वालचंद हिराचंद : (२३ नोव्हेंवर १८८२-८ एप्रिल १९५३). आधुनिक भारताच्या औद्योगिकीकरणाचे प्रमुख शिल्पकार तसेच वालचंद उद्योगसमूहाचे संस्थापक. पूर्ण नाव वालचंद हिराचंद दोशी. जन्म सोलापूर येथे. गुजरात राज्यातील ईडर भागातून जी अनेक जैन कुटुंबे दक्षिण महाराष्ट्रात येऊन स्थिरावली, त्यांपैकी वालचंद हिराचंद यांचे एक कुटुंब होय. वालचंदांचे आजोबा नेमचंद यांनी फलटण येथे प्रथम सूत व कापड यांचा आणि नंतर पिढीजाद सराफीचा व्यवसायही चालू केला. वालचंदांच्या वडिलांचे नाव हिराचंद, तर आईचे राजुबाई. वालचंदांच्या जन्मानंतर अवघ्या पंधरा दिवसांतच त्यांच्या मातेचे निधन झाले. पुढे त्यांचा प्रतिपाळ त्यांच्या चुलतीने केला. हिराचंद प्रथम सोलापूरमधील मोरारजी गोकुळदास यांच्या कापडगिरणीत सराफी अडत्या म्हणून काम करीत होते. स्वकर्तृत्वावर हिराचंदांनी औरंगाबाद,सोलापूर आणि मुंबई येथे व्यावसायिक कौशल्याने अनेक उद्योग उभारले.
वालचंद यांचे शिक्षण औरंगाबाद, सोलापूर, मुंबई व पुणे येथे झाले. तथापि प्लेगच्या साथीत त्यांचे दोन कर्ते भाऊ अचानक वारल्याने, वालचंद यांनी शिक्षण अर्धवट सोडून वडिलांच्या व्यवसायात लक्ष घालण्याचे ठरविले. तथापि सराफी व्यवसायात त्यांचे मन रमले नाही. त्यांनी मक्तेदारीच्या व्यवसायावर लक्ष केंद्रित करण्याचे ठरविले. रेल्वेची कामे ठेकापद्धतीने घेऊन ती स्वतःच्या आर्थिक बळावर व धाडसावर यशस्वी रीत्या पार पाडणारे व्यावसायिक लक्ष्मण बळवंत फाटक (१८७४-१९३५) व वालचंद या दोघांनी मिळून प्रथम येडशी ते तडवळ हा सु. ११ किमी. लांबीचा रेल्वेमार्ग (पुढे ‘बार्शी लाइट रेल्वे’ म्हणून ओळखला जाणारा) बांधला. पुढे त्यांना रेल्वेची अनेक कामे मिळत गेली. बोरीबंदर ते करीरोड यांदरम्यानचे, दुहेरी रूळमार्ग (चार रूळांचा मार्ग) तयार करण्याचे काम (१९०५), तसेच हार्बर शाखेचे रे रोड-कुर्ला हे रूळमार्गाचे कामही कमी वेळात व कमी खर्चात वालचंदांनी पूर्ण केले व त्यांतून भरपूर फायदाही मिळविला. पूर्वीची जुनाट कार्यपद्धती, साधने व धोरणे यांचा त्याग करून वालचंद यांनी सुधारित पद्घती व अवजारे, नवीन प्रगत तंत्रे व दूरदर्शी धोरणे यांचा अंगीकार केल्यामुळेच त्यांना यश लाभले. फाटक-वालचंद जोडीने १९१२ च्या सुमारास ठेकेदार म्हणून खूप प्रतिष्ठा मिळविली.
