वसई: महाराष्ट्र राज्याच्या ठाणे जिल्ह्यातील पश्चिम किनाऱ्यावरील एक इतिहासप्रसिद्ध स्थळ. बसीन, बश्या, बाजीपूर इ. भिन्न नावांनी ते प्रसिद्ध आहे. शिवाय काही ठिकाणी त्याचा उल्लेख बसई, बकैम, बक्‍सई, बुशी असा आढळतो. मुंबईच्या उत्तरेला ठाण्याच्या खाडीवर सु. ४८ किमी.वर ते वसले आहे. त्याची लोकसंख्या ५२,३९८ (१९८१) होती. त्याच नावाच्या तालुक्याचे ते मुख्यालय असून सांप्रत तेथे एक भुईकोट किल्ला आहे. येथील भुईकोट किल्ल्याची पूर्व-पश्चिम लांबी १,०७३ मी. व दक्षिणोत्तर रुंदी ५३७ मी. असून याचा घेर सु. दोन किमी. आहे. कोटाची उंची ११ मी. असून त्याची रुंदी दीड मीटर आहे. याला दोन प्रमुख दरवाजे, तीन दिंड्या आणि अकरा बुरूज होते. किल्ल्यात एक बालेकिल्ला असून मांडवी, वखार, बाजार, रुग्णालय, न्यायालय, सभागृह, तुरुंग, मोठा चव्हाटा, कायदेगृह, दोन स्नानगृहे, सेनापती-उपसेनापती यांची निवासस्थाने आणि सात चर्चवास्तू, हे पोर्तुगीजकालीन वास्तु-अवशेष आहेत. या किल्ल्यामध्ये वसईकरांतर्फे नरवीर चिमाजी अप्पांचे स्मारक उभे करण्यात आले आहे. वसई गाव किल्ल्याच्या कोटाबाहेर वसले आहे.

खरे, ग. ह.

वसईचा प्राचीन इतिहास सुस्पष्ट नाही. त्याच्या नजीक सु. दहा किमी.वर दक्षिणेकडे असलेले सोपारा हे गाव प्राचीन काळापासून प्रसिद्ध होते.त्यामुळे वसईकडे फारसे लक्ष गेले नाही. सोपारा येथे अशोककालीन प्रस्तरलेख मिळाला. त्यावरून हे गावही इ.स.पू. तिसऱ्या शतकात मौर्य सत्तेखाली असावे. इ.स. ११०० पर्यंत ते एक व्यापारी बंदर म्हणून प्रसिद्ध होते. काही वर्षे ते शिलाहारांच्या अंमलाखाली होते. पुढे देवगिरीच्या यादवांनी ते तेराव्या शतकात घेतले. त्यांच्या एका जिल्ह्याचे ते मुख्यालय होते. त्यानंतर गुजरातचा मुहम्मद बेगडा (१४५९-१५११) याने वसई व मुंबई यांवर स्वारीचा बेत आखला. येथून कोको, सुपारी, मसाल्याचे पदार्थ इ. निर्यात होत आणि मलबारहून जहाजे येथे येऊन विसावा घेत, असे बार्बोसाने नमूद केले आहे (१५१४). पोर्तुगीजांनी प्रथम येथे १५२६ मध्ये वखार घातली आणि पुढे अनुक्रमे १५२९ व १५३१ मध्ये तीत काही सुधारणा केल्या. त्यावेळी बिभलेश्वर महादेवाचे मंदिर त्यांनी उद्ध्वस्त केले. पोर्तुगीजांच्या वाढत्या सत्तेस पायबंद घालण्यासाठी गुजरातच्या मुहम्मद शाहने दीवचा राज्यपाल मलिक तोकन यास १५३२ मध्ये वसईला तटबंदी बांधण्याची आज्ञा दिली. तेव्हा तेथे बालेकिल्ला आणि खाडीच्या तोंडावर तटबंदी बांधण्यात आली. किल्याच्या संरक्षणासाठी काही दारूगोळा व लष्कर ठेवण्यात आले. साहजिकच मलिक तोकनला पोर्तुगीजांशी संघर्ष करावा लागला. पोर्तुगीजांचा सेनापती नू द कून्या याने १५० गलबते आणि ४०० शिपाई घेऊन किल्ल्यावर हल्ला केला. त्याने किल्ला जिंकून तेथील वास्तू व तटबंदी जमीनदोस्त केली व शस्त्रसामग्री घेऊन गोव्यास प्रयाण केले.

