वामनपंडित : (१६०७ – १६९५). प्राचीन मराठी पंडिती काव्याचे एक प्रमुख प्रतिनिधी. त्यांच्या जीवनाविषयी निश्चित स्वरूपाची माहिती फारशी मिळत नाही. रामदासी पंथातील श्रीसिद्धेश्वर महाराजांचे शिष्य राजाराम प्रासादी (? – १८४७) ह्यांच्या भक्तमंजरीत (१८३४) वामनपंडितांचे चरित्र विस्ताराने देण्यात आले आहे. तथापि त्यात भाबडेपणाने दिलेल्या निराधार आख्यायिकाही आढळतात. समर्थ संप्रदायाच्या काही बखरकारांनीही वामनपंडितांची काही माहिती दिली आहे. वि. अं. कानोले ह्या संशोधकांच्या कवि वामन पंडिताविषयी नवी माहिती (१९६६) ह्या ग्रंथामध्ये वामनपंडितांचे साधार चरित्र मांडण्याचा प्रयत्‍न आहे.

वामनपंडित एक की अनेक, असा प्रश्नही विविध संशोधकांच्या लेखनातून चर्चिला गेला आहे. उदा., बाळकृष्ण अनंत भिडे ह्यांनी पाच वामन असल्याचे मत मांडले. हे पाच वामन असे : (१) यथार्थ-दीपिका हा गीतेवरील भाष्यग्रंथ लिहिणारा वामन, (२) स्वतःला वासिष्ठगोत्री म्हणविणारा वामन, (३) शांडिल्यगोत्री वामन, (४) शृंगारप्रिय वामन, (५) यमक्या वामन. संतचरित्रकार ज. र. आजगावकर ह्यांच्या मते यथार्थदीपिकाकार वामन व शांडिल्यगोत्री यमक्या वामन असे दोनच वामन आहेत. इतिहासाचार्य वि. का. राजवाडे ह्यांनी वामनपंडित हे एकच होते, असे मत प्रतिपादिले.

वामनाच्या काव्यरचनेचे अनुकरण करणारे हरी वामन, साम्राज्य वामन, विश्वनाथ वामन, बापू वामन, असेही काही वामन होऊन गेले आहेत. ह्यांच्या काव्यरचना चुकीने आद्य वामनपंडितांच्या कवितेत समाविष्ट झाल्यामुळे ही गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली.

ह्या सर्व पार्श्वभूमीवर आद्य वामनपंडितांचे सामान्यतः स्वीकारार्ह असे जे चरित्रात्मक तपशील आपल्याला उपलब्ध होतात, ते असे : वामन-पंडितांचा जन्म विजापूर शहरी झाला. त्यांच्या घराण्याचे नाव शेष. कानोले ह्यांच्या मते हे शेष घराणे नांदेडचे. तथापि एस्. पी. व्ही. रंगनाथस्वामी ह्यांनी ऑन द शेषाज ऑफ बनारस ह्या आपल्या लेखात हे शेष घराणे आंध्र प्रदेशातील असल्याचे म्हटले आहे. शेष घराणे हे संपन्न आणि विद्वान होते. वामनपंडितांचे आजोबा वामन अनंत शेष हे आदिल-शहाच्या दरबारी असलेले एक विद्वान. आदिलशहाच्या ग्रंथालयाची व्यवस्थाही त्यांच्याकडे होती. फार्सी भाषेवर त्यांचे प्रभुत्व होते. वामनपंडित हे विजापूर येथे राहत असताना त्यांच्या मनात एकदा धर्मांतराची भीती निर्माण झाली. असा प्रसंग आपल्यावर येऊ नये म्हणून आपली पत्‍नी गिराबाई हिच्यासह ते काशीस गेले. तेथे बराच काळ राहून त्यांनी विद्याभ्यास केला पंडिती वादांत भाग घेतला, विजय मिळविले. त्यांना सहा अपत्ये होती. जवळपास वयाच्या साठाव्या वर्षी त्यांनी संसारत्याग केला, असे दिसते. त्यानंतर योग्य गुरूचा शोध घेण्यासाठी दक्षिण भारतात ते ठिकठिकाणी हिंडले. पुढे मलय-पर्वतावर त्यांना सच्चिदानंदयती हे सत्पुरुष भेटले व त्यांनी वामनपंडितांना भार्गवी किंवा भार्गवी वारुणी विद्येचा उपदेश केला. हे सच्चिदानंदयती म्हणजेच शृंगेरी पीठाचे शंकराचार्य होत, असे म्हटले जाते. गुरूपदेशानंतर, बहुधा वयाच्या पंच्याहत्तराव्या वर्षी त्यांनी संन्यास घेतला असावा. पूर्णानंद हे वामनपंडितांचे, संन्यास घेतल्यानंतरचे नाव असावे. तथापि ह्या नावाचा उल्लेख वामनपंडित आपल्या कोणत्याच ग्रंथात करीत नाहीत. संन्यास घेतल्यानंतर वारणातीरी कोरेगाव (शिगाव – कोरेगाव) येथे ते वास्तव्य करून राहिले. यथार्थदीपिका हा ग्रंथ त्यांनी तेथेच लिहिला. कोरेगाव येथेच त्यांचे निधन झाले. तेथे त्यांची समाधी आहे. वाई तालुक्यातील भोगाव येथेही वामनपंडितांची एक समाधी दाखविली जाते. तथापि त्यांच्या एका शिष्याने बांधलेली ही प्रसाद-समाधी वा प्रतीक-समाधी असावी.

