वाहू : (पेटो). या माशाचा समावेश स्काँब्रिडी कुलात होत असून अकँथोसिबियम सोलँडेरी हे याचे शास्त्रीय नाव आहे. उघड्या समुद्रात राहणे याला आवडते व हा इतरत्र आढळत नाही. याचे शरीर काहीसे लांबोडके असते. मुखविदर (तोंडातील फट) खोलसर गेलेले व जबड्यावरील दात मोठे व बळकट असून जिभेवरील दात अणकुचीदार असतात. याच्या पाठीवर दोन पर म्हणजे हालचालींस व तोंड सांभाळण्यास उपयुक्त स्नायुमय घड्या असतात. पहिल्या परातील काटे कमकुवत असतात. पहिला पर दुसऱ्या पराच्या सुरुवातीपर्यंत पोहोचलेला असतो. दुसऱ्या परात पहिल्या परातील काट्यांपेक्षा जास्त किरण असतात. दुसऱ्या पराच्या व ढुंगणावरील पराच्या मागे सात किंवा अधिक छोटे पर असतात. खवले असल्यास अल्पविकसित असतात. शेपटीच्या खंडांच्या दोन्ही बाजूंवर आडे असते.

वाहूवाहूचा रंग पाठीवर प्रशियन निळा, दोन्ही बाजू व खालच्या बाजूस तो रुपेरी असून रंग एकमेकांपासून हिरव्या रंगाच्या एका रुंद पट्टीने अलग केलेले असतात. याची लांबी कमीत कमी १८० सेंमी. पर्यंत व वजन ५६ किग्रॅ. असते. हा आपले अन्न पकडताना हवेत कसरत करीत उड्या घेताना बहुधा नजरेस पडतो. हा उत्तम क्रीडामत्स्य तसेच चांगला खाद्यमत्स्यही आहे. योग्य आकारमानाचे हे मासे मासळींमध्ये सर्वांत रुचकर समजले जातात.  ४५ – ७५ सेंमी. लांबीचे मासे खाण्यासाठी अगदी योग्य समजले जातात. ३० सेंमी. पेक्षा कमी लांबीच्या माशाचे मांस कोरडे असते व ७५ सेंमी.पेक्षा जास्त लांबीच्या माशाचे मांस चरबरीत असते.

जमदाडे, ज. वि.