वाळीत टाकणे : या संकल्पनेचा अर्थ सामाजिक संकेत, रूढी वा त्या त्या समाजातील प्रसृत धर्म यांचे पालन न करणाऱ्या व्यक्तीला जातिबहिष्कृत करणे, असा आहे. आतापर्यंत वाळीत टाकण्याची शिक्षा हिंदू समाजात त्या त्या जमातीत विशिष्ट अपराधाकरिता अपराधी व्यक्तीला देत असत. निरनिराळ्या जमातींत आपापले निर्बंध किंवा विधिनिषेध सदस्य व्यक्तींकडून पाळले जावेत, याबद्दल त्या दक्ष असत. उदा., दक्षिणेतील ब्राह्मण जमातीत मांसाहार निषिद्ध मानीत. हा निषेध वाळीत टाकण्याइतका कडक असे. ब्राह्मण विधवाविवाह निषिद्ध मानीत. त्याबद्दल शंभर वर्षांपूर्वी महाराष्ट्रात व भारतात नव्या युगाला अनुसरून सुधारक व सनातनी असे गट पडले होते. त्यासंबंधी चर्चा आणि वादविवाद सामुदायिक स्वरूपात झालेले आहेत. धर्मशास्त्र विषयातील संदर्भात सविस्तर चर्चेकरिता जनभाषेत प्रसिद्ध झालेली अनेक पुस्तके आहेत. वाळीत टाकणे म्हणजे जमातीच्या सदस्यत्वाचा अधिकार काढून घेणे आणि जमातीतील प्रतिष्ठा नष्ट करणे, ही गोष्ट अगदी अलीकडे आधुनिक शिक्षणाचा प्रसार झालेल्या हिंदू जमातींमध्ये परिणामशून्य झाली आहे. वाळीत टाकण्याची शिक्षा आधुनिक शिक्षण ज्यांच्यात कमीजास्त प्रमाणात पसरले आहे, त्यांच्यामध्ये महत्त्वाची राहिली नाही. जुन्या जमान्यात जे निर्बंध जमातीच्या दृष्टीने फार महत्त्वाचे मानले जात, त्यांचा महिमा आता संपला आहे.
वाळीत टाकण्याचे एक अत्यंत महत्त्वाचे उदाहरण म्हणजे ज्ञानेश्वरांच्या आईवडिलांनी महत्त्वाचा निर्बंध मोडला. ज्ञानेश्वरांच्या वडिलांनी संन्यास घेतल्यानंतर पुन्हा गृहस्थाश्रमाचा स्वीकार केला आणि पुढे त्यांना निवृत्ती, ज्ञानदेव, सोपानदेव व मुक्ताबाई अशी चार अपत्ये संन्यासातून परतल्यानंतर झाली. ही गोष्ट ब्राह्मणत्वाच्या प्रतिष्ठेला शोभणारी नाही, म्हणून त्यांना उपनयनाचा अधिकार दिला गेला नाही. ती शूद्रसमानच होत, असे धर्मशास्त्र सांगते मरेपर्यंत त्यांच्या आई-वडिलांनाच वाळीत टाकले होते. ही शिक्षा त्यांना भोगावी लागली. या शिक्षेला ‘मरणान्त शिक्षा’ असेच म्हणतात. विठ्ठलपंत व रखुमाई यांनी काशीस जाऊन गंगेत देहत्याग केला, अशीही नोंद आहे. अशाच प्रकारची अलीकडच्या काळातील काही उदाहरणे या संदर्भात देता येतील. उदा., पंचहौद मिशन चहा पार्टीतील (१८९०) लोकमान्य टिळक आणि न्या. महादेव गोविंद रानडे यांचा सहभाग व त्याविषयीची तत्कालीन समाजाची प्रतिक्रिया किंवा बराच काळ गाजलेले बोहरा समाजातील वाळीत टाकण्याचे प्रकरण इत्यादी.
सामाजिक संकेत विस्तृत स्वरूपात आणि जीवनाच्या सर्व अंगोपांगांना अनुलक्षून प्रसृत झालेले असतात. त्यांच्या पालनामुळे सामाजिक स्थैर्य निर्माण होते, अशी समाजाची दृढ श्रद्धा आहे. याउलट या संकेतांचे पालन केले नाही, तर सामाजिक स्थैर्याला तडा जाण्याची शक्यता निर्माण होते. साहजिकच समाज अशा प्रकारचे वर्तन घडू नये, म्हणून विशेष दक्षता घेतो. सामाजिकीकरणाच्या या प्रक्रियेमुळे सर्वांना सामाजिक संकेतांचे पालन करणे आपाततः शक्य होते परंतु व्यक्ति-वैशिष्ट्ये व निरनिराळ्या प्रासंगिक गरजा यांमुळे अनेकदा सामाजिक संकेतांचे उल्लंघन होते. उदा., एखादी व्यक्ती परदेशगमन करून परत आल्यानंतर तिच्या आहार-वर्तन-वेष-विचारांत आमूलाग्र बदल होतात आणि खाणे-पिणे-पोशाख, सामाजिक संबंध, विवाहपद्धती इत्यादींत नवीन कल्पना प्रविष्ट होऊन त्या आचरणात आणण्याचा प्रयत्नही केला जातो. परिणामतः मूळ सामाजिक संकेतांना धक्का बसतो. यासाठी समाज काही उपाययोजना करतो आणि सर्वसाधारणतः परंपरागत संकेत पाळले जावेत, अशी व्यवस्था त्या समाजाकडून केली जाते. अशा संकेतांचे पुनःपुन्हा उल्लंघन झाले, तर सर्वांत कडक शिक्षा म्हणजे, अशा लोकांना समाज वाळीत टाकतो. साधारणतः व्यक्ती ही समाजावर अवलंबून असते, त्यामुळे वाळीत टाकणे ही सर्वांत कडक शिक्षा मानली जाते. या शिक्षेमुळे व्यक्तीचा समाजाशी असलेला संबंध पूर्णतः तोडण्यात येतो आणि त्या व्यक्तीच्या कोणत्याच गरजा भागविल्या जात नाहीत. साहजिकच या शिक्षेमुळे अशा व्यक्तीवर किंवा गटावर समाजाचे दडपण आणले जाते. वाळीत टाकणे हे समाज नियंत्रणाचे एक अत्यंत प्रभावी साधन आहे.
