वॉर्नर ब्रदर्स पिक्चर्स : अमेरिकन चित्रपटनिर्मितीसंस्था. हॅरी, जॅक, आल्बर्ट आणि सॅम या वॉर्नर बंधूंनी अनेक अयशस्वी व्यवसायांनंतर १९१७ मध्ये न्यूयॉर्कमध्ये एक चित्रपटवितरणसंस्था स्थापन केली व पुढे १९२३ मध्ये तिचाच विस्तार निर्मितिसंस्थेत करून ‘वॉर्नर ब्रदर्स पिक्चर्स’ ही संस्था स्थापन केली. हॅरी हे संचालक व आल्बर्ट खजिनदार होते. न्यूयॉर्क येथील संस्थेचे मुख्य कार्यालय हे दोघे बंधू चालवत होते व जॅक आणि सॅम बंधू हॉलिवुडमधील स्टुडिओचे कामकाज पाहात होते. संस्थेची सुरुवातीची काही वर्षे चाचपडण्यात व आर्थिक अस्थिरतेतच गेली. हॉलिवुड व न्यूयॉर्क येथे त्यांनी भव्य चित्रपटगृहे उभारली व १९२५ मध्ये ‘व्हिटाग्राफ’ ही जुनी चित्रपटनिर्मितीसंस्था ताब्यात घेतली. सुरुवातीच्या ह्या आर्थिदृष्ट्या प्रतिकूल काळातच वॉर्नर ब्रदर्सनी चित्रपटाला ध्वनीची जोड देण्याचा पहिला प्रयोग यशस्वी रीत्या पार पाडला. सॅम वॉर्नरने ‘वेस्टर्न इलेक्ट्रिक अँड बेल टेलिफोन लॅबोरेटरीज’च्या सहयोगाने ‘व्हिटाफोन’ ही तबकडीवरील ध्वनिप्रक्रियेची पद्धती शोधून काढली. ह्या पद्धतीच्या आधारे वॉर्नर ब्रदर्स संस्थेने निर्माण केलेला द जाझ सिंगर (१९२७) हा पहिला बोलपट होय. अल जॉल्सन ह्या गायकनटाची त्यात प्रमुख भूमिका होती. ह्या पहिल्याच बोलपटाचे प्रेक्षकांनी उत्स्फूर्तपणे प्रचंड स्वागत केले व ह्या बोलपटाने मूकपट जमान्याचा अस्त घडवून आणला. शिवाय त्याच्या प्रचंड यशाने वॉर्नर ब्रदर्सची आर्थिक स्थिती झपाट्याने सुधारत गेली. त्यानंतर संस्थेने लाइट्स ऑफ न्यूयॉर्क (१९२८) हा पूर्ण लांबीचा बोलपट व ऑन विथ द शो (१९२९) हा पहिला संपूर्ण रंगीत बोलपट हे तयार केले. संस्थेने आर्थिक भरभराटीनंतर आपला व्यापार मोठ्या प्रमाणावर वाढवण्यास सुरुवात केली. १९३२ मध्ये संस्थेने चित्रपटगृहांची एक मोठी साखळीच तयार केली (अमेरिकेतील स्टॅन्ले कंपनी), तसेच अनेक चित्रपटनिर्मितीसंस्था ताब्यात घेतल्या. ‘फर्स्ट नॅशनल’ ही त्यांपैकीच एक होय. हळूहळू संस्थेने आपली व्याप्ती आंतरराष्ट्रीय क्षेत्रातही पसरवली. माफक निर्मितिखर्च, तांत्रिक सफाई व उत्कृष्ट रंजनमूल्ये ही वॉर्नर ब्रदर्सच्या चित्रपटांची खास वैशिष्ट्ये त्या काळी गणली गेली. १९३० च्या दशकात गुन्हेगारी टोळीयुद्धांच्या व मारधाडीच्या देमार रंजक चित्रपटांची एक लाटच वॉर्नर ब्रदर्सनी सिनेसृष्टीत आणली. त्यांत लिट्ल सिझर (१९३०), पब्लिक एनिमी (१९३१), स्कार फेस (१९३२) इ. चित्रपट उल्लेखनीय आहेत. त्यांत हम्फ्री बोगार्ट, जेम्स कॅग्नी, एडवर्ड जी. रॉबिन्सन इ. नटांच्या टोळीनायकांच्या प्रमुख भूमिका असत. १९३० व १९४० या दशकांत वॉर्नर ब्रदर्सनी संगीतनृत्यप्रधान रंजक चित्रपटांची (म्यूझिकल्स) मालिकाच निर्माण केली व ती अतिशय लोकप्रिय ठरली. बझ्बी बर्कली या नृत्यदिग्दर्शकाचा ह्या चित्रपटांच्या यशामागे महत्त्वाचा वाटा होता. ह्या चित्रपटांमध्ये गोल्डडिगर्स ही चित्रपटमालिका (१९३३-३८), फॉर्टीसेकंड स्ट्रीट (१९३३), फुटलाइट परेड (१९३३) इत्यादींचा प्रामुख्याने निर्देश करता येईल. डिक पॉवेल व रूबी कीलर ह्या नटनट्यांच्या या चित्रपटांतून प्रमुख भूमिका असत. वॉर्नर ब्रदर्सनी काही सामाजिक आशय असलेले गंभीर चित्रपट निर्माण केले. उदा., आय ॲम अ फ्यूजिटिव्ह फ्रॉम अ चेन गँग (१९३२) कन्फेशन्स ऑफ अ नाझी स्पाय (१९३९) तसेच काही प्रख्यात व्यक्तींविषयीचे चरित्रपटही तयार केले. उदा., द लाइफ ऑफ एमिल झोला (१९३७). त्रिमिती चित्रपटाचा नवा प्रयोगही वॉर्नर ब्रदर्स संस्थेनेच पहिल्यांदा केला. उदा., ब्वाना डेव्हिल (१९५३) हा पहिला रंगीत त्रिमिती चित्रपट त्यांनी तयार केला.
