वर्षावृक्ष : (पर्जन्यवृक्ष हिं. विलायती शिरीष इं. रेन ट्री, मंकी पॉड, सॅमन लॅ. सॅमानिया सॅमन, पिथेकोलोबियम (एंटेरोलोबियम) सॅमन कुल-लेग्युमिनोजी उपकुल-मिमोजॉइडी). एक मोठा, सु. २०-२७ मी. उंच, सदापर्णी, डौलदार, शोभिवंत व जलद वाढणारा वृक्ष. हा मूळचा मध्य व दक्षिण अमेरिका (व्हेनेझुएला व कोलंबिया) येथील असून तो जमेकामार्गे भारतात आणला गेला आहे. रेल्वे इंधनाकरिता उपयुक्त असे लाकूड यापासून मिळते, म्हणून अमेरिकेतून आणवून प्रथम याची लागवड श्रीलंकेत केली व तेथून त्याचा इतरत्र प्रसार झाला असाही उल्लेख आढळतो. हल्ली तो उत्तर कारवारच्या जंगलात सुस्थित असून शोभा व सावलीकरिता सार्वजनिक उद्यानांतून व रस्त्याच्या दुतर्फा लावलला आढळतो. उष्णकटिबंधात सर्वत्र याच कारणामुळे याची लागवड करतात. याची मुळे फार खोलवर जात नसल्याने सोसाट्याच्या वाऱ्याने किंवा वादळामुळे हा उन्मळून पडतो. मुळांवर कधी कधी वाढणाऱ्या कवकामुळे (बुरशीसारख्या हरिद्रव्यरहित सूक्ष्म वनस्पतींमुळे) ती कुजून जातात व वृक्षाचा आधार कमी होतो.

वर्षावृक्षाची साल गर्द करडी असून पसरट फांद्या व त्यांवरील पर्णसंभार यांमुळे याचा माथा रुंद (सु. ३९ मी. व्यासाच्या) घुमटासारखा दिसतो. याची पाने संयुक्त, पिसासारखी व दोनदा विभागलेली असून त्यांवर ४-८ दलांच्या जोड्या व त्यांवर ३-७ दलकांच्या जोड्या असतात. रात्री नेहमीच, पण क्वचित दिवसा, ती एकावर एक पडून मिटलेली असतात. साधारणपणे पावसापूर्वी ती मिटतात, हा अनुभव घेऊन मलायात ‘रेन ट्री’ हे इंग्रजी नाव त्याला पडले यावरून पडलेले वर्षावृक्ष हे मराठी नाव सार्थ वाटते कारण ह्या वृक्षाला फुलोरे येण्याच्या मोसमात (मार्च ते मेमध्ये व पुन्हा डिसेंबरात) व थोडेफार एरवीही वृक्षाखाली सूक्ष्म फुलांचा सडा पडलेला आढळतो. हे लाल फुलोरे पानांच्या बगलेत येतात ते अनेक (सु. २०) फार लहान फुलांचे गुच्छ असून त्या प्रत्येक फुलात बारीक नळीसारखा हिरवट संवर्त व पिवळट किरमिजी पाकळ्यांचा तुतारीसारखा पुष्पमुकुट असतो शिवाय अनेक केसरदले (पुं-केसर) अर्धी लाल व अर्धी पांढरी असून मध्यभागी एकच किंजदल (स्त्री-केसर) असते. केसरदलांचे सूक्ष्म व नाजूक तंतू झुबकेदार असून फुलांतील तोच भाग उठून दिसतो फुले सुकल्यावर खाली पडलेल्या तपकिरी सड्यात मुख्यतः केसरदलेच असतात [⟶ फूल]. एप्रिलमध्ये झाडांवर अनेक गर्द तपकिरी, जाड, काहीशा चपट्या, खरबरीत, न तडकणाऱ्या व मांसल शिंबा (शेंगा) येतात त्यांत चिंचेप्रमाणे गोडसर मगज असून प्रत्येक शिंबा सु. १५-२० X १.९ सेंमी. असते व तीत ५-१०, पिंगट, कठीण व चकचकीत बिया असतात. घोडे, गुरे, खारी, शेळ्या व माकडे शिंबा आवडीन खातात बिया बहुधा इजा न होता शरीरांतून बाहेर पडतात. दुष्काळात गरीब लोकही ही फळे खातात. पाला गुरांना चारतात. बियांपासून नवीन रोपे बनतात व त्यांचा उपयोग लागवडीसाठी करतात. या वृक्षांचे लाकूड हलके व कमी प्रतीचे असून जळणालाही योग्य नसते. ह्या वृक्षाची इतर सामान्य शारीरिक लक्षणे ⇨ लेग्युमिनोजी (शिंबावंत) कुलातील मिमोजॉइडी अथवा शिरीष उपकुलात वर्णन केल्याप्रमाणे असतात. ⇨ शिरीष वृक्षाप्रमाणे हा शोभिवंत असून कित्येक लक्षणांत दोन्हींत साम्य आढळते. 

संदर्भ : 1. Blatter, E. Milliard, W.S. Some Beautiful Indian Trees, Bombay, 1954.

           2. Cowen, D.V. Flowering Trees and Shrubs in India, Bombay, 1965.

परांडेकर, शं. आ.

वर्षावृक्ष