वसईसह सभोवतालचा प्रदेश १५३४ पर्यंत गुजरातचा सुलतान बहादुरशाह याच्या ताब्यात होता. बहादुरशाहवर मोगल बादशाह हुमायून याची काही काळ गैरमर्जी झाली. दोघांनाही पोर्तुगीजांची मैत्री हवी होती. बहादुरशाहने १५३३ मध्ये पोर्तुगीजांना वसई व त्यासभोवतीचा भाग तोडून देण्याचे मान्य केले. तसेच समुद्रातील जहाजांवरील कर त्यांनी वसूल करावा आणि व्यापारी जहाजांनी वसईला येऊन परवाना घेऊन पुढे कूच करावी इ. गोष्टी मान्य केल्या. पोर्तुगीजांच्या ताब्यात किल्ला आल्यानंतर त्यांनी या किल्ल्यास लढाऊ रूप दिले (१५३६) आणि तेथे भरभक्कम भुईकोट किल्ला बांधला तेथील मशिदी पाडून त्या जागी ख्रिस्ती धर्मप्रसारार्थ सेंट जोसेफ कॅथीड्रल बांधले. याशिवाय वसईत तेरा चर्च, पाच कॉन्व्हेन्ट, एक अनाथाश्रम आणि एक इस्पितळ इतक्या धार्मिक इमारती होत्या. पोर्तुगीजांनी तेथे एक भव्य प्रासाद बांधला बालेकिल्ल्याभोवती बुरुजांनी सुसज्ज अशी भक्कम तटबंदी केली. पुढे सु. २०० वर्षे पोर्तुगीजांच्या सत्तेखालील, गोव्याच्या खालोखाल, एक प्रमुख लष्करी ठाणे व समृद्ध व्यापारी बंदर म्हणून वसईचा लौकिक होता. सतराव्या शतकात येथे जहाजबांधणी उद्योग जोरात होता आणि लाकूड व ग्रॅनाइटपेक्षा कठीण असा बांधकामाचा उत्कृष्ट दगड यांची येथून निर्यात होई. याच दगडाचा उपयोग करून त्याकाळी गोव्यातील अनेक चर्चवास्तू बांधण्यात आल्या. तत्कालीन परकीय प्रवाशांच्या वृत्तांतांत ‘वसई हे एक भक्कम तटबंदी असलेले समृद्ध टुमदार बंदर आहे,’ असे वर्णन आढळते.

शिवाजी महाराजांना पोर्तुगीजांच्या उत्तर कोकणातील या प्रदेशाकडे लक्ष देण्यास सवड मिळाली नाही तथापि शेंडीकराविरुद्ध व जुलमी ख्रिस्ती धर्म-प्रसाराविरुद्ध प्रसंगोपात्त कडक धोरण अवलंबिले. त्यांच्यानंतर छत्रपतींच्या गादीवर आलेल्या अनुक्रमे संभाजी व राजाराम यांनाही उत्तर कोकणातील प्रदेशाकडे लक्ष देता आले नाही तथापि छ. संभाजींनी पोर्तुगीजांचा गोव्याच्या परिसरातील काही भाग पादाक्रांत करून त्यांना तहास प्रवृत्त केले (१६८४).

