वाद्यवृंद :
ज्याचे वादन होते ते वाद्य व अशा विशिष्ट वाद्यांचा व वादकांचा समूह म्हणजे वाद्यवृंद. परंपरेने अवनद्ध, घन, तत आणि सुषिर असे वाद्यांचे चार प्रमुख वर्ग मानले आहेत. या वर्गांतील काही निवडक वाद्यांना हेतुपूर्वक एकत्र आणून त्यांच्या द्वारे संगीत सादर करणे, हे वाद्यवृंदाचे कार्य होय. वाद्यांचे सामूहिक वादन भारतात प्राचीन काळापासून प्रचलित होते. मात्र कालौघात त्याच्या स्वरूपात फरक पडत गेला आहे. या संदर्भात भरताचे ‘कुतप’ वाद्यमेळाविषयीचे विवेचन तपशीलवार आहे. उदा., आधी निर्देश केलेल्या चारही वर्गांतील वाद्ये विशिष्ट संख्येने एकत्र आणून त्यांची मांडणी, गायकांचा प्रवेश, गायनारंभ, वाद्यांची प्रारंभिक छेड, वेगवेगळ्या वादनपद्धतींचा सराव, वाद्यांची पद्धतशीर जुळणी, लय-वाद्यांची सिद्धता, तत व अवनद्ध वाद्यांच्या एकत्रित वादनाचा प्रारंभ अशा पायऱ्या भरताने ‘कुतपविन्यास’ म्हणून नोंदल्या आहेत. त्या तपासण्यासारख्या आहेत. मात्र गायक व वादक यांचे समूह एकत्र आणण्याचा तेव्हाचा प्रघात कुतप या संज्ञेने दाखविला जातो. सामूहिक सादरीकरण करणाऱ्यांचे संगीतरत्नाकरातील विवरणही हीच परंपरा दर्शविते. तीनुसार कलाकारांच्या संख्येवर वृंदांचे वर्ग अवलंबून असत. गायक, सहगायक, वेणुवादक व पटह (एक आघात वाद्य)-वादक यांच्या संख्येप्रमाणे वर्णिलेले वर्ग असे :
वर्ग |
गायक |
सहगायक |
वेणुवादक |
पटहवादक |
उत्तम |
४ |
१२ |
४ |
४ |
मध्यम |
२ |
४ |
२ |
२ |
कमिष्ठ |
१ |
३ |
२ |
२ |
वाद्यवृंद : पाश्चात्य संगीतपरंपरेतही वाद्यवृंदाच्या (ऑर्केस्ट्रा) उत्क्रांतीत केवळ वाद्यसमूहाची सुव्यवस्थित रचना व योजना सु. १६०० नंतरच आढळते. सोयीनुसार लहान-मोठी वाद्ये एकत्र आणण्यापासून त्याची सुरुवात झाली. सुमारे १७०० नंतर नवीन वाद्यांचा-विशेषतः ⇨ हार्पसिकॉर्ड, ⇨ ऑर्गन इ. चावीफलकाच्या (की बोर्ड) वाद्यांचा-खास वापर करण्यात येऊ लागला. सुमारे १८०० नंतर ⇨व्हायोलिन व अन्य तंतुवाद्यांचा वाद्यवृंदातील प्रभाव वाढला. स्वरसंगति-तत्त्वावर आधारित संगीतरचनांत वाद्यांची कुशल वाटणी शक्य झाल्याने वाद्यवृंदाला खास रूप येऊ लागले. १९३० नंतर विद्युच्चलित व तत्सम आधुनिक वाद्यांची निरनिराळी एकत्रीकरणे साधून वाद्यवृंद तयार केले गेले.
पारंपारिक व आधुनिक वाद्यांचे एकत्रीकरण भारतात मुख्यतः एकोणिसाव्या शतकापासून होऊ लागले. विशेषतः ⇨ नाट्यसंगीत आणि ⇨ बँडवादन या क्षेत्रांत वाद्यवृंदाचा अंतर्भाव होऊ लागला. या नावीन्यपूर्ण प्रकाराचे त्या काळी वृत्तपत्रांतून बरेचसे कौतुकही झाले. ⇨ चित्रपट-संगीतात वाद्यवृंदाचा उपयोग अधिक प्रमाणात व वैशिष्ट्यपूर्ण रीत्या करण्यात येतो. केवळ वाद्यवृंदासाठी खास संगीतरचना हा प्रकार आपल्याकडे मात्र अद्यापही नवीनच आहे.
रानडे, अशोक दा.
“