वागळी : या माशाचा समावेश बॅटिया (रॅजिफॉर्मीस) गणाच्या मायलिओबॅटिडी कुलात करतात. या कुलातील एटोमायलस निकोफाय (ईगल रे) व एटोबॅटीस फ्लॅजेलम (स्पॉटेड ईगल रे) या दोन जाती वागळी किंवा बोलाड (बोलाट) या नावाने ओळखल्या जातात. या माशांचे अंसपक्ष (छातीवरील पर) गरुडाच्या पसरलेल्या पंखांसारखे असतात. त्यावरून ‘ईगल रे’ हे इंग्रजी नाव पडले आहे. यांची शेपटी चाबकासारखी असते व तिच्यावर एक काटा असतो. चकती लांबीपेक्षा जास्त रुंद असते व ती समभुज चौकोनी आकाराची असते. दात पसरट असतात. त्वचा गुळगुळीत असते. नर व मादी सारखे दिसतात. ते मुख्यतः मृदुकाय (मॉलस्क) प्राण्यांवर उदरनिर्वाह करतात.
एटोमायलस निकोफाय ही जाती अगदी सर्रास नाही, तरी पण गंगेच्या मुखात व चिल्का सरोवरात, तसेच भारताच्या पूर्व व पश्चिम किनाऱ्यांवर आढळते. या जातीच्या माशाचे शरीर मुख्यतः ऑलिव्ह रंगाचे असून त्यावर तांबूस छटा असते त चकतीची बाहेरील कड गर्द रंगाची असते. पिलाच्या अंगावर चकतीच्या आरपार जाणारे सुमारे सात निळे पट्टे असतात. पिलू वाढू लागले की, प्रथम डोक्यावरील पट्टे नाहीसे होतात व शेवटी शरीरावरील जातात. ए. मिल्व्हस या जातीत गर्द रंगाच्या शरीराच्या मागच्या अर्ध्या भागावर हिरवट तपकिरी कडेचे ठिपके असतात.
एटोबॅटीस प्रजातीतील फक्त ए. फ्लॅजेलम (ए. नारीनारी) हीच जाती भारतीय सागरात आढळते. हिचा रंग करडा ऑलिव्ह, कधीकधी हिरवट ऑलिव्ह किंवा वरून शिशासारखा करडा असतो. पोटाचा भाग पांढरा असतो. शेपटी काळी असते. डोळ्याची बाहुली सोनेरी हिरवी असते. दात हिरवट पिवळे असतात. पिलांची पाठ गर्द शिशाच्या रंगाची असते.
१.५ मी. रुंदीचा मासा सापडल्याची नोंद झालेली आहे. हा मासा ऑयस्टर व मोठे क्लॅम हे प्राणी खातो. त्यामुळे दक्षिण भारतात ऑयस्टर व क्लॅम पैदाशीत त्याचा फारच धोका असतो. स्थानिक लोक तो खातात.
पहा : रे मासे
जमदाडे, ज. वि.
“