वाळू : खनिज व खडक यांच्या ०.०६ ते २ मिमी. आकारमानाच्या सुट्या कणांचा समुदाय म्हणजे वाळू होय. हे कण नुसत्या डोळ्यांनी वेगवेगळे ओळखू येता. ते जवळजवळ गोलसर ते कोनीय (अणकुचीदार) असतात. आधीच्या खडकाची झीज होऊन वाळू तयार होते. तयार झाल्यावर वाळू बहुधा पाणी, वारा किंवा हिमबर्फाने दुसरीकडे वाहून नेली जाते व मग तेथे साचते.
गुणवैशिष्ट्ये : खडकांमध्ये आढळणारी बहुतेक खनिजे वाळूत आढळतात. तथापि क्वार्टझ हा वाळूतील सर्वात सामान्य घटक असतो. कारण क्वार्ट्झ खनिज सापेक्षतः कठीण असून त्याला ⇨पाटन नसते. यामुळे ते सहज झिजत नाही. तसेच ते पाण्यात जवळजवळ विरघळत नाही व त्याच्यावर रासायनिक विक्रियेचा विशेष परिणाम होत नाही. जीवांची कवचे, फेल्स्पार व शुभ्र अभ्रक ही सुद्धा वाळूत असतात. काही ठिकाणी चूर्णीय द्रव्य, लोह धातुक (मॅग्नेटाइट), ज्वालामुखी काच वा जैव द्रव्य हे वाळूतील मुख्य घटक असते. क्वार्ट्झ मुख्य घटक असल्याने वाळूचा रंग सामान्यतः फिकट असतो. लोह ऑक्साइडांमुळे वाळूला पिवळसर वा लालसर रंग येतो. मॅग्नेटाइट विपुल असणारी वाळू काळी तर ग्लॉकोनाइटयुक्त वाळू हिरवट असते. बेसाल्टसारख्या खडकाचे तुकडे विपुल असल्यास वाळूला गडद रंग येतो. व्हाइड सँड्स नॅशनल मॉन्यूमेंट (न्यू मेक्सिको, अमेरिका) येथील पांढरी शुभ्र वाळू जवळजवळ पूर्णपणे जिप्समाच्या कणांची बनलेली आहे. वाळूत थोड्या प्रमाणात जड खनिजेही आढळतात. उदा. गार्नेट, तोरमल्ली, झिर्कॉन, रूटाइल, इल्मेनाइट, मोनॅझाइट, पायरोक्सिने, पुष्कराज, अँफिबोले वगैरे. काही ठिकाणी नदीतील वा किनारी भागाती वाळूचे प्रकारीकरण वा कणांची वर्गवारी होऊन हलकी खनिजे निघून गेलेली असतात. त्यामुळे जड खनिजे (उदा., गार्नेट, मोनॅझाइट, इल्मेनाइट) व मूलद्रव्ये (उदा., सोने, प्लॅटिनम) यांचे स्थानिक दृष्ट्या एकत्रीकरण झालेले असते. अशा साठ्यांना प्लेसर म्हणतात. वाळू घट्ट होऊन ⇨ वालुकाश्म तयार होतो.
वाळूचे वर्णन पोत व संरचना यांना अनुसरून करतात. कणांचे आकारमान, आकारमानानुसार झालेले प्रकारीकरण, कणांची गोलाई किंवा कोनीयता, आकार, पृष्ठभागाचा पोत (खडबडीतपणा) या गुणधर्मांनुसार वाळूचा पोत ठरतो. कणांचे आकारमान प्रमाणित चाळण्या वापरून ठरवितात. कणांची वाहतूक करणाऱ्या कारकाचा (प्रवाह, वारा) वेग व जोर तसेच कणाची झालेली वाहतूक यांनुसार त्याचे आकारमान निश्चित होते. प्रकारीकरण कमी झालेल्या वाळून विविध आकारमानांचे कण असतात. उलट प्रकारीकरण चांगले झालेले असल्यास बहुसंख्य कण एकसारख्या आकारमानाचे असतात. वाहतूक वाऱ्यासारख्या कारकाने झालेली असल्यास व साचण्याची क्रिया सावकाश झालेली असल्यास प्रकारीकरण सर्वांत चांगले झालेले असते.