वामनाच्या यथार्थदीपिकेप्रमाणेच त्यांनी निःसंशयपणे रचिलेल्या काव्यकृती अशा : निगमसार, कर्मतत्त्व, ब्रह्मस्तुति, समश्लोकी – भगवद्‍गीता, हरिनामसुधा (म्हणजेच नामसुधा), श्रुतिसार (संस्कृतात), अनुभूतिलेश (संस्कृतात), उपादान, चरमगुरुमंजिरी, गीतार्णवसुधा, प्रियसुधा, वेणुसुधा, वनसुधा, चित्सुधा, अपरोक्षानुभूति, विश्वासबंध, प्रेमसरी, सिद्धान्तविजय, सीतास्वयंवर, रामजन्म, द्वारकाविजय, भरतभाव, भागवती रामायण भागवती प्रकरणे.

वामनपंडितांचा विख्यात ग्रंथ म्हणजे यथार्थदीपिका (ओवी-संख्या बावीस हजारांच्या वर). त्यांच्या आयुष्याच्या अखेरच्या कालखंडात म्हणजे १६८८ ते १६९४ च्या दरम्यान केव्हा तरी त्यांनी तो लिहिला, असे दिसते. गीतेचा यथार्थ मांडण्याची भूमिका घेऊन लिहिलेली ही टिका आहे. ह्या टीकेचे स्वरूप खंडन – मंडनात्मक, तर्कनिष्ठ असे आहे. गीतेत सगुण ज्ञान श्रेष्ठ मानले आहे, असा विचार ह्या टीकेत वामन पंडितांनी प्रतिपादिला आहे. वामनपंडितांच्या व्यासंगाचा, स्वतंत्र वैचारिकतेचा आणि भाषेवरील प्रभुत्वाचा ह्या टीकेतून प्रत्यय येतो. प्राचीन मराठी साहित्यातील गीताभाष्यपर प्रमुख ग्रंथांत यथार्थदीपिकेचा समावेश होतो. तथापि ह्या टीकेत लालित्य वा काव्यगुण नाहीत.

वामनपंडितांनी रचिलेल्या तत्त्वचिंतनपर ग्रंथांत निगमसार (ओवीसंख्या १,१६८) हा विशेष उल्लेखनीय होय. त्यांच्या ह्या एकाच ग्रंथात त्यांनी ग्रंथसमाप्तीचा काळ दिला आहे (शके १५९५ इ. स. १६७३). ह्या ग्रंथात त्यांना त्यांच्या गुरूपासून प्राप्त झालेल्या भार्गवी वारुणी ह्या विद्येचे विवेचन प्रारंभी त्यांनी केले आहे. सकळ निगमांचे सार संक्षेपाने सांगणे, हा ह्या ग्रंथाच्या रचनेमागील हेतू. पुरुष-प्रकृती, ब्रह्म-माया, जग-जगदात्मा ह्या विषयांचा परामर्श त्यांनी ह्या ग्रंथात घेतलेला आहे. ह्या ग्रंथातही तार्किकतेची पद्धती आहेच. कर्मतत्त्व (श्लोकसंख्या – ५२४) हाही त्यांचा एक महत्त्वाचा तत्त्वविवेचनपर ग्रंथ. कर्मतत्त्वांचे विवेचन करीत असता कर्म, अकर्म व विकर्म अशी कर्माची तीन रूपे सांगितली आहेत. कर्म व कर्मफळे सगुण ईश्वरास अर्पण करावीत. अहंता व ममता नाहीशी झाली, तर सुखदुःखही नाहीसे होईल इ. विचार त्यांनी मांडले आहेत. त्याचप्रमाणे शुद्ध आणि अखंड आत्मतत्त्व कोणते, ह्या- संबंधीचे विवेचनही केले आहे.