वालचंदांच्या भागीदारी कंपनीने कमी स्पर्धेची लहान रेल्वेकंत्राटे मिळवून ती यशस्वीपणे पार पाडली. तो काळ म्हणजे जगभर तसेच भारतातही बांधकाम-उद्योगाचा अतिशय भरभराटीचा व तेजीचा काळ होता. यामुळेच ‘फाटक वालचंद’ ही कंपनी झपाट्याने कामे मिळवून ती सक्षमतेने पूर्ण करीत गेल्याने तिचा वेगाने विकास होत गेला. पहिल्या महायुद्ध काळात बांधकाम-क्षेत्रातील नवनव्या संधी वालचंदांना लाभत गेल्या. मुंबई नगरपालिका, पोर्ट ट्रस्ट, सार्वजनिक बांधकाम खाते इत्यादींची बांधकामे त्यांनी उत्तम प्रकारे पार पाडली. तसेच अनेक ठिकाणी लष्करी शिपायांसाठी बराकी बांधल्या. खडकी येथील दारूगोळ्याच्या गुदामाचे धोक्याचे काम अल्प मुदतीत त्यांनी पूर्ण केले. फाटक-वालचंद कंपनीने भांडवलबाजारात आपल्या भागांची विक्री जाहीर केली, मुंबईतील ‘नेपियर फाउंड्री’ ही ओतशाला खरेदी केली, तत्कालीन मध्य प्रांतातील एका कोळसा खाणीमधील काही हक्क मिळवले, त्याचप्रमाणे नवनवीन उपकरणे खरेदी करून मोठी गुंतवणूक साध्य केली. उद्योगव्यवसायातील प्रत्येक बारीकसारीक तपशील विचारात घेऊन, तसेच नियोजित कालमर्यादा कसोशीने पाळून वालचंद यांची कंपनी उच्च दर्जाची कामे कमी दर लावून साध्य करू लागली. १९१७ च्या सुमारास फाटकांनी कंपनीतून आपली निवृत्ती जाहीर केलीतथापि कंपनीने अधिक वेगाने व जोमाने आपली कामे चालूच ठेवली.
वालचंदांच्या कंपनीचा हा विस्तार भारतातील उत्साहदायी आर्थिक वातावरणामुळे वाढतच गेला. पहिल्या महायुद्धानंतर भारतातील व्यावसायिक तेजीने अधिकच जोर धरला. ही परिस्थिती १९२० पर्यंत तेजीची राहिली. या अनुकूल वातावरणात वालचंद यांनी आपल्या उद्योगधंद्यांचे क्षितीज जहाजबांधणी, साखर-उत्पादन, बांधकाम-व्यवसाय अशा भिन्नभिन्न उद्योगशाखांमध्ये विस्तारत नेले. बांधकाम-उद्योगात विकासाला भरपूर वाव असल्याचे जमशेटजीं च्या नेतृत्वाखालील टाटा उद्योग समूहाने हेरले होते.त्यांच्याजवळ आर्थिक बळ होते,त्यामुळे टाटांनी वालचंदांबरोबर संयुक्त कंपनी-उभारणीची एक योजना आखली व त्यातून ‘द टाटा कन्स्ट्रक्शन कंपनी’ची १९२० मध्ये स्थापना झाली. वालचंदांच्या कुशल व्यवस्थापनाखाली या नव्या कंपनीला महत्त्वाची व प्रतिष्ठेची अनेक कंत्राटे मिळत गेली. ती पूर्ण केल्याने मुंबईची औद्योगिक भरभराट होण्यास चालना मिळाली. उदा., बोरघाटातील रूळमार्गाच्या विस्तारीकरणामुळे मुंबई-पुणे थेट रेल्वेवाहतूक शक्य झाली, तानसा तलावाचे बांधकाम फक्त १८ महिन्यांत पूर्ण केल्याने मुंबई शहराला निर्वेध पाणीपुरवठा होऊ शकला. याच काळात ‘द टाटा कन्स्ट्रक्शन कंपनी’ कडे सु. ३०,००० कामगार कामाला होते व तिच्या पाच उपकंपन्या होत्या. यांपैकी ‘हिंदुस्थान कन्स्ट्रक्शन कंपनी’, ‘बिल्डिंग कन्स्ट्रक्शन कंपनी’, ‘ऑल इंडिया कन्स्ट्रक्शन कंपनी’ या तीन उपकंपन्या बांधकामक्षेत्राशी संबंधित होत्या तर ‘इंडियन ह्यूम पाइप कंपनी’ व ‘मार्सलंड प्राइस कंपनी’ या दोन कंपन्या अन्य क्षेत्रांशी संबंधित होत्या. अशा प्रकारच्या साहाय्यक कंपन्यांचा गट तयार करणारे वालचंद हे देशातील पहिले प्रवर्तक होत.
