वर्ख : धातूच्या पापुद्र्यासारख्या अतिशय पातळ पटलाला वर्ख म्हणतात. वर्ख सामान्यपणे ०·००५ सेंमी. वा त्याहून पातळ असतो. वर्ख एका धातूचा, मिश्रधातूचा अथवा अनेक धातूंची पटले एकावर एक रचून बनविलेला अनेक पदरीही असतो. वर्ख सामान्यतः वजनाला हलका, अक्रिय, लवचिक व अर्धदृढ असून त्यावर सहसा ओरखडे उमटत नाहीत. तसेच वास, वाफ, चव, द्रव, वायू, ग्रीज, वसा, प्रकाश इत्यादींना वर्ख मुख्यत्वे वस्तू वा पदार्थ लपेटण्यासाठी किंवा पिशव्या, पाकिटे यांसारख्या आवेष्टनांसाठी वापरतात.
सोने व चांदी यांचा वर्ख फार पूर्वीपासून तयार करण्यात येत असून सोन्याचा वर्ख मुख्यत्वे इतर धातूंवर मुलामा देण्यासाठी वापरतात. कधीकधी चिनी मातीच्या व काचेच्या वस्तूंवरील सुशोभनाच्या नक्षीसाठीही सोन्याचा वर्ख वापरतात. चांदीचा वर्ख पानांचे विडे, मेवामिठाई आणि अन्य खाद्यपदार्थ सजविण्यासाठी, तसेच दंतवैद्यकात व विद्युत् विलेपनातही वापरतात.
पूर्वी सामान्यपणे शिशासारख्या मऊ व प्रसरणशील धातूचा वर्खच मोठ्या प्रमाणावर तयार करीत. कागदाचे अस्तर लावून तो चहाची खोकी व पुडे, सिगारेटची पाकिटे, खाद्यपदार्थ, चॉकोलेट, तंबाखू वगैरेंची आवेष्टने यांसाठी तसेच खिसमिस वृक्षावरचे शोभिवंत दागदागिने, डाखकाम, विद्युत् धारित्र वगैरेंमध्ये वापरीत. नंतर कथिलाचा वर्ख वापरात आला. मोठ्या प्रमाणावर सर्वात प्रथम हाच वर्ख बनविण्यात आला. तो शिशाप्रमाणे विषारी नसला, तरी महाग असल्याने कधीकधी शिशाच्या वर्खाच्या दोन्ही बाजूंवर कथिलाच्या वर्खाचे अतिशय पातळ आवरण देऊन अनेक पदरी वर्ख बनवीत. शिवाय विद्युत् धारित्रात वापरण्यासाठी ८३% कथिल, १५% शिसे आणि २% अँटिमनी असलेल्या मिश्रधातूचा वर्ख बनवीत. तांबे व जस्त यांचे वर्खही तयार करीत आणि दागदागिन्यांच्या सुशोभनासाठी ते वापरीत. आता मात्र या सर्वांची जागा ॲल्युमिनियमाच्या वर्खाने घेतली असून तोच सर्रास सर्वत्र वापरला जातो.
लाटता येण्यासारखा कोणत्याही धातूपासून वर्ख बनविता येतो. मात्र वर्ख बनविण्यासाठी तन्य व प्रसरणशील धातू सोयीची असते. धातू जेवढी अधिक तन्य व वर्धनशील असते तेवढा अधिक पातळ वर्ख तयार करता येतो. उदा., सर्वांत तन्य असलेल्या सोन्याचा ०·०००००७५ सेंमी. जाडीचा वर्ख बनविता येतो. वर्खासाठी धातू शुद्धही असावी लागते. कारण अशुद्धीमुळे धातूची तन्यता कमी होते. वर्ख बनविण्याच्या दृष्टीने धातूचे पुनर्स्फटिकीभवन तापमानही महत्त्वाचे असते. सोने, चांदी, शिसे यांचे पुनर्स्फटिकीभवन तापमान सर्वसाधारण कोठी तापमानापेक्षा कमी असते. यामुळे लाटून अथवा ठोकून या धातूच्या कणांच्या आकारात होणारा बदल पुनर्स्फटिकीभवनामुळे लगेच नाहीसा होतो. यामुळे वर्खाचे तुकडे कठीण फाटत नाहीत आणि सलग वर्ख बनविता येतो.
