वायुछिद्र : सागरी लाटांचे खननकार्य व हवेचा दाब यांमुळे किनाऱ्यावर निर्माण होणारा भूविशेष.
समुद्रकडे व समुद्रगुंफा निर्माण होणाऱ्या चबुतऱ्यासारखी सपाटमाथ्याची भूरचना असणाऱ्या किनारी प्रदेशात काही वेळा वायुछिद्र हे भूरूप निर्माण होते. खोल पाणी असणाऱ्या समुद्रकड्यांच्या भागात समुद्राच्या लाटा पूर्ण शक्तीनिशी कड्यावर आदळतात. भरतीच्या वेळी व वादळात लाटांची शक्ती प्रचंड असते. काही वेळा ती एक चौ. मी. जागेवर २५,००० किग्रॅ. पर्यंत वाढते म्हणजे एक चौ. मी. जागेवर २५ टन वजनाचा आघात होतो. त्यामुळे खडकातील फटींमध्ये हवेचा दाब खूप वाढतो व खडक खिळखिळे होतात. कमजोर सांधे निखळतात व कड्यांमध्ये समुद्रगुंफा निर्माण होतात. काही समुद्रगुंफा ३० मी. पर्यंत जमिनीकडे पसरतात. जेव्हा अशा विस्तृत गुंफा तयार होतात तेव्हा लाटांच्या आघातावेळी त्यांमध्ये खूप हवा कोंडली जाते व जमिनीच्या बाजूला गुंफेच्या छतावर तिचा आघात होऊन गुंफेच्या छताला वर जाणारे छिद्र निर्माण होऊ लागते. सामान्यपणे सांधेयुक्त कठीण खडकांत यांची निर्मिती होते. खडकांचे सांधे उभे असल्यास हे छिद्र चांगल्या प्रकारे निर्माण होते व लाटांच्या गुंफेतील आघातावेळी या छिद्रातून हवा अतिवेगाने आवाज करीत बाहेर पडते, तसेच कारंज्यासारखे पाणीही या छिद्रातून बाहेर हवेत उडत असते. यालाच वायुछिद्र किंवा ‘ब्लोहोल’ म्हणतात. याला स्कॉटलंडमध्ये ग्लूप किंवा ग्लोप म्हणतात. मॉन्सूनच्या सुरुवातीस वायुछिद्रामुळेच लाटांचा प्रचंड आवाज निर्माण होतो. चिं. त्र्यं. खानोलकरांच्या कोंडुरा या विख्यात कादंबरीतील ‘कोंडुरा’ ही समुद्रगुंफा व वायुछिद्र आहे.
डिसूझा, आ. रे.