दादाभाई नवरोजींच्या प्रेरणेने देशी उद्योगंधद्यांच्या भरभराटीचे स्वप्न त्यांनी आयुष्यभर जोपासले व ते प्रत्यक्षात आणण्यासाठी ते अविरत झगडत राहिले. आर्थिक स्वातंत्र्य ही राजकीय स्वातंत्र्याची पहिली पायरी होय, ही त्यांची विचारसरणी होती व त्यानुसार ब्रिटिशांच्या दास्यातून व पकडीतून भारतीय अर्थव्यवस्था मुक्त करण्यासाठी त्यांनी अखंड प्रयत्न केले. उद्योगक्षेत्रात एखादी संधी चालून आली की, वालचंद तीबाबत झटपट निर्णय घेत असत. एखाद्या प्रकल्पाबाबत वालचंदांनी एकदा निर्णय घेतला, म्हणजे त्यासाठी ते अथक व जिवापाड अखंड परिश्रम करून तो प्रकल्प पूर्ण करीत. यामुळेच वालचंदांनी स्थापलेले उद्योग टिकले, एवढेच नव्हे तर जोमाने भरभराटीस आले.
वालचंदांच्या अशा प्रकारच्या साहसी व धडाडीच्या निर्णयक्षमतेनेच त्यांना जहाजउद्योगात उडी घ्यावयास उद्युक्त केले. भारताच्या किनाऱ्यावरून चालणारी जहाजवाहतूक ही पूर्णतया ब्रिटिश जहाजकंपनीच्याच अखत्यारीत असणे, ही गोष्ट वालचंदांना सदैव खटकत होती. ही जहाजवाहतूक भारतीयांच्या हाती येण्याच्या दृष्टीने वालचंदांनी सरकारशी सतत वाटाघाटी केल्या. या गंभीर प्रश्नाला त्यांनी वृत्तपत्रांद्वारा वाचा फोडली, प्रसंगी राजकीय पुढाऱ्यांशीही संपर्क साधला. अखेर नरोत्तम मोरारजी यांच्या सहकार्याने वालचंदांनी ‘सिंदिया स्टीम नॅव्हिगेशन कंपनी’ ही भारतीय जहाजकंपनी स्थापन केली. वालचंदांच्या अथक प्रयत्नांमुळे ‘डफरिन’ ह्या बोटीवर भारतीय युवकांना नाविक शिक्षण घेण्याची सुविधा उपलब्ध झाली. याच सुमारास वालचंद हॉलंडला गेले व तेथे त्यांनी जहाजबांधणीच्या कारखान्यांचा अभ्यास केला. स्वदेशी परतल्यावर विशाखापटनम् येथे त्यांनी नौकाबांधणी केंद्र स्थापन केले. १९३० मध्ये त्यांनी भारतीय जहाजव्यापाऱ्यांची एक संघटना स्थापन केली. त्यायोगे भारतीय जहाजउद्योगास व्यापक स्वरूप प्राप्त झाले. भारतात विमाननिर्मितीचा कारखाना उभारण्याचा त्यांना सदैव ध्यास लागून राहिला होता. त्या प्रेरणेने वालचंदांनी आपला अमेरिकन मित्र पॉले याच्या साहाय्याने, तसेच म्हैसूरच्या महाराजांच्या संमतीने बंगलोर येथे विमाननिर्मितीचा कारखाना उभारला. भारतीय अभियंत्यांनी आराखडा तयार करून आणि संपूर्णपणे देशी सामान वापरून बनविलेले पहिले ग्लायडर याच कारखान्यामधून समारंभपूर्वक उडविण्यात आले.
टाटा कन्स्ट्रक्शन कंपनीतील टाटा व वालचंद यांची भागीदारी पुढे संपुष्टात आली. १९३२ मध्ये वालचंदांनी टाटांकडून प्रवर्तकाचे सर्व भाग तसेच व्यवस्थापन हक्क खरेदी केले. १९३५ मध्ये द टाटा कन्स्ट्रक्शन कंपनीचे ‘द प्रीमियर कन्स्ट्रक्शन कंपनी’ असे नामांतर करण्यात येऊन, पुढे वालचंद उद्योगसमूहाची ती प्रमुख व नियंत्रक कंपनी (होल्डिंग कंपनी) बनली. बहुतेक बांधकाम प्रकल्प हिंदुस्थान कन्स्ट्रक्शन कंपनीकडे गेले आणि वालचंद समूह हा साखर,मोटारगाड्या, अभियांत्रिकी, विमाननिर्मिती अशी विविध औद्योगिक निर्मितिक्षेत्रे काबीज करीत विस्तारत गेला. १९३८ मध्ये वालचंदांनी ‘कन्स्ट्रक्शन हाउस’ हे आपल्या समुहाचे केंद्रीय कार्यालय मुंबईत उभारले.
