वाजपेयी, नंददुलारे : (१९०६–१९६७). हिंदी समीक्षक. जन्म मगरैल, जि. उन्नाओ येथे. त्यांचे वडील हिंदी साहित्याचे चांगले जाणकार होते व त्यांनीच त्यांना साहित्याची गोडी लावली. ते बनारस हिंदू विश्वविद्यालयातून एम्.ए.ची परीक्षा प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाले (१९२९). विद्वान हिंदी लेखक ⇨श्यामसुंदर दास यांचे ते प्रिय शिष्य होते. त्यांच्या प्रेरणेने त्यांनी बनारस हिंदू विश्वविद्यालयात संशोधनकार्य केले. १९३२ पासून ते अलाहाबाद येथून निघणाऱ्या भारत दैनिकात संपादक म्हणून काम करू लागले. त्या पत्रात आधुनिक साहित्यासंबंधी त्यांनी अनेक विद्वत्तापूर्ण लेख लिहिले. हिंदी साहित्य : बीसवी शताब्दी आणि जयशंकर प्रसाद (१९३८) या पुस्तकांत हे लेख संगृहीत आहेत. जयशंकर प्रसाद या ग्रंथात त्यांच्या व्यापक समीक्षादृष्टीचा प्रत्यय येतो. त्यांनी पुढे १९३६ मध्ये ‘नागरी प्रचारिणी सभा’, वाराणसी येथून सूरदासाच्या पदांचे सूरसागर हे संकलन दोन खंडांमध्ये (१९४८ व १९५० मध्ये) संपादित केले. १९३७ पासून दोन वर्षे ‘गीता प्रेस’, गोरखपूर येथे त्यांनी तुलसीदासविरचित रामचरितमानस या महाकाव्याचे संपादन केले. त्यांच्या अन्य समीक्षाग्रंथांमध्ये प्रेमचंद, सूरदास, आधुनिक साहित्य (१९५०), नया साहित्य–नये प्रश्न (१९५५), राष्ट्रभाषाकी समस्याएँ, राष्ट्रीय साहित्य तथा अन्य निबंध इत्यादींचा अंतर्भाव होतो. डॉ. रामाधार शर्मा यांनी नंददुलारे वाजपेयी : व्यक्तित्व और कृतित्व हा समीक्षात्मक ग्रंथ संपादित केला. वाजपेयींनी १९४१ ते १९४६ या काळात बनारस हिंदू विश्वविद्यालयात हिंदीचे प्राध्यापक म्हणून व १९४७ ते १९६५ पर्यंत सागर विद्यापीठात हिंदी विभागप्रमुख म्हणून अध्यापनकार्य केले. अखेरीस उज्जैन येथील विक्रम विद्यापीठाचे उपकुलगुरू म्हणून त्यांची नियुक्ती झाली. वाजपेयींनी हिंदी साहित्याच्या संशोधनकार्यात मोलाची भर घातली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक विद्यार्थ्यांनी डी.लिट्. व पीएच्.डी. यांसारख्या उच्च शैक्षणिक पदव्या मिळविल्या. ⇨ रामचंद्र शुक्ल यांच्यानंतरच्या टीकाकारांत त्यांचे स्थान अग्रगण्य आहे. छायावादाचे सखोल विवेचन करून त्याला हिंदी साहित्यात गौरवाचे स्थान मिळवून देण्याचे श्रेय त्यांनाच आहे. आलोचना या हिंदी त्रैमासिकाचे संपादन त्यांनी काही काळ केले. १९४० मध्ये पुण्यात भरलेल्या हिंदी साहित्य संमेलनाच्या एका विभागाचे ते अध्यक्ष होते. महाकवी निराला यांच्याशी त्यांचा घनिष्ठ स्नेह होता.
दुबे, चंदूलाल द्रविड, व्यं. वि.