वर्धमान पिंपळी : एक, दोन, तीन, पाच, सात किंवा दहा पिंपळ्या (फळे), एका वेळी वय, बल, रोगबल, ऋतू यांना अनुसरून प्रथम घेऊन त्याच संख्येने १०-१४ किंवा २१ दिवसांपर्यंत वाढवीत सेवन करून पुन्हा त्याच संख्येने कमी कमी करून अखेरीस थांबवणे या पिंपळीच्या प्रयोगाला ‘वर्धमान पिंपळी’ म्हणतात.

पिंपळ्या दुधात किंवा पाण्यात वाटून किंवा दुधाच्या तिप्पट पाणी मिसळून त्यात शिजवून वाटून योग्य वाटल्यास साखर घालून सेवन कराव्यात. पथ्य म्हणून केवळ दूधभात सेवन करावा. वातरक्त, विषमज्वर, अरोचक, पांडुरोग, प्लीहोदर, मूळव्याध, खोकला,  श्वास, सूज, क्षय, हृद्रोग, उदर जीर्णज्वर मंदाग्‍नी या रोगांवर हा उपाय उपयुक्त आहे. पिंपळीच्या सगळ्या फळांचे सर्व घटक सेवनात आले पाहिजेत. औषध शरीराशी हळूहळू क्रमाने सात्म्य होत मोठ्या प्रमाणात शरीराने औषध आत्मसात करून रोगनाश करावा. औषध एकदम बंद करण्याचे अनिष्ट परिणाम होऊ नयेत. शरीरधातूंचे विशुद्धतर घटकच निर्माण करणारा आहार असावा.

जोशी, वेणीमाधवशास्त्री