वाडिया, अर्देशिर कर्सेटजी : (६ ऑक्टोबर १८०८-१६ नोव्हेंबर १८७७). भारतीय अभियंते, रॉयल सोसायटी ऑफ लंडन या मान्यवर आंतरराष्ट्रीय शास्त्रीय संस्थेचे सदस्य म्हणजे एफआरएस झालेले पहिले भारतीय संशोधक.
वाडिया यांचा जन्म मुंबई येथे झाला. त्यांचे वडील कर्सेटजी रुस्तमजी हे विख्यात जहाजनिर्माते होते. प्रारंभिक व शालेय शिक्षण संपवून वयाच्या अवघ्या चौदाव्या वर्षीच अर्देशिर यांनी आपल्या वडिलांच्या कार्यक्षेत्रात प्रवेश केला. नाविक तंत्रविद्या व अभियांत्रिकी यांचा त्यांनी कसून अभ्यास केला. वाफेची शक्ती वापरून भारतातील जहाज उद्योगाचा विकास करण्याच्या ध्येयाने प्रेरित होऊन त्यासाठी आवश्यक असणाऱ्या उच्च शिक्षणासाठी ते इंग्लडला गेले. तेथे त्यांनी एक मोठे वाफ एंजिन तयार केले व ते भारतात आणून भारतातच तयार केलेल्या जहाजाला जोडले. १८३३ मध्ये हे इंडस जहाज समारंभपूर्वक समुद्रात सोडले व अशा रीतीने भारतात यांत्रिक नौकानयनाचा पाया वाडियांनी घातला.
वाडियांनी मुंबईतील काही रस्त्यांवर कोल गॅस या ज्वलनशील वायूचे म्हणजे गॅसचे दिवे लावण्याचे कामही केले तसेच विशिष्ट यंत्रसंच उभारून १० मार्च १८३४ रोजी त्यांनी आपल्या बंगल्यात व बागेत गॅसचे दिवे लावले. हा अभिनव प्रयोग पहाण्यासाठी आलेल्या गव्हर्नरांनी प्रभावित होऊन वाडियांना मानाची वस्त्रे दिले.
वाडियांनी मुंबईच्या एल्फिन्स्टन इन्स्टिट्यूटमध्ये यांत्रिक अभियांत्रिकी व रसायनशास्त्राचे अध्यापक म्हणून काही वर्षे काम केले व १८३९ मध्ये उच्च शिक्षणासाठी ते पुन्हा इंग्लंडला गेले. वाफेची एंजिने व नाविक अभियांत्रिकी या विषयाचे त्यांचे ज्ञान व भारतात यांत्रिक नौकानयन विकसित करण्याचे त्यांचे अविरत प्रयत्न पाहून लंडन येथील रॉयल सोसायटीने २७ मे १८४१ रोजी त्यांना आपले सदस्य (फेलो) करून घेतले. व्हिक्टोरिया राणीच्या विवाहाच्या सोहळ्यास वाडिया खास निमंत्रित म्हणून उपस्थित राहिले होते.
भारतात परत आल्यानंतर ईस्ट इंडिया कंपनीच्या संचालक मंडळाने स्टीम फॅक्टरी ऑफ बॉम्बे या कारखान्यात इंग्रज उमेदवार असताना वाडियांना प्रमुख अभियंते व मुख्य यंत्रनिरीक्षक म्हणून नेमले. तेथून ते १ ऑगस्ट १८५७ रोजी सेवानिवृत्त झाले.
मुंबईच्या नागरी जीवनात त्यांनी अनेक सुधारणा घडवून आणल्या. शिवणयंत्रे, कॅमेरे, धातूंच्या वस्तूंवर चांदीचा मुलामा देणारी यंत्रे-उपकरणे वापरायला त्यांनी लोकांना उद्युक्त केले. ज्वलनशील वायू घरगुती कामांसाठी वापरायला त्यांनीच प्रथम सुरुवात केली. वाफेवर चालणारी अनेक लहानसहान यंत्रे-उपकरणे निर्माण करण्याचा त्यांना छंद होता. त्यांनी भारतात प्रथमच वाफेवर चालणारे पंप तयार केले व त्यांच्या मदतीने अनेक फवारे व कारंजी उडती ठेवता येतात हे दाखविले. अशा रीतीने जलसिंचन योजना सफलतापूर्वक अंमलात आणण्याच्या तंत्राचा पाया त्यांनी रोखला. ज्वलनशील वायू वापरून भारतातील काही शहरांतील रस्ते प्रथम प्रकाशित करण्याचे श्रेय त्यांच्याकडेच जाते.
वाडियांना आणखीही काही मानसन्मान लाभले होते. उदा. इंग्लडच्या रॉयल एशियाटिक सोसायटीचे परदेशी सदस्यत्व (१८३७) मुंबईचे जे. पी. (जस्टीस ऑफ द पीस, १८५५) वगैरे. सेवानिवृत्तीनंतर काही वर्षांनी वाडिया इंग्लंडमधील रिचमंड शहरी स्थायिक झाले होते. येथेच ते मृत्यू पावले. भारतीय टपाल व तार खात्याने वाडिया एफआरएस झाल्यानंतर १२८ वर्षांनी (२७ मे १९६९ रोजी) त्यांचे खास तिकीट व प्रथम दिन-आवरण काढले होते.
चोरघडे, शं. ल.