जास्त वाहतूक झालेल्या कणांची जास्त झीज होऊन ते अधिक गोलसर होतात (उदा., नदीतून दूरवर गेलेले कण किंवा लाटांनी मागे-पुढे हलणारे किनाऱ्यावरचे कण) वाऱ्यानेही कणांना चांगली गोलाई येते. कारण असे कण जोराने एकमेकांवर आदळत, घासटत वाहून नेले जातात.
वाळूच्या कणांचा गोलसर वा लंबगोल आकार हा सामान्यपणे मूळ कणांच्या आकारावरून ठरतो. कणाच्या पृष्ठभागाचा पोत क्रमवीक्षक इलेक्ट्रॉन सूक्ष्मदर्शकासारख्या अतिशय वर्धन करणाऱ्या उपकरणाने कळू शकतो. त्यावरून कणाची वाहतूक कशी झाली असेल, याविषयी अनुमान करता येईल.
मृत्तिकेवर बारीक वाळू व पाणी साचल्यास रुतणाचे थर तयार होतात. हे थर जास्त भार सहन करू शकत नाहीत, यामुळे यावर उभा राहिलेला माणूस वा जनावर या थराच्या आत जाते. परिणामी रुतणात बुडून मृत्यू येऊ शकतो, म्हणूनच रुतणात पुष्कळ जीवाश्म (जीवाचे शिळारूप अवशेष) आढळतात.
आढळ : उच्च गतिज ऊर्जेच्या वाऱ्याने वा जलप्रवाहाने जेथे गाळ वाहून नेला जातो, तेथे वाळू आढळते. वाळवंटे आणि पुळणी (समुद्रकिनारे) येथे सर्वाधिक वाळू साचलेली आढळते. या दोन्ही ठिकाणी वाऱ्यामुळे वाळूच्या टेकड्या निर्माण होतात. त्यांना ⇨वालुकागिरी म्हणतात. यांशिवाय डोंगराच्या पायथ्याशी निर्माण होणारी जलोढीय व्यजने (पंख्याच्या आकाराचे गाळाचे साठे), वाळूचे दांडे व रोधक बेटे [⟶ वालुकाभित्ति], त्रिभुज प्रदेश इ. ठिकाणीही वाळू आढळते. महासागराच्या तळाच्या विस्तृत भागावर हिरवी वाळू पसरलेली असून ती प्राचीन थरांतही आढळते.
वाळू जगात सर्वत्र आढळते. भारतात काचेसाठी उपयुक्त वाळू बिहार, गुजरात, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, जम्मू व काश्मीर, केरळ, तमिळनाडू, कर्नाटक, महाराष्ट्र (रत्नागिरी व सिंधुदुर्ग), ओरिसा व पंजाब येथे आढळते. केरळ, तमिळनाडू व महाराष्ट्र (सिंधुदुर्ग व रत्नागिरी) यांच्या किनारी भागात मोनॅझाइट व इल्मेनाइटयुक्त वाळू आढळते.
वर्गीकरण : वाळूची उत्पत्ती व तिच्यातील घटक यांनुसार तिचे वर्गीकरण करतात. उत्पत्तीनुसार तिचे सागरी, नदीमुखीय, सरोवरीय, नादेय, वाळवंटी, हिमनादेय व ज्वालामुखीय असे प्रकार करतात. यांतील पहिले चार प्रकार उत्पत्ती व गुणधर्म यांच्या दृष्टीने एकमेकांना जवळचे आहेत. त्यांना मिळून जलीय वाळू म्हणतात. यांच्यातील कण सर्वसाधारणपणे उपकोनीय असून त्यांचे चांगले प्रकारीकरण झालेले असते. जेथे ते तयार होतात तेथील जैव द्रव्याचे कणही या प्रत्येक प्रकारात असतात. किनारी वालुकागिरीतील वाळूचा संबंध पुष्कळदा वाळवंटातील वाळूशी जोडतात, कारण वालुकागिरी वाऱ्यानेच निर्माण होतात. मात्र सागरी वाळू पाण्याने बनलेली असून वाऱ्याने पुढे नेली जाते व यामुळे नंतर कणांना थोडी गोलाई येते. यामुळे सागरी वाळू या वाळूपासून वेगळी ओळखता येत नाही. वाळवंटी वाळूचे कण जवळजवळ पूर्णपणे गोल झालेले व अगदी बारीक असतात. तिच्यात धूळ व अभ्रकाचे तुकडे नसतात. कारण ते वाऱ्याने उडून गेलेले असतात. हिमनादेय वाळूचे कण अगदी धारदार कडांचे असून त्यांचे प्रकारीकरण झालेले नसते. हिमानी वाळूत बहुतकरून जड खनिजांचे मोठे व विविध प्रकारचे कण असतात. ज्वालामुखीय वाळू सामान्यतः ज्वालामुखी बेटांभोवती जमते. तिच्यातील कणांचे अग्निज व कोनीय रूप व त्यांच्यात झालेले स्तरण (स्तरयुक्त रचना) ही तिची वैशिष्ट्ये असून ही वाळू अन्य वाळूत मिसळलेली आढळते.
