वासुदेवन् नायर, एम्. टी.: (१५ जुलै १९३४ – ). विख्यात मलयाळम् लेखक. कुडल्लूर, केरळ येथे एका शेतकरी कुटुंबात जन्म. शिक्षण बी. एस्‌सी. त्यांनी प्रारंभी काही काळ शिक्षक म्हणून काम केले. नंतर त्यांनी मातृभूमी साप्ताहिकात सुरुवातीला उपसंपादक व पुढे १९६९ ते १९८१ या काळात संपादक म्हणून नोकरी केली. त्यांनी १९५० च्या दशकात लेखनास सुरुवात केली. उमेदवारीच्या काळात त्यांना खूप झगडा करावा लागला. त्यांच्या प्रारंभीच्या लेखनावर प्रख्यात मलयाळम् साहित्यिक ‘उरूब’ यांचा प्रभाव जाणवतो. त्यांचे लेखन विपुल व वैविध्यपूर्ण आहे. त्यात नालुकेट्‌टु (१९५८), असुरवित्तू (१९६२), मञु (१९६४), कालम् (१९६९), विलापयात्रा (१९७८) इ. कादंबऱ्या वेयिलुम् निलावुम् (१९५४), वेदनयुटे पूक्कळ (१९५५), ओळवूम तीरवुम (१९५७), कुटि्टयेडथी (१९५९), नष्टपेट्ट दिवसंगळ (१९६०), बंधनम् (१९६३), पतनम् (१९६६), वारीक्कुझी (१९६७), अज्ञातंते अ‌यरात्त स्मारकम् (१९७३) इ. कथासंग्रह प्रमुख आहेत. त्यांचा काथीकंते पणिप्पुरा हा वाङ्‌मयनिर्मितीच्या प्रक्रियेची मीमांसा करणारा लेखसंग्रह आहे. हेमिंग्वे-ओरू मुखखुरा (१९६४) हा हेमिंग्वेच्या साहित्याविषयीचा परिचयपर व मूल्यमापनात्मक ग्रंथ आहे. रण्डामूळम् ह्या ग्रंथात त्यांनी भीमसेनाच्या दृष्टिकोणातून महाभारताचा आढावा घेतला आहे. त्यांचे आळक्कुट्टत्तिल तनिये (१९७२) हे आगळेवेगळे व रोचक असे प्रवासवर्णन आहे.

एम्. टी. यांचा जन्म ज्या सनातन कुटुंबात झाला, त्या कुटुंबजीवनातील कर्मठ वातावरणाशी निगडित असलेले बालपणीचे अनुभव त्यांच्या साहित्यातून व्यक्त झाले आहेत. सरंजामशाही व्यवस्थेला धक्के देणाऱ्या सामाजिक शक्तिस्त्रोतांचे दर्शन त्यांच्या कादंबऱ्यांतून घडते, तसेच आर्थिक-सांस्कृतिक आघात सोसणाऱ्या मध्यमवर्गीय कुटुंबातील व्यक्तींचे चित्रणही आढळते. कौटुंबिक जीवनातील संघर्ष व ताणतणाव हा विषय त्यांच्या लेखनात वारंवार डोकावतो. नालुकेट्‌टु या त्यांच्या गाजलेल्या कादंबरीत एकत्रित नायर कुटुंबाच्या ऱ्हासाचे चित्रण आहे. त्याचबरोबर  ही एकत्र कुटुंबपद्धती ज्या सरंजामशाही प्रवृत्तीचे प्रतीक आहे, त्या सरंजामशाहीचा विनाशही त्यातून सूचित केला आहे. अप्पुण्णी ही कादंबरीतील नायकाची मध्यवर्ती व्यक्तिरेखा अशा दोन जगांच्या कात्रीत सापडली आहे, की त्यांपैकी एक जग नष्ट होण्याच्या मार्गावर आहे व दुसरे अद्याप उदयास यावयाचे आहे. अशा संक्रमणकाळाचे चित्रण एका तरुण संवेदनक्षम व्यक्तीच्या जीवनात त्याचे जे पडसाद उमटतात, त्याच्या आधारे या कादंबरीत केले आहे. असुरवित्तूमध्ये मानसिक विकृतीच्या चित्रणाद्वारे कौटुंबिक तणाव व्यक्त केला आहे. त्यांच्या कालम् या कादंबरीतील नायक सर्व पारंपारिक मूल्ये नाकारून, सत्ता, वैभव व सुख मिळवण्याचे बाजारी मार्ग अवलंबतो पण या मार्गात त्याच्या वाट्याला यातनाच येतात. विलापयात्रा या कादंबरीत काम्यूच्या आउटसायडर कादंबरीतील न-नायकाच्या पावलावर पाऊल टाकून मार्गक्रमण करणारा न-नायक रंगविला आहे. त्यांच्या मञु (म. शी. बर्फ) या कादंबरीत विमला नामक तरुणीचे मानसिक चित्रण आहे. तिची तिच्या कुटुंबापासूनची तुटलेपणाची भावना तिला एकांतवासात राहण्यास भाग पाडते. ही कादंबरी दार्जिलिंगच्या बर्फमय वातावरणाच्या पार्श्वभूमीवर चित्रित केली आहे. या कादंबरीतील संज्ञाप्रवाहात्मक चित्रण विशेष लक्षणीय आहे.

एम्. टी. हे मलयाळम् लघुकथेतील आधुनिक प्रवाहांचे दर्शन घडवणारे प्रातिनिधिक कथाकार होत. ग्रामीण कुटुंबांतील युवकांच्या व्यथांचे चित्रण ते आपल्या कथांतून करतात, त्यांत एक नवी संवेदनक्षमता  प्रत्ययास येते. ऱ्हासाला लागलेल्या नायर कुटुंबांचे व त्यांतील यातनापीडित स्त्रीपुरुषांचे प्रभावी चित्रण त्यांच्या कथासाहित्यात आढळते. भौतिक सुखांना अवास्तव महत्त्व देणाऱ्या आधुनिक जगात मानवी मूल्यांचे जे अधःपतन झालेले दिसून येते, त्याचे विदारक दर्शन त्यांच्या कथांतून घडते. त्यांच्या नालुकेट्‌टु कादंबरीस केरळ साहित्य अकादेमीचा पुरस्कार (१९५८), कालमला साहित्य अकादेमी पुरस्कार (१९७१), रण्डामूळमला वयलार पारितोषिक, तसेच ज्ञानपीठ पुरस्कार (१९९५) इ. मानसन्मान त्यांना लाभले.

एम्. टी. हे ख्यातनाम पटकथाकार असून त्यांनी आठ मलयाळम् चित्रपटांच्या पटकथा लिहिल्या गेल्या. त्यांच्या कथा असलेले मुरप्पेण्णू (१९६५), इरूट्टिन्डे आत्माऊ (१९६६), ओळवूम तीरवूम (१९६९) इ. चित्रपट गाजलेले आहेत. त्यांच्या काही पटकथांना व चित्रपटांना राज्य व राष्ट्रीय पातळीवरची पारितोषिकेही लाभली आहेत. त्यांनी दिग्दर्शित केलेल्या निर्माल्यम् चित्रपटास राष्ट्रपती सुवर्णपदक मिळाले (१९७३). त्यांनी फिल्म वित्त महामंडळाचे संचालक (१९६८ – ७२), तसेच चित्रपट अभ्यवेक्षण मंडळाचे सदस्य (१९८० – ८२) म्हणूनही कार्य केले आहे.

इनामदार, श्री. दे.