वॉर्ड, बार्बारा मेरी : (२३ मे १९१४-३१ मे १९८१). ब्रिटिश अर्थशास्त्रज्ञ, नैसर्गिक साधनसंपत्तीच्या परिरक्षिका, वार्ताहर आणि जवाहरलाल नेहरू स्मृति-पुरस्काराच्या मानकरी. यॉर्क येथे वॉर्ड यांचा जन्म झाला. फ्रान्स तसेच जर्मनी या देशांतील विद्यालयांतून शिक्षण घेऊन त्यांनी १९३२ मध्ये ऑक्सफर्डच्या सॉमरव्हिल महाविद्यालयात प्रवेश घेतला. तेथे त्यांनी अर्थशास्त्र, राज्यशास्त्र व तत्त्वज्ञान या विषयांचे शिक्षण घेऊन पदवी संपादन केली (१९३५). १९३६-३९ या कालावधीत त्यांनी विस्तार अध्यापिका (एक्स्टेन्शन लेक्चरर) म्हणून काम केले. १९३९ मध्ये त्यांनी द इकॉनॉमिस्ट या अग्रेसर ब्रिटिश आर्थिक साप्ताहिकात नोकरी पतकरली व १९४० मध्ये त्यांची या साप्ताहिकाच्या विदेशी संपादिका म्हणून नियुक्ती करण्यात आली. त्यानंतर वॉर्ड ह्यांनी ब्रिटिश रेडिओ-प्रक्षेपण संस्थेच्या (बीबीसी) गव्हर्नर (१९४६-५०), हार्व्हर्ड विद्यापीठात अभ्यागत सन्मान्य प्राध्यापिका (१९५७-६८), कोलंबिया विद्यापीठात आंतरराष्ट्रीय आर्थिक विकासाच्या श्वाइत्सर प्राध्यापिका (१९६८-७३) आणि नैसर्गिक साधनसंपत्तीच्या परिरक्षण संस्थेच्या अध्यक्षा (१९७३ पासून) यांसारख्या अनेक महत्त्वपूर्ण जबाबदाऱ्या सांभाळल्या. दुसऱ्या महायुद्धानंतरच्या कालखंडात वॉर्ड ह्यांनी यूरोपीय देश व अमेरिकेची संयुक्त संस्थाने ह्यांमध्ये अनेक व्याख्याने दिली त्यांयोगे आर्थिक व राजकीय विषयामधील एक अतिशय प्रभावी लेखिका व टीकाकार म्हणूनही त्यांना मोठी प्रसिद्धी लाभली.

बार्बारा वॉर्ड ह्यांनी १९५० मध्ये रॉबर्ट जी. ए. जॅक्सन हे ऑस्ट्रेलियन अर्थशास्त्रज्ञ व संयुक्त राष्ट्रांमधील एक अधिकारी, यांच्याशी विवाह केला. १९७४ मध्ये बार्बारा ह्यांना ‘डेम कमांडर ऑफ द ब्रिटिश एंपायर’ हा सन्मान लाभला. १९७६ मध्ये त्यांना ‘बॅरनेस जॅक्सन ऑफ लॉर्ड्झवर्थ’ असा उमरावपत्नीचा किताब देऊन सन्मानित करण्यात आले. १९८० मध्ये वॉर्ड यांना ‘आंतरराष्ट्रीय सामंजस्याचा जवाहरलाल नेहरू स्मृति-पुरस्कार’ प्रदान करण्यात येऊन गौरविण्यात आले. काही काळ वॉर्ड ह्या अमेरिकन राष्ट्राध्यक्ष जॉन एफ्. केनेडी ह्यांच्या अर्थसल्लागारही होत्या.

यूरोपीय आर्थिक संघटनेच्या वॉर्ड प्रारंभापासून कट्टर समर्थक असून अर्धविकसित देश-प्रदेशांतील उगवत्या राष्ट्रवादाला तसेच सामयवादी गटाला तोंड देण्यासाठी पश्चिमी राष्ट्रांनी एक नीति-प्रणाली उभारावी, अशी वॉर्ड ह्यांची धारणा होती. तीनुसारच पश्चिमी औद्योगिक लोकशाही राष्ट्रांमधील पराकोटीची संपत्ति-क्षेत्रे व दारिद्र्य-क्षेत्रे यांमधील दरी वा अंतर कमी करणे यांकरिता सामाजिक न्यायाची कसोटी वा निकष लावणे हे कसे महत्त्वाचे आहे, हे वॉर्ड ह्यांनी ठरविण्याचा प्रयत्न केला. दुसऱ्या महायुद्धानंतरच्या काळात, उद्ध्वस्त यूरोपीय राष्ट्रांच्या पुननिर्मितीसाठी मार्शल योजनेचे महत्त्व पटविण्यात त्यांचा सिंहाचा वाटा होता.

