वार्ता : ‘ वार्ता’ हा शब्द सर्वसाधारणपणे बातमी, हकीकत, वर्तमान, वृत्त अशा रुढ अर्थांनी वापरण्यात येतो. ‘वृत्’ या संस्कृत धातूचा अर्थ होणे, घडणे त्यावरून ‘वृत्त’, ‘वार्ता’ हे शब्द आले. भर्तृहरीने वार्ता हा शब्द दोन भिन्न अर्थांनी वापरलेला आढळतो (सुभाषितरत्न भांडागारम् ). ‘धारणा करणे’, ‘लोकजीवन यथार्थ होणे’ हा पहिला अर्थ आणि ‘पाण्यात पडलेल्या तेलाच्या थेंबाप्रमाणे भूमीवर आपोआप पसरणारी गोष्ट’ – हा दुसरा अर्थ. ‘वार्ता’ चा इंग्रजी प्रतिशब्द ‘न्यूज’ हा लॅटिनमधील ‘नोव्हम’ (नवी गोष्ट) या शब्दावरून आला. ‘न्यू’ या इंग्रजी विशेषणाचे अनेकवचन म्हणून ‘न्यूज’ हा शब्द सोळाव्या शतकाच्या पूर्वार्धात रूढ होता. पुढे तो नाम म्हणून वापरात आला. ‘न्यूज’ या शब्दातील चार अक्षरे म्हणजे चार दिशांची (नॉर्थ, ईस्ट, वेस्ट व साउथ) आद्याक्षरे होत. त्यावरून चारी दिशांनी येणारी माहिती म्हणजे ‘न्यूज’ असा अर्थ पुढे रूढ झाला पण ही काही ‘न्यूज’ या शब्दाची व्युत्पत्ती नव्हे.
आपल्या परिसरात काय घडले, हे जाणून घेण्याची माणसाला निसर्गतःच इच्छा व जिज्ञासा असल्यामुळे मुद्रणाचा शोध लागण्यापूर्वीसुद्धा पत्रांतून बातम्यांची देवाणघेवाण चाले. मुसलमानी अंमलात बातम्यांची नोंद ठेवण्याची पद्धत होती. राजदरबारात झालेल्या महत्त्वाच्या गोष्टी, राजकारण,मुत्सद्यांचे वादविवाद इत्यादींची इत्थंभूत नोंद केली जाई. वाकेनवीस किंवा अखबारनवीस हे काम करीत. राजे,अमीर-उमराव तसेच काही श्रीमंत व्यापारीही ‘अखबारे’ मागवीत. अखबारांत ‘खबर’ म्हणजे ‘वार्ता’ किंवा ‘बातमी’ असे. खबरवरून ‘बखर’ शब्द आल्याचे काही इतिहासकार सांगतात परंतु ऐतिहासिक मराठी पत्रांत बखर हा शब्द ‘घडलेली हकीकत’ किंवा ‘वार्ता’ या अर्थाने वापरल्याचे आढळते. ‘तुम्ही बखर पाठविली लिहिले जे’…., असा उल्लेख खुद्द छत्रपती शिवाजी महाराजांच्या पत्रात आला आहे. (रा. खं. १५, पृ. २, ८२ ते २७४). वृत्तांत कथन करते, ते वृत्तपत्र असे म्हटले, तर तत्कालीन समाजात बखरपत्रे वृत्तपत्राचेच कार्य करीत असत.
ग्रेट ब्रिटनमध्ये १६०० पूर्वी (पहिले छापील वृत्तपत्र निघण्यापूर्वी) हाताने लिहिलेले मोठ्या आकारांचे कागद (फुलस्केप पेपर-शीट) बातम्या प्रसृत करण्यासाठी वापरले जात. अथेन्समधील नाटककार, रोमन न्यूज-पोस्टर लेखक, मध्यकालातील पोवाडेगायक इ. वार्ता-वितरणाचेच कार्य करीत असत. म्हणून वार्तांवरून वृत्तपत्रे अस्तित्वात आली, असे संबोधले जाते.
