वर्णविद्वेष : आधुनिक काळात, विशेषतः दक्षिण आफ्रिकेत, तेथील शासनाने प्रचारात आणलेली वांशिक पृथक्‌वासनाची एक पद्धती. तिचा अधिकृत उद्देश देशातील विविध वांशिक गटांचा स्वतंत्र रीत्या विकास करणे, हा होता. ‘अपार्थाइट’ या संज्ञेचा अर्थ ‘अलगता’ असा असून तिला मराठी प्रतिशब्द वर्णविद्वेष असा आहे. वांशिक पृथक्‌वासन आणि गोऱ्यांचे वर्चस्व, या दोन बाबी दक्षिण आफ्रिका प्रजासत्ताकात परंपरागत रीत्या १९४८ पूर्वीपासूनच अस्तित्वात होत्या परंतु १९४८ च्या सार्वत्रिक निवडणुकीत डॅन्यिअल एफ्. मॅलन याच्या नेतृत्वाखालील आफ्रिकेतर नॅशनॅलिस्ट पक्ष सत्तेवर आला आणि मॅलन पंतप्रधान झाला. त्याने अपार्थाइट हे देशाचे अधिकृत धोरण ठरविले. परिणामतः गोऱ्यांचे-जुन्या डच वसाहतवाल्यांच्या वंशजांचे – राजकारणात वर्चस्व वाढले आणि शिक्षण, निवास, राजकारण या सर्व क्षेत्रांत गोरेतरांना कायद्याने अलग ठेवण्यात आले. प्रार्थनागृहे, विद्यालये, शुश्रूषागृहे, नाट्यगृहे, वाहतुकीची सार्वजनिक साधने इत्यादींतून मिळणाऱ्या सुविधा-सवलती काळ्या लोकांना-निग्रोंना-आफ्रिकी जमातींना बंद करण्यात आल्या. समान पातळीवर दैनंदिन व्यवहारात त्यांच्याशी कोणताही संपर्क नको, ही त्यामागची भूमिका होती. आपाततः काळा-गोरा हा वर्णभेद विकोपास गेला. ह्या वर्णविद्वेषाचा हेतू भिन्न वंशांत अलगता निर्माण करणे तसेच गोऱ्यांना काळ्यांपासून अलग पाडणे, शिवाय काळ्यांमध्येही पुन्हा अमुक एका वंशाचा वा जातीचा म्हणून भेद करणे, असा होता. साहजिकच त्यांमधून बांतूंच्या भिन्न वांशिक गटांत दूरत्व आले आणि शहरांतून हा भेद तीव्रतर झाला. या संदर्भातील १९५० व १९६८ च्या समूह क्षेत्रीय कायद्यांनुसार पाच लाख काळ्या आफ्रिकनांचे शहरांतून ग्रामीण राखीव भागात सक्तीने स्थलांतर करण्यात आले.

वंशभेद अगर वर्णभेद मुळात जरी जैविक तत्त्वावर आधारलेला असला, तरी वंशद्वेष अगर वर्णद्वेष सामाजिक व मानसिक भूमिकांतून उद्‌भवला आहे कारण गोऱ्या विद्वानांनी एकेकाळी प्रतिपादिलेले व सामान्य जनांमध्ये आजही रूढ असलेले वंश व संस्कृती यांचा अन्योन्य संबंध हे तत्त्व होय. इतिहास आणि प्राचीन परंपरा यांवर आधारित ही मूलभूत कल्पना आहे. १६५२ मध्ये दक्षिण आफ्रिका खंडात वसाहतीकरणास प्रारंभ झाला, त्यावेळेपासून वर्णविद्वेषाची प्रवृत्ती गोऱ्या  लोकांत वास करीत होती.

मूलतः मानवप्राण्यांमध्ये वांशिक भेदाभेद असतो आणि प्रत्येक वंशाची स्वतंत्र संस्कृती व काही मूलभूत वैशिष्ट्ये असतात. या सामाजिक व धर्मशास्त्रीय धारणेतून पृथक्‌वासनाची प्रवृत्ती उदयास आली. तीतून काळ्या लोकांची संस्कृती हीन व अप्रगत आहे आणि आदिवासींची संस्कृती त्याहूनही कनिष्ठ आहे, हे अपसमज दृढतर झाले. साहजिकच काळ्या लोकांना कनिष्ठ मानव समजून त्यांना गोऱ्या लोकांच्या सुखसोयी नाकारण्यात आल्या. अमेरिकेची संयुक्त संस्थाने, दक्षिण आफ्रिका खंड, दक्षिण ऱ्होडेशिया व ग्रेट ब्रिटन यांमध्ये निग्रोंना व काळ्या लोकांना हीन लेखण्यात येऊ लागले. गोऱ्या  लोकांच्या सामूहिक जीवनापासून त्यांना अलग ठेवण्यात आले.

आंतरविवाहाला श्वेतवर्णियांचा विरोध असून वर्णसंकर आपल्या संस्कृतीचा नाश करेल, अशी त्यात भावना होती. श्वेतवर्णियांच्या राजकीय वर्चस्वामुळे व आर्थिक सुबत्तेमुळे विसाव्या शतकाच्या मध्यापर्यंत हे पृथक्‌वासन काळ्या लोकांना सहन केले मात्र त्यानंतर शिक्षण, उद्योग-व्यवसाय, कलाकौशल्य इ. क्षेत्रात गोरेतर लोक प्रगतिपथावर आल्यामुळे आणि निग्रो, आफ्रिकन मूळवासी यांपैकी अनेकांनी ख्रिस्ती धर्म अंगीकारल्यामुळे ते स्वतःला सांस्कृतिक-सामाजिक दृष्ट्या कमी मानावयास तयार होईनात. शिवाय त्यांच्यांत सामाजिक-राजकीय जागृतीही आली. आफ्रिकेतील अनेक देश स्वतंत्र झाले आणि वर्णविद्वेषास कडवा विरोध होऊ लागला. अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांतील काही घटक राज्यांमधून वर्णभेदाला कायद्याने बंदी घातली आहे. संयुक्त राष्ट्रे या संघटनेने मानवी हक्कांच्या घोषणापत्रकात वर्णविद्वेष, वंशभेद इ. अमान्य केले असून त्यांविरुद्ध कायदाही केला आहे तसेच जागतिक मतही वर्णविद्वेषाविरुद्ध तयार झाले आहे. अमेरिकेत निग्रो लोकांच्या वतीने मार्टिन ल्यूथर किंग याने अहिंसात्मक चळवळीद्वारा वर्णविद्वेषाविरुद्ध आवाज उठविला. द. आफ्रिका प्रजासत्ताकात नेल्सन मंडेला यांच्या नेतृत्वाखालील आफ्रिकन नॅशनल काँग्रेसने अनेक लढे देऊन सवलती मिळविल्या असून आंतरराष्ट्रीय स्तरावर वर्णविद्वेष हळूहळू नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. गोऱ्या  लोकांमधील काही सुशिक्षित व प्रतिष्ठित पुढाऱ्यांनी त्यास पाठिंबा व्यक्त केला आहे.

संदर्भ : 1. Banerjee, Brojendra Nath, Apartheid : A Crime Against Humanity, London, 1987.

           2. Hoagland, Jim, South Africa : Civilizations in Conflict, Boston, 1972.

           3. Rhoodie, N. J. Apartheid and Racial Partnership in Southern Africa, Pretoria, 1969.

           4. UNESCO, Pub. Apartheid : It’s Effects on Education, Science, Culture and Information, New York, 1972. 

                                                                                                                                                               कुलकर्णी, मा. गु.