विकसनशील देशांमधील आर्थिक विकासाच्या समस्यांबाबत चर्चा करणाऱ्या ग्रंथांच्या लेखिका म्हणून वॉर्ड विशेष प्रसिद्धी पावल्या. जगातील आर्थिक साधनसंपत्तीचे औद्योगिक दृष्ट्या प्रगत व विकसनशील राष्ट्रांमध्ये अधिक सम प्रमाणात विभाजन केले जावे, याकडे त्यांनी विशेष लक्ष वेधले. ही उद्दिष्टे साध्य करण्याच्या हेतूने, वॉर्ड ह्यांनी लोकसंख्या नियंत्रणासाठी आंतरराष्ट्रीय सहकार्य व कार्यक्रम यांवर प्रामुख्याने भर दिल्याचे आढळते.

बार्बारा वॉर्ड ह्यांनी आर्थिक, परिस्थितिकीय आणि राजकीय विषयांवर प्रचंड आणि प्रभावी लेखन केले आहे. विशषतः तिसऱ्या जगातील विविध राष्ट्रांमध्ये असणाऱ्या साम्यवादाला यशस्वीपणे तोंड द्यावयाची आवश्यकता त्यांनी प्रतिपादिली वॉर्ड ह्यांनी पश्चिमी राष्ट्रांतील दारिद्र्य कमी करणाऱ्या व सामाजिक न्याय प्रस्थापित करणाऱ्या (सामाजिक न्यायाचे वर्धन करणाऱ्या) धोरणांचा अवलंब तिसऱ्या जगातील राष्ट्रांमध्ये करणे किती जरुरीचे आहे, हे पटविण्याचा विविध ग्रंथांद्वारा प्रयत्न केल्याचे दिसून येते. यूरोपीय आर्थिक संघटनेच्या स्थापनेसाठी प्रयत्न करणाऱ्या पहिल्या काही प्रवर्तकांमध्ये वॉर्ड यांची गणना करण्यात येते.

आशियाई विकास कार्यक्रमांत विशेष रस व रुची घेणाऱ्या बार्बारा वॉर्ड ह्यांनी नियोजन व विकास या दोन्ही क्षेत्रांबाबत चीनबरोबरच भारतालाही एकाच पंक्तीत बसविले आहे. अर्धविकसित देशांना अर्थसाहाय्य करणाऱ्या जागतिक बँकेच्या धोरणांच्या संदर्भात देशांमधील गरीब व अतिशय गरजू लोकांना अधिक झुकते माप देण्यासाठी वॉर्ड यांनी बँकेवर मोठ्या प्रमाणावर प्रभाव व दबाव आणण्याचा आटोकाट प्रयत्न केला. भारताच्या पंचवार्षिक योजनांच्या यशस्वितेकरिता वॉर्ड ह्यांनी पश्चिमी औद्योगिक राष्ट्रांकडे भारताच्या अर्थविषयक राजदूत म्हणूनही जाण्यास मागेपुढे पाहिले नाही.

वॉर्ड ह्यांच्या महत्त्वाच्या ग्रंथांपैकी काही खालीलप्रमाणे होत: (१) द इंटरनॅशनल शेअरआउट, १९३८, (२) द वेस्ट ॲट बे, १९४८ (३) फेथ अँड फ्रीडम, १९५४ (४) इंटरप्ले ऑफ ईस्ट अँण्ड वेस्ट, १९५७(५) फाइव्ह आयडियाज दॅट चेंज वर्ल्ड, १९५९ (६) द रिच नेशन्स अँड द पूअर नेशन्स, १९६२ (७) स्पेसशिप अर्थ, १९६६ (८) नॅशनॅलिझम अँड आयडिऑलॉजी, १९६७ (९) द वाइडनिंग गॅप, १९७१ (सहलेखक: रेने द्यूबास) (१०) ओन्ली वन अर्थ, १९७२ (११) द होम ऑफ मॅन, १९७६ (१२) प्रोग्रेस फॉर ए स्मॉल प्लॅनेट, १९७९. वॉर्ड यांचे लॉड्‌र्झवर्थ येथे निधन झाले.

गद्रे. वि. रा.