वॉर्नर ब्रदर्सच्या चित्रपटांतून वेळोवेळी अनेक गुणी व लोकप्रिय चित्रपट-कलावंत, तंत्रज्ञ, निर्माते-दिग्दर्शक ह्यांना आपली गुणवत्ता सिद्ध करण्यास वाव मिळाला. त्यांत बेटी डेव्हिस, ऑलिव्हिया डी हॅविलँड, एरॉल फ्लिन, पॉल म्यूनी इ. नटनट्या तसेच हॉल वॉलिस, मायकेल कर्टिझ, मेर्व्हिन लरॉय, राऊल वॉल्श इ. निर्माते-दिग्दर्शक ह्यांचा उल्लेख करता येईल. अलीकडच्या काळात एलिया कझान, माइक निकोलस, आर्थर पेन इ. दिग्दर्शकांनी वॉर्नर ब्रदर्सच्या सहयोगाने काही दर्जेदार चित्रपट निर्माण केले.
वॉर्नर ब्रदर्सनी १९५० च्या दशकाच्या उत्तरार्धात दूरदर्शन मालिकांच्या निर्मितीवर जास्ती भर दिला. त्यांतील काही मालिका अत्यंत यशस्वी ठरल्या. १९५५ नंतर संस्थेने निर्माण केलेले माय फेयर लेडी (१९६४) द ग्रेट रेस (१९६५), कॅमेलॉट (१९६७) यांसारखे चित्रपट तुफान लोकप्रिय व यशस्वी ठरले. हू इज अफ्रेड ऑफ व्हार्जिनिया वुल्फ (१९६६) व बॉनी अँड क्लाइड (१९६७) यांसारख्या हॉलिवुडच्या प्रयोगिक चित्रपटांच्या निर्मितीतही वॉर्नर ब्रदर्सचा सहयोग होता.
वॉर्नर ब्रदर्स ही चित्रसंस्था १९६७ च्या मध्यावधीत ‘सेव्हन आट्र्स’ (दूरदर्शनसाठी चित्रपटवितरण करणारी संस्था) या संस्थेत विलीन झाली व ‘वॉर्नर ब्रदर्स सेव्हन आट्र्स’ (संक्षिप्त ‘डब्ल्यू-सेव्हन’) या नावाने ओळखली जाऊ लागली. १९६९ मध्ये ‘किन्ने नॅशनल सर्व्हिस’ ह्या बड्या आर्थिक संघटनेने वॉर्नर स्टुडिओ ताब्यात घेतला व तो मूळ संस्थेकडे परत दिला. जॅक एल्. वॉर्नर हा या संस्थेशी संबंधित असलेला शेवटचा वॉर्नर बंधू निवृत्त झाला व त्याने चित्रपटनिर्मितिगृहाचा ताबा टेड ॲश्ली व जॉन केली यांच्या व्यवस्थापनाकडे सोपविला. १९७२ मध्ये ‘कोलंबिया पिक्चर्स’ ही संस्था वॉर्नर ब्रदर्स स्टुडिओमध्ये स्थलांतरित झाली व या दोन्ही संस्थांचे एकत्रीकरण होऊन ते ‘कोलंबिया-वॉर्नर’ या नावाने ओळखले जाऊ लागले.
इनामदार, श्री. दे.