कणांच्या आकारमानानुसार वाळूचे अतिभरड (१ ते २ मिमी.), भरड (०.५ ते १ मिमी.), मध्यम (०.२५ ते ०.५ मिमी.), बारीक (०.१२ ते ०.२५मिमी.) आणि अतिबारीक (०.०६ ते ०.१२मिमी.)असेही प्रकार करतात. शिवाय वाळूत एखाद्या घटकाचे एकत्रीकरण झालेले असल्यास त्याच्यावरून किंवा तिच्या असाधारण संघटनावरून तिला वेगवेगळी नावे देतात. उदा., मॅग्नेटाइट, मोनॅझाइट, गार्नेट वाळू किंवा प्रवाळी (हवाई बेटे), फोरॅमिनीफरयुक्त, बेसाल्टी (महाराष्ट्र) वाळू वगैरे.
उपयोग : आर्थिक दृष्टीने वाळू ही महत्त्वाची साधनसंपत्ती आहे. क्वार्ट्झयुक्त वाळू हा काचनिर्मितीमधील महत्त्वाचा घटक आहे. कारण काच म्हणजे सिलिकेट असून सिलिकेचा वाळू हाच मुख्य स्त्रोत आहे. वाळू हा बांधकामातील महत्त्वाचा घटक आहे, उदा., काँक्रीट, गिलावा, सिमेंट, चुना, विटा इ. बांधकाम साहित्यात ती वापरतात. अपघर्षक म्हणूनही वाळूचा उपयोग होतो. उदा., घासकागद व घासावयांचा साबण यांत वाळू वापरतात तसेच वाळूच्या फवाऱ्याने भिंती साफ करतात व खोदतातही. खताच्या दृष्टीने ग्लॉकोनाइट वाळू उपयुक्त आहे. प्लेसर वाळूतून सोने, प्लॅटिनम, मॅग्नेटाइट, कथिल, हिरे व अन्य रत्ने, मोनॅझाइट, इल्मेनाइट इ. मौल्यवान द्रव्ये मिळतात. पोलादाच्या भट्टीचे अस्तर किंवा पोलादी ओतकामाचे साचे यांकरिता वाळू वापरतात, तसेच क्वार्टझयुक्त वाळू खनिज तेल विहिरी खोदण्यासाठी लागणाऱ्या गाळात वापरतात. ग्लॉकोनाइट वाळूने पाणी मृदू होते व वाळूने पाणी गाळण्याचे कामही केले जाते. स्फोटक द्रव्ये, रंगलेप, रबर, प्लॅस्टिक इ. उद्योगांतही काही प्रकारची वाळू भरण द्रव्य म्हणून वापरतात. आगनिवारणासाठीही वाळूचा उपयोग करतात.
पहा : किनारा व किनारी प्रदेश गाळाचे खडक झीज व भर त्रिभुज प्रदेश वालुकागिरी वालुकाभित्ति वाळवंट हिमोढ.
संदर्भ : 1. Blatt, H. Middelton, G. Murray, R. Origin of Sedimentary Rocks, New York, 1972.
2. Pettijohn, F.J. Potter, P. E. Siever, R. Sand and Sandstone, London, 1985.
3. Press, F. Siever, R. The Earth, New York, 1982.
ठाकूर, अ. ना.