वसुबंधु : (इ. स.पाचव्या शतकाचा पूर्वार्ध). विख्यात बौद्ध पंडित. त्याचा जन्म पुरुषपूर (आजचे पेशावर) येथे झाला. संघभद्रनामक काश्मीरी पंडिताजवळ त्याने अध्ययन केले. आरंभीच्या काळात वसुबंधू हा वास्तववादी, सर्वास्तिवादी म्हणून सर्वत्र प्रसिद्धी पावला होता. अभिधर्मकोश हा त्याचा ग्रंथ सर्वास्तिवादाचा पुरस्कार करणारा आहे. हा ग्रंथ कारिकायम असून संघमित्र ह्या वसुबंधूच्या गुरूने त्यावर टीका लिहिली. स्वतः वसुबंधूनेही त्यावर भाष्य (अभिधर्मकोशभाष्य) लिहिले आहे. अभिधर्मकोशाच्या शेवटच्या परिच्छेदातील शेवटच्या कारिकेवरून हा ग्रंथ प्रायः सर्वास्तिवाद पंथाच्या काश्मीरातील वैभाषिक शाखेच्या परंपरेला अनुसरून लिहिला गेला आहे, असे दिसते. अभिधर्मकोशभाष्यावर भाष्य लिहिताना यशोमित्राने वसुबंधूचा उल्लेख ‘जणू काही दुसरा बुद्धच’ असा केला आहे. बाणाने आपल्या हर्षचरितात ‘शुकैरपि शाक्यशासनकुशलैः कोशं समुपदिशद्भिः’ असे म्हणून वसुबंधूच्या अभिधर्मकोशाचा गौरवपर उल्लेख केला आहे. तिबेटात सापडलेल्या हस्तलिखितांवरून ख्यातनाम पंडित राहुल सांकृत्यायन ह्यांनी हा ग्रंथ भारतात उपलब्ध केला. बौद्ध तत्वज्ञ ⇨ असंग हा वसुबंधूचा ज्येष्ठ बंधू होय. आरंभी सर्वास्तिवादी मताचा असलेला वसुबंधू पुढे असंगाच्या विचारांनी प्रभावित होऊन विज्ञानवादी बौद्ध बनला. वसुबंधुकृत विंशतिका व त्रिंशिका हे विज्ञानवादी संप्रदायाचे महत्त्वाचे ग्रंथ होत.
वसुबंधूच्या अन्य ग्रंथांत ⇨ ईश्वरकृष्णाच्या सांख्यसप्ततीच्या खंडनपर त्याने लिहिलेल्या परमार्थसप्तति ह्या ग्रंथाचा अंतर्भाव होतो. तर्कशास्त्र आणि वादविधि हे दोन ग्रंथही त्याच्याच नावावर मोडतात. शिवाय सद्धर्मपुंडरीकसूत्र, महापरिनिर्वाणसूत्र, वज्रच्छेदिका, प्रज्ञापारमिता ह्या ग्रंथांवर त्याने टीका लिहिल्या आहेत.
वसुबंधू एक की अनेक, असा वाद आहे. फ्राउ-वाल्नरसारख्या विद्वानांना अभिधर्मकोशकार वसुबंधू आणि विंशतिका व त्रिंशिका ह्या ग्रंथांचा लेखक वसुबंधू ह्या दोन वेगवेगळ्या व्यक्ती आहेत, असे वाटते. तथापि त्या दोन व्यक्ती नाहीत, असे अय्यास्वामीशास्त्रींसारख्या पंडितांचे मत आहे. काही चिनी ग्रंथांत सहा वसुबंधूंचा उल्लेख आहे.
पहा : बौद्ध दर्शन.
बापट, पु. वि.