नामसुधा, वेणुसुधा आणि वनसुधा ही सुधाकाव्येही उल्लेखनीय आहेत. नाममाहात्म्य हा नामसुधेचा विषय, तर वेणुसुधेत श्रीकृष्ण वाजवीत असलेल्या मधुर मुरलीच्या रवाने गोपी, मधुवनातील वेली व वृक्ष ह्यांच्यावर झालेला विलक्षण परिणाम प्रभावीपणे वर्णिला आहे. अघासुरवध हा वनसुधेचा विषय. ह्यांशिवाय प्रियसुधा म्हणून त्यांचे जे काव्य आहे, ते त्यांनी आपल्या पत्‍नीला उपदेश करण्याकरिता लिहिले आहे. चित्सुधा हे एक वेदान्त प्रकरण होय. वामन-पंडितांच्या द्वारकाविजयात द्वारकेच्या संपन्नतेचे वर्णन आले आहे.

वामनपंडितांना लोकप्रियता लाभली, ती त्यांच्या आख्यान-रचनेमुळे. राम आणि कृष्ण ह्या अवतारांच्या लीला त्यांनी वर्णन केल्या. कृष्णावरील आख्यानांसाठी कृष्णाच्या निवडक कथा त्यांनी श्रीमद्‍‌भागवताच्या आधारे घेतल्या. रामायणाच्या आधारे त्यांनी अहल्योद्धार, जटायुस्तुति, भरतभाव, रामजन्म, रामस्तव, सीतास्वयंवर, लोपामुद्रा-संवाद ही आख्याने रचिली. कृष्णजन्म, बालक्रीडा, भामाविलास, राधाविलास, मुकुंदविलास, राधाभुजंग, रासक्रीडा, कंसवध ही त्यांनी कृष्णचरित्रावर लिहिलेली काही आख्याने.

रसाळ शैलीमधील ह्या आख्यानांतील कलात्मक श्लोक-रचनेमुळे सुश्लोक वामनाचा असे म्हटले जाऊ लागले. त्यांच्या श्लोकरचनेचे अनुकरणही अनेकांनी केले. यथार्थदीपिकेसारखी पांडित्यपूर्ण टीका लिहिणारे वामनपंडित त्यांच्या रसाळ आख्यानरचनेमुळे सर्वसामान्यांपर्यंत जाऊन पोहोचले. मराठी भाषेवर त्यांचे असामान्य प्रभुत्व होते आणि संस्कृत भाषाही त्यांनी उत्तम प्रकारे आत्मसात केलेली होती. त्यांच्या ह्या भाषाप्रभुत्वाचा प्रत्यय त्यांच्या काव्यरचनांतून स्पष्टपणे येतो. तथापि यमकांचा आणि प्रासांचा त्यांचा हव्यास मात्र टीकास्पद ठरला. अनेकाक्षरी यमके साधण्याकडे त्यांचा कल होता. वनी खेळती बाळ हे बल्लवांचे। तुरे खोवती मस्तकी पल्लवांचे। (वनसुधा) किंवा म्हणति हे परिसा नवल क्षण। त्रिभुवनेश्वर मानवलक्षण। (वेणुसुधा) ही अशा यमकांची काही उदाहरणे होत. वंशी नादनटी, तिला कटितटी खोवूनि पोटी पटी, कक्षे वामपुटी स्वश्रृंगनिकटी वेताटिही गोमटी। (वनसुधा) ही त्यांची अनुप्रासात्मक रचना विख्यात आहे. काही वेळा त्यांच्या रचनेत दुर्बोधता येते छंदोभंगही होतो. आध्यात्मिक विषय मांडत असताना बीभत्स रसाने भरलेल्या ओळी लिहून ते काही वेळा औचित्यभंगही करतात. अध्यात्म-प्रधान काव्यरचना करणाऱ्या वामनपंडितांनी शृंगारिक रचना करताना मात्र काही वेळा मर्यादांचे उल्लंघन केलेले दिसते. उदा., राधाभुजंग आणि रासक्रीडा ही काव्ये ह्या संदर्भात टीकार्ह ठरलेली आहेत. एक तत्त्वज्ञ म्हणून अद्वैताधिष्ठित भक्तीचा पुरस्कार करणारी यथार्थदीपिकेमधील आणि एक आख्यानकवी म्हणून भागवती प्रकरणातील रसाळ स्वरूपाची वामनपंडितांची आविष्कारपद्धती लक्षणीय आहे.

संदर्भ : १. आजगावकर, ज. र. महाराष्ट्र कविचरित्र-भाग १, मुंबई, १९०७.

          २. करंदीकर, वि. रा. भगवद्‍गीतेचे तीन टीकाकार, पुणे, १९७४.

          ३. करंदीकर, वि. रा. वामनपंडितांची यथार्थ-दीपिका, पुणे, १९६३.

          ४. कानोले, वि. अं. कवि वामन-पंडिताविषयी नवी माहिती, नांदेड, १९६६.

         ५. पंगु, द. सी. प्राचीन मराठी कविपंचक, कोल्हापूर, १९४४.

         ६. वाटवे, के. ना. पंडित कवी, पुणे, १९५२.

जोशी, वसंत स.