वाहक वृंद : उच्च मानलेल्या वनस्पतींत प्राथमिक ⇨ प्रकाष्ठ (पाण्याची ने आण करणारे व मजबुती देणारे घटक) व ⇨ परिकाष्ठ (अन्नरसाची ने-आण करणारे घटक) यांची मांडणी भिन्न असते. पाणी व अन्नरसाची ने-आण करणारी ही दोन्ही ऊतके (समान रचना व कार्य असलेले कोशिकांचे-पेशींचे-समूह) परस्परांभोवती असून त्यांचा वनस्पतीच्या अक्षात भरीव किंवा पोकळ चितीय (दंडगोलासारखा) स्तंभ असतो अथवा त्यांच्या स्वतंत्र व स्पष्ट पट्ट्या असून त्यांची मांडणी वर्तुळाकार व इतर केंद्रवर्ती ऊतकाबाहेर असते. कधी विशिष्ट प्रकारे ते रंभामध्ये [वाहक ऊतकांच्या व्यूहात ⟶ रंभ] समाविष्ट असतात. सर्व पट्ट्या मिळून वाहक ऊतक तंत्र (संस्था) बनते. या पट्ट्यांशी संलग्न असलेल्या इतर दुय्यम प्रकारच्या ऊतकांसह (किंवा त्यांशिवाय) त्यांना वाहक वृंद म्हणतात. खोड, देठ किंवा मूळ यांच्या आडव्या छेदामध्ये, सूक्ष्मदर्शकाने पाहिल्यास, वाहक वृंदातील कोशिकांची संख्या कमीजास्त दिसते. तसेच प्रकाष्ठ व परिकाष्ठ यांचे प्रमाणही सारखे नसते. यांचे पट्टीतील परस्पसापेक्ष स्थान, ते ज्या इंद्रियात आढळतात त्यावर व त्या वनस्पतीच्या कुलावर अवलंबून असते. मात्र बहुधा त्या इंद्रियात व कुलात ते नेहमीच तसे असते. सामान्यतः प्रकाष्ठ व परिकाष्ठ परस्परांशेजारी एकाच त्रिज्येवर असतात. यामध्ये प्रकाष्ठ अवयवाच्या आतल्या बाजूस (मध्याकडे) व परिकाष्ठ बाहेर असल्यास, तो वाहक वृंद संलग्न (उदा., सूर्यफूल) व परिकाष्ठ दोन्ही बाजूंस असल्यास द्विसंलग्न (उदा., काकडी), दोन्ही ऊतकांपैकी एक दुसऱ्याभोवती असल्यास ‘एकमध्य वाहक वृंद’ म्हणतात. हे दोन प्रकारचे असून एकात प्रकाष्ठ परिकाष्ठाभोवती असल्यास त्याला ‘मध्यपरिकाष्ठक’ (उदा., कॉर्डिलीन) व दुसऱ्यात परिकाष्ठ प्रकाष्ठाभोवती असल्याने त्याला ‘मध्यप्रकाष्ठक’ (उदा., अनेक नेचे) म्हणतात. प्रकाष्ठ व परिकाष्ठ यांची मांडणी भिन्न त्रिज्येवर असल्यास ती मांडणी ‘अरीय’ होते, यालाच पूर्वी ‘अरीय वाहक वृंद’ म्हणत व ते बहुतेक मुळात आढळतात. एकाच त्रिज्येवर व परस्परांशी भिडलेल्या प्रकाष्ठ आणि परिकाष्ठाच्या मांडणीमुळे ‘संयुक्त वाहक वृंद’ बनतो.
वाहक वृंदात कमीजास्त प्रमाणात आधार ऊतक आढळते व त्यात दृढसूत्रे (कठीण तंतू) असतात. कधी त्यांचे भोवती पूर्ण आवरण असते, तर कधी वृंदाच्या प्रकाष्ठाबाहेर किंवा परिकाष्ठाबाहेर त्यांची पट्टी असते. तिला वृंदत्राण म्हणतात, कारण आडव्या छेदात ती पट्टी टोपीसारखी असते.
खोड किंवा मुलाच्या टोकाशी असलेल्या विभज्येतील (सतत नवीन कोशिकांची निर्मिती असलेल्या भागातील) पूर्वोतककर (वाहक वृंद निर्मिणारा कोशिकांचा थर) पट्टीपासून प्राथमिक वाहक वृंदाचा विकास होतो. त्यामध्ये विभज्येचा काही भाग शिल्लक राहून त्यापासून सतत प्रकाष्ठ व परिकाष्ठ निर्मिती होत राहिल्यास त्या वृंदाला ‘वर्धी’ व तसा भाग शिल्लक न राहिल्यास ‘अवर्धी’ म्हणतात. अवर्धी प्रकार बहुतेक सर्व एकदलिकित वनस्पतीत व वाहिनीवंत अबीजी वनस्पतींत आढळतो. बहुतेक सर्व द्विदलिकित व प्रकटबीजी वनस्पतींत वर्धी प्रकार आढळतो व त्यामुळे द्वितीयक वाढीस मदत होते.
पहा : परिकाष्ठ प्रकाष्ठ रंभ विभज्या शारीर, वनस्पतींचे.
संदर्भ : Eames, A. J. MacDaniels, L. H. An Introduction to Plant Anatomy, Tokyo, 1953.
परांडेकर, शं. आ.
“