनुभवास येते. अशी प्रत्येक नवनिर्मिती निसर्गाच्या इतिहासात केवळ अपूर्व अशी असते.
नवोद्भवास नावीन्य हे आवश्यकतेने अंतर्भूत असते आणि नवोद्भवशील विकासवाद्यांनी नावीन्याची आपली संकल्पनाही स्पष्ट केली आहे. नावीन्य म्हणजे आधीच अस्तित्वात असलेल्या घटकांची केवळ पुनर्मांडणी नव्हे, परंतु अशी पुनर्मांडणी हा नावीन्याचा एक निकष असू शकतो. हे नावीन्य केवळ परिमाणाच्या दृष्टीने नव्हे, तर गुणात्मक दृष्ट्या विश्वाच्या इतिहासात अपूर्व आणि अनन्यसाधारण असले पाहिजे. ह्या नाविन्याबद्दल आधी काही सांगता येणे (पूर्वकथन वा प्रीडिक्शन) शक्य नसते. असे पूर्वकथन करता येणे शक्य झाले, तर ती नव्हता नव्हेत. नवोद्भवातील नावीन्याबद्दल पूर्वकथन शक्य नसते, असे म्हणण्यात ते बुद्धिगम्य नसते असा आशय अनुस्यूत आहे. तसेच त्याचे पूर्वकथन शक्य नसल्यामुळे त्याचे स्पष्टीकरणही देता येत नाही. नवोद्भवातील नावीन्य हे एक प्रकरच्या ‘नैसर्गिक श्रद्धे’ने स्वीकारावयाचे असते, असे मॉर्गन ह्यांनी म्हटले आहे. विकासाच्या विस्तीर्ण चित्रात क्रमाने येणारे नवोद्भव म्हणजे निम्नतेकडून उच्चतेकडे जाणारे प्रगतीचे टप्पे प्रगतीचे टप्पे होत. म्हणूनच नवोद्भवशील विकासवादी ⇨सॅम्युएल अलेक्झांडर (१८५९−१९३८) ह्यांच्याप्रमाणेच मॉर्गन ह्यांनीही समग्र निसर्ग म्हणजे एक पिरॅमिडसारखी व्यवस्था असल्याचे म्हटले आहे.
विश्वाच्या उत्पत्तीच्या संदर्भात नवोद्भवशील विकासाच्या संकल्पनेचा वापर करताना ती संकल्पना पातळ्यांच्या (लेव्हल्स) संपल्पनेशी निगडित केली जाते. पातळी म्हणजे विशिष्ट गुण, नियमबद्धता, संरचना ह्यांसारख्या, परस्परांशी निकटपणे संबंधित असलेल्या लक्षणांचा संच होय. हा संच सृष्टीच्या एका भागाशी लक्षणीयपणे निगडित झालेला असतो. त्याचप्रमाणे पूर्वीच अस्तित्वात असलेल्या अन्य काही पातळ्यांपासून तो निष्पन्न झालेला असतो. उदा., अजैव भौतिक−रासायनिक (नॉनलिव्हिंग फिजिकोकेमिकल) पातळीपासून सु. दोन हजार दशलक्ष वर्षांपूर्वी उद्भवलेले जीव ही एक पातळी होय. मानवनिर्मित वस्तू हीसुद्धा अशीच एक पातळी. ती मानवी संस्कृती पासून सापेक्षतः अलीकडच्या काळात निर्माण झालेली आहे. ह्या पातळ्यांमध्ये वरिष्ठ व कनिष्ठ असा भेद केला जात असला, तरी ह्या पातळ्यांच्या एकंदर व्यवस्थेकडे जिन्याच्या पायऱ्यांकडे पाहावे, तसे पाहता येणार नाही कारण प्रत्यक्ष सृष्टीत जे गुंतागुंतीचे आंतरसंबंध असतात, जे अशा तुलनेने नीटसे स्पष्ट होत नाहीत. शिवाय नवोद्भवशील विकासवाद्यांच्या मते कोणत्याही विशिष्ट पातळीत अन्य काही पातळ्याही अंतर्भूत असू शकतात. त्यामुळे एक अगदी तळाची पातळी गृहीत धरून तिच्यातून सर्व काही विकसित झाले, असे समजण्याची आवश्यकता नाही.