ब्रिटिश सरकारच्या साखरविषयक धोरणाचा लाभ उठवून वालचंदांनी ⇨रावळगाव येथे ‘रावळगाव शुगर फार्म लिमिटेड’ ही कंपनी स्थापन केली (१९३३). त्यांनी बांधकामविषयक व्यवस्थापन सुत्रे रतनचंद ह्या आपल्या कर्तबगार भावाच्या हाती सोपविली. १९२३ मध्ये वालचंदांनी नासिक जिल्ह्यातील गिरणा कालव्याजवळील रावळगाव येथील सु. ६०७ हे. पडीक जमीन काही विकत व काही भाडेपट्ट्याने घेऊन तिचे कृषियोग्य जमिनीत रूपांतर केले व तेथे आंब्याची कलमे, ऊस, कपाशी, भुईमूग इ. विविध पिके घेण्याचे प्रयोग केले. १९३३ मध्ये मात्र त्यांनी केवळ ऊसाच्या पिकावरच आपले सर्व लक्ष केंद्रित केले व साखर कारखाना उभारला. वालचंदांचे धाकटे बंधू लालचंद हिराचंद व पुतण्या गोविंद यांच्या योजनाबद्ध परिश्रमांमुळे रावळगाव कंपनीची व कारखान्याची उत्तोरत्तर भरभराट होत गेली. रावळगाव वसाहतीचे आधुनिक आदर्श व डौलदार स्वरूप आणि तेथील कारखान्याची वाखाणण्याजोगी शिस्त ह्यांचे सारे श्रेय मुख्यतः लालचंद यांच्याकडे जाते. आर्थिक व्यवहारांचे पायाशुद्ध ज्ञान,हाती घेतलेल्या उद्योगांशी निगडित अशा सर्व बाबींचा सखोल अभ्यास करण्याची प्रवृत्ती, सततची उद्योगमग्नता, काटेकोर शिस्त आणि संघटनाकौशल्य या लालचंदांच्या अलौकिक गुणांमुळे वालचंदांना त्यांचा फार आधार वाटे. १९२८ ते ३६ ह्या काळात रावळगाव फार्मचा कारभार लालचंदांच्या संचालकत्वाखाली उत्तम प्रकारे चालला. रावळगाव फार्म हे केवळ व्यापारी तत्त्वावर ऊस व साखर यांचे उत्पादनक्षेत्र न बनता, कृषिशास्त्रविषयक संशोधनाचे प्रयोगक्षेत्रही बनावे, अशी वालचंदांप्रमाणेच लालचंद यांचीही तळमळ व इच्छा होती. रावळगावप्रमाणेच अन्यत्र आणखी एक साखर कारखाना उभारण्याच्या उद्देशाने, वालचंद यांनी पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील कळंब या खेड्याच्या परिसरातील सु. ३६ हे. शेतजमीन खरेदीतत्त्वावर व १,४०० हे. भाडेपट्ट्याने घेऊन तेथे साखर कारखाना उभारला (१९३४). येथील ऊसमळा व त्यासोबतचा कारखाना यांची उत्तरोत्तर भरभराट होऊन ⇨ वालचंदनगर या नव्या उद्योगनगरीचा उदय झाला. खडीसाखर व मेवा-मिठाई, मेण (साखरेच्या मळीपासून), कार्डबोर्ड व कागद (ऊसाची चिपाडे व चोयट्या यांपासून), अल्कोहॉल (मळीपासून) यांसारखे अनेक दुय्यम उद्योगधंदे तेथे भरभराटीस आले. वालचंद यांचे बंधू गुलाबचंद यांनी लीव्हर ब्रदर्सच्या ‘डालडा’ या उत्पादनाबरहुकूम ‘वाल्डा’ या नावाने बाजारात वनस्पती तूप विक्रीस आणले. गुलाबचंदांनी सुरू केलेल्या वनस्पती तुपाच्या पाठोपाठ साबण व डबे यांचे उत्पादनही कारखान्यातून होऊ लागले. दुसऱ्या महायुद्धाच्या अखेरीस कृषीवर आधारित अनेक उद्योगधंद्यांचे नगर म्हणून वालचंदनगरचा कायापालट व विकास झाल्याचे दिसून येते.
