वॉशर : (वायसर). नट व बोल्ट यासारख्या साधनाने धातूच्या किंवा अन्य वस्तूंचे जोडकाम करताना त्यांच्याबरोबर वापरण्यात येणारी व बहुधा मध्यभागी छिद्र असलेली चापट चकती. सामान्यपणे ही चकती पोलादाची व कधीकधी शिशाची असते. काही ठिकाणी मात्र चामडे, रबर, प्लॅस्टिक इ. द्रव्यांचे वॉशर वापरतात. वॉशराच्या छिद्रातून बोल्ट घालतात आणि नटाच्या खाली अथवा बोल्टाच्या डोक्याखाली वॉशर बसवून नट लावतात [⟶ बोल्ट व नट]. वॉशरांचे साधा सपाट, अटकी, शंकूच्या आकाराचा इ. प्रकार आहेत.
वॉशर वापरल्याने नट आवळताना वस्तूच्या पृष्ठभागावर ओरखडे पडून तो खराब होत नाही. वस्तूचा पृष्ठभाग चांगला सपाट नसल्यास नटाचा व बोल्टाच्या डोक्याचा दाब एकसारखा पडत नाही. वॉशर वापरल्याने हा दाब अधिक मोठ्या क्षेत्रावर एकसारखा वाटला जातो. यामुळे वस्तूचा पृष्ठभाग चांगला सपाट करण्यासाठी करावे लागणारे संस्करण केले नाही तरी चालते. नट व बोल्टाचे डोके व सक्रूचे डोके आणि त्याने पकडून ठेवलेल्या वस्तूचे पृष्ठ यांच्यातील अंतर वाजवीपेक्षा जास्त असल्यास वॉशराने ते भरून काढले जाते. शिवाय यामुळे बोल्टाच्या आटे नसलेल्या भागापर्यंत नट पोहोचत नाही. चामडे, रबर, प्लॅस्टिक वगैरेंच्या वॉशरांमुळे जोडातून वायू, पाणी वा अन्य द्रव पदार्थ गळत नाही (उदा., नळाचा वॉशर).
साध्या सपाट वॉशरांमुळे वस्तू जोडण्याचे व सुट्या करण्याचे काम सोपे होते व ते झटपट करता येते. स्थिर राहणाऱ्या जोडकामासाठी असा वॉशर वापरतात. मात्र जोडकामाला हादरे बसत असल्यास किंवा त्याचे कंपन होत असल्यास त्यामुळे नट-बोल्ट सैल होऊन धोका संभवतो म्हणून अशा वेळी अटकी वॉशर वापरतात. त्यामुळे नट-बोल्ट हलण्यास प्रतिबंध होऊन ते सैल होत नाहीत. स्प्रिंग वॉशर व दातेयुक्त वॉशर हे अटकी वॉशरांचे सामान्यपणे वापरले जाणारे प्रकार आहेत.
स्प्रिंग वॉशर हा सर्वाधिक वापरला जाणारा अटकी वॉशर असून त्याला सर्पिलाकार (मळसूत्री) वॉशर असेही म्हणतात. असा साधा वॉशर दोन-तीन वेढ्यांचा असून तो स्प्रिंगप्रमाणे कार्य करतो म्हणजे नटाखाली दाबला गेल्याने तो तात्पुरता सपाट राहतो. मात्र स्प्रिंगप्रमाणे मूळ स्थितीत येण्याचा त्याचा प्रयत्न असतो. यामुळे नटावर त्याचा सारखा दाब पडत असतो म्हणून हादऱ्याच्या किंवा कंपनाच्या वेळी नट व बोल्ट घट्ट धरून ठेवले जाऊन त्यांच्या फिरण्यास अटकाव होतो व ते सैल होत नाहीत. शंकूच्या आकाराच्या वॉशराची क्रियाही स्प्रिंगप्रमाणे होते व त्याचा अटकाव घर्षणातून निर्माण होतो.
काही वॉशरांच्या आतल्या, बाहेरच्या किंवा दोन्ही कडांना दाते असतात. हे दाते आलटून पालटून विरुद्ध दिशांना वाकलेले असतात. यामुळे ते वस्तूच्या पृष्ठभागावर व बोल्टाच्या डोक्यावर रोवले जाऊन नट-बोल्ट घट्ट पकडून ठेवले जातात. परिणामी हादऱ्याने वा कंपनाने ते सैल होत नाहीत. अशा वॉशरांना दातेयुक्त किंवा न फिरणारे वॉशर म्हणतात.
प्रमाणभूत मापाच्या नट-बोल्टांसाठी त्या त्या मापाचे आयते वॉशर मिळू शकतात. तसेच जोडकाम झटपट होण्याकरिता नट-वॉशर व बोल्ट -वॉशर अशा अंगचे वॉशर असणाऱ्या जोड्याच तयार मिळतात.
वैद्य, ज. शि.
“