विकासाच्या पातळ्या किती व कोणत्या ह्याबद्दल नवोद्भवशील विकासवाद्यांमध्ये मतभेद आहेत. उदा., कॉनवे लॉइड मॉर्गन ह्यांनी चार पातळ्यांचा अनुक्रम सांगितला आहे : (१) मानसभौतिक घटना, (२) जीवन, (३) मन आणि (४) ‘स्पिरिट’ किंवा देव. सॅम्युएल अलेक्झांडर ह्यांनी पाच पातळ्या नमूद केल्या आहेत : (१) अवकाश-काल (स्पेस-टाइम), (२) जडद्रव्य (मॅटर), (३) जीवन, (४) मन आणि (५) देव. पॉल ओपेनहाइम आणि हिलरी पटनम ह्यांनी सहा पातळ्या मानल्या आहेत : (१) मूलकण, (२) अणू, (३) रेणू, (४) कोशिका वा पेशी, (५) बहुकोशिक जीव आणि (६) सामाजिक गट.
सॅम्युएल अलेक्झांडर ह्यांनी अवकाश-काल ही संकल्पना त्यांच्या तत्त्वमीमांसेसाठी वापरली. त्यांच्या प्रतिपादनानुसार अवकाश आणि काल अभिन्न आहेत. अवकाशावाचून काळाची आणि काळवाचून अवकाशाची कल्पना असंभवनीय होय. अवकाश-कालातून पदार्थ निर्माण होतात. पदार्थ हे गतींचे समूह असतात आणि त्यांचे गुणधर्म तेच निर्माण करीत असतात. ह्या प्रक्रियेतूनच खराखुरा नवोद्भव होत असतो. मन हा अशाच प्रक्रियेतून निर्माण झालेला नवोद्भव होय. अचेतन, अजैव अस्तित्वातून सजीव अस्तित्वात येते आणि मज्जाप्रक्रियेचे विशिष्ट प्रकारे संघटना होऊन मन वा जाणीव निर्माण होते. विकासाचा आवेग विश्वाला सत्तेच्या (बीइंग) नव्या नव्या पातळ्यांची निर्मिती घडवून आणण्यास जणू प्रवृत्त करतो. ह्या आवेगाला सॅम्युएल अलेक्झांडर ‘नायसस’ (Nisus) असे संबोधितात. त्यांच्या मते देव म्हणजेही कोणी अतिभौतिक सत्ता नसून पूजक वा भक्त ह्यांच्यापेक्षा वर असलेली नवोद्भवाची एक पातळी आहे. उदा., कुत्र्याला त्याचा मालक हा परमेश्वर असतो.
विकासाच्या प्रक्रियेत ज्या घटनांचे पूर्वकथन करणे शक्य असत, अशा घटनांना जॉर्ज हेन्री ल्यूइस आणि कॉनवे लॉइड मॉर्गन ह्यांनी फलिते (रिझल्टंट्स) अशी संज्ञा दिली आहे. ह्या घटना पुनरावृत्त होणाऱ्या असतात.
नवोद्भवाचे पूर्वकथन वा स्पष्टीकरण शक्य नसल्यामुळे त्यातील नावीन्याचा स्वीकार एक प्रकारच्या ‘नैसर्गिक श्रद्धे’नेच केला पाहिजे, ह्या भूमीकेमुळे नवोद्भवाच्या कल्पनेभोवती गूढतेचे वलय निर्माण झाले. त्याचप्रमाणे ही भूमिका विवेकाप्रमाण्याच्या आणि वैज्ञानिक शिस्तीच्या विरोधी आहे, अशी टिकाही ह्या प्रकारच्या विकासवादावर झालेली आहे.
कुलकर्णी, अ. र.