भारत सरकारने पंचवार्षिक योजनांच्या काळात राष्ट्रीय दृष्टिकोनातून नियोजिलेल्या महत्त्वाच्या प्रकल्पांमध्ये (उदा., महाराष्ट्र राज्यातील कोयना प्रकल्प, ल कॉर्ब्यूझ्ये यांनी उभारलेली पंजाबची राजधानी चंडीगढ, भिलाई पोलाद कारखाना, दामोदर खोरे योजना इ.) वालचंदांच्या हिंदुस्थान कन्स्ट्रक्शन कंपनीने भाग घेऊन आपला ठसा उमटविला. तसेच आखाती देशांनी योजिलेल्या प्रचंड बांधकाम प्रकल्पांमध्येही या कंपनीने मोठ्या प्रमाणात वाटा उचलला.
जागतिक स्तरावर जर्मनीत १८८५ मध्ये मोटार – उत्पादनास प्रारंभ झाला असला तरी भारतात तिचे उत्पादन त्यानंतर सु. ६० वर्षांनी आणि तेही वालचंदांच्या प्रयत्न- प्रेरणांनीच शक्य झाले. १९४४ मध्ये वालचंदांनी ‘प्रीमियर ऑटोमोबाइल्स लि.’ (‘पाल’) हा मोटारींची निर्मिती करणारा कारखाना मुंबई येथे २.२ कोटी रु. भांडवलावर उभारला. प्रथम प्रीमियर कंपनी प्लिमथ, डॉज, देसोटा, फियाट यांसारख्या यूरोपीय कंपन्यांच्या मोटारगाड्यांची दुरुस्ती व जुळणी ही कामे करीत असे. भारत स्वतंत्र झाल्यानंतर प्रीमियर कंपनीने अमेरिकेची ‘क्राइस्लर कॉर्पोरेशन’ आणि इटलीची ‘फियाट कंपनी’ या जगप्रसिद्ध मोटारकंपन्यांशी संयुक्त करार करून भारतात मोटारगाड्यांची निर्मिती करण्यास प्रारंभ केला. भारतीयांनी प्रत्येक गोष्टीबाबत परदेशावर विसंबून न राहता उद्योगधंद्यांत स्वावलंबी बनण्याचा प्रयत्न सातत्याने केला पाहिजे. असे वालचंदांचे मत होते. वैयक्तिक लाभ बाजूला सारून देशहिताचा व्यापक दृष्टिकोन त्यांनी सदैव आपल्यासमोर ठेवला होता आणि त्याप्रमाणे ते सतत कार्यरत राहिले. रेयॉन कापडाचे उत्पादन भारतात चालू करण्याच्या दृष्टीने वालचंदांनी काही उद्योगपतींच्या सहकार्याने ‘नॅशनल रेयॉन कॉर्पोरेशन’ हा उद्योग उभारला. बँका व विमा कंपन्या अधिकाधिक प्रमाणात आत्मनिर्भर होण्याच्या दृष्टीने, तसेच देशी उद्योगांना संरक्षण मिळावे, म्हणून वालचंदांनी अथक प्रयत्न केले.
वालचंदांची स्वदेशहितविषयक तळमळ व आस्था त्याचप्रमाणे त्यांनी धाडसाने सुरू केलेले अनेक उपयोग यांमुळे त्यांना अनेक मानसन्मान प्राप्त झाले. सोलापूर नगरपालिकेचे सदस्य म्हणून ते सतत २५ वर्षे कार्य करीत होते (१८८२ – १९०८). ब्रिटिश सरकारने स्थापिलेल्या (१९२९) शेती संशोधन संस्थेच्या प्रशासकीय मंडळावर त्यांची नियुक्ति करण्यात आली होती. ‘महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स’ (१९२७) या त्यांनीच स्थापन केलेल्या संस्थेचे ते १९३८ पर्यंत अध्यक्ष होते. अखिल भारतीय व्यापार व वाणिज्य मंडळांच्या महासंघाचेही अध्यक्षपद (१९३२-३३) त्यांनी भूषविले. आंतरराष्ट्रीय वाणिज्य मंडळाचेही ते दोन वर्षे उपाध्यक्ष होते (१९३४-३५ व १९३६-३७). जिनीव्हा येथे १९३१ साली भरलेल्या आंतरराष्ट्रीय मजूरसंघाच्या अधिवेशनास वालचंद हे भारतीय उद्योगधंद्यांचे प्रतिनिधी म्हणून उपस्थित होते. ‘ओरिएंटल’ या भारतीय विमा कंपनीचे संचालक म्हणून ११ वर्षे, तर ‘बँक ऑफ बडोदा’चे अध्यक्ष (१९३६-३९) म्हणून त्यांनी काम केले. वालचंद यांनी खूप संपत्ती कमावली पण त्यांची राहणी अगदी साधी होती. ते नेहमी खादी वापरीत. त्यांनी जवळजवळ जगभर प्रवास केला होता. त्यांची मित्रसंपदा मोठी होती. भिन्नभिन्न क्षेत्रांमधील व्यक्तींशी त्यांचे स्नेहसंबंध होते.
अशा प्रकारे आधुनिक औद्योगिक भारताचा नव-इतिहास घडविणारे साहसी, कर्तबगार उद्योगपती म्हणून वालचंद यांचे स्थान अढळ आहे. जमशेटजी टाटा ह्यांच्यानंतर भारतात अनेक मूलभूत उद्योगांचे प्रवर्तन करणाऱ्या उद्योजकांमध्ये ते अग्रणी होते. आपल्या गतिमान व सर्जनशील बुद्धिमत्तेच्या व कर्तृत्वाच्या बळावर त्यांनी भारतात एका नव्या औद्योगिक युगाचा प्रारंभ केला. ब्रिटिशांच्या आर्थिक शोषणातून भारताला मुक्त करून आर्थिक स्वातंत्र्य मिळवून देण्याच्या उच्च ध्येयापोटीच त्यांनी अनेक नवनव्या उद्योगधंद्यांचे साहसी उपक्रम हाती घेऊन ते यशस्वी रीत्या पार पाडले. वालचंदांचे निधन सिद्धपूरा (गुजरात राज्य) येथे झाले.
वालचंदांच्या पश्चात सबंध उद्योगसमूहाचा कार्यभार त्यांचे बंधू लालचंद ह्यांनी कौशल्याने व समर्थपणे सांभाळला व पुढे उद्योगसमूहाचा विस्तार-विकासही घडवून आणला. १९९४ मध्ये लालचंद ह्यांचे निधन झाल्यानंतर हा उद्योगसमूह दोशी घराण्याच्या नंतरच्या पिढ्यांनी सांभाळला. १९९३ मध्ये सु. ८२० कोटी रुपयांची उलाढाल असलेल्या या उद्योगसमूहाचे ‘विनोद दोशी गट’ व ‘बाहुबली गट’ अशा दोन मोठ्या गटांत विभाजन झाले.
वालचंद उद्योगसमूहात खालीलप्रमाणे प्रमुख उद्योग व त्यांची उत्पादने अंतर्भूत होतात –
(१) ॲक्रो इंडिया लि. – बांधकाम -उद्योगासाठी ॲक्रो पोलादी सांगाडे तयार करणे.
(२) बाँबे सायकल अँड मोटार एजन्सी लि. – मोटारगाड्या व वातानुकूलक यांची विक्री, दुरुस्ती व विक्रीपश्चात सेवा.
(३) कूपर एंजिनिअरिंग लि. – ज्वलन एंजिने, ओतकाम, यांत्रिक हत्यारे.
(४) हिंदुस्थान कन्स्ट्रक्शन कंपनी लि. – बांधकाम.
(५) इंडियन ह्यूम पाइप कंपनी लि. – ह्यूम पाइप, विशिष्ट पाइप.
(६) प्रीमियर ऑटोमोबाइल्स लि. – प्रवासी मोटारगाड्या व मालवाहू वाहने.
(७) प्रीमियर कन्स्ट्रक्शन कंपनी लि. – भांडवल गुंतवणूक, सल्ला, भाडेकराराने वस्तू पुरविणे (लीझिंग).
(८) रावळगाव शुगर फार्म लि. – साखर, मेवामिठाई, मेण, साखर कारखान्याची अवजड तसेच मेवामिठाईंची यंत्रसामग्री.
(९) टिवॅक इंडस्ट्रीज लि. – घड्याळे.
(१०) विक्रोळी मेटल फॅब्रिकेटर्स लि. – पोलादी बांधकामविषयक यंत्रसामग्रीचे अभिकल्प तयार करणे, जोडकाम, संपूर्ण उभारणी करणे.
(११) वालचंदनगर इंडस्ट्रीज लि. – साखर व सिमेंट संयंत्रांचे उत्पादन, अणुभट्ट्या, अवकाशयाने, खते व रसायने यांच्या प्रकल्पांसाठीची साधनसामग्री.
संदर्भ – १. खानोलकर, गं. दे. वालचंद हिराचंद – व्यक्ति, काळ व कर्तृत्व, मुंबई, १९६५.
२. भावे, सबिता, जिंकिले भूमि जल आकाश – वालचंद हिराचंद चरित्र, पुणे, १९८५.
गद्रे, वि. रा.
“