सोन्याचांदीचे वर्ख सर्वसाधारणपणे घरगुती पातळीवर व मुख्यत्वे लाकडी हातोड्याने ठोकून तयार करतात. याकरिता अतिशुद्ध सोन्याच्या वा चांदीच्या पत्र्याचे छोटे तुकडे घेतात. त्यांच्या मध्ये चिवट कागदाचे वा शॅमॉय चामड्याचे तुकडे घालून एकावर एक रचतात. नंतर या चवडीवर लाकडी हातोड्याने ठोके देऊन वर्ख तयार करतात. प्रत्येक ठोक्यानंतर चवड फिरवितात. यामुळे पुढील ठोका दुसऱ्या जागी बसून पत्रा प्रसरण पावत जातो. या पद्धतीने दीर्घ काळाने हळूहळू प्रसरण पावत जाऊन पत्र्यापासून अतिशय पातळ असे वर्खाचे मोठे तुकडे तयार होतात. भारतात सोन्यचांदीच्या वर्खाची निर्मिती मुख्यत्वे वाराणसी येथे होते. सर्वाधिक वर्ख ॲल्युमिनियमापासून बनवितात. शुद्ध ॲल्युमिनियम तन्य व धातुरूपणक्षम असून तीपासून पुढील पद्धतीने वर्ख तयार करतात. ॲल्युमिनियमाच्या पत्र्याचे भेंडोळे एका मोठ्या खोलीसारख्या भट्टीत सु. २५०° सें. पर्यंत तापवून एकदम थंड करतात. यामुळे धातू मऊ होऊन सहज प्रसरण पावते व ताणली जाते. नंतर पत्रा लाटण यंत्राने लाटतात. लाटणक्रिया केली जाताना पत्र्यावर उभ्या दिशेत दाब दिला जातो आणि आडव्या दिशेत तो तोणला जातो. या लाटण यंत्राची लाटणी अतिशय टणक व कठीण पोलादाची बनविलेली असतात. त्यांचा पृष्ठभाग अत्यंत सपाट, गुळगुळीत व चकचकीत असतो. यामुळे त्यांच्यातून लाटल्या गेलेल्या पत्र्यापासून अतिशय चमकदार वर्ख तयार होतो. पृष्ठ क्र. ११०१ वरील छायाचित्रात अशा एका कारखान्यातील लाटण यंत्र व चकचकीत वर्खाची भेंडोळी दिसत आहेत. अशा कारखान्यातील वातावरण अतिशय स्वच्छ असावे लागते. तेथे धूळ वा केरकचरा अजिबात नसतो. धुळीच्या कणांमुळे लाटणक्रिया होताना वर्खाला छिद्रे पडतात. गरजेनुसार वर्खाची जाडी नियंत्रित करतात. ॲल्युमिनियमाचा ०·०००५ सेंमी. पर्यंत जाडीचा वर्ख बनविता येतो. अधिक पातळ वर्ख बनविण्यासाठी दोन पत्रे लाटून मग दोन पटले अलग करतात, तर अधिक चिवट वर्ख बनविण्यासाठी ॲल्युमिनियमाच्या मिश्रधातूंचे पत्रे वापरतात. ॲल्युमिनियमाचा वर्ख गंध वा रुची नसलेला, न गाजणारा असून त्याच्यातून पाणी वा अन्य द्रव, ग्रीज वगैरे पलीकडे जाऊ शकत नाही. त्याच्यावर साधी व रंगीत छपाई करता येते तसेच उठावदार नक्षी काढता येते. तो इतर द्रव्यांना जोडता येतो आणि त्याच्यावर प्लॅस्टिकाचा पातळ लेपही देता येतो. उलट अन्य द्रव्यांच्या पृष्ठभगावर ॲल्युमिनियमाचा पातळ थर देऊनही त्याचा वर्खासारखा वापर करतात (उदा., ॲल्युमिनियमाचा पातळ थर असलेले पॉलिएस्टर पटल).
सुके, ओले व गोठविलेले अन्न आणि खाद्यपदार्थ, क्ष-किरण छायाचित्रणासाठी वापरण्यात येणाऱ्या फिल्म, औषधी गोळ्या वगैरे अन्य वस्तूंसाठी आवेष्टन म्हणून ॲल्युमिनियमाचा वर्ख वापरतात. शिवाय विद्युत् धारित्रासारखी उपकरणे, नियंत्रण प्रणाली, खेळणी, चमक दिवे, दुधाच्या बाटल्यांची बुचे, डबाबंदीकरण, शिळामुद्रण इत्यादींमध्ये हा वर्ख वापरतात. रत्नांची आणि दागदागिन्यांची रंगछटा व चमक यांना उठाव येण्याकरिताही हा वर्ख वापरतात.
पहा : लाटण, धांतूंचे,
आळतेकर, वि. अ. ठाकूर, अ. ना.
“