विख्यात फ्रेंच तत्त्वज्ञ ⇨आंरी बेर्गसाँ (१८५९−१९४१) ह्यांनी लामार्क आणि डार्विन ह्या दोघांच्याही उपपत्ती अमान्य करून निर्मितिशील विकासवादाची भूमिका मांडली. त्यांच्या मते विकासाचे यथार्थ आकलन होण्यासाठी आपल्या आंतरिक अनुभवात येणाऱ्या निर्मितीच्या प्रेरणेचा आधार घेतला पाहिजे. उत्क्रांतीच्या ओषात मानसाची बुद्धी आणि कीटकांची सहजप्रेरणा विकसित झाली तथापि ह्या दोन्ही शक्तींचे प्रयोजन व्यवहारिक आहे. बुद्धी म्हणजे संकल्पना घडवून वस्तूंविषयी विचार करण्याची आणि त्यांचे स्वरूप समजून घेण्याची शक्ती आहे. कीटक हे निव्वळ सहजप्रवृत्तीच्या आधारे बुद्धीलाही थक्क करणाऱ्या कृती करतात. बुद्धी ही ज्ञेय वस्तूच्या बाहेर राहून त्या वस्तूचे आकलन करून घेते, तर सहजप्रवृत्ती ही वस्तूशी तादात्म्य पावून तिचे ज्ञान प्राप्त करून घेते. त्यामुळे सहज प्रवृत्तीला होणारे ज्ञान आंतरिक असते. तथापि कृतींपुरतेच मर्यादित असते. सहजप्रवृत्तीची ही मर्यादा नाहीशी करून तिला आत्मजाणीव प्राप्त करून देता आली, तर कोणत्याही वस्तूचे साक्षात, सम्यक् आणि आंतरिक ज्ञान तिला प्राप्त होऊ शकेल. ह्या ज्ञानाला बेर्गसाँ प्रातिभज्ञान म्हणतात. व ते प्राप्त करून देणाऱ्या शक्तीला अंतःप्रज्ञा वा प्रतिभाशक्ती म्हणतात. ही शक्तीच अस्तित्वाचे आंतरिक ज्ञान प्राप्त करून देते. अंतिम अस्तित्त्व हे चैतन्याच्या, सर्जक उन्मेषाच्या म्हणजेच कलातत्त्वाच्या स्वरूपाने आहे. मात्र हा काळ सेकंद, मिनिटे, तास अशा एककांनी मोजला जाणारा संकल्पनात्मक काळ नव्हे, तर ज्याचा आपण साक्षात अनुभव घेतो, तो प्रवाह आणि अखंड असा शुद्ध काल होय. त्यात भूतकाळ आणि वर्तमानकाळ एकमेकांपासून अलग नसतात. एकवटलेला भूतकाळ वर्तमानात अनुस्यूत असतो आणि त्यातूनच उत्स्फूर्तपणे नावीन्याची निर्मिती होत असते. हा शुद्ध काल म्हणजेच टिकण्याची खरीखुरी प्रक्रिया होय. हे चैतन्यच जडतत्त्वातून अधिकाधिक उन्नत जीव विकसित करते. त्या जीवांच्या जाणिवेचा आणि कृतीचा आवाका जसाजसा वाढत जातो, तसतशी त्यांची निर्मितिक्षमताही वाढत जाते.
रेगे, मे. पुं.
संदर्भ : 1. Alexander, Samuel, Space, Time and Deity, London, 1920.
2. Bergson, Henry, Trans. Mitchell, Arthur, Creative Evolution, New York, 1911.
3. Broad, C. D. The Mind and its Place in Nature, London 1925.
4. MacDougall, W. Modern Materialism and Emergent Evolution, London. 1929.
5. Mason, F. Ed. Creation by Evolution, London, 1923.
6. Morgen, C. Lloyd, Emergent Evolution, London, 1923.
7. Needham, J. Integrative Levels : A Revaluation of the Idea of Progress, Oxford, 1937.
8. Nobel, E. Purposive Evolution, London, 1926.
9. Spencer, Herbert, First Principles, London, 1862.
10. Wheeler. W. M. Emergent Evolution and the Development of Societies, New York, 1928.
“