छत्रपती शाहू महाराज यांच्या कारकीर्दीमध्ये (१७०८-४९) हिंदूंच्या धर्मच्छळाच्या बातम्या वारंवार पेशव्यांकडे येऊ लागल्या. तेव्हा पेशव्यांनी गोवे आणि वसई व उत्तर कोकण हा प्रदेश आपल्या ताब्यात घेण्याचा प्रयत्‍न केला. गोव्याची स्वारी इचलकरंजीकर नारायणराव घोरपडे याजवर सोपविली होती पण तीत ते यशस्वी झाला नाही. पुढे वसईचा हा प्रदेश हस्तगत करण्यासाठी चिमाजीअप्पा व त्याच्या हाताखालील मराठे सरदार १७३७ पासून प्रयत्‍न करू लागले. मराठ्यांनी फिरंगणावर अनेक हल्ले केले, पण यश आले नाही. तेव्हा खुद्द चिमाजी अप्पाने दमण, वसई व गोवे या मुलखात १७३९ च्या सुरुवातीस एकाच वेळी फौज पाठवून धुमाकुळास प्रारंभ केला होता. वसईच्या मोहिमेत बुणगे व सैनिक मिळून सु. दोन लाख लोक सहभागी झाले. त्यांत पिलाजी जाधव, मल्हारराव होळकर, राणोजी शिंदे, गणपतराव मेहेंदळे, रामचंद्र पटवर्धन, बापूजी भिवराव, विठोजी कदम, जिवाजीराव विचारे, गंगोजी नाईक आदी मातब्बर सेनापती-सरदार होते. शंकराजी केशव व अणजूरकर मंडळी यांनी त्यांस मोलाची मदत केली. चिमाजी अप्पाने ६ फेब्रुवारी १७३९ रोजी आसपासची वरसोवा, धारावी इ. ठाणी काबीज करून वसईला वेढा दिला. हा वेढा सु.चार महिने चालला होता. अखेर ही मोहीम २३ मे १८३९ रोजी मराठ्यांनी किल्ला हस्तगत केल्यानंतर संपली. त्याअगोदर सात-आठ दिवस वाटाघाटी होऊन तहाची बोलणी सुरू झाली आणि युद्ध थांबले. वसईच्या तहातील प्रमुख अटी अशा होत्या : पोर्तुगीजांची उर्वरित फौज व बुणगे तसेच ख्रिस्ती, हिंदी वा मुसलमान नागरिकांना स्वेच्छेनुसार हत्यारे व संपत्ती यांसह किल्ल्याबाहेर जाण्यास अनुमती द्यावी. त्यांच्यासाठी गलबतांची व्यवस्था करून दारूगोळा व तोफा नेण्यास परवानगी द्यावी. पकडलेले कैदी परस्परांनी मुक्त करावेत आणि स्वखुशीने राहणाऱ्या ख्रिस्ती रहिवाशांना धर्माचरणास परवानगी द्यावी व चर्चची हानी करू नये, तहातील अटींची पूर्तता होईपर्यंत एकमेकांनी आपला अम्मलदार ओलीस ठेवावा. अप्पांनी भाड्याने गलबते घेऊन प्रवासाची सुविधा उपलब्ध करून दिली आणि मराठी अंमलात ख्रिस्ती वास्तूंना कोणीही हात लावला नाही परंतु अप्पाने मारुती मंदिराच्या रूपाने प्रथमच हिंदू देवतेची तेथे स्थापना केली. पुढे त्याचा वज्रेश्वरीचे मंदिर वज्रयोगिणींसह बांधण्याचा मानस होता पण तो पुरा झाला नाही. पुढे नानासाहेब पेशव्याने १७५३-५४ मध्ये ते बांधून पूर्ण केले. सांप्रत तेथे या मंदिरांव्यतिरिक्त मारुती व शिव यांची मंदिरे आहेत.