पाश्चिमात्य देशांत कोणत्याही चर्चचा वा धर्मसंस्थेचा सदस्य असलेल्या व्यक्तीस धर्माची निंदा वा कुचेष्टा केल्यास विश्वासू सख्यसंबंधांतून (कम्यून्यन) तात्पुरते वा दीर्घकाळ वगळण्यात येते आणि ती व्यक्ती धार्मिक हक्क, विशेष अधिकार व प्रासादिक फायदे यांना वंचित होते. प्राचीन काळी ग्रीक व रोमन संस्कृतीत तसेच पेगन अनुयायांत, ज्यू व ख्रिस्ती धर्मांत आणि विशेषतः आदिम समाजांत ही पद्धत रूढ होती. प्रदेशपरत्वे आणि त्या त्या धर्मातील संकेतांप्रमाणे या पद्धतीत फरक आढळतो. ऑर्थडॉक्स, अँग्लिकन, रोमन कॅथलिक या पंथांच्या चर्चची व्यवस्था कमीअधिक प्रमाणात या पद्धतीच्या बाबतीत सारखीच आहे. रोमन कॅथलिक पंथीयांत एखाद्याने पोपच्या अधिकारावर हल्ला केल्यास किंवा ईश्वराची निंदा वा कुचेष्टा करण्याचे धाडस केल्यास, ती व्यक्ती वाळीत टाकली जाते. ख्रिस्ती धर्माप्रमाणे वाळीत टाकलेला माणूस चर्चमधील मूलभूत हक्कांस पारखा होतो परंतु त्याचे बाप्तिस्मा-संस्कार नष्ट होत नाहीत. रोमन कॅथलिक चर्चची या संदर्भातील विद्यमान नियमावली, कोड ऑफ कॅनन लॉ (१९१८) या ग्रंथातील २२५७-२२६७ या कॅनन्समध्ये (शास्त्रनियम) उद्घृत केलेली आहे. सक्षम धर्माधिकाऱ्याच्या आदेशाने शिक्षा भोगणाऱ्या माणसाने क्षमेची याचना केल्यानंतर काही वेळा ही शिक्षा रद्दही करण्यात आली आहे. पूर्वी वाळीत टाकलेली व्यक्ती मरण पावली असता, तिचे दफन पवित्र भूमीत करण्यास परवानगी नव्हती परंतु या कडक धोरणात बरेच फेरफार झाले असून या शिक्षेचे सर्व अधिकार चर्चच्या प्रार्थना समाजाकडे (काँग्रिगेशन) सुपूर्द केलेले आहेत. कॅनन लॉच्या सुधारित नियमावलीवर दुसरे पोप जॉन पॉल यांनी जानेवारी १९८३ मध्ये संमतिदर्शक स्वाक्षरी केली. या नियमावलीत वाळीत टाकण्याच्या शिक्षेस पात्र होणारी कारणे ३७ वरून ७ पर्यंत मर्यादित केलेली आहेत. त्यामुळे अलीकडे अशा प्रकारची प्रकरणे अत्यल्प प्रमाणात घडतात.
आदिवासींमध्येही वाळीत टाकण्याची कडक शिक्षा प्राचीन काळापासून प्रचारात असल्याचे अनेक दाखले मिळतात. आदिम लोकांचे जीवन प्रचलित रीतिरिवाजांना अनुरूप असे असते. रीतिरिवाजांच्या विरुद्ध वर्तन करण्यास कोणतीही व्यक्ती सहसा धजत नाही कारण रीतिरिवाज हे धर्माशी संबंधित असतात आणि त्यांचे उल्लंघन कोणत्याही एखाद्या व्यक्तीने केल्यास दैवी प्रकोप सर्व समाजावर होतो, अशी त्या लोकांची धारणा असते. जमात पंचायतीचा निर्णय मान्य करून त्याप्रमाणे शिक्षा भोगणे, हे प्रत्येक व्यक्तीचे आवश्यक कर्तव्य मानले जाते व पंचायतीचा निर्णय अंमलात न आणणाऱ्या इसमांना वाळीत टाकण्याची किंवा त्यांच्याशी कसलाही सामाजिक संबंध न ठेवण्याची कडक शिक्षा दिली जाते.
संदर्भ : 1. Helm, Kenneth, Eucharist and Excommunication: A Study in Early Christian Doctrine and Discipline, Frankfurt, 1973.
2. Hyland, F. E. Excommunication: Its Nature, Historical and Effects, Washington, 1928.
देशपांडे, सु. र.