वरंगळ : आंध्र प्रदेश राज्यातील त्याच नावाच्या जिल्ह्याचे ठिकाण व पुरातत्त्वीय अवशेषांसाठी प्रसिद्ध असलेले एक स्थळ. हैदराबादच्या ईशान्येस सु. १४० किंमी. वर दक्षिण-मध्य रेल्वेच्या विजयवाडा-हैदराबाद विभागात हे वसले आहे. वरंगळजवळ सहा किमी. अंतरावर असलेले अनमकोंडा हे उपनगर सांप्रत या शहरातच अंतर्भूत होते. त्यामुळे यास हनमकोंडा-वरंगळ असेही म्हणतात. त्याची लोकसंख्या ३,३६,०१८ (१९८१) होती. प्राचीन ओरुकल व एकसिलनगरम् म्हणजेच वरंगळ होय. याशीवाय अनूम-कुण्डपुर, अनूमकुण्डपुट्टन, कोरूनकुल, वेणकटक, अक्षलिनगर या भिन्न नावांनी त्याचा उल्लेख आढळतो.
वरंगळचा अतिप्राचीन इतिहास सुस्पष्ट नाही. पूर्व चालुक्य, राष्ट्रकूट, कल्याणीचे चालुक्य व काकतीय या घरण्यांच्या आणि त्यानंतर बहमनी, कुत्बशाही, मोगल आणि अखेर निजाम (असफझाई) या क्रमाने या प्रदेशाचा इ. स. ५ व्या शतकापासून ते २० व्या शतकाच्या मध्यापर्यंतचा इतिहास ज्ञात होतो. काकतीय राजांच्या वेळी (१०७५–१३०३) त्यांची राजधानी प्रथम अनमकोंडा (हनमकोंडा) येथे होती. पुढे गणपती (कार. ११९९–१२६१) राजाने ती सध्याच्या रेल्वेस्थानकाच्या पूर्वेस असलेल्या वरंगळ येथे हलविली. १३१० मध्ये मलिक काफूर याने शेवटचा काकतीय राजा प्रतापरुद (कार. १२९५–१३२३) याचा पराजय करून त्याच्याकडून जबर खंडणी वसूल केली. अखेर उलुघखानाने १३२३ मध्ये काकतीयांचे राज्य खालसा केले. हैदराबाद संस्थान विलीन होईपर्यंत (१९४९) हा प्रद्श असफझाई निजामांच्या अखत्यारीत होता. स्वातंत्र्योत्तर काळात त्याचे जिल्ह्यात रुपांतर झाले आणि वरगंळ हे त्याचे शासकीय मुख्यालय करण्यात आले.
काकतीय राजांच्या वेळी अनमकोंडा-वरंगळ येथे अनेक प्रासाद, मंदिरे आणि तोरणे बांधली गेली. तसेच वरंगळ येथे एक भुईकोट किल्ला बांधला. त्याचे काही अवशेष उत्खननांद्वारे अलीकडे उपलब्ध झाले आहेत. अनमकोंडा येथे काही शिलालेख उपलब्ध झाले आहेत. येथे एक सहस्त्रस्तंभी मंदिर असून ते तेथील शिलालेखानुसार पहिला रुद्र (कार. ११५०–११९५) याने चालुक्य वास्तुशैलीत ११६३ मध्ये बांधले. त्याचे विधान तारकाकृती असून त्याला तीन गर्भगृहे (शिव, विष्णू व सूर्य) आहेत मात्र सध्या कोणत्याच गर्भगृहात मूर्ती नाही. मूळ मंदिर एक मीटर उंड दगडी चौथऱ्यावर बांधलेले आहे. मंडपातील सर्व स्तंभ अलंकृत असून गणेशपट्टीवरील मकर तोरणे आणि स्तंभांच्या तीरशिल्पांत विविध मुद्रांतील नृत्यांगनांच्या अनेक मूर्ती आढळतात. त्यांत काही अवघड नृत्यमुद्रा आहेत. मोठी कर्णफुले, मोजके पण वैशिष्ट्यपूर्ण अलंकार ल्यालेल्या या नृत्यांगनांची धारदार नाके, टोकदार हनुवटी, धनुष्याकार भुवया, उन्नत उरोभाग आणि सिंहकटी ही स्त्रीसौंदर्याची पारंपरिक लक्षणे या शिल्पांत भारदारपणे दाखविली आहेत. या मंदिरासमोर नंदी मंडपात एकसंध दगडात कोरलेली नंदीची भव्य मूर्ती आहे. रेल्वेस्थानकाच्या पूर्वेस सु. दोन किमी. वर वरंगळचा भुईकोट किल्ला आहे. याला पूर्वी तीन तट होते. बाहेरचा तट सु. ४९ किमी. लांबीचा होता असे म्हणतात. त्यानंतरचा दुसरा तट नैसर्गिक अशा खुज्या टेकड्यांचा आहे आणि अगदी आतील तट भक्कम ग्रॅनाइट दगडाचा असून बालेकिल्ल्याला चार भक्कम दरवाजे आहेत. त्याबाहेर सिंहाचे शिल्प आढळते. तटाच्या आतील बाजूने पायऱ्या बांधलेल्या आहेत. तटावर चढून येणाऱ्या शत्रूला