 या युद्धात मराठ्यांची जबर हानी झाली. तत्संबंधी इतिहासकारांत मतैक्य नाही तथापि पोर्तुगीज कागदपत्रांत मराठ्यांचे २२ हजारांवर लोक मारले गेले आणि पोर्तुगीजांच्या फौजेतील ८५० शिपाई गारद झाले, असे म्हटले आहे. मराठ्यांनी पराक्रमाची शर्थ केली. त्यांच्या युद्धकुशलतेचे वसई मोहीम एक उत्कृष्ट उदाहरण आहे. या युद्धानंतर उत्तरेकडच्या किनाऱ्यावर दीव, दमन आणि रेवदंडा एवढेच किल्ले पोर्तुगीजांकडे राहिले. काही वर्षे सोडता हा किल्ला पेशवाईच्या अखेरीपर्यंत मराठ्यांकडे राहिला. दुसऱ्या बाजीरावाने वसई येथे इंग्रजांबरोबर ३१ डिसेंबर १८०२ रोजी तैनाती फौजेचा तह केला. तो वसईचा तह म्हणून प्रसिद्ध असून या तहाने पेशवा इंग्रजांचा मांडलिक बनला आणि पेशव्याने तैनाती फौजेच्या खर्चासाठी सु. २६ लाखांचा मुलूख त्यांना दिला. पेशवाईच्या अस्तानंतर स्वातंत्र्यापर्यंत वसई इंग्रजांच्या आधिपत्याखाली होती.

वसई शहर हे आधुनिक सुखसोयी व सुविधा यांनी सुसज्ज असलेले एक टुमदार शहर आहे. अलीकडे तेथे लघु-उद्योगधंद्यांची अफाट वाढ झाली आहे. वसई नगरपालिका ही जुनी (स्थापना १८६४) असून शहरातील पाणीपुरवठा, सार्वजनिक आरोग्य, जलनिःसारण, रस्ते आदी सुविधांकडे लक्ष पुरविते. वसई तालुका वैद्यकीय सुविधांबाबत आघाडीवर असून सु. ७० टक्के ग्रामीण भागातून वैद्यकीय सेवा उपलब्ध आहे. शहरात सात रुग्णालये, कुटुंबनियोजन केंद्र आणि सतरा सार्वजनिक दवाखाने आहेत. शिवाय अनेक खाजगी दवाखाने आहेत. तसेच बारा प्राथमिक विद्यालये, पाच उच्च माध्यमिक विद्यालये, दोन कनिष्ठ महाविद्यालये, दोन धंदेशिक्षण संस्था, महाविद्यालय व प्रशिक्षण महाविद्यालय या दोन शैक्षणिक संस्था शिक्षणप्रसाराचे कार्य करतात. त्यांशिवाय तेथे आदिवासींसाठी एक शासकीय आश्रमशाळा आहे. शहरात करमणुकीसाठी तीन चित्रपटगृहे, तीन प्रेक्षागृहे आणि दोन सार्वजनिक ग्रंथालये आहेत. लोकमान्य टिळक उद्यान, नरवीर चिमाजी अप्पा मैदान, तामतलाव मार्केट इ. प्रेक्षणीय स्थळे वसईत आहेत.

वसईच्या परिसरात मच्छीमारीचा धंदा तसेच बाराशे हेक्टर जमिनीवर मिठागराचा व्यवसाय चालतो. तांबूस-पिवळी जांभ्याची मृत्तिका येथे मुबलक प्रमाणात उपलब्ध असल्याने तिच्यापासून विटा, पाईप, फरशा, भांडी इ. वस्तू बनवितात. त्यांची मुंबई व अन्य शहरांकडे निर्यात होते. वसईच्या समुद्रात नुकतेच तेलसाठे मिळाले आहेत. तुंगार पर्वतश्रेणीत बॉक्साइट मिळते. बसीन इलेक्ट्रिक सप्लाय कंपनी ही वीज उत्पादन करणारी एक महत्त्वाची संस्था आहे. केळांसाठी हा तालुका प्रसिद्ध असून आगाशी येथे सुकेळीच्या बागा आहेत.

संदर्भ : 1. Danvers, F. C. The Portuguese in India, 2. Vols, London, 1966.

           2. Government of Maharashtra, Gazetteer of India : Maharashtra State-Thane District, Bombay, 1982.

          3. Majumdar, R. C. Ed. The Maratha Supremacy, Bombay, 1977.

          ४. केळकर, य. न. वसईची  मोहीम, पुणे १९५५.

          ५. पिसुर्लेकर पां. स. पोर्तुगेज-मराठे संबंध, पुणे १९६७.

देशपांडे, सु. र.