वार्ता कशास म्हणावे, हा वृत्तपत्रविद्येतील महत्त्वाचा विषय. घटना म्हणजे वार्ता नव्हे. घडलेली गोष्ट समजली, म्हणजे तिला वार्तेचे स्वरूप प्राप्त होते. वार्तेचा मुख्य गुण गोष्ट घडण्याचा ताजेपणा नसून घडलेली गोष्ट कळण्याचा ताजेपणा हा होय. अंतराळ व सागरतळ हे आता बातमीच्या क्षेत्रात सामावले आहेत. अशा रीतीने सर्व बाजूंनी येणारी नवी माहिती वार्ता ठरते. नवेपणाचा खरा अर्थ ताजेपणा होय, (न्यूज इज अ पेरिशेबल प्रॉडक्ट-गुड ओन्ली व्हेन फ्रेश). घडलेल्या घटना वार्ता कशा ठरतात, यासाठी वार्तामूल्य विचारात घ्यावे लागते. ताजेपणा हे सर्वांत महत्त्वाचे वार्तामूल्य होय. सान्निध्य (प्रॉक्सिमिटी) हे आणखी एक वार्तामूल्य होय. निसर्गतःच माणसाला स्वतःविषयी आस्था, प्रेम असल्यामुळे त्याच्याविषयी किंवा त्याच्या परिसराविषयी त्यास उत्सुकता असते. त्यामुळेच मॉस्कोत जी एखादी घटना बातमी ठरेल, ती कोल्हापुरात बातमी वाटेलच असे नाही. घटनेची महत्ता, हे आणखी एक वार्तामूल्य. व्यक्तिमाहात्म्य व स्थानमाहात्म्य यांचा त्यात समावेश होतो. मोठ्या पदावरील कोणीही व्यक्ती, तसेच कोणत्याही पदावर नसणारी मोठी व्यक्ती वार्ताविषय ठरेल. घटनेचे फलित किंवा परिणाम (कॉन्सिक्वन्स) वार्ताविषय ठरवू शकतो. एखाद्या घटनेशी संबंधित व्यक्तींची संख्या जितकी अधिक, तितकी ती मोठी वार्ता. तिच्याविषयी माणसाला वाटणारी आस्था, हेही महत्त्वाचे वार्तामूल्य होय. विविध पत्रकारांनी अनेक प्रकारच्या वार्तामूल्यांची चर्चा केली आहे. टॉमसन प्रतिष्ठानाच्या संपादकीय अध्ययनकेंद्राने पत्रकारांच्या मार्गदर्शनाकरिता संघर्ष, नावीन्य, गुन्हे, स्थानिकत्व इ. वीस प्रकारच्या वार्तामूल्यांची यादी दिली आहे. ही वार्तामूल्ये ज्या घटनेत आढळतील, ती घटना बातमी ठरू शकेल. बातमी किंवा वार्ता म्हणजे काय, याचा अनेक पत्रकारांनी विचार केला परंतु तिची सर्वमान्य व सर्वसमावेशक व्याख्या तयार होऊ शकली नाही. अखेर वृत्तपत्राचा उपसंपादक किंवा संपादक जे छापण्यायोग्य मानतो, ती बातमी ठरते (फिट टू प्रिंट).
अपेक्षित व अनपेक्षित वार्ता, अवघड आणि सोपी वार्ता, अन्वर्थक नि शोधक वार्ता (इंटर्प्रिटेटिव्ह ॲन्ड इन्व्हेस्टिगेटिव्ह न्यूज) असे वार्तांचे प्रकार मानतात. घटिताचे पावित्र्य राखणे आणि मतप्रदर्शन खुलेपणाने करणे (कॉमेन्ट इज फ्री, बट द फॅक्ट्स आर सेक्रिड) असा चार्ल्स प्रेस्टविच स्कॉट (१८४६-१९३२) ह्या ग्रेट ब्रिटनमधील गार्डियन या प्रसिद्ध वृत्तपत्राच्या संपादकाने वार्तेच्या शुचितेसंबंधी दंडक घालून दिलेला आढळतो. टीका-टिपणीमध्ये कोणतेही मत व्यक्त होण्यास हरकत नाही मात्र घडलेली गोष्ट जशीच्या तशीच देण्याची जवाबदारी पाळली पाहिजे, असा याचा अभिप्रेत अर्थ आहे परंतु अलीकडील वार्तांमधून वृत्तपत्रांचे धोरण डोकावल्याशिवाय राहात नाही. सत्य नि वार्ता यांत फरक असल्याचे जोसेफ पुलिट्झर याने म्हटले आहे. वार्ता ओळखण्यासाठी वृत्तसंवेदन (न्यूज सेन्स) असणे आवश्यक ठरते.
समाजघटकांचे महत्त्वाचे हितसंबंध आणि त्यांना रुची असणाऱ्या घटना किंवा गोष्टी यांसंबंधीच्या मजकुराची वार्ता बनते. वाचकांच्या बहुविध गरजा व त्या भागविण्यामागील दृष्टिकोन यांमुळे वार्ता कशास म्हणावयाचे, यासंबंधीच्या निरनिराळ्या कल्पना पुढे आल्या. ‘कुत्रा माणसाला चावला, ही बातमी नाही. माणूस कुत्र्याला चावला, तर ती बातमी होय’. वार्ता कशास म्हणावे, याचे हे उदाहरण एकोणिसाव्या शतकाच्या अखेरीस अमेरिकेतील न्यूयॉर्कर ह्या पत्राने सांगितले. वाचक आपल्या आवडीच्या विषयासंबंधीचा वृत्तपत्रातील मजकूर वाचतो. त्याच्या दृष्टीने वार्ता स्वरूपाचा तेवढाच भाग असतो. अग्रलेख, वाचकांची पत्रे, इतर लेख इ. मजकुरांत मुख्यतः मते अथवा विचार असतात. हा सगळा मजकूर जी गमके व्यक्त करतो, म्हणजेच वार्तेच्या मुळाशी जे मूल्य अनुस्यूत असते, ते महत्त्वाचे ठरते.
वाचकाला वार्तेविषयी रस वाटणे, हाच वार्तेचा मुख्य निकष होय. यावरून वाचकांपैकी बहुतांशांना ती वाचावीशी वाटणे, किंवा वाचून आपणास ठाऊक नसलेली माहिती कळणे, अशा मजकुरास ‘वार्ता’ म्हणता येईल. वृत्तपत्राच्या परिभाषेत तिला ‘वृत्तकथा’ असेही संबोधिले जाते. वार्ता आणि विचार (न्यूज ॲन्ड व्ह्यूज) ह्या दोन अंगांनी मिळून वृत्तपत्र बनते चालू घडामोडींच्या नोंदींचा तो ऐतिहासिक द्स्तऐवज असतो. त्यांच्या विविधतेमुळे सामान्य माणसाचे ते विद्यापीठ (कॉमन मॅन्स युनिव्हर्सिटी) मानले जाते. कारण या सर्वांचा वार्ता हाच मुख्य आधार व पाया असतो.
संदर्भ : 1. Hodgson, W. F. Modern Newspaper Practice, London, 1984,
2. James. M. Brown, Suzanne S. Newswriting and Reporting, New Delhi, 1976.
3. Kamath, M. V.ProfessionalJournalism, New Delhi. 1980.
4. Westly,Bruce,Newsediting,Oxford, 1968.
५. कानडे, रा. गो. मराठी नियतकालिकांचा इतिहास, मुंबई, १९३८.
६. केळकर, न. चिं. वृत्तपत्रमीमांसा,पुणे, १९६५.
७. टिकेकर, श्री. रा. बातमीदार,सोलापूर,१९३४.
८. पवार, सुधाकर, वृत्तपत्रव्यवसाय : काल आणि आज,नासिक, १९८५.
गोखले, ल. ना. पवार, सुधाकर