मारामारी करून परतवून लावण्याच्या दृष्टीने या पायऱ्यांवर सैनिकांच्या रांगा उभ्या करीत. यांमुळे शत्रूस किल्ल्यात येण्यास प्रतिबंध होई. मूळ किल्ल्याच्या चारी बांजूंस ग्रॅनाइट दगडांत बांधलेली कमानी-वजा तोरणे आहेत. त्यांना कीर्तिस्तंभ म्हणतात. यांवर नक्षीकाम असून वरच्या दोन्ही बाजूंस कडेला हंसाचे शिल्प आहे. त्याखाली एक तुळई सोडून शरभाच्या मूर्ती आहेत. किल्ल्यात झालेल्या उत्खननात काही शिल्पे सापडली. ती दिल्लीच्या राष्ट्रीय वस्तुसंग्रहालयात ठेवली आहेत. त्यांत एक मकर तोरण असून त्याच्या दोन्ही बाजूंस मकर शिल्पे आणि मधोमध मृत्यमग्न शिवाची मूर्ती आहे. त्याशेजारी ब्रह्मदेव व विष्णू यांच्या मूर्ती खोदलेल्या आहेत. दुसऱ्या एका शिल्पपट्टात हंसावर आरूढ झालेली, नृत्यमुद्रेतील, उभी सरस्वतीची मूर्ती आहे. तिच्या बाजूंस चामरधारी आणि शेजारी इंद्र, शक्तिदेवता इ. च्या मूर्ती खोदल्या आहेत. यांशिवाय उत्खननात काही अलंकृत छते (वितान) आणि स्तंभ मिळाले. ते सांप्रत हैदराबादच्या वस्तुसंग्रहालयात ठेवले आहेत. येथील तोरणे सांचीच्या तोरणांशी सादृश्य दर्शवितात. पुढे विजयानगरनेही हीच परंपरा उचलली असावी असे दिसते. किल्ल्यात भग्न स्थितीतील शंकराचे (शंभुलिंगेश्वर) व रंगनाथस्वामी यांची मंदिरे आहेत. शंकराच्या मंदिराजवळ सु. आठ मीटर व्यासाची रंगशिळा पडली आहे.
किल्ल्याबाहेरील परिसरात भद्रकाली, पद्माक्षी व सिद्धेश्वर अशी तीन स्वतंत्र मंदिरे असून भद्रकालीचे मंदिर प्राचीन आहे. ते एका टेकाडावर बांधलेले आहे. त्याच्या गर्भगृहात ३ मी. उंचीची अष्टभुजा देवीची भव्य मूर्ती आहे. अष्टभुजा राक्षसावर बसली असून ती बहुधा काकतीय वंशाची कुलदेवता असावी. या मंदिराजवळ एक सरोवर आहे. गावात हजरत सय्यद शहा यांचा दर्गा, हजरत अब्दुन नबी शहांची कबर आणि सीता-रामस्वामी मंदिर इ. अन्य वास्तू आहेत.
वरंगळ शहरात आरोग्य, स्वच्छता, पाणीपुरवठा, वैद्यकीय सेवा इ. सुविधांची व्यवस्था नगरपालिकेतर्फे (स्थापना १८९९) करण्यात येते. जिल्ह्याची सर्व प्रशासनीय कार्यालये येथे आहेत. सर्व विषयांतील उच्च शिक्षणाच्या सोयी व सुविधा वरंगळमध्ये उपलब्ध आहेत. त्यासाठी तीन महाविद्यालये (एक शासकीय महिला महाविद्यालय), एक प्रशिक्षण महाविद्यालय व सहा शिक्षक-प्रशिक्षण विद्यालये आहेत. यांशिवाय प्रादेशिक अभियांत्रिकी महाविद्यालय आणि अनंत-लक्ष्मी आयुर्वेदिक महाविद्यालय अनुक्रमे अभियांत्रिकी व वैद्यकीय शिक्षणासाठी आहेत. शिवाय शहरात एक औद्योगिक शाळा व प्रयोगिक कृषी विद्यालय आहे. शहरात महात्मा गांधी मेमोरियल हॉस्पिटल, शासकीय रुग्णालय, क्षय रुग्णालय इ. प्रसिद्ध रुग्णालये आहेत.
वरंगळ ही मोठी बाजारपेठ असून शहरात हातमाग उद्योग तसेच कातडी कमविण्याचा मोठा धंदा चालतो. वरंगळचे तलम सुती व रेश्मी कापड प्रसिद्ध असून येथील सतरंज्या आणि गालिचे निर्यात होतात. यांमुळे वरंगळ हे पर्यटकांचे आकर्षण झाले आहे.
संदर्भ : 1. Rajagopal, M. V. Ed. Andhra Pradesh Districr Gazetteers : Warangal, Hyderabad, 1976.
2. Sivaramamurti, Calambur, The Art of India, New York, 1977.
3. Toy, Sidney, The Fortified Cities of India, London, 1965.
4. Yazdani, Ghulam, Ed. Early History of the Deccan, Parts Vii-XI, London, 1960.
